१५ ऑगस्ट १९७५ रोजी ‘शोले’ प्रदर्शित झाला. त्याला ४० वर्षे होत आहेत. तो प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट समीक्षकांनी ‘शोले’वर झोंबरी टीका केली होती. पहिले दोन आठवडे तर त्याचे बॉक्स ऑफिसवरही थंडेच स्वागत झाले होते. परंतु ज्यांनी तो पाहिला त्यांच्या प्रशंसेने नंतर या चित्रपटाने जी उचल खाल्ली, ती पुढे जाऊन त्याने चक्क इतिहासच रचला. ‘पाश्चात्य मसालापट’ अशी जरी त्याची संभावना झाली असली तरी पुढे हा चित्रपट ‘फिल्म ऑफ द मिलेनियम’ (बीबीसी इंडिया), ‘बेस्ट ऑफ बॉलीवूड’ (‘टाइम’ मॅगझिन) म्हणून गौरवला गेला. एकाच वेळी १०० चित्रपटगृहांत रौप्यमहोत्सव, ६० चित्रपटगृहांमध्ये सुवर्णमहोत्सव, तसेच मिनव्‍‌र्हा थिएटरमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ चाललेला पहिला चित्रपट असे अनेक विक्रम त्याने केले. ‘शोले’वर ‘शोले- अ कल्चरल रीडिंग’ आणि ‘शोले- द मेकिंग ऑफ अ क्लासिक’ ही अभ्यासपूर्ण पुस्तकेही लिहिली गेली आहेत. २०१४ साली ‘शोले’ थ्रीडी रूपात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. ‘शोले’च्या चाळीशीनिमित्त वेगवेगळ्या पिढय़ांतील प्रेक्षकांना काय वाटते, हे सांगणारी मनोगते..

सिनेमा पाहण्याची मनापासून आवड असलेल्यांपैकी मी नाही; पण चांगले चित्रपट पाहायला मलाही आवडतं. कुटुंबीयांपैकी किंवा मित्रांपैकी कोणी एखाद्या चित्रपटाची शिफारस करतं आणि तो चित्रपट मी पाहतो. ‘शोले’बद्दल मात्र असं झालं, की तो प्रदर्शित होऊन लोकप्रिय झाला तरी सात-आठ महिने तो पाहायचा राहून गेला होता. नंतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या किंवा समारंभाच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून या चित्रपटातील लोकप्रिय गाणी जशी पुन:पुन्हा ऐकू येतात तसे भल्यामोठय़ा आवाजातले ‘शोले’चे संवाद ऐकू येऊ लागले. गब्बरसिंगची आवाजाची जोरदार फेक असलेले ‘अरे ओ सांबा..’ यासारखी वाक्ये तर त्याकाळी अनेकांना पाठच झाली होती.
..शेवटी मी ‘शोले’ पाहिला. चित्रपटाची कथा एका इंग्रजी चित्रपटाच्या कथेची थोडी उसनवारी करून तयार झाल्याचेही नंतर ऐकले. चित्रपट पाहताना मात्र कथाही आवडली. हिंसेचे आणि क्रौर्याचे आघात झेलणारे गावप्रमुखाचे कुटुंब शेवटी अमिताभ आणि धर्मेद्र या (चित्रपटातल्या) धंदेवाईक रक्षकांना आमंत्रित करून गावाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतात. धर्मेद्र आणि टांगेवाल्या हेमामालिनीचा प्रणय आणि दरोडेखोरांच्या टोळीने जिचा पती मारला व जी त्याच हल्ल्यात अपंग झालेल्या सासऱ्याला सोबत करते आहे, अशी जया भादुरी अशा पात्रांच्या भोवती हे कथानक विणलेले आहे.
आज माझ्या लक्षात आहे तो ‘शोले’तला संजीवकुमारचा अप्रतिम अभिनय आणि जया भादुरी आणि अमिताभ यांनी त्यांच्यात निर्माण झालेल्या अतिशय तरल प्रेमभावनेचे केलेले संयमित प्रकटीकरण! त्याचबरोबर आठवतो आहे तो आपला आवाज, आपले आकारमान यांच्या जोडीला आपल्या देहबोलीतून अमजद खानने (गब्बरसिंगने) निर्माण केलेला हिंसेचा थरार. ‘शोले’ला आता चाळीस वर्षे होऊन गेली. फारसे चित्रपट न पाहणाऱ्या माझ्यासारख्यांच्याही स्मरणात अजून तो का आहे? उत्तम छायाचित्रण असल्यामुळे? प्रमुख भूमिका करणाऱ्यांच्या अभिनयगुणामुळे? की त्यातल्या संवादांमुळे? िहदी सिनेमा हा ज्यांच्या भावजीवनाचा भाग झालेला असतो, त्या प्रेक्षकांना गब्बरसिंगने उच्चारलेल्या त्यातल्या शब्दांच्या फेकीची मोहिनी असणे स्वाभाविक होते; पण इतरांच्या मनावरही ती होती.. याचे काय कारण असावे? लोकप्रिय गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकांसारखीच ‘शोले’तल्या संवादांच्या ध्वनिमुद्रिकेचीही तडाखेबंद विक्री का झाली? इतरांना घाबरवू शकणाऱ्या सामथ्र्यवानाविषयीचे दुबळ्या माणसांच्या मनात खोलवर दडून असलेले आकर्षण हे त्याचे कारण असावे.
चित्रपटातल्या प्रणयदृश्यांत जसे काही प्रेक्षक स्वत:ला पाहण्याचा प्रयत्न करतात, तसेच ‘शोले’तल्या असहाय नागरिकांत छोटय़ा-मोठय़ा हिंसाचाराच्या भीतीखाली वावरणारे आजचे प्रेक्षक आत्मानुभव घेत असतील. पोलिसांकडून संरक्षण होत नाही, हा आपला अनुभव या चित्रपटातही पाहत असतील आणि दुष्टांचे निर्दालन करणाऱ्या अमिताभ आणि धर्मेद्र यांच्या निर्भयतेने सुखावत असतील.
एखादा चित्रपट किंवा एखादे नाटक आपल्याला का आवडले, याची अशी विभागश: चिकित्सा करण्यासाठी नक्की कारण शोधणे उपयोगी पडतेच असे नाही. त्या कलाकृतीचे समग्र दर्शन आपल्याला भावलेले असते. त्यातले भव्य, उत्कट चाळीस वर्षांनंतरही आपल्या स्मरणात कायम असते. थोडेफार डावे वाटले असेल ते विस्मरणात वाहून गेलेले असते.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी