सिद्धार्थ खांडेकर

siddharth.khandekar@expressindia.com

विविध क्रीडा क्षेत्रांतील घटना-घडामोडींचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक बाजूंनी विश्लेषण करणारे आणि खेळाडूंच्या मनोकायिक प्रश्नांच्या अंतरंगात डोकावणारे सदर..

पाचऐवजी चारच दिवसांचे कसोटी सामने असावेत असा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात् आयसीसी यंदाच्या वर्षी घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सन २०२३ ते २०३१ या काळातील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी चार दिवसांचे कसोटी सामने वास्तवात उतरतील, हे नक्की. गेली काही वर्षे चार दिवसांच्या कसोटी सामन्यांबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू होतीच. परंतु आयसीसीने यंदाच्या हंगामात त्याविषयी ठोस आणि गंभीरपणे विचार सुरू केल्यामुळे क्रिकेटमध्ये येऊ घातलेल्या या अत्यंत क्रांतिकारी बदलाची दखल घ्यावी लागते. या मुद्दय़ावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यवस्था आणि बहुतांश क्रिकेटपटू अशी थेट दरी निर्माण झालेली दिसून येत आहे. बहुतेक सर्व आघाडीच्या क्रिकेटपटूंना आणि प्रमुख क्रिकेट संघांना कसोटी क्रिकेटचे माहात्म्य वेगळे समजावून देण्याची गरज नाही. या मंडळींच्या दृष्टीने कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वोत्तम, सर्वोच्च आविष्कार आहे. कसोटी क्रिकेट खेळल्याशिवाय आणि या प्रकारात सातत्याने पारंगत झाल्याशिवाय कोणी परिपूर्ण क्रिकेटपटू बनू शकत नाही. डॉन ब्रॅडमन ते सचिन तेंडुलकर आणि व्हिव्हियन रिचर्ड्स ते विराट कोहली; जिम लेकर ते शेन वॉर्न आणि फ्रेडी ट्रमन ते ग्लेन मॅकग्रा असे अनेक फलंदाज आणि गोलंदाज क्रिकेटमधील आख्यायिका बनून राहिले ते कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली म्हणूनच. १८७७ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ब्रिटिश वसाहतींना कसोटी क्रिकेटने भुरळ घातली. आज काही प्रमाणात वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता या पारंपरिक क्रिकेटचे आकर्षण बहुतेक देशांमध्ये कायम आहे. परंतु आधुनिक खेळामध्ये रोमॅंटिसिझमबरोबरच पैशाचा खेळही जुळून यावा लागतो. पाच दिवसांच्या कसोटीला गत शतकाच्या उत्तरार्धात सार्वत्रिक मान्यता मिळत गेली. परंतु आज १४२ वर्षांनंतरही कसोटी क्रिकेट खेळणारे संघ (देश आणि राष्ट्रसमूह एकत्र मानल्यास) बाराच आहेत, हे ढळढळीत वास्तव नाकारण्यासारखे नाही. कॅरेबियन समूहातील देशांचा विचार केल्यास ही संख्या फार तर १८-१९ इतकी भरेल. क्रिकेट- रसिकांकडूनच ‘ग्लोबल’ म्हणवल्या जाणाऱ्या या खेळातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या कसोटी प्रकाराला अजून वीसेक देशांनीही जवळ केलेले नाही, हे अपयश कुणाचे मानायचे? निव्वळ संख्येचा विचार केल्यास क्रिकेटरसिक हे फुटबॉल किंवा टेनिसरसिकांच्या फार मागे नाहीत. परंतु तरीही क्रिकेटला सरसकट ‘जागतिक’ म्हटले जात नाही. फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, बास्केटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, बॉक्सिंग, रग्बी या खेळांना ‘जागतिक’ म्हणता येते. कारण फुटबॉल आणि बुद्धिबळाच्या दोनशेहून अधिक राष्ट्रसंघटना आणि इतर खेळांमध्ये १०० हून अधिक किंवा त्याच्या आसपास देशांच्या संघटना आहेत. गेलाबाजार गोल्फसारखा महागडा खेळ खेळणारे देशही क्रिकेट खेळणाऱ्या देशांपेक्षा अधिक आहेत. हॉकी खेळणाऱ्या संघटनाही २५ ते ३० च्या वर गेलेल्या नाहीत. पण किमान त्या खेळात जर्मनी, नेदरलँड्स, अर्जेटिना, बेल्जियम, दक्षिण कोरिया असे वसाहतीच्या वर्तुळाबाहेरील देश तरी खेळताना आणि चमकताना दिसतात. टी-२० क्रिकेट खेळणारे जवळपास ८० हून अधिक देश आहेत; पण तो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे.

आता आणखी एका वास्तवाकडे वळू या. कसोटी क्रिकेटच्या मक्तेदारीला प्रथम एक-दिवसीय क्रिकेट आणि नवीन सहस्रकात टी-२० क्रिकेटने हादरे दिले. आज परिस्थिती अशी आहे की, १२ संघांपैकी ‘कसोटी’ दर्जा खऱ्या अर्थाने बहाल झालेले दहाच संघ आहेत. त्यातही भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या तीन संघांचा अपवाद केल्यास उर्वरित संघांचा सध्याचा कसोटी दर्जा काय आहे? न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ त्यांच्या देशात चांगले खेळत असतीलही; परंतु परदेशी मैदानांवर अजूनही हे संघ अडखळताना दिसतात. याचाच अर्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच संघ घरच्या आणि परकीय अशा दोन्ही मैदानांवर तुलनेने चांगले खेळतात. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील जवळपास प्रत्येक सामना पाचव्या दिवसापर्यंत चालला. परंतु जगभर इतरत्र चाललेल्या कसोटी सामन्यांच्या बाबतीत ही परिस्थिती अजिबातच नाही. भारताने अलीकडेच वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरुद्धचे कसोटी सामने एक अपवाद वगळता अक्षरश: तीन ते साडेतीन दिवसांमध्येच जिंकले. एका आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये जवळपास ६८ टक्के सामने चार किंवा कमी दिवसांमध्ये संपल्याचे दिसते. हे प्रमाण अलीकडच्या काळात वाढत चालल्याचे आढळून येते. उदा. २०१८ मध्ये ते ५६.२५ टक्के होते, तर २०१७ मध्ये ४७.८३ टक्के. चार दिवसांच्या कसोटी सामन्याचा पुरस्कार करणाऱ्यांना अलीकडे बळ का आले असावे, हे यातून स्पष्ट होते. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने गेल्या वर्षी एक सामना दोन दिवसांमध्येच जिंकला! तर बांगलादेशविरुद्ध अलीकडेच झालेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत ४०३ षटके टाकली गेली; जी एका पूर्ण लांबीच्या कसोटी सामन्यापेक्षा ४७ षटकांनी कमी ठरली! ‘डेली टेलिग्राफ’ने अलीकडेच केलेल्या एका पाहणीनुसार, हल्ली कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी ३६२ षटकेच टाकली जातात. तेव्हा पाच दिवस क्रिकेट खेळण्याची खेळाडूंची क्षमता, ऊर्जा, कौशल्य आणि इच्छाशक्ती कमी होऊ लागली आहे. अशा काळात ते पाच दिवस खेळवले जाण्याचा आग्रह कशासाठी धरायचा, असा सवाल उपस्थित केला जातो.

टी-२० क्रिकेटच्या उगमानंतर कसोटी क्रिकेटचे महत्त्व काही भागांमध्ये (उदा. कॅरेबियन देश) कमी होऊ लागले आहे हे स्पष्टच आहे. श्रीलंकेत हीच परिस्थिती दिसते. पाकिस्तानी क्रिकेटपटू मोठय़ा प्रमाणात टी-२० लीगच्या मागे धावतात, असा आक्षेप तेथे घेतला जातो. न्यूझीलंडमध्ये सुरुवातीला ही परिस्थिती होती. ती आता बदलली असली तरी आजच्या न्यूझीलंड कसोटी संघाला अजून बरीच मजल मारायची आहे, हे त्यांच्या ऑस्ट्रेलियातील सध्याच्या कामगिरीवरून दिसून येते.

भारतामध्ये याच्या नेमकी उलट परिस्थिती दिसून येते. ती कशी काय?

टी-२० क्रिकेटमध्ये चमकू लागल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची आणि चमकण्याची इच्छा असलेले क्रिकेटपटू मोठय़ा संख्येने घडवणारा भारत हा बहुधा एकमेव संघ असावा. ही उदाहरणे पाहा : जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत, कुलदीप यादव, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा आणि आता (काही प्रमाणात) रोहित शर्मा. हा पूर्णपणे ‘कोहली इफेक्ट’ आहे. विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटवर निरतिशय प्रेम आहे. म्हणूनच पाचऐवजी चार दिवसांचे कसोटी क्रिकेट खेळवायला त्याचा विरोध आहे. त्याला गुरुस्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरलाही चार दिवसांच्या कसोटीची संकल्पना पसंत नाही. या दोघांच्या लेखी कसोटी क्रिकेट निव्वळ गंभीर नव्हे, तर पवित्र आहे. बहुसंख्य ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनाही पाच दिवसांचे कसोटी क्रिकेटच आवडते. याउलट, इंग्लिश क्रिकेटपटू चार दिवसांच्या क्रिकेटचे समर्थन करताना दिसतात. मग आता पावित्र्य आणि व्यावहारिकतेची सांगड कशी घालणार? चार दिवसांचे कसोटी क्रिकेट आणल्यास २०२३ ते २०३१ या काळामध्ये जवळपास ३३५ दिवस अतिरिक्त मिळतात, असा आयसीसीचा हिशेब सांगतो. पण त्या ३३५ दिवसांमध्ये काय करणार? आणखी टी-२० क्रिकेट घुसवणार? किंवा १०० षटकांसारखा आणखी एखादा हास्यास्पद प्रयोग..? चार दिवसांमध्ये प्रत्येकी ९८ षटके टाकल्यास पाच दिवसांच्या सामन्यांच्या तुलनेत फार घट होत नाही असे आयसीसीचे म्हणणे. यात एक मूलभूत गोम आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज या देशांमध्ये क्रिकेटचा हंगाम तेथील उन्हाळ्यात सुरू होतो. दक्षिण आशियात तो हिवाळ्यात सुरू होतो. त्यामुळे भारत, बांगलादेश, पाकिस्तान येथील काही भागांमध्ये डिसेंबर-जानेवारीत सूर्यास्त साडेचापर्यंत होतो. म्हणजे सकाळी साडेआठ-नऊ वाजता सामना सुरू करावा लागणार. तरीही पूर्ण ९८ षटके टाकली जाण्याची शक्यता कमीच. तरीही यातून काही मार्ग काढायचा झाल्यास भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तसेच यांच्याखेरीज आणखी एक देश यांच्यातील सामनेच पाच दिवसांचे असावेत. उर्वरित संघांची दुय्यम लीग करावी आणि चार-चार दिवसांचे सामने त्यांनी खेळावेत. त्यांच्यातील सर्वोत्तम संघ पुढील हंगामात किंवा चक्रामध्ये बडय़ा तिघांव्यतिरिक्त असलेल्या चौथ्या संघाची जागा घेईल. कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारे विभागणी करण्याची वेळ आली आहे. त्यातून काहीएक दर्जा राखला जाईल आणि पुरस्कर्ते, प्रक्षेपण कंपन्या व प्रेक्षक यांनाही याचा लाभ होईल. क्रिकेट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचे विविध प्रकारे मनोरंजन करण्यात आज ऑस्ट्रेलियाचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यांचा कित्ता आपणही गिरवला पाहिजे, असे विराटने बीसीसीआयला सुनावले आहे. बडय़ा तीन संघांपैकीही एखादा संघ खराब कामगिरीमुळे दुय्यम लीगमध्ये फेकला जाऊ शकतो. तसे झाल्यास कसोटी क्रिकेटमधील चुरस कायम राहील. वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश ही मंडळे कसोटी क्रिकेटप्रति गंभीर नाहीत. याउलट न्यूझीलंड, आर्यलड, पाकिस्तान ही मंडळे हतबल आहेत. ते काहीही असले तरी ‘वरच्या कसोटी’ लीगमध्ये सरकण्यासाठी या संघांना भरघोस आर्थिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. याउलट, कसोटी क्रिकेट खालावलेल्या मंडळांची आर्थिक मदत कमी करणे वा कापून घेणे असे उपाय योजले गेले पाहिजेत. कसोटी क्रिकेट हे अस्सल आणि अभिजात आहे, खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ क्रिकेट आहे असे केवळ मानून चालणार नाही, तर त्यासाठी तशी पावले उचलली गेली पाहिजेत.