News Flash

भाई… निरंतर योद्धा

भाईंचा समोरच्या व्यक्तीची तत्त्वे आणि धोरणांना जरी विरोध असला तरी त्या व्यक्तीविषयी त्यांच्या मनात कुठलाही व्यक्तिगत आकस मात्र नसे.

प्रख्यात समाजवादी नेते व विचारवंत मधु लिमये यांची येत्या १ मे रोजी जन्मशताब्दी सुरू होत आहे. स्वातंत्र्यलढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते, अभ्यासू संसदपटू, तळागाळातील वंचित-शोषितांचे कैवारी अशा विविध भूमिकांतून त्यांनी राजकारण आणि समाजकारणात आपली अमीट छाप उमटविली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र अनिरुद्ध लिमये यांनी आपल्या पित्याच्या कारकीर्दीचा मांडलेला  लेखाजोखा…

मधु लिमये अर्थात आमचे भाई म्हणजे निरलसपणे निरंतर लढणारा योद्धा… ‘मधु लिमये- माझे वडील अर्थात भाई घरात कसे वागत?’ या प्रश्नाचं उत्तर : सर्वसामान्य घरातले वडील जसे असतात तसेच ते होते. आपण खूप बुद्धिमान, विचारी व्यक्ती आहोत याची झूल त्यांनी कधीच पांघरली नाही. पण त्यांचं वेगळेपण होतं ते त्यांच्या बुद्धिमत्तेत आणि सर्वांशी असलेल्या समानतेच्या वर्तणुकीत! भरपूर पुस्तकं व कागदपत्रांनी भरलेलं आणि एकमेकांशी समानतेची वागणूक असलेलं घर असंच आमच्या घराचं चित्र होतं. मी माझ्या जीवनात अशा दोन व्यक्तींना भेटलोय. एक- डॉ. राम मनोहर लोहिया आणि दुसरे आमचे भाई… जे समोरच्या व्यक्तीचा आर्थिक, बौद्धिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर कोणताही असो, हे दोघेही त्याच्याशी आपुलकीने आणि समानतेने वागत. त्यांच्याकडे लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा भेद नसे.

आमच्या घरात खेळीमेळीचे वातावरण असे. विविध विषयांवर चर्चा रंगत. पुस्तकांचं वाचन होई. कुठल्याही विषयावर चर्चा, गप्पा करून तोडगा काढला जात असे. त्यात कोणाचीच एकाधिकारशाही नसे. एकमेकांच्या आचार-विचारांचा सगळेच आदर करीत.

भाईंना मुलं अतिशय प्रिय. ते लहान मुलांशी व मुले त्यांच्याशी सहज रुळत. ते मुलांमध्ये छान रमत. त्यांनी आमच्यावर कधीही कुठलीच जोरजबरदस्ती केलेली मला आठवत नाही. उलट कधी एखादा फतवा काढला असेल तो आईनेच! भाई म्हणजे प्रेमळ नवरा आणि पिता असंच समीकरण होतं. आमच्या घरातलं वातावरण ‘व्यासंगी’ होतं. भाईंचं वाचन चौफेर, अफाट होतं. त्यांना वैविध्यपूर्ण गोष्टींमध्ये रस होता. राजकारण, समाजकारण, साहित्य, नाटक, संगीत, स्थापत्य, शिल्प, नवनवीन तंत्रज्ञान ते क्वान्टम फिजिक्समध्ये काय सुरू आहे याविषयीही त्यांना कुतूहल असे. आणि त्या विषयांतली माहितीही त्यांना असे. हा संस्कार माझ्यातही रुजला व कळत-नकळत मुरत गेला.

मधु लिमये आणि माझी आई चंपा लिमये हे दाम्पत्यच मुळी परस्पर साहचर्याचं उत्तम उदाहरण होतं. भाई आईच्या संमतीनेच गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झाले होते. त्यांच्या लग्नाला तेव्हा तीन वर्षे झाली होती आणि मी एक वर्षाचा होतो. आई तशा परिस्थितीतही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या लढ्यात भाईंना १९ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळी आमचं पूर्ण कुटुंबच डळमळीत झालं होतं, पण तिने ते दिवस एकटीनेच न डगमगता काढले. दोघांनाही याची पूर्ण कल्पना होती. पण एकमेकांच्या विचारांचा आदर करत परस्परांना खंबीरपणे ते साथ देत राहिले… अगदी शेवटपर्यंत!

भाई थोडे रिझर्व्ह ड् होते. सहजासहजी अनोळखी व्यक्तीशी स्वत:हून संवाद सुरू न करणारे. पण एखादी व्यक्ती त्यांच्याशी बोलायला आली की ते आवर्जून संवाद साधत. त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारीत. त्याशिवाय का त्यांनी असंख्य माणसं जोडली! भाई खूप रागीट, कुणाचंही न ऐकणारे होते असं त्यांच्याविषयी भलंबुरं बोललं जाई. पण प्रत्यक्षात ते तसे नव्हते.

भाईंनी सार्वजनिक जीवनात जी तत्त्वे अंगीकारली, ती वैयक्तिक आयुष्यातही जपली. समाजवादी मंडळींचा आग्रह होता की मुलांना भारतीय भाषांमधूनच शिक्षण मिळायला हवे. पुढे जाऊन त्यांची अशीही भूमिका होती की, जनतेसाठीचा राज्यकारभार भारतीय भाषांमधून- स्थानिक भाषांमधूनच चालायला हवा; म्हणजे मग जनता आपल्या हक्कांविषयी अधिक सजग होईल… जनतेला समान संधी मिळेल.  राजकारणात आणि शासनात काय चाललं आहे, तिथे कोणत्या भूमिका घेतल्या जात आहेत याविषयी जनताही अनभिज्ञ राहणार नाही. याच भूमिकेतून आई-भाईंनी मला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. माझी शाळा मराठी आणि हिंदी माध्यमाची होती. सातवीची परीक्षा झाल्यावर या शाळेने आम्हा काही हुशार मुलांना वार्षिक निकालासोबत पालकांसाठी एक पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं की, ‘आठवीपासून हिंदी माध्यम बंद करून इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करत आहोत. तुम्ही तुमच्या पाल्याला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा.’ मी ते पत्र वाचून शिक्षकांना सांगितलं की, ‘मला हे पत्र देऊ नका. कारण मी आणि माझे आई-वडील याला सहमती देणार नाही.’ तरीही त्यांनी ते पत्र देणं आम्हाला बंधनकारक असल्याचं सांगून मला ते दिलं आणि घरी घेऊन जाण्यास सांगितलं. मी घरी येऊन भाई आणि आईला ते पत्र दाखवलं आणि त्यांना सांगितलं की, ‘मी शिक्षणाचं माध्यम बदलणार नाही.’ अर्थात त्यावर आम्हा सर्वांचं एकमतच होतं.

भाईंची जनमानसात प्रतिमा काय होती, आणि त्यांचे स्पष्टवक्तेपणाचे संस्कार एक मुलगा म्हणून माझ्यात कसे रुजत गेले याचा एक किस्सा आठवतो. भाई जेव्हा निवडून आले तेव्हा पहिल्यांदा आम्ही दिल्लीला गेलो होतो. मी दहा वर्षांचा होतो. त्या लहान वयातही मला राजकारणात रस होता. १९६५ च्या बजेट सेशनच्या वेळी मी संसदेच्या पब्लिक गॅलरीत जाऊन बसलो होतो. त्यावेळी पब्लिक गॅलरीतील उपस्थितीसाठी वयाच्या कमीत कमी दहा वर्षांची अट होती. मी चणीने खूप लहानखुरा होतो, त्यामुळे मी आठ वर्षांचा दिसत होतो. मला सांगण्यात आलं की, ‘तू लहान आहेस, तू जाऊ शकत नाही.’ तेव्हा वॉच अ‍ॅन्ड वॉर्डच्या लोकांना सांगण्यात आलं की, ‘हा मधु लिमयेंचा मुलगा आहे. मधु लिमये किंवा तो खोटं बोलणार नाहीत…’ तेव्हा कुठे मला आत सोडण्यात आलं. मी जेव्हा गॅलरीत बसायचो तेव्हा माझ्या लक्षात आलं की, लोकसभेचे अध्यक्ष हुकमसिंह अतिशय पक्षपाती होते. ते समाजवादी मंडळींना बोलू द्यायचे नाहीत. त्यांनी जर काही गडबड केली तर त्यांना सस्पेंड करायचे. एके दिवशी मी भाईंसोबत डॉ. लोहियांकडे गेलो होतो तेव्हा मी त्या दोघांना विचारलं की, ‘अध्यक्षाने संसदेचं काम सुरळीतपणे आणि नि:पक्षपातीपणे कसे चालेल हे पाहावं ना! हे हुकमसिंह खूप पक्षपातीपणे काम करतात. संसदेत निवडून गेल्यावर सदस्यांना जशी शपथ दिली जाते, तशी अध्यक्षांच्या शपथेत ‘मी सभागृहाचं कामकाज संपूर्णत: नि:पक्षपातीपणे पार पाडेन’ असं वाक्य सामावून घ्यायला हवं.’ त्यानंतर काही दिवसांनी सभागृहात डॉ. लोहिया यांना हुकमसिंह यांनी टोकलं तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की, ‘तुमचा पक्षपातीपणा इतका उघड आहे की मधु लिमयेंचा दहा वर्षांचा मुलगा गॅलरीत बसलेला असतो त्यालाही तो जाणवतो. त्याचं म्हणणं असं आहे की, अध्यक्षांच्या शपथेत ‘मी सभागृहाचं कामकाज पूर्णपणे नि:पक्षपातीपणे पार पाडीन’ असं वाक्य घालायला हवं.’

इतक्या लहान वयात मला हे जे शहाणपण आलं त्याला सर्वस्वी जबाबदार माझ्या घरातलं वातावरण होतं. चर्चा, वाचन, एकमेकांच्या आचार-विचारांचा आदर आणि आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य. आमचं घर या वातावरणाने भारलेलं होतं.

भाई उत्तम स्वयंपाक करत. आमच्याकडे पाहुण्यांचा राबता असे. ज्यावेळी आईला मदतीची जरुरी असे तेव्हा ते मदत करायला तत्पर असत.  राजकारणातून निवृत्त झाल्यावर तर ते आईला आवर्जून मदत करीत. तेव्हा आई कौतुकाने म्हणे की, ‘माझ्या हातून कधीतरी एखादा पदार्थ बिघडेल, पण मधूंच्या हातून नाही.’ त्यातून आपण इक्वल पार्टनर आहोत हाच संस्कार माझ्यावर कायम होत गेला. आमच्या घरात व्यावसायिक आणि कौटुंबिक बाबतीत कुठल्याही प्रकारची भिंत ठेवायची नाही हे या दोघांनी आपल्या व्यवहारातून माझ्यावर बिंबवलं. आई आणि भाईंनी या दोन्हीचा मेळ खूप उत्तमपणे साधला होता.

घरात सतत राजकारणाने भारलेलं वातावरण असतानाही मी राजकारणात आलो नाही. मला असं वाटतं की, काही मुलांना आपल्या आई-वडलांच्या व्यवसायाचा आकस असतो. त्यांना वाटतं की, त्यांचे आई-वडील त्या व्यवसायातील व्यग्रतेमुळे आपल्या वाट्याला येत नाहीत. परिणामी ती मुलं आपल्या आई-वडिलांच्या व्यवसायात पडत नाहीत. आपला स्वतंत्र मार्ग निवडतात. पण मी राजकारणात न जाण्यामागचं कारण वेगळं होतं. मला राजकारण कळत असे, आवडत असे, त्यात रसही होता; परंतु मला एक जाणवलं की, या मंडळींपेक्षा आपली कुवत व हिंमत कमी आहे आणि म्हणून मी तो मार्ग पत्करला नाही. दुसरी बाब म्हणजे आई-भाईंचा राजकारणातील घराणेशाहीला विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की, भारतात भयानक घराणेशाही आहे. अगदी नेहरू कुटुंबापासून इंदिरा गांधी ते कांती देसाईंपर्यंत सगळ्यांनीच या घराणेशाहीमुळे गोंधळ माजवला आहे. मी जोपर्यंत राजकारणात असेन तोपर्यंत तू राजकारणात यायचं नाही असा भाई आणि माझ्यात करार झाला होता. ८० सालच्या शेवटच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात तीन-चार आठवडे मी प्रचारात सहभागी झालो होतो. मात्र मी प्रत्यक्ष राजकारणात कधी उडी घेतली नाही. आणि माझ्या वेळीच लक्षात आलं, की आपल्या वडिलांपेक्षा आपली कुवत जास्त नाही. १९७७ ते ८० सालामध्ये झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकारणाविषयी माझा इतका भ्रमनिरास झाला, की माझा त्यातला रस खूपच कमी झाला. आणि गेली १०-१५ वर्षे तर राजकारणाची शिसारीच आली आहे.

‘भाईंनी जनता पक्ष फोडला’ अशी आरडाओरड महाराष्ट्रात जेवढी झाली तेवढी उत्तर भारतात झाली नाही. याचं कारण तिथल्या नेत्यांना, कार्यकत्र्यांना आणि जनतेला राजकीय वास्तवाची जास्त जाणीव होती. इंदिरा गांधींचा निवडणुकीत पराभव करण्यात जनता पक्षातील सर्व घटकांचा हातभार होता. परंतु सत्तापिपासा, अति महत्त्वाकांक्षा आणि व्यक्तिगत असूया यामुळे मोरारजीभाई आणि संघ परिवारातल्या मंडळींनी चरणसिंहांचे अनुयायी आणि उत्तर भारतातील समाजवादी यांना सत्तेपासून दूर केले. यामुळे या मंडळींमध्ये असंतोष माजला. भाईंनी

या दोन गटांत समेट घडवून आणण्याचे अथक प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले आणि त्याचा परिपाक जनता पक्षाचे विभाजन आणि मोरारजी सरकारचे पतन होण्यात झाला. हे सत्य फारसे दक्षिणेतील लोकांना, विशेषत: महाराष्ट्रात ठाऊक नाही, म्हणून पक्ष- विभाजनाचा ठपका भाईंवर ठेवण्यात येतो. संघ परिवारातील मंडळींचा प्रचार- किंबहुना अपप्रचार करण्यात कोणीच हात धरणार नाही. त्यात मोरारजीभाईंनी माहिती प्रसारण मंत्रालय अडवाणींच्या हाती दिले होते.  जनता राजवटीपासून व त्यानंतर भारतीय राजकारणात सत्याचा अपलाप होण्यास सुरुवात झाली. तेव्हा दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यापेक्षाही वरील कारणं जनता पक्षाच्या विभाजनाला जास्त कारणीभूत होती.

भाई एकांतप्रिय, अंतर्मुख होते. मितभाषी होते. पण समोरच्या माणसाचा प्रत्येक शब्द ऐकून घेण्याचा त्यांना जबरदस्त पेशन्स होता. हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. त्यांना मैत्री करायला वेळ लागे हे खरं, पण समान धागा जुळला की त्यांची चटकन् मैत्री होत असे. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. सार्वजनिक जीवनातील आणि वैयक्तिक जीवनातील मधु लिमये यांच्यात काहीच फरक नव्हता. आपण असामान्य आहोत आणि दुसऱ्याला तुच्छ लेखणं ही वृत्ती त्यांच्यात नव्हती. ते सर्वांशी आपुलकीने वागत. दिल्लीतही त्यांच्याकडे अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येत. काही जण तर असंबद्धपणे बडबड करीत. पण भाई प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडू देत आणि शांतपणे ऐकून घेत. त्यामुळे त्यांच्याकडे यायला कोणाला संकोच वाटत नसे.

भाईंचा समोरच्या व्यक्तीची तत्त्वे आणि धोरणांना जरी विरोध असला तरी त्या व्यक्तीविषयी त्यांच्या मनात कुठलाही व्यक्तिगत आकस मात्र नसे. म्हणूनच भाईंचे त्यांच्या विरोधकांशीही चांगले व्यक्तिगत संबंध होते. भाई हे इंदिरा गांधींचे सर्वात कडवे विरोधक; परंतु त्यांच्या संदर्भातला एक किस्सा इथे आवर्जून सांगावासा वाटतो. आणीबाणीत इंदिरा गांधींनी त्यांना १९ महिने जेलमध्ये टाकलं होतं. आणि भाईंच्या प्रीव्हिलेज मोशनमुळे इंदिरा गांधींचं सदस्यत्व रद्द केलं जाण्याची नामुष्की ओढवली होती. इंदिरा गांधी आणि भाई या दोघांच्याही बाजूने विसंवाद किंवा शत्रुत्व असण्यासारखीच परिस्थिती होती. पण इंदिरा गांधींनी अशा परिस्थितीतही भाईंचा सल्ला मागितला होता. त्याचं झालं असं की, ‘मारुती’च्या प्रकरणाबाबत चौकशी करणाऱ्या सरकारी तसेच मारुतीमधील अधिकाऱ्यांवर इंदिरा गांधींनी जबरदस्ती केली होती. त्याविषयी लोकसभेत स्टेटमेंट देताना मारुतीत सगळं आलबेल चाललं आहे असं त्या खोटं बोलल्या होत्या. हे कळल्यानंतर भाईंनी त्यांच्याविरोधात विशेषाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. प्रीव्हिलेज कमिटीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला. त्यात इंदिरा गांधींवर वरील दोन्ही गोष्टींबाबत ठपका ठेवण्यात आला होता. यासाठी लोकसभा त्यांच्यावर कारवाई करू शकते- ज्यात त्यांचं सदस्यत्व रद्द करणे किंवा त्यांना एक दिवसाचा तुरुंगवास अशी शिक्षाही होऊ शकली असती. सदस्यत्व रद्द करणं किंवा जेलमध्ये पाठवणं हे खूपच पुढचं टोक होतं. इंदिरा गांधींनी माफी मागितली असती तरी चाललं असतं. भाईंचं म्हणणं होतं की, इंदिरा गांधींना सभागृहाची माफी मागायला भाग पाडू आणि त्यांच्याविरोधात सेन्सर मोशन पास करू. कारण त्यांना जनतेनं निवडून दिलं होतं. त्यांनी पक्षाला पटवून दिलं की, त्यांच्याविरोधात असं विद्वेषाचं राजकारण करणं चुकीचं आहे आणि जनतेलाही हे रुचणार नाही. कारण असं करून आपण लोकांच्या इच्छेचाही अपमान करत आहोत. शेवटी लोकांनी इंदिरा गांधींना निवडून दिलंय. पण बाकीचे लोक सुडाने इतके पेटले होते की इंदिरा गांधींचं सदस्यत्व रद्द करायला लावायचं आणि एक दिवस तरी त्यांना जेलमध्ये पाठवायचं अशी त्यांची ठाम भूमिका होती. तेव्हा इंदिरा गांधींनी या प्रकरणात भाईंची आणि पक्षाची नेमकी कोणती भूमिका आहे, आपण कोणता निर्णय घ्यावा व त्याचे कोणते परिणाम होतील, हे जाणून घेण्यासाठी आपल्या विश्वासातील दोन माणसे आमच्या घरी पाठवली. भाईंनी त्यांच्यापुढे आपली भूमिका मांडली की, ‘माझ्या पक्षातील आणि अन्य विरोधकांना असं वाटतंय की इंदिराबाईंचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं आणि त्यांना जेलमध्ये पाठवावं. पण माझं वैयक्तिक असं मत नाही.’ तेव्हा ते सदस्य भाईंना म्हणाले की, ‘इंदिराबाईंनी या प्रकरणी माफी मागितली तर या प्रकरणावर पडदा पडेल का?’ तेव्हा भाई त्यांना म्हणाले, ‘इंदिरा गांधींना खरंच मनापासून जर मारुतीबाबत आणि आणीबाणीबाबत स्वत:ची चूक उमगली असेल तर त्यांनी जनतेची आणि सदनाची माफी मागावी. पण माफी मागितली तर माझे सहकारी पक्ष आपल्याला माफ करतील आणि आपलं सदस्यत्व रद्द होईल का यासाठी केवळ ही माफी असू नये. आणि त्यांनी माफी मागितली तरी त्यांना माफ करावं असं माझ्या पक्षातील लोकांचं विशेष मत नाही,’ असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पुढे इंदिरा गांधींनी माफी मागितली नाही आणि त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आणि त्या जेलमध्ये गेल्या. पण त्या पुन्हा निवडून आल्या आणि सत्तेतही आल्या. आपल्या तगड्या विरोधकालाही विश्वास वाटावा असे भाई होते.

भाईंचं मत होतं की, जे सक्रीय राजकारणी आहेत त्यांनी विधानसभा, लोकसभेतच जायला हवे. ते स्वत: ७० व ८० साली हरले तेव्हा विधान परिषद किंवा राज्यसभेत जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली नाही. तत्त्वांना तिलांजली देणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. फक्त एकच अपवाद सांगावासा वाटतो की ज्याचा भारतीय राजकारणावर खूप दूरगामी परिणाम झाला असं मला वाटतं.

१९६२ च्या निवडणुकीतील पराजयानंतर समाजवादी पक्षाचे लोक आणि चीनच्या युद्धाच्या नामुष्कीनंतर डॉ. लोहिया हे इतके कॉंग्रेस आणि नेहरूंविरोधी झाले की त्यांनी ठरवलं- आपल्याकडे इतके विरोधी पक्ष आहेत की कॉंग्रेसला ४०-४५ टक्के मतं मिळूनसुद्धा त्यांना जास्त जागा मिळतात, म्हणून मग सगळ्या कॉंग्रेसविरोधी पक्षांनी एकत्र येऊन कॉंग्रेसला हरवण्याचे धोरण आखावे. डॉ. लोहियांनी बिगर- कॉंग्रेसवादाची ही भूमिका मांडली. कॉंग्रेस हरली की राजकारणात प्रवाहीपण येईल अशी त्यामागची त्यांची भूमिका होती. त्यामागे कोणत्याही प्रकारची असूया नव्हती; जी सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेत आहे. भाईंना मात्र ही भूमिका मान्य नव्हती. म्हणजे सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी साटंलोटं करून कॉंग्रेसच्या विरोधात उभं ठाकायचं, हे त्यांना मंजूर नव्हतं. कारण असं करणं म्हणजे पक्षाच्या मूळ तत्त्वांनाच हरताळ फासण्यासारखं होतं. ‘ईझी वे टू पॉवर’ अशी परिस्थिती निर्माण होईल आणि राजकारणात तत्त्वांचं पावित्र्य राहणार नाही. त्यासाठी त्यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हमधून राजीनामा दिला. ती बैठक पार पडल्यानंतर डॉ. लोहिया मुंबईत आले. ते मुंबईत आले की आमच्याच घरी राहत. त्यावेळी चांगले पाच-सहा दिवस दोघांमध्ये यावर चर्चा सुरू होती. मी आठ-नऊ वर्षांचा होतो. त्या वयातही मला डॉ. लोहियांची भूमिका पटली नव्हती. भाई त्यांच्या भूमिकेशी सहमत नव्हते. या भूमिकेमुळे सत्तेसाठी स्वार्थाचं राजकारण सुरू होईल आणि राजकारणामागचं जनकल्याणाचं हित नामशेष होईल अशी त्यांची पक्की धारणा होती. त्यातून राजकारणातला संधिसाधूपणा वाढेल. जनचळवळी मरतील.

परंतु चर्चेतून आपली भूमिका भाईंना पटवून देणं शक्य झालं नाही तेव्हा अखेर डॉ. लोहियांनी त्यांना सांगितलं की, ‘माझ्यावरच्या प्रेमाखातर तरी तू माझ्या या भूमिकेला पाठिंबा दे. कारण तुझ्या पाठिंब्याशिवाय हे धोरण यशस्वी होणार नाही.’ तेव्हा भाई आपली तात्त्विक भूमिका बाजूला ठेवून यास तयार झाले. लोहियांच्या निधनानंतर पुढची दहा-बारा वर्षे त्यांनी या बिगर-कॉंग्रेसवादाचा पाठपुरावा केला. पुढे या धोरणाचे मोठे दुष्परिणाम देशाच्या राजकारणावर झाले. मला आजही असं वाटतं की त्या क्षणी भाईआणि लोहियांचं नातं तुटलं असतं तरी चाललं असतं. भारतीय राजकारणाच्या भविष्यासाठी ते योग्य ठरलं असतं. कारण पुढे बिगर-कॉंग्रेसवादामुळेच संघ परिवाराला संधी मिळाली. मला आज प्रकर्षाने वाटतं की लोहियांच्या या बिगर-कॉंग्रेसवादाच्या धोरणाला नाइलाजाने पाठिंबा देणं ही भाईंची मोठी चूक झाली.

पक्षातील गट-तटाच्या राजकारणाचे बरेच फटके भाईंना बसले. जेव्हा कॉंग्रेसमधून समाजवादी बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन केला, तेव्हा भाई अचानक राष्ट्रीय स्तरावर पुढे आले. अन्यथा तोवर त्यांचं कार्यक्षेत्र खानदेश हेच होतं. १९४८ ते १९५५ या काळात भाई जयप्रकाश नारायण, लोहिया, आचार्य नरेंद्र देव, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे आणि अन्य समाजवादी नेते व कार्यकत्र्यांच्या गळ्यातले ताईत बनले होते. १९५५ नंतर पक्ष फुटल्यावर ही मंडळी प्रजा समाजवादी पक्षात राहिली. त्यांनी भाईंचा आयुष्यभर द्वेष केला. १९६७ साली लोहिया अचानक गेले. त्यांचे खरे वैचारिक उत्तराधिकारी भाईच होते. पण युपी-बिहारमधील राजनारायण आणि कर्पुरी ठाकूर यांच्या व्यक्तिवादी राजकारणाने त्यांचं वैचारिक नेतृत्व स्वीकारलं नाही. ते त्यांचे पाय ओढत राहिले. एवढंच कशाला, १९७३ साली बांका पोटनिवडणुकीत राजनारायण भाईंच्या विरोधात निवडणूक लढले आणि हरले. १९५५ पासून ते भाई सक्रिय राजकारणातून निवृत्त होईपर्यंत बऱ्याच वेळा त्यांना आपल्याच सहकाऱ्यांनी दिलेल्या धक्क्यांमुळे खूप मन:स्ताप सोसावा लागला.

मला आठवतं, देवीलाल यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला यांना राजकारणात महत्त्वाचं पद द्यायचं घाटत होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत होती. त्यावेळी भाई राजकारणातून निवृत्त झाले होते. देवीलाल सल्ला मागायला भाईंकडे आले. चहा वगैरे झाल्यावर त्यांनी आपली इच्छा भाईंना सांगितली. तेव्हा भाईंनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, आपण नेहरू-गांधी घराण्यावर नेहमी घराणेशाहीबद्दल टीका करतो. आणि आता आपणही तेच करायचं हे मला स्वत:ला पटत नाही. देवीलाल तेव्हा भाईंना ‘तुमचं म्हणणं योग्य आहे…’ असं म्हणाले आणि निघून गेले. तेव्हा भाईंना मी म्हटलं की, तुम्ही त्यांना पटवून दिलंत. त्यावर भाई म्हणाले, ‘अरे, ते त्यांना जे करायचंय तेच करणार.’ आणि झालंही तसंच. मी त्यांना म्हटलं, ‘मग तुम्ही सल्ला का दिलात?’ त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘मी कुणाच्या घरी सल्ला द्यायला जात नाही. जे माझ्याकडे सल्ला मागायला येतात त्यांना मी योग्य असेल तो सल्ला देतो.’

सध्याचं एकूणातलं संधिसाधूपणाचं राजकारण पाहता भाई अशा राजकारणापासून दूरच राहिले असते. अशा तत्त्वशून्य राजकारणात ते बिलकूल रमले नसते. ते आज हयात असते तर ९९ वर्षांचे असते. त्यांच्यात पूर्वीचा बौद्धिक आणि शारीरिक जोम कमी झालेला नसता तर त्यांनी मोदींना कडाडून विरोध केला असता. आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने, अभ्यासाने, धडाडीने आणि निष्कलंक चारित्र्याच्या बळावर त्यांनी मोदींना ‘एक्सपोज’केलं असतं, हे नक्की!

aniruddha.m.limaye@gmail.com

शब्दांकन : लता दाभोळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:07 am

Web Title: freedom fighters studious parliamentarians akp 94
Next Stories
1 श्री. बा. : व्यासंगी, जिज्ञासू लेखक
2 रफ स्केचेस : जहांगीरच्या पायऱ्या
3 अरतें ना परतें… : खुज्या सावल्यांचा काळ
Just Now!
X