यावर्षीचे साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कादंबरीकार पॅट्रिक मोदियानो यांच्याविषयी फ्रेंच भाषेच्या अभ्यासकडॉ. मंगला सरदेशपांडे यांनी खास ‘लोकसत्ता’साठी इंग्रजीत लिहिलेला आणि मीना वैशंपायन यांनी मराठीत अनुवादित केलेला लेख..
९ ऑक्टोबरला फ्रेंच कादंबरीकार पॅट्रिक मोदियानो यांना प्रतिष्ठित असा साहित्याचा ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर झाला. ‘मानवी जीवनातील अतक्र्य आणि अनाकलनीय असे नियतीचे खेळ स्मृतीच्या साहाय्याने शब्दांतून जिवंत करणारं आणि शरणागत फ्रान्सचा जर्मनांनी कब्जा घेतल्यानंतरच्या भयानक परिस्थितीच्या अनुभवांचं विश्व उलगडणारं’ मोदियानो यांचं साहित्य पुरस्कार समितीला वैशिष्टय़पूर्ण आणि कलात्मक वाटलं. मोदियानो यांचं सर्व साहित्य नेहमी एका केंद्राभोवती फिरत वेगवेगळ्या प्रकारे त्या अनुभवाचा खोलवर शोध घेत राहतं. ते केंद्र असतं- भूतकाळ पुसून टाकायचा आणि लेखनातून त्याचा पुन्हा पुन्हा शोध घ्यायचा. त्यांची प्रत्येक कादंबरी आपल्याला भीती, धक्के, ताटातूट आणि अंतिमत: सारं काही गमावणं याचा एक झपाटल्यासारखा अनुभव देते. जणू काही ते अजूनही ‘एकच पुस्तक’ लिहिताहेत. मात्र त्यांच्या कादंबऱ्या काळजीपूर्वक वाचणाऱ्याच्या लक्षात येतं की, त्या प्रत्येक कादंबरीचं कथानकच केवळ निराळं आहे असं नाही, तर त्यातील पात्रं, त्यांचे परस्परसंबंध, त्यातील ताणतणाव यांचं नेटकं चित्रण करताना काळ आणि अवकाश यांचा ते सुयोग्य वापर करतात. जर्मनीनं फ्रान्सवर कब्जा केलेला तो विषण्ण काळ (द ऑक्युपेशन-१९४०-१९४४) ते सतत खोदून काढतात. त्यांच्या कादंबरीतील बहुतेक घटना फ्रान्समध्येच- विशेष करून युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या पॅरिसमध्येच घडतात. कधीकधी त्यातील मध्यवर्ती पात्रं लपून छपून राहत असताना एखाद्या संकटाच्या, धोक्याच्या चाहुलीने भरलेल्या वातावरणात सापडतात आणि एकदम सैरभैर होत, धोक्याच्याच ठिकाणी वावरत राहतात, त्यात पकडली जातात. या लेखकाच्या २५-३० कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असल्या तरी इथे सर्वाचा विचार करणं शक्य नाही. म्हणून वैशिष्टय़पूर्ण कादंबऱ्यांपैकी काहींचाच विचार केला आहे.
१९६८ मध्ये मोदियानो यांची ‘ल प्लास द इत्वॉल’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि एका रात्रीत हा २३ वर्षांचा तरुण लेखक प्रसिद्ध झाला. त्यांच्या या कादंबरीचं समीक्षकांनीही पुष्कळ कौतुक केलं. पण त्यात तत्कालीन काळाचे प्रतिसाद, पडसाद मात्र दिसत नाहीत. १९६८ चं वर्ष फ्रान्ससाठी फार उलथापालथीचं होतं. विद्यार्थी आणि कामगार यांच्या आंदोलनांनी फ्रेंच समाजाला हतबल केलं होतं. सुस्थापित व ख्यातकीर्त अशा अनेक शैक्षणिक संस्थांच्या- विशेषत: विद्यापीठांच्या- व्यवस्था या आंदोलनांमुळे खिळखिळ्या झाल्या होत्या. पारंपरिकतेच्या विरोधात जाणारी, स्पर्धावृत्तीला महत्त्व देणारी तरुणांची नवीन संस्कृती उदयास आली होती. त्या काळात आलेली मोदियानोंची कादंबरी त्यांना समकालीन अशा इतर तरुण लेखकांच्या कादंबऱ्यांप्रमाणे बंडखोर, मर्यादा ओलांडणारी वगैरे मुळीच नव्हती. प्रत्येक साहित्यकृती ही समकालीन काळाची निर्मिती असते. पण तशा त्या काळाची निर्मिती असणाऱ्या तत्कालीन कादंबऱ्यांपेक्षा ती वेगळी होती. तिचा रोख हा क्रांतिकारी, उज्ज्वल भविष्याचं सूचन करण्याकडे नव्हता. उलट हा लेखक आता धूसर झालेल्या, हरवलेल्या गतकाळाचंच चिंतन करीत होता, फ्रान्समधील ज्यूंच्या संदिग्ध स्थानाची चिंता करीत होता. त्या ६०च्या दशकातील वाचकाला या लेखकाचा विषय विचित्र, जुनाटही वाटला असेल. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या आंदोलनाचा एक परिणाम म्हणून मे ६८पासून युद्धसंबंधित अधिकृत दस्तावेज उपलब्ध होऊ  लागले होते. फ्रेंच इतिहासातील त्या काळ्या वर्षांमधील अनेक सत्य हकीकती त्यामुळे उजेडात येऊ  लागल्या होत्या. मोदियानोंची पहिली कलाकृती याच पाश्र्वभूमीवर आली.
‘ल प्लास द इत्वॉल’ हा पॅरिसमधील एक मोठा चौक वा रस्त्यांचं जंक्शन आहे. या कादंबरीच्या आरंभी त्या काळी प्रसिद्ध असणारा एक विनोद दिला आहे. १९४२ मध्ये एक नाझी सैनिक एका फ्रेंच तरुणाजवळ जाऊन विचारतो, ‘प्लेस द इत्वॉल कुठे आहे?’ त्याचा शब्दश: अर्थ असा होतो, ‘ताऱ्याची जागा कोणती?’ त्या दिवसांत प्रत्येक ज्यूने तारांकित बिल्ला लावणे सक्तीचे होते. त्यामुळे त्या तरुणाने आपल्या छातीवर डावीकडे बोट ठेवले. न बोलता त्याने सूचित केले होते की, ‘ताऱ्याची जागा या इथेच आहे.’
तेव्हा फ्रान्समध्ये ज्यूंची काय हालत होती याचं हेलावून टाकणारं चित्रण या कादंबरीत आहे. यातील बोचऱ्या विनोदातून फ्रान्सने ज्यूंना किती वाईट रीतीने वागवलं हे कळतं. हा इतिहास फ्रान्सला विसरावासा वाटला असेल, पण मोदियानोंनी तो आपल्या कादंबरीद्वारा जणू पुन्हा जिवंत करत दाखवून दिलंय की, एखाद्या राष्ट्राने ठरवले तरी घडलेला इतिहास असा पुसून टाकता येणार नाही. हे मुद्दाम नाहीसं करण्याचा, गाडून टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर ते प्रकट केलंच पाहिजे. म्हणजेच दुसऱ्या महायुद्धात ज्यूंवर झालेले अन्याय उघडकीस येतील. या कादंबरीला ‘रॉजर निमियर’ पुरस्कार मिळाला.
‘ल प्लास द लेत्वॉल’मधील छळणूक, जबरदस्तीचा एकांतवास या सूत्रांना मोदियानोंच्या कुटुंबाचीही पाश्र्वभूमी आहे. त्यांची आई बेल्जियन आणि वडील ज्यू. १९४५मध्ये युद्ध संपतानाच मोदियानोंचा जन्म झाला. परंतु जर्मनांचा फ्रान्सवरील कब्जा, हजारो ज्यूंना देशाबाहेर हाकलून दिलं जाणं, उदासी, गुप्ततेचं वातावरण या सगळ्या अनुभवातून त्यांना जावं लागलं. त्या आठवणींनी आयुष्यभर त्यांचा पिच्छा सोडला नाही. मोदियानो यांना ‘आजच्या काळातील मार्सेल प्रूस्त’ असं म्हटलं जातं. ते दोघे स्मृती आणि काळ यांच्यातून ‘स्व’चा शोध घेत, जीवनाचं आकलन करू पाहतात. पण त्या दोघांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. प्रूस्त आपण स्वत: अनुभवलेल्या काळाच्या स्मृती जागवतो, त्या स्मृतींचा उत्सवच जणू तो साजरा करतो. त्यासाठी आपली ऐच्छिक स्मृती आणि शब्दांचं सामथ्र्य यांचा कलात्मक मेळ घालून तो उत्कृष्ट कृती निर्माण करतो. उलट मोदियानो ज्या काळाचं वर्णन करतात तो काळ ते स्वत: कधी जगलेले नाहीत. ते एक प्रकारची पूर्वस्मृती मानतात. अशा शक्तिशाली स्मृती कल्पनेच्या मदतीनं ते तो गतकाळ, त्यातील इतरांच्या आठवणी पुनरुज्जीवित करतात. ज्यूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांचा कुणाला विसर पडू नये अशी त्यांची धडपड असते. मोदियानोंनी खऱ्या वा काल्पनिक स्मृतीच्या मदतीने घेतलेला हा शोध म्हणूनच प्रूस्तच्या गतकाळाच्या शोधापेक्षा नक्कीच वेगळा ठरतो.
१९६९ मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची दुसरी कादंबरी ‘नाइट राउंड्स’. तिच्या आरंभीचं स्कॉट फिट्जेराल्डचं अवतरण असं आहे- ‘भय आणि करुणा यांनी परिप्लुत अशा गोष्टींमध्येच मी स्वत:ला का शोधत राहतो? का जोडून घेतो स्वत:ला त्याच्याशी?’ इथेही पुन्हा ते त्या काळाच्या भ्रामक कल्पना निर्माण करतात. यातही ‘स्व’चा शोध आहे. यातनांचीच गोष्ट सांगताना संपूर्ण कादंबरीभर पुन्हा पुन्हा प्रश्न उमटत राहतो, ‘एखादा  माणूस द्रोही कसा ठरतो आणि द्रोही न ठरण्यासाठी त्याला काय करावं लागतं?’    
  या कादंबरीचा नायक आपल्या मनातील शंकाकुशंका बाजूला ठेवत फ्रेंच गेस्टापोंसाठी काम करायचं ठरवतो. त्यातून त्याला भरपूर पैसे मिळतात आणि तो आईसाठी चांगल्या वस्तीत उत्तम घर घेतो. हा विश्वासघातकी ‘फ्रेंच प्रतिकार चळवळी’चाही सदस्य बनतो. त्यांचा नाश करण्यासाठीच तो त्या गटात सामील झालेला असतो. ही व्यक्तिरेखा अगदी दुबळी आहे. मात्र ही कादंबरी आपल्याला ग्रीक शोकांतिकेची आठवण करून देते. वाचकाचं मन भीती आणि करुणा यांनी भरून जातं. अरिस्टॉटलच्या मते उत्तम शोकांतिकेची हीच तर वैशिष्टय़ं असतात ना? त्याला जाणीव असते की, आपण विश्वासघात करतोय. मोदियानो आपल्याला त्या विश्वासघातक्याच्या मनातील खोल गुहेत घेऊन जातात आणि त्याच्या मनातील पश्चात्ताप, विवेकबुद्धीची टोचणी यांचं दर्शन घडवतात.
    ‘हरवलेला माणूस’ (Missing Person) ही १९७८मध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी एखाद्या गुप्तहेरकथेसारखी आहे. पोलीस चौकशीवर आधारित या कादंबरीचं कथानक बहुतांशी पॅरिसमध्ये घडतं. कथानायक गी रोलँड हा चौकशीचा प्रमुख असतो आणि जिमी पेद्रो स्टर्न नावाच्या एका फरार माणसाचा ठावठिकाणा त्यांना लावायचा असतो. रोलँडला स्मृतिभ्रंश झालेला असतो. चौकशी करता करता त्याला काही क्षुल्लक गोष्टी कळतात, पण त्या गोष्टींनी तो इतका झपाटला जातो की पेद्रोचा शोध आणि स्वत:चा भूतकाळ या दोन्हींची गल्लत करू लागतो आणि त्यांचा माग तो एकाच वेळी घेऊ  लागतो. शेवटी आपण नक्की कोण याचा त्याने घेतलेला शोध जितका नाटय़मय, थरारक तितकाच करुण ठरतो. एका वेळी वेगळ्या वेगळ्या पातळीवर घडणारी ही कादंबरी उत्कंठावर्धक आहे आणि तिचा रचनाबंधही वैशिष्टय़पूर्ण आहे. तिला त्या वर्षीचा फ्रेंच साहित्यातील आत्यंतिक मानाचा ‘प्रिक्स गोन्कुर्ट’ पुरस्कार मिळाला.  
 ‘डोरा ब्रुडर’ (The search warrant) ही मोदियानो यांची १९९७ मध्ये प्रकाशित झालेली शोकांतिका. पुन्हा येथेही जर्मनांच्या ताब्यातील फ्रान्समधील ज्यूंचे अनुभव, त्यांच्या हालअपेष्टा, त्यांच्या मनीमानसी भरलेलं भय, या सगळ्या गोष्टींबद्दलचं लेखकाचं चिंतन आहे. ‘पॅरिस सॉर’मध्ये आलेली एक बातमी- ‘हरवली आहे. डोरा ब्रुडर ही १५ वर्षांची मुलगी, उंची १.५५ मीटर, उभट चेहरा, पिंगट, घारे डोळे, राखाडी जॅकेट, लाल स्वेटर, निळा स्कर्ट आणि हॅट, तपकिरी बूट. माहिती कळल्यास श्री. वा सौ. ब्रुडर ४१, बुलेवार्ड ऑरनानो, पॅरिस यांना कळवावे.’ ही बातमी वाचून अस्वस्थ झालेला लेखक तिचा शोध घेतो. मुलगी शाळेतून नाहीशी झाली होती. शोधताना कळतं की सप्टेंबर १९४२ मध्ये ऑश्विट्झच्या छळछावणीत नेलेल्या ज्यूंच्या यादीत तिचं नाव आहे. त्यानंतर अथकपणे एक दशकभर घेतलेल्या तिच्या व तिच्या आईवडिलांच्या शोधाची ही कहाणी वाचकाला सुन्न करणारी आहे. या शोधात मोदियानोंनी काय नाही अनुभवलं? गमावलेली माणसं, कितीतरी हरवलेल्यांच्या कथा, मानवी इतिहासच हरवलेला!
  ही कादंबरी लिहिण्यापूर्वी मोदियानोंनी असंख्य दस्तावेज, नोंदी, पोलीस फाइल्स, फोटो यांचा अभ्यास केला. डोरा ब्रुडरची आणि तिच्यासारख्या इतरांची कहाणी जगापुढे मांडण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अचाटच आहेत. एखाद्या डिटेक्टिव्हने आपल्या केसची चौकशी करताना ठिकठिकाणाहून जमा केलेल्या माहितीचे तुकडे मोठय़ा कौशल्यानं जुळवावेत तसं कौशल्य मोदियानो यांनी दाखवलं आहे. शब्दांमधून जे त्यांनी सांगितलं आहे त्यापेक्षा शब्दांमधील रिकाम्या जागाही अर्थपूर्ण आहेत. डोराचे सुटकेचे प्रयत्न आणि त्याचं केलेलं विश्लेषण विलक्षण आहे. शेवटी एके ठिकाणी ते म्हणतात, ‘‘माझ्या आधीच्या अनेक लेखकांप्रमाणेच मीही कधीतरी योगायोगावर विश्वास ठेवला आणि कधीतरी लेखकाजवळील ‘दिव्य दृष्टी’चा आधार घेतला. या सगळ्या प्रवासात माझ्याजवळ फ्रेंच कवी बोदलेअर याच्या मताप्रमाणे कोणत्याही लेखकाजवळ असणारी इतरांबद्दलची करुणा आणि संवेदनशीलता होती.’’
    अन फ्रॅन्कच्या डायरीसारखीच चटका लावणारी ही गोष्ट आहे. यात लेखकाची शैलीही जणू आपलं सारं सामथ्र्य दाखवते. त्यांच्या चित्रशैलीतील अनेक उदाहरणं येथे सापडतात. एखाद्या चित्रपटाप्रमाणे छोटय़ा छोटय़ा चित्रमय दृश्यांतून कादंबरी आपल्या समोर उलगडत जाते. कधी तिची भाषा काव्यमय होते. हळवे शब्द व्याकूळ करतात. ‘मी डोरा ब्रुडरचा विचार करतो,’  ‘मला तिची आठवण येते’, ही वाक्यं संपूर्ण कादंबरीभर कवितेच्या ध्रुपदासारखी पुनरावृत्त होत राहतात.
   ‘अंधाराबाहेर’ (Out Of The Dark) या कादंबरीचा विषय जर्मनांच्या ताब्यातील फ्रान्स किंवा जर्मनांनी ज्यूंवर केलेले अत्याचार असा नसला तरी इथेही आयुष्यातलं मोलाचं काही गमावणं, ताटातूट, त्यातून येणारं दु:ख वा बसलेला धक्का असा आहे. १९९५मध्ये लिहिल्या गेलेल्या या कादंबरीत एका हरपलेल्या, गमावलेल्या प्रेमाची कहाणी आहे. एक विवाहित तरुणी आणि तिचा तरुण प्रियकर यांच्या असफल प्रेमाची ही कथा मीलन, विरह, ताटातूट, पुन्हा मीलन, ताटातूट अशा चक्रातून फिरते. यातही योगायोगावर भर आहे. कधी पॅरिसमध्ये तर कधी लंडनमध्ये त्यांचं पुनर्मीलन होतं. पण शेवटी ‘आपलं काही जमत नाही’ याच निष्कर्षांवर दोघं येतात आणि नेहमीसाठी दूर होतात. एकीकडे विचित्र तरी विषण्ण करून टाकणारी ही कादंबरी कधीतरी मध्येच हास्यास्पद, विनोदीही होते. मात्र मोदियानोंच्या सहज, सुंदर आणि गतिमान गद्यशैलीचं इथेही कौतुक वाटतं. एक मात्र नक्की की त्यांच्या अनुभवविश्वाशी वाचक सहजपणे समरस होऊ  शकतो. त्यांच्या कलाकृती वाचताना हे आपलंच काही आहे, आपण हे अनुभवलंय असं वाटत राहतं.
  याच महिन्यात मोदियानो यांची नवीन कादंबरी ‘ How  to  not  get  lost  in  your  neighbourhood’आली आहे. त्यात पुन्हा मोदियानो आपल्या आवडीच्या, स्वत:ला झपाटून टाकणाऱ्या विषयाकडे वळले आहेत असं दिसतं.
 मोदियानो यांचं सारं साहित्य हे जर्मनांनी फ्रान्सवर केलेल्या कब्जाच्या काळाशी संबंधित आहे. त्या काळाचा ते सतत विचार करतात. तो त्यांच्या निरंतर चिंतनाचा विषय आहे. ‘लेखकाचं कर्तव्य, समर्थन कोणतं तर ज्या लोकांना आपल्याबद्दल बोलण्याची संधी नाकारली जाते, अशांबद्दल बोलणं, लिहिणं’ या आल्बेर काम्यूच्या म्हणण्याशी मोदियानो सहमत आहेत. त्यांचं साहित्य वाचताना, साहजिकच अलेक्झांडर सोल्झेनित्सिनची आठवण येते. रशियातील सक्तीच्या कामगार छावण्यांबद्दल तोही असाच निर्भयपणे बोलला होता. आपले ‘Gulag Archepelago’ पुस्तक त्याने ‘हे सांगण्यासाठी जे जिवंतच राहिले नाहीत त्या साऱ्यांना’ अर्पण केलं आहे.
डोरा ब्रुडरची कहाणी सांगणाऱ्या ‘सर्च वॉरन्ट’ या कादंबरीत तिच्या रहस्यमयरीत्या नाहीसं होण्याचा शोध घेणारे मोदियानो एका ठिकाणी म्हणतात, ‘हे पुस्तक लिहिताना मी माझ्या क्षमतेप्रमाणे एखाद्या दीपगृहासारखं, अंधार दूर करता येईल असे संदेश देण्याचं काम करत आहे. मी आशेवर जगतोय की माझ्या या सांगण्याचा काही ना काही फायदा होईल.’ खरं म्हणजे केवळ डोरा ब्रुडरच नव्हे तर त्यांच्या सर्वच साहित्याबाबत असं म्हणता येईल.
वयाच्या ६९ व्या वर्षीही मोदियानो लिहीत आहेत. आज माणसा माणसांमधील असहिष्णू वृत्ती, क्रौर्य, हिंसा वाढत चालली आहे. अशा  काळात मोदियानोंसारख्यांचं लेखन विशेष करून महत्त्वाचं ठरतं. आपल्या प्रभावशाली, झपाटून टाकणाऱ्या लेखनाद्वारे ते जणू आठवण करून देतात की हे असं पुन्हा घडता कामा नये. करुणा आणि प्रेम यांचा ते संदेश देत आहेत. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात म्हटले आहे, ‘साहित्याचे नोबेल पारितोषिक हे आदर्शाकडे नेणाऱ्या सवरेत्कृष्ट साहित्यकृतीस मिळावं.’ मोदियानो अशाच आदर्शाची वाट दाखवीत नाहीत काय?