News Flash

दोस्त माझा मस्त

तुम्च्या फ्रेन्डशिप डेच्या शुभेच्चा गावल्या. लई झ्याक वाटलं गडय़ाहो.

|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

तुम्च्या फ्रेन्डशिप डेच्या शुभेच्चा गावल्या. लई झ्याक वाटलं गडय़ाहो. तुम्च्यावानी सच्चा दोस्त गावला, आमी शिरमंत जालो. अंबानी, अदानीपेक्शाबी वाईच जास्तच. तुमाला बी मत्रीदिनाच्या शुभेच्चा!

तुमी परेशान हाईत.. सग्या दोस्ताला हाळी द्या. पाटावर बसल्याला त्यो जेवन सोडून बिगी बिगी तुम्च्याकडं धाव घेईल त्यो खरा सच्चा दोस्त. तो जवा ईचारील, ‘लगोलग यायलाच पायजेल काय?’ तवा समजून घेयाचं- तुम्च्या दोस्तीला दरार पडून ऱ्हायलीय. दोस्तीतली गेहराई संपून ऱ्हायलीय. फकस्त वरवरचा उमाळा उरलाय. ग्येलाबाजार असं दोस्त पाच-पाच हजार गावतील थोबाडपुस्तकावर. तेन्चा कायबी उपेग न्हाई. सच्चा दोस्त येखांदाच. कृष्ण-सुदामा, जय- वीरू आन् ह्ये दादासायेब आन् सदाभौ.

ही सच्च्या दोस्तीची सच्ची फ्रेन्डलिश्ट. सदाभौ, सलामत रहे दोस्ताना हमारा. फ्रेन्डशिप डे इदेशी आसल, पर सच्ची दोस्ती सौ फिसदी देशी.

तुमी म्हनून ऱ्हायलाय ते इंग्लिश कल्चर गावाकडं बी पाप्युलर हाई. व्हॅलेन्टाईन डे, चाकलेट डे, हग डे.. मस हंड्रेड डेज् ठावं हाईत आमास्नी. त्यो शेवटचा हग डे. तेच्याईषयी जरा कन्फूजन जालतं. पर आता कन्शेप्ट क्लीअर झाली हाय. ते सोडा हो.

सोडय़ावरनं आठवन जाली. सगळ्या डेंचा राजा.. ड्राय डे. गावाकडं त्योच पाप्युलर हाई. येखाद् साली फ्रेन्डशिप डेच्या दिशी ड्राय डे येऊ दे द्यावा. समद्यास्नी समजंल- कौन सच्चा दोस्त आन् कौन बाटलीदोस्त. ब्येस हाई. मत्रीचा दिस येतो बी ईतवारी हमेशा. मंजी शिटीवाल्यांना शेलीब्रेट कराया सोईचं. ‘चला, बसू यात.’ तुमी कंटिनू करा सदाभौ. पीनेवालों को पीने का बहाना चाहिये. कारबारी जरा दमानं घेवा.

सदाभौ, सच्च्या दोस्तीला बाटलीची गरज न्हाई. वल्या पार्टी करून मायेचा वलावा गावत न्हाई. दोस्ती का नशा दोस्तों के साथ जीने में होता है, ना तो पीने में. दारूची नशा दोस्तीची मजा किरकिरी करून ऱ्हायलीय सदाभौ. सच्चे दोस्त दारूच्या टय़ेबलावर नशेमंदी कचाकचा भांडत्यात. येकमेकान्च्या जीवावर उटत्यात. जानेमनचा नशेमन होवून जातू गडय़ाहो. वल्या पार्टीत दोस्तीचं नातं सुकून जातं पार.. ऱ्हायलं. सदाभौ, आमी आपलं टपालकीतूनच चीअर्स करून ऱ्हायलोय. हिप हिप र्हु..

तुमी फ्रेन्डशिप डे आन् नागपंचमीचा गलत मतलब काडून ऱ्हायलाय सदाभौ. मत्रीदिनाला शुभेच्चा मंजी विश देत्यात. तुमी ईषाची बात करून ऱ्हायले. आवं, सच्चा दोस्त कसा आसतू? ‘तुम्च्यासाटी काय पन’ कल्चरवाला शंकर भगवानावानी सच्चा दोस्त तुम्च्यासाटी हलाहल ईष बी पिवून टाकील. यात कायबी ईशेष न्हाई. पाश्ट टेन्समदी डोकवाया आमास्नी लई आवडतं बगा. येकच टेन्स हाई- की जिथं आपुन टेन्स नसतू. समदं घडून गेल्यालं. आटवनीत रुतून बसल्यालं. कशाचं बी टेन्शन न्हाई. तारीक पे तारीक.. तारीक पे तारीक..

सदाभौ, आमी आपलं टपालकीचं बाड बाईन्ड करून घेनार हाई. आम्च्या दिलबर बाईन्डरकडनं. मस ढाई किलो वीयेट जालं तरीबी चालतंय की. जिंदगीच्या ईवीनिंगला काय बी हॅपनिंग नसतं गडय़ाहो. त्या टायमाला दादासायेब डुल्या खुर्चीमंदी बसनार. टपालकीचा ढाई किलोचा अल्बम तारीकवार बार बार वाचनार. परत्येक अक्षरामंदी सदाभौ भेटनार. आटवनीतून आमी धपांडी, ईष्टाप ख्येळनार.. येकदम यादों की बारात.

दोस्तीवरनं आटीवलं. आम्च्या साळंत बी येक जय-वीरूची जोडी हुती. दिग्या पाटील आन् सदानंद कुलकर्नी. सदा कुलकर्नी मास्तरांचा पोरगा. दिग्या आन् सदा.. कुटं बी बगा, दोगं हमेशा संगटच. दिग्याला पलवानकीचा नाद. येकदम श्टीलबाडी. मस फड गाजवले हाईत दिग्या पलवानानं. दिग्यानं कुस्ती मारली की शड्ड ठोकून सदा बेभान नाचनार. सदा अभ्यासात हुश्शार. बारावी जाला आन् पुडं शिकाया नगरला गेल्ता. बी. काम. जाला. ब्यांकेच्या परीक्षा दिलत्या. पास जाला. आता म्यानेजर हाई न्याशनल बँकेमंदी तिकडं पुन्याला. त्याची बायकू बी नौकरी करती. मोट्टा फ्लॅट हाई. मास्तर आन् सदाची आई बी तिकडंच पुन्याला. सदा तिकडं पुन्याला ग्येला आन् सदा आन् दिग्याच्या दोस्तीत आंतर पडलं.

दिल का रिश्ता तसाच मजबूत.. पर सालभर भेटी हुईनात. दिग्याचं वडील ग्येलं. बागाईती जिमीन. मस पका. दारूचा नाद जडला. आईला इचारीना. बायकोला जुमानत नौहता गडी. धा वर्साची लेक. तिच्याकडं ध्यान न्हाई. दोन-चार टोळभरव रोज जमा करतू. आन् रोजच्याला बाटलीदास हुनार. कुटनं तरी सदाला खबर  लाग्ली. गाडी काडून गडी तडक गावाकडं. दिग्या मफल जमवून बसल्येला. तिथं ग्येला. समद्यांसमोर दिग्याच्या कानाखाली जाळ. दिग्याला हात लावन्याची हिम्मत न्हाई कुनाची; पर सदाची बातच और. सदाला बगीतलं आन् दिग्याची नशा उतरली. सदानं जमल्याला माबला हग्या दम दिला. पुन्यांदा हिकडं दिसाल तर तंगडं तोडून हातात देईल म्हन्ला. समद्यास्नी गाडीत घालून पुन्याला सौताच्या घरी.

दिग्याला मनाभर वेसनमुक्ती केन्द्रात. समदी कागदपत्रं म्हातारीच्या आन् वैनीच्या नावावर. दोस्तीचा दरारा लई मोटा आसतू सदाभौ. सदा म्हनंल तिथं दिग्यानं मुकाट सह्य क्येल्या. ट्रीटमेंट घेऊन दिग्या मागारी.

दिग्या सुदारला. माळकरी झालाया. दारूच्या थेंबाला बी शिवत न्हाई आताशा. शेतीवाडीत जीव रमलाय त्येचा. आईला जपतो. बायकूचा शबूद खाली पडू देत न्हाई. समदा जीव ल्येकीत अडकल्याला. सदानं दिग्याच्या ल्येकीला सांगून ठेवलंया.. ‘‘खूप शीक. बारावी झालीस की पुण्याला यायचं. कॉलेजमधे जायचं. सदाकाकाच्या घरी राहायचं.’’

दिग्याला परत मान्सात आन्ला सदानं.

दारूस स्पर्श नका करू, संसार उद्ध्वस्त करी दारू. दारू वाट लावती, पर दोस्ती वाट दावती सदाभौ.

ही खरी दोस्ती. सलाम अश्या दोस्तीला.

सदाभौ, दोस्ती जातपात, गरीब-शीरमंत, लिंगभेद मानत न्हाई. आम्च्या दत्तूचा पोरगा मिलिंदा पुन्याला हाई शिकाया. फिल्म इन्स्टिटय़ूटमंदी. मागच्या म्हैन्यात आलता त्यो गावाकडं. शार्टफिल्मचं शूटिंग कराया. दुष्काळ आन् पानी प्रश्नावर लई भारी डाक्युमेंटरी क्येली त्यानं. चार दिस शूटिंग चालू व्हतं. क्यामेरा, लाइट आन् संगट त्येचा गोतावळा. मिलिंदासंगट त्येचे दोस्त. मित्र कमी आन् मत्रिनीच जास्त. पर मत्रीचं नातं गंगेवानी निर्मळ. जबराट टीमवर्क. येकमेकांना समजून घेनारं, जीव लावनारं दोस्तीचं नातं. काय बी वंगाळ न्हाई. आपल्या पिडीचा मत्रिनीकडं बगायचा चष्मा जुना जाला सदाभौ. बदलाया पायजेल.

मत्रिनीवरनं आठीवलं. मी आटवीत होतु. आम्ची जाइंट फ्यामिली. माज्या चुलतभावाचं लगीन जालं. माजी वैनी नवी नवरी होवून घरात आली. माजी आन् वैनीची येकदम गट्टी जमली. मी सारका वैनीमागं. वैनी चांगली शिकल्याली. माजा अभ्यास घेयाची. मस गोष्टी सांगायची. मला गोडधोड खायला घालायची. शिपीची आमटी करावी तर वैनीनंच. नंबर वन. चांगल्याचं कवतिक. मी चुकलो तर पाठीत धपाटा घालायची. वैनी पंचमीला मायेरी ग्येली तर मी बी तिच्या मागं मागं तिकडं. वैनी माजी येकदम जवळची मत्रीन. वैनीच्या डोळ्यात आसू दिसलं की मी कासावीस. दादाशी भांडन डायरेक. दादा म्हनायचा, ‘हा माजा भाव नाही, साला हाई.’ मी खूश. तुमास्नी सांगतू सदाभौ, पोरगी बगाया बी मी वैनीला घेवून जायाचो. आज बी बायकूनं शिपीची आमटी क्येली की ती वैनीची आटवन काडती.

‘कसा जालाय सपाक? जालाय का तुम्च्या वैनीवानी?’

कुटंबी असूया न्हाई. तिलाबी वैनीचं कवतिकच हाई.

सदाभौ, आमचा दत्तू येकडाव पोराला भेटाया पुन्याला गेल्ता बायकोसंगट. यष्टीस्टॅन्डवर दोगांची चुकामूक. येकदम दत्तूच्या डोळ्यात पानी. जीव कासावीस. हिकडं तिकडं येडय़ावानी फिरतूया. तेची बायकू हुश्शार. ती कंट्रोल रूममंदी पोचली. तिथनं अनाऊन्सम्येंट. दत्तू धावत तिकडं. बायकूला बगितली आन् दत्तू पुन्यांदा शेंटी. बायकूत जीव अडकल्याला त्येचा.

सदाभौ, आपुन सगळे हीच मिश्टेक करतू बगा. मत्रीचं नातं जोडतू. निभावून बी न्येतु. दोस्तीखातर जीव देनार न्हाई तर जीव घ्येनार. पर नात्यांमदली मत्री ईसरून जातू. जिंदगीभर खस्ता काडनारा बाप आपल्याला मित्राइतका जवळचा वाटत न्हाई. आई, वैनी, बायकू यांच्यामदी आपल्याला मत्रीन दिसत न्हाई. मत्रीचं नातं आन् नात्यातली मत्री दोनी बी सारकीच. मत्री म्हन्ली की कवतिक, कानउपटनी समदं आलंच. चांगल्या-वायटासकट जवा आपुन आपलं मानूस मत्रीच्या नात्यानं अ‍ॅक्शेप्ट करू, तवा पूरा साल मत्रीदिन साजरा हुईल. न्हाईतर मत्रीच्या नावानं फ्रेन्डशिप ब्यॅन्डवालं कितीबी गंडेदोरे बांधा, मतलबी दोस्ती गंडा घालनारच.

सदाभौ, तुम्चा ‘मितवा’ लई आवडला बगा. मित्र, तत्त्वज्ञ आन् वाटाडय़ा लई ब्येस. आई शप्पत.. तुमीच आम्चं सच्चा मितवा. आमी बी तुमाला वचन देतू. आध्या रातीला हाक मारा, दादासो धावून येईल. एकदम इन्श्टंट आन् फाश्ट. तवर आपली भ्येट टपालकीतूनच.

सुख के सब साथी, दुख में ना कोई..

येकदम रांग हाई. सुख-दुक्खातला येकच साथी मंजी मितवा. जुग जुग जीयो सदाभौ.

ओ मितवा रे..

तुम्चा जिवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 2:32 am

Web Title: friendship day 2019 kaustubh kelkar nagarwala mpg 94
Next Stories
1 वेटिंग फॉर व्यास
2 निरंतर
3 ‘गृहलक्ष्मी’
Just Now!
X