13 August 2020

News Flash

मैत्री.. फ्रेंडशिप.. नातं.. रिलेशनशिप वगैरे..

तरुणाई.. आयुष्यातला सर्वात बहारदार टप्पा. एक व्यक्ती म्हणून याच टप्प्यात आपण घडत असतो. चांगले-वाईट अनुभव, नात्यांची समज, प्रेम, द्वेष, राग या भावनांची ओळख आपल्याला याच

| July 12, 2015 01:01 am

lr09तरुणाई.. आयुष्यातला सर्वात बहारदार टप्पा. एक व्यक्ती म्हणून याच टप्प्यात आपण घडत असतो. चांगले-वाईट अनुभव, नात्यांची समज, प्रेम, द्वेष, राग या भावनांची ओळख आपल्याला याच काळात होते. तरुणपणी एक फार सुंदर गोष्ट घडते, ती म्हणजे आपल्या आयुष्यात येतात मित्र-मैत्रिणी. सगळ्या गोष्टींत आपली साथसोबत करणारे. आपण दिसायला, वागायला जसे असू तसे स्वीकारणारे. आई-वडिलांसमोर आदर वा भीतीपायी आपण थोडं वेगळं वागतो. पण मित्रांसमोर आपल्या स्वभावाचे सारे पैलू आपण खुल्या पुस्तकाप्रमाणे मांडतो. तसं करताना कसलाच संकोच, भीती व लाज वाटत नाही. त्यांच्या स्वभावातले कंगोरेही तितक्याच सहजतेने आपण स्वीकारतो. मनातलं सगळं- मग ते घरातले वाद असतील, पहिलं प्रेम, गणितातले मार्क्‍स, कशाची तरी भीती- हे एकदा या मित्रांसोबत शेअर केलं ना, की अगदी हुश्श वाटतं.
अनेकदा मी माझ्या या गेलेल्या काळात जेव्हा डोकावते तेव्हा केवळ सुंदर आठवणीच नजरेसमोर येतात. तारुण्यातील निरागसता, नात्यांमधला ओलावा, पालक व शिक्षकांचा आदर, मोठय़ांचा मान आणि लहानांचे लाड. थोडक्यात ‘ए इन्फॉर्मल पस्र्पेक्टिव्ह फ्रॉम एव्हरी अँगल’ कसा ठेवायचा, हे सगळं त्या वयानंच तर शिकवलं मला!
ऑस्ट्रेलियन फ्रेंडशिप त्यामानाने खूपच वरवरची वाटते. ऑस्ट्रेलियन तरुणाई हे एक अत्यंत वेगळंच प्रकरण आहे. ऑस्ट्रेलियन तरुण उत्साही आहेत. सळसळते आहेत. खळखळून हसतातदेखील. पण इथे मैत्री मात्र व्यावहारिक रीतीनेच सांभाळली जाते असं मला वाटतं. कदाचित माझा पाहण्याचा दृष्टिकोन तसा असेल; पण येणारे अनुभव मात्र हेच सिद्ध करतात, हे नक्की! अर्थात व्यवहार केंद्रस्थानी ठेवून जरी इथलं मित्रमंडळ वावरत असलं, तरी त्यांची फ्रेंडशिप मात्र खोटी, वरवरची किंवा तोंडदेखली नसते. आपण मैत्रीत जरा ‘टेकन फॉर ग्रांटेड’ स्वभाव बाजूला सारून त्यांच्यात मिसळलो ना, तर तेही आपल्या जडणघडणीचा मान ठेवतात, आपल्या विचारांचा आदर करतात. आपण काही त्यांना बदलायला इथे नाही आलो, ही खूणगाठ जेव्हा मनाशी बांधतो, तेव्हाच त्यांच्याशी छान तरल मत्री होते. पण ती तेवढय़ापुरतीच. जरा जरी खाजगी आयुष्यात ढवळाढवळ होताना जाणवलं की मग ‘फ्रेंडशिप एंड्स देअर.’ ‘एन्जॉय अन्टील इट लास्ट्स’ हे तत्त्व मैत्रीतही लागू होतं.
माझ्या मुलांचे काही मित्र केजीपासून एकमेकांसोबत आहेत. पण किती वेळा त्यांनी आपापले लंचबॉक्स शेअर केलेत? एक-दोनजण सोडल्यास इतरांसोबत अजिबात नाही. शाळेचाच तसा नियम आहे. इथे फूड अ‍ॅलर्जीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा नियम आहे.
माझा मोठा मुलगा पाच वर्षांचा असताना त्याला मी एकदा डब्यात इडली दिली होती. शाळेतून आल्यावर तो मला म्हणाला, ‘‘आज मस्त होता डबा. पण प्लीज, उद्या परत इडलीच दे आणि जरा जास्त दे. मॅट एट हाफ ऑफ दोझ. ही जस्ट लव्हड् देम.’ मी हे ऐकल्यावर उडालेच व रागावलेही. त्याला फूड अ‍ॅलर्जी व हायजिन स्टँडर्ड वगैरेवर बरंच ऐकवलं. पण त्याच्या बालमनाला ते काही पटलं नाही. दुसऱ्या दिवशी इडली दिली खरी; पण मॅटनी मागितली तरी द्यायची नाही, या शर्तीवर. वर्गात सोडायला गेले तर मॅटची आईपण होतीच. मी ठरवलं होतं की, आम्ही कशी स्वयंपाकात स्वच्छता बाळगतो, कुणी अन्नपाणी मागितलं तर नाही म्हणत नाही, वगैरे तिला ऐकवायचं. पण ती चक्क हसतमुख चेहऱ्याने मला म्हणाली, ‘मॅट एंजॉइड द व्हाइट स्टफ! प्लीज, परत केले तर पाठवशील का? मी पैसे देईन.’ मी तिला सांगितलं की, ‘आज दिली आहे आणि दोघांना पुरेल इतकी आहे. पण पैसे नको देऊस.’ त्यावर तिचं उत्तर फारच मजेशीर होतं, ‘ओह! मॅट आस्कड् मी टू गिव यू मनी बीकॉझ इट ईझ बेटर दॅट वे.’ बापरे! मित्रासाठी जास्त इडली दे सांगणारा पाच वर्षांचा माझा मुलगा आणि त्याच्याच वयाचा मॅट चक्क पैशांत गोष्टी मोजतो? पण मला काही त्या माय-लेकांचा राग आला नाही. त्यांच्या दृष्टीने ते बरोबरच होतं. माझ्याऐवजी कोणी ऑस्ट्रेलियन बाई असती तर हा प्रश्न अगदी सहज विचारला असता तिने; आणि उत्तरही व्यवहाराला धरूनच मिळालं असतं. अर्थात त्यामुळे त्यांच्या ‘फ्रेंडशिप’वर काही परिणाम झाला असता असंही नाही. आजही मॅट माझ्या मुलाचा खूप चांगला मित्र आहे. दोघांच्या हायस्कूल वेगळ्या असल्या तरी दर सुट्टीत ते भेटतातच. एकमेकांचं सांस्कृतिक आगळेपण ते जाणून आहेत. मॅटच्या घरी राहायला जाताना माझा मुलगा स्वत:ची स्लिपिंग बॅग घेऊन जातोच- ते काही मॅटकडे पुरेसे पलंग नाही म्हणून नाही. मॅटही आमच्या घरी त्याची स्लिपिंग बॅग आणतो. तशी पद्धतच आहे इथे. मॅट पक्कं ओळखून आहे की या घरात इंडियन फूडवर ताव मारताना पैसे विचारायचे नाहीत. नुसतं मनसोक्त खायचं. आणि विशेष गोष्ट मॅट जपतो- ती म्हणजे दारातून आत येण्याआधी तो पायातले बूट काढून आत येतो. हे आम्ही कोणी कधीही इतक्या वर्षांत त्याला सांगितलेलं नाही. थोडक्यात, मैत्रीतल्या व्यवहाराला कितपत व कुठवर महत्त्व द्यायचं किंवा नाही द्यायचं, हे ते दोघंही जाणून आहेत. मॅटची रूम त्याच्या भावाच्या रूमपेक्षा थोडी लहान आहे. त्यामुळे जास्त मित्र आले की जागा अपुरी पडते. केवळ या कारणासाठी मॅटची आई एका वेळी फक्त तीन मित्र आणण्याची परवानगी देते. त्याबद्दल तिनं ‘to avoid the inconvenience of sleeping anywhere other than Mat’s room,’ असं मला कौतुकाने सांगितलं. मनात त्याच क्षणी विचार आला की, चार-पाच रूम्सची भव्य घरं असूनही कशाची गैरसोय होत असावी बरं यांना? दोन छोटेखानी खोल्यांमध्ये अनेकांच्या पिढय़ानुपिढय़ा राहतात आपल्याकडे. गैरसोयीच्या घरांमध्ये लग्नकरयही धडाक्यात पार पडतात. पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना घराच्या लांबी-रुंदीपेक्षा मनाच्या माठेपणाला प्राधान्य देतो आपण.
इथे ‘गुड फ्रेंड्स’ असाल तरी लग्नकार्य म्हटलं की प्रत्येक मित्राची गणना केलीच पाहिजे असा नियम नसतो. लग्न होणार असलेल्या जोडप्याला जर वाटलं आणि परवडलं, तरच तुम्हाला निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. लग्नाचा खर्च शेवटी वर-वधूच करतात. त्यामुळे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असतो. त्यात घरच्यांनी अथवा मित्रांनी ढवळाढवळ न करणे अपेक्षित असतं. माझी खूप जवळची मैत्रीण मेरीलीन हिने मला या विचारसरणीचा अर्थ समजावला. मी तिला विचारलं, ‘उद्या तुझ्या मुलीचं लग्न आहे आणि तू आजही कामावरच? तुला कसलंच टेन्शन कसं नाही? तुझ्या कोणीच मैत्रिणी का नाही येणार?’’ त्यावर ती म्हणाली, ‘वी फॉलो अ प्रॅक्टिकल रुल.. से ओन्ली इफ यू पे, अदरवाइज स्टे अवे.’ केवढं विरुद्ध जग आहे नाही! आपल्याकडे खिशाला परवडत असो वा नसो, लग्नसोहळा मात्र थाटात पार पडलाच पाहिजे. आमंत्रितांतले किती जवळचे आणि किती लांबचे, याला महत्त्व नाही. वधुपित्याला कन्यादानाची भलीमोठी किंमत मोजावी लागते. कर्जाचा डोंगर झाला तरी बेहत्तर; पण गल्लीबोळातल्या प्रत्येकाला बोलावून त्यांचा मान राखणं, हे वधुपित्याचं कर्तव्यच. भारतीय विवाह परंपरेतला हा ‘व्यवहार’ बुद्धीला न पटणाराच. एरवी सर्व नाती मोरपिसाप्रमाणे जपणारे आपण, प्रत्येक नात्याला भावनात्मक दृष्टीने पाहणारे आपण- लग्नासारख्या पवित्र नात्याचा असा बाजार का मांडतो? इथे आपण नात्याचं रूपांतर कोरडय़ा ‘रिलेशनशिप’मध्ये का करतो? विवाह सोहोळ्यांत जेवढी म्हणून भावनांची अवहेलना, व्यवहार व रीतीच्या नावाखाली होणारी पैशांची उधळण बघायला मिळते, तेवढी इतर वेळी पाहण्यात येत नाही. तेव्हा असं काय होतं, की आपल्याला मनाची श्रीमंती, नात्यांमधला जिव्हाळा आदीचा विसर पडतो आणि लक्षात राहतो तो केवळ जीवघेणा व्यवहार! हाताच्या बोटांवर मोजावे असे काही वरपिता मी पाहिले आहेत- जे ‘मुलगी व नारळ द्या’ किंवा ‘तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच करा,’ असं सांगून विवाहाने जोडल्या जाणाऱ्या नव्या नात्याची रंगत आणखीनच वाढवतात.
कुठल्याही नात्यामध्ये व्यवहार आला की ते नातं संपलंच, असं आपण मानतो. पण याउलट, ऑस्ट्रेलियन नातं (रिलेशन) व्यवहाराला कमी पडलं म्हणून मोडलं- असं चित्र पाहायला मिळतं. आजकाल भारतातही व्यवहारिक नातीच डोकं वर काढताना दिसतात. काळाची निकड की व्यक्तिगत हव्यास, हे माहीत नाही; पण अनेक वेळा असं ऐकतो आपण. काहीजण तक्रार करतात की, मैत्रीतला तो पूर्वीचा ओलावा, आपलेपणा आता राहिलेला नाही. पण का वाटत नाही? कधी या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपण उत्तर शोधलं का? आपण मनाशी ठरवून टाकतो, त्यांना नाही गरज, तर मला पण गरज नाही. मात्र, गरज आहे! आजही मला माझ्या त्या मित्रांची- ज्यांनी मला हसवलं, घडवलं, आधार दिला- त्यांची मला निरतिशय गरज आहे. शेवटी हे विसरून कसं चालेल, की आपणच निवडतो आपले मित्र. आपली निवड इतकी तर नाही चुकणार? फ्रेंडशिप, रिलेशनशिप हे इंग्रजी शब्द थोडा वेळ बरे वाटतात ऐकायला; पण थेट हृदयाला स्पर्श करतात ते मात्र ‘अवर व्हेरी ओन’ नातं व मैत्रीच! या शब्दांचा गोडवा कायम ठेवण्यासाठी, मित्रांशी असलेलं नातं आणि नात्यांमधली मैत्री जपण्याकरता आपण मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी काय फरक पडतो? मनापासूनची ओढ असेल तर सारं काही शक्य आहे.
मोनिका कुलकर्णी (ऑस्ट्रेलिया) – kulkarnimona@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2015 1:01 am

Web Title: friendship relationship
टॅग Relationship
Next Stories
1 दुष्काळ फार झाला, पाणी जपून घाला
2 संस्कृतीला सुगंधाचे कोंदण
3 पितृदिन
Just Now!
X