रविवारी, २७ एप्रिल रोजी ‘लोकरंग’ चाळत असताना माझे लक्ष एका गमतीशीर चित्राने वेधले गेले. मानवी नाक आणि तोंड असलेले एक संत्रे आत्यंतिक वेदनेने ओरडते आहे असे या चित्रात दाखवले होते. आणि लेखाचे शीर्षक होते- ‘फळांचा मोह टाळा!’ साहजिकच असे ‘हटके’ चित्र व शीर्षक पाहून माझे कुतूहल चाळवले गेले आणि मी संपूर्ण लेख नीट वाचून काढला. आहारशास्त्राने प्रचंड संशोधन करून फळांची उपयुक्तता सिद्ध केलेली असूनही फळांच्या बाबतीत इतका नकारात्मक लेख वाचून मन अस्वस्थ झाले. मग आपोआपच आहारशास्त्राच्या खोलात शिरून लेखाची चिकित्सा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. कारण असे न करणे हा लेख वाचून घाईघाईने काही निष्कर्ष काढणाऱ्या लोकांवर अन्याय झाला असता.
लेखाच्या सुरुवातीलाच वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांनी एक मजेदार किस्सा सांगितला आहे. सर्दी व सायनुसायटिससाठी त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या एका मैत्रिणीला त्यांनी उपचारांबरोबरच फळे न खाण्याचे पथ्य पाळण्याचा सल्ला दिला होता. पंधरा दिवसांनी त्याच मैत्रिणीने बाजारात भेटलेल्या लेखिकेला लांबूनच हात केला, पण प्रत्यक्ष भेटण्याचं टाळलं. तिच्या तशा वागण्याचं कारण लेखिकेच्या दुसऱ्या एका मैत्रिणीने त्यांना सांगितलं. त्या मैत्रिणीने वजन कमी करण्यासाठी फलाहार वाढवला होता आणि हे लेखिकेच्या सल्ल्याच्या विरुद्ध असल्याने ती लेखिकेला टाळत होती. आपण दिलेला हिताचा सल्ला जवळच्या मैत्रिणीने असा डावलल्याबद्दल लेखिकेला वाईट वाटलं आणि तसं होणं साहजिकच होतं. हा किस्सा मजेशीर असला तरी हसण्यावारी नेण्याजोगा नसून विचारप्रवृत्त करायला लावणारा आहे. आपला हिताचा सल्ला डावलून मैत्रिणीने दुसऱ्या कोणाचा फलाहार करण्याचा सल्ला मानला, असा या घटनेचा मर्यादित अर्थ लेखिकेने काढला आहे. पण तो तसा मर्यादित आहे का, याचा सखोल विचार करायची गरज आहे.
सर्दी, दमा, सायनुसायटिस अशा श्वसनाच्या विकारांचा संबंध लेखिकेने थेट फलाहाराशी जोडलेला आहे. हे आजार मुख्यत: वातावरणातील विशिष्ट विषाणूंमुळे होतात. या विषाणूंना जेव्हा आपल्या श्वसनमार्गात पोषक वातावरण मिळते तेव्हा त्यांचा संसर्ग होतो. परंतु कालांतराने म्हणजे चार-पाच दिवसांनी आपली रोगप्रतिकारक्षमता या विषाणूंना शरीरातून हद्दपार करते. त्यांना मारण्यासाठी वेगळ्या औषधांची गरज नसून फक्त लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी (symptomatic relief) औषधे घ्यावी लागतात. कधी कधी धूळ, झाडांचे परागकण अशा विशिष्ट घटकांच्या अ‍ॅलर्जीमुळे दीर्घकाळ टिकणारी- म्हणजेच जुनाट सर्दी (allergic rhino – sinusitis) होते. सदर लेखात नमूद केल्याप्रमाणे जर हे आजार फलाहारामुळे होत असतील किंवा बळावत असतील तर मग असा निष्कर्ष काढायला हवा, की फळांमुळे आपल्या श्वसनमार्गात विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार होते, किंवा आधीच संसर्ग झालेल्या विषाणूंची फळांमुळे आणखीन वाढ होते. परंतु आजपर्यंत झालेल्या वैज्ञानिक संशोधनातून फळांचा आणि विषाणूंचा असा कोणताच परस्परसंबंध सिद्ध झालेला नाही. फळांमधील विशिष्ट घटकांमुळेच हे श्वसनविकार होतात असेही कोठे सिद्ध झालेले नाही. फार तर असे म्हणता येते की, लिंबूवर्गीय (संत्री, मोसंबी वगैरे) किंवा अन्य आंबट फळांमुळे अगोदरच जंतूसंसर्ग होऊन संवेदनशील बनलेल्या घशाला   irritation होऊन खोकला वाढू शकतो. परंतु हा नियमही आंबट फळे वगळता सर्व फळांना लावता येत नाही.
‘फलाहार केल्यानं दमेकरी, तापकरी रुग्णांचे प्राण कंठाशी येतात. एक दिवस एक वेळ एक प्लेट फळांच्या फोडी खाल्ल्यानं बारा-बारा तास श्वासोच्छ्वास घेणं कठीण होतं..’ असं लेखिकेचं म्हणणं आहे. दमा या आजारात रुग्णाची श्वासनलिका अतिसंवेदनशील बनते आणि मग थंड हवा, धूळ, परागकण, काही विशिष्ट अन्नपदार्थ इत्यादींच्या संपर्कात आल्यावर ती अचानक आकुंचन पावते. त्यामुळे रुग्णाचा श्वास गुदमरतो. परंतु ज्या अन्नपदार्थामुळे दम्याचा अटॅक येतो, त्यात फळांचा समावेश आहे, वा फळांमधील विशिष्ट घटकांमुळे दमा बळावतो असे कोणत्याही वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झालेले नाही. संत्री-मोसंबी यांसारख्या आंबट फळांमुळे असे होऊ  शकते असे मानले जाते. परंतु त्यालाही पुरेसा शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही.
माणसाला येणारा ताप हादेखील जंतुसंसर्गामुळे किंवा काही वेळा शरीरातील तापमान नियंत्रण प्रणाली बिघडल्यामुळे होतो. इथेही फळातील कोणताच घटक याला कारणीभूत असतो, किंवा फळे खाल्ल्यावरच परिस्थिती बिघडते, हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालेले नाही. मग अशा रुग्णांनी सरसकट सगळीच फळं खाणं थांबवावं, असं म्हणणं कितपत सयुक्तिक आहे?  
पुढे लेखिकेने दुसरा एक किस्सा सांगितला आहे. त्यांच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला न्युमोनिया झाला असताना त्याने लेखिकेचा सल्ला डावलून फळे खाल्ली. परिणामी त्यांची परिस्थिती गंभीर बनून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. वास्तविक न्युमोनिया म्हणजे फुप्फुसांना होणारा जंतुसंसर्ग- जो मुख्यत: जीवाणूंमुळे ( Bacteria) व कधीतरी विषाणूंमुळे (virus) किंवा बुरशीमुळे (fungus) होतो. जीवाणूंमुळे होणारा न्युमोनिया प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे रुग्णाची श्वसनक्रिया निकामी होऊन (Respiratory failure ) त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर ठेवावं लागू शकतं. मी मागेच नमूद केल्याप्रमाणे, फळे ही जीवाणूंच्या संसर्गाकरता कारणीभूत नसतात किंवा त्यांच्या वाढीकरता श्वसनमार्गात पोषक वातावरणही निर्माण करत नाहीत. मग फळे खाण्याने न्युमोनिया बळावला आणि रुग्णाची श्वसनक्रिया बंद पडून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं, या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? फळांचा आणि श्वसनविकारांचा असा बादरायण संबंध जोडून आपण नक्की काय साध्य करणार आहोत?
वर नमूद केलेल्या किश्श्यामध्ये सांगितलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे लेखिकेच्या मैत्रिणीचा नवरा पोटात प्रथिनं जावीत म्हणून फळं खात होता, तर आधीच्या किश्श्यामध्ये त्यांची मैत्रीण वजन कमी करण्यासाठी फलाहार करत होती. पुढे दिलेल्या एका उदाहरणात एक तरुण मुलगी ‘झीरो फिगर’ बनविण्याच्या नादात फक्त फलाहार करत होती. लोकांना असे चुकीचे आहारविषयक सल्ले का आणि कुठून मिळतात, याबद्दल लेखिकेला आश्चर्य आणि दु:ख वाटतं. पण त्याचं उत्तर सोपं आहे. आजकाल अर्धवट ज्ञान असलेल्या आणि पैशांच्या मागे लागलेल्या अनेक फिटनेस गुरूंचं पेव फुटलं आहे. टीव्ही, इंटरनेट आदी प्रसारमाध्यमांमुळे त्यांचा प्रचारही पटकन् होतो. कोणी म्हणतो- फक्त फलाहार करा. कोणी म्हणतो- फक्त सूप पिऊन राहा. तर कोणी आणखी काही! साहजिकच व्यायाम, आहार व योग्य जीवनशैली यांचा समतोल न साधता पटकन् वजन कमी करू पाहणारी मंडळी याला बळी पडतात. आधीच अशा अज्ञानाच्या गर्तेत सापडलेल्या मंडळींसमोर श्वसनविकारांचा बागुलबुवा उभा करून त्यांना सरसकट फलाहार बंद करायला लावणं कितपत योग्य आहे?
फळांना असं सरसकट वाईट ठरवण्याऐवजी त्यांच्या उपयुक्ततेची किंवा उपद्रवाची वैज्ञानिक चिकित्सा करणं गरजेचं आहे. आहारशास्त्र ही प्रचंड संशोधन झालेली एक आधुनिक विज्ञानशाखा असून, अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा कोणत्याही वैद्यकीय चिकित्सा पद्धतीच्या तज्ज्ञाने त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण इथे ‘pathy ’ कोणती, हे महत्त्वाचं नसून आहारशास्त्राने काय सिद्ध केलं आहे, ते महत्त्वाचं आहे. विज्ञानामध्ये घटक (उदा. फळं) आणि घटना (उदा. श्वसनविकार) यांतील कार्यकारणभाव हा वस्तुनिष्ठ पुराव्यांची जोड देऊन सिद्ध करावा लागतो. एवढंच नव्हे, तर तेच ते प्रयोग पुन:पुन्हा करून त्यांच्या निष्कर्षांची वारंवारता संख्याशास्त्राच्या आधाराने तपासावी लागते. यातून तावूनसुलाखून टिकून राहिलेले सिद्धान्तच वैज्ञानिक सत्य म्हणून मान्यता पावतात. फळं आणि श्वसनविकार यांतील कार्यकारणभाव हादेखील असाच सिद्ध व्हावयास हवा; जो इथे होत नाही. कारण लेखिकेने नमूद केलेले अनुभव हे व्यक्तीनिष्ठ आहेत; वस्तुनिष्ठ नाहीत. अमुक एकाला फळं खाल्ल्याने सर्दी झाली, तमुक एकाला दमा, न्युमोनिया झाला अशा विस्कळीत वैयक्तिक अनुभवांना वैज्ञानिक तथ्य म्हणून मान्यता देता येत नाही. असे अनुभव फसवे असू शकतात. कारण तिथे कार्यकारणभाव आणि त्याची वारंवारता तपासण्याचे कष्ट कोणी घेतलेलेच नसतात. मागील उदाहरणांमध्ये फळं खाल्ल्यामुळे श्वसनविकार झाले, हे खरं मानायचं झाल्यास फळांमधील नक्की कोणते घटक त्यास कारणीभूत आहेत, ते सांगावं लागेल. तसंच किती उदाहरणांमध्ये फळं खाल्ल्यावरच आजार बळावला, याची सरासरी वा टक्केवारी संख्याशास्त्राच्या आधारावर ठरवली पाहिजे आणि त्याचे निष्कर्ष किमान ६०-७० % वारंवार आढळून आले तरच त्यात काही तथ्य आहे असं मानलं पाहिजे. अन्यथा अशा दोन-चार अनुभवांना निव्वळ योगायोग म्हणावं लागेल; ज्यात रोगांना कारणीभूत घटक वेगळाच होता, पण दोष मात्र फळांवर आला.
लेखिकेच्या मते, सर्व फळं गोड चवीची, पचायला जड, रसदार आणि थंड असतात. पण हे शंभर टक्के खरं आहे का? वास्तविक बहुतांश फळं गोड चवीची असली तरी आंबट, तुरट चवीचीही असंख्य फळं आहेत. फळांमध्ये मुबलक प्रमाणात असलेली ‘फ्रुक्टोज’ नावाची साखर पचायला खूप हलकी असते. म्हणून तर दीर्घकालीन उपवास वा उपोषण सोडताना फळांचा रस प्यायला दिला जातो. ‘फ्रुक्टोज’ उष्मांक
(caloric value ) ४ आहे- म्हणजेच  एक ग्रॅम ‘फ्रुक्टोज’पासून ४ cal’ ऊर्जा मिळते- जी अन्य पदार्थातील साखरेतून मिळणाऱ्या ऊर्जेएवढीच आहे. त्यामुळे केवळ स्पर्शाला थंड वाटतात म्हणून फळांना थंडही म्हणता येत नाही. फळांमध्ये प्रथिने फारशी नसली तरी व्हिटामिन्स, मिनरल्स आदी अन्य अत्यावश्यक सूक्ष्म पोषकद्रव्यांची भरमार असते. फळांच्या सालीमधील चोथ्यामुळे (caloric value) अन्नपचन चांगलं होतं, तसंच रक्तातील चरबीचं (cholesterol  वगैरे) प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लंडनमधील किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, नियमित फळं खाणाऱ्या मुलांमध्ये श्वसनविकारांचं प्रमाण कमी होतं. कारण फळांमधील व्हिटामिन ‘सी’ तसेच अन्य aniti-oxidants  माणसाची रोगप्रतिकारक्षमता वाढवतात. मग अशा बहुगुणी फळांना श्वसनविकारांसाठी कारणीभूत ठरवून दूर ठेवणं आपल्या आरोग्याला खरोखरच हितकारक ठरेल?
मग कोणी म्हणेल- फळांचे काहीच दुष्परिणाम नाहीत का? तर आहेत! आंबा, केळी, द्राक्षे अशी गोड फळं अतिप्रमाणात खाल्ल्याने स्थूलता वाढू शकते. केवळ फलाहार करणाऱ्या लोकांमध्ये प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ
(Essential amino and fatty acids) यांची कमतरता निर्माण होऊ  शकते. फळे नीट न धुता खाल्ल्यास किंवा अतिप्रमाणात खाल्ल्यास त्यांच्या सालींमुळे पोट जड होणं, जुलाब होणं असा त्रास होऊ  शकतो. Hereditory fructose intolerance  या दुर्मीळ आनुवंशिक आजारात फळं पचत नाहीत. फळातील काही व्हिटामिन्स (उदा. व्हिटामिन ए) अति झाल्याने ‘हायपरव्हिटामिनोसीस’ नावाचा विकार होऊ शकतो. पण मग बाकीच्या अन्नघटकांच्या अतिसेवनाचे-देखील दुष्परिणाम होतातच ना! कोणतीही गोष्ट विशिष्ट मर्यादेत खाल्ल्यास फायदाच होतो. आणि फळंही त्याला अपवाद नाहीत.
लेखिकेला तरुण पिढी बंडखोर वाटते, कारण ती ‘फळे खाऊ  नका’ या किंवा अशाच सल्ल्यांबद्दल शंका उत्पन्न करते. लेखिकेच्या ओळखीची एक मुलगी विचारते की, ‘इतके सगळे लोक फळं खातात, त्यांना कुठे काय होतं? जुन्या काळी ऋषीमुनीसुद्धा फळंच खायचे ना!’ त्यावर लेखिकेचं म्हणणं असं की, फळं खाऊन त्रास झालेले लोक त्या मुलीला थोडंच सांगायला येणार आहेत? ते तर त्यांच्या डॉक्टरांनाच सांगणार. जुन्या काळच्या ऋषीमुनींचीही दिनचर्या वेगळी होती. ते खूप कष्ट करायचे. त्यांचं स्वत:चा राग, लोभ, भीती यावरही नियंत्रण असायचं. म्हणून त्यांना फळं, कंदमुळं  पचायची.
वस्तुत:  कष्ट केल्यावर एकंदरच अन्नपचन चांगलं होतं, हे खरं असलं तरी कष्ट केल्यावरच फळांचं पचन होतं, हे अजिबात खरं नाही. शिवाय फळांमधील कोणत्या विशिष्ट घटकांचा राग, लोभ, भीती अशा भावनांवर काही प्रभाव असतो, याला काहीच शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे फळांचं पचन होण्यासाठी अगदी ऋषीमुनींसारखीच दिनचर्या असली पाहिजे असंही नाही. उलट, पचायला हलकी असलेली फळांतील साखर आणि चोथा यामुळे ती मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास पचन चांगलंच होतं. अगदी कोणतेही कष्ट न करता!   
लेखिकेच्या मते, रुग्ण व त्याचा आचारीही ‘भिषग्वस्य’ म्हणजेच वैद्याला वश झालेला, त्याचं प्रामाणिकपणे ऐकणारा असावा. हे जरी खरं असलं तरी त्याचा अर्थ रुग्णाने आपल्या विवेकबुद्धीला जागृत ठेवून काही तर्कसंगत प्रश्न विचारूच नयेत असं नव्हे. आणि त्याने तसे प्रश्न विचारलेच तर वैद्य/डॉक्टरने त्याची तितकीच तार्किक व विवेकपूर्ण उत्तरं द्यायला हवीत. आजकाल बाजारात फळांच्या उपयुक्ततेबद्दल शास्त्रीय माहिती देणारी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.Foods that harm, foods that heal या पुस्तकात अनेक फळांचा विशिष्ट आजार बरे करण्यासाठी कसा उपयोग झाला, याची शास्त्रीय माहिती दिली आहे. ”National Institute of Nutrition’ ‘ या भारतीय आहारविज्ञान संस्थेने तर आहारविषयक शास्त्रीय माहिती देणारी पुस्तकं  अत्यंत स्वस्तात उपलब्ध करून दिली आहेत. ती प्रत्येक वैद्यकीय तज्ज्ञाने तसेच सामान्य माणसांनीही आवर्जून वाचायला हवीत. शेवटी वैद्य कोणत्याही ‘Pathy ‘चा का असेना, पण तो नेहमी रुग्णाच्या हिताचाच विचार करत असल्याने अशा अवांतर वाचनाचा त्याला आणि त्याच्या रुग्णालाही फायदाच होईल यात शंका नाही.
तात्पर्य : कुटुंबात आरोग्य नांदावं असं वाटत असेल तर गृहिणींनी कोणत्या एका अन्नपदार्थाला  गुणकारी वा दोषी न ठरवता सर्व प्रकारच्या अन्नघटकांचा समतोल कसा साधला जाईल, याचा विचार करून स्वयंपाकाचं व आहाराचं नियोजन करावं.
अशी ही फळांची कहाणी सुफळ संपूर्ण होवो, हीच सर्वासाठी मनोमन सदिच्छा!