News Flash

हास्य आणि भाष्य : (सं)वाद आणि (वि)संवाद

‘लग्न’ या विषयावर जगभरात लाखो व्यंगचित्रं काढली गेली आहेत.

लग्न, संसार आणि दुर्दैवाने घटस्फोट या पाश्चिमात्य संस्कृतीतील विविध पातळ्यांकडे पाश्चात्त्य व्यंगचित्रकार खेळकरपणे कसे पाहतात ते लक्षात येतं.

प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

‘लग्न’ या विषयावर जगभरात लाखो व्यंगचित्रं काढली गेली आहेत. याचं साधं कारण म्हणजे नवरा-बायकोमधील वाद, संवाद आणि विसंवाद यांमध्ये विनोद आणि विसंगतीच्या प्रचंड शक्यता असतात.. ज्याच्या शोधात व्यंगचित्रकार नेहमी असतो. एकूणच  लग्न, संसार आणि दुर्दैवाने घटस्फोट या पाश्चिमात्य संस्कृतीतील विविध पातळ्यांकडे पाश्चात्त्य व्यंगचित्रकार खेळकरपणे कसे पाहतात ते लक्षात येतं.

एका व्यंगचित्रात चर्चमध्ये विवाहाची शपथ घेत असतानाच नवरा मुलगा त्याच समारंभातील दुसऱ्या कुठल्या तरी मुलीकडे चोरटय़ा नजरेनं पाहताना व्यंगचित्रकारानं त्याला नेमकं पकडलं आहे. एक नववधू तर लग्नानंतर ‘जस्ट मॅरिड’ असं लिहिलेल्या गाडीतून हनिमूनला जातानाच नवऱ्याला बजावते, ‘‘आता माझे प्रॉब्लेम तुझेही झाले आहेत, त्याची ही यादी!’’ (‘मेरे सुख अब तेरे, तेरे दु:ख अब मेरे’ हे गाणं तिने ऐकलं असावं.)

हनिमूनसाठी हॉटेलमधल्या रूममध्ये आल्यानंतर नवरा सर्वात प्रथम तयार होऊन टीव्हीवर क्रिकेटची किंवा बेसबॉलची मॅच लावतो असं व्यंगचित्र एकाने रेखाटलं आहे. तेव्हाच खरं तर यांच्या नात्याची अखेर कशी होणार याची साधारण कल्पना येते. हेच लॉजिक पुढे न्यायचं म्हटलं तर नवऱ्याच्या फुटबॉल मॅचेसच्या वेडाला कंटाळून बायको घर सोडून निघाली आहे आणि नवरा म्हणतोय, ‘‘ठीक आहे, आपल्यात काही संवाद उरलेला नाही असं तू म्हणते आहेस; पण निदान ‘हाफ टाइम’ होईपर्यंत तरी थांब. चर्चा करू.’’ (व्यंगचित्रकार हर्ली शेवड्रोन)

लग्नानंतर बायकोने केलेला स्वयंपाक नवऱ्याला न आवडणं ही जगभरची समस्या असावी. कारण एका चित्रात नवरा म्हणतोय, ‘‘मला आवडला. फारच वाईट आहे हा! पण तरीही मला आवडला!!’’ एका चित्रात तर चर्चमध्ये पाद्रीसमोर उभे राहताना एक नियोजित नवरा तिथून पळून जातो (सावधान!). पण जाताना म्हणतोय, ‘‘ज्युली, तुला सरप्रायजेस खूप आवडतात ना? मी जातोय, कारण माझं मत मी बदललंय!!’’ तर दुसऱ्या एका चित्रात नववधूच्या वेशातच एक तरुणी ऑफिसमध्ये टायपिंग करते आहे आणि मैत्रिणीला  म्हणते, ‘‘आमचं फारसं जमेल असं मला वाटलं नाही!!’’ (उगाच एक दिवसाची रजा का वाया घालवायची?)

कुत्र्याबद्दल फार प्रेम असलेल्या नववधूचा लांबलचक पायघोळ वेडिंग गाऊन दोन लहान मुलांऐवजी दोन छोटी कुत्र्यांची पिल्ले घेऊन उभी आहेत असं चित्र एका व्यंगचित्रकाराने रेखाटलं आहे, पण त्याची कॉमेंट या चित्राला आणखी पुढे नेते. ती म्हणजे.. समारंभातली एक खाष्ट  बाई म्हणते, ‘‘जॉर्जला आता बहुतेक त्याच्या कुत्र्यांची संख्या कमी करावी लागेल!’’

नवरा-बायको दोघंही एकाच वेळी एकच पियानो वाजवत आहेत. तेव्हा वैतागलेली बायको एका व्यंगचित्रकाराने रेखाटली आहे. ती सुरांच्या स्वर्गीय आनंदात मश्गूल असलेल्या नवऱ्याला म्हणते, ‘‘लग्नानंतर आपले सूर जुळतील असं तू म्हणाला होतास; पण ते हे असे?’’

आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न म्हटल्यावर जगभरातल्या आई-वडिलांना कमालीचा आनंद होणं स्वाभाविकच. पण ही पाश्चात्त्य विश्वातील आई मात्र- ‘‘माझ्या मुलीचं हे पहिलंच लग्न खूप थाटामाटात व्हावं असं मला वाटतं..’’ असं अभावितपणे बोलून जाते. ‘न्यू यॉर्कर’चे व्यंगचित्रकार बर्नी टोबे यांचं हे चित्र आहे.

लग्नानंतर सूर तर जुळले नाहीतच; पण विसंवादही इतका पराकोटीचा वाढला की प्रचंड संकटातही एकत्र राहावं असं वाटण्याऐवजी स्वतंत्र राहावं, ही भावना काही जोडप्यांत प्रबळ होते. म्हणूनच बोट फुटल्यानंतरही व्यंगचित्रातील या जोडप्याला जणू करवतीने हे बंधन तोडण्याची इच्छा आहे.

बायको घर सोडून जात असताना तिला नवरा स्पष्ट शब्दांत सुनावतोय, ‘‘तुझं माझ्या बेस्ट फ्रेंडबरोबर जाणं फार दु:खदायक आहे!!’’ चित्र नीट पाहिल्यावर लक्षात येतं की, हा बेस्ट फ्रेंड म्हणजे त्यांचा लाडका कुत्रा असतो!! ‘‘कुत्र्याची वाटणी कुणाकडे, हे नीट ठरत नसल्याने आमचा घटस्फोट जरा लांबणीवर पडलाय..’’ असं सांगणारं जोडपं एका व्यंगचित्रात आहे. तसंच ‘‘घटस्फोट मिळाल्यानंतर मित्रमैत्रिणींचीसुद्धा वाटणी झाली आणि त्यात माझ्या वाटय़ाला तुम्ही आलेले आहात..’’ असं एका व्यंगचित्रातील एक नवरा मित्रांना सांगतोय. मद्यपानावरून अनेक पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. एका व्यंगचित्रातील एक दारुडा नवरा आपल्या बायकोला स्वत:चं समर्थन करताना म्हणतोय, ‘‘दारू सोडण्याचं वचन मी दारू प्यायलेल्या अवस्थेत दिलं असल्याने मी ते कसं पाळणार?’’ घरातील भांडणं शक्यतो घरातच सोडवावीत, कोर्टात नेऊ नयेत असं म्हणतात. त्यामुळे कोर्टाबाहेर प्रश्न सोडवला जाणार म्हटल्यावर आनंद झालेल्या पत्नीला आपल्या पतीच्या  स्वभावाचा अंदाजच आलेला दिसत नाही, हेच खरं!! (व्यंगचित्रकार अल्बर्ट रुस्लिंग)

मराठी हास्यचित्रकलेतही ‘नवरा-बायको’ या विषयावर अनेकांनी हास्याचे फवारे उडवले आहेत. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे त्यांच्या मिश्कील हास्यचित्रांविषयी सुप्रसिद्ध आहेत. त्यांची दोन उदाहरणे नमुना म्हणून पाहता येतील. (सौजन्य : व्यंगार्थी, प्रफुल्लता प्रकाशन) बायकोला बरं वाटत नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. नेहमीप्रमाणे डॉक्टर राऊंडला येतात आणि विचारपूस करतात, तेव्हा नवरा म्हणतो, ‘‘आज तिला जरा बरं आहे डॉक्टर! थोडी भांडलीदेखील!!’’ त्यांच्याच दुसऱ्या एका चित्रात- ‘‘गुन्हेगाराला शिक्षा देताना तो विवाहित आहे हे कोर्टाने लक्षात घ्यावं..’’ असा युक्तिवाद वकील करताहेत!!  एकूण वैवाहिक जीवनात विसंवाद निर्माण होतात आणि संवाद संपून फक्त वाद उरतात तेव्हा घर म्हणजे तुरुंग आणि जीवन म्हणजे जणू सक्तमजुरीच असं वकिलांना सुचवायचं असावं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:51 am

Web Title: funny cartoons about marriage hasya ani bhashya dd70
Next Stories
1 विश्वाचे अंगण : सुखखरेदी आणि खरेदीसुख
2 सांगतो ऐका : व्यापारी जगातला विलक्षण सौदागर
3 या मातीतील सूर : अमृताहुनी गोड…
Just Now!
X