|| डॉ. संजय ओक

परवा एके ठिकाणी वाचनात निवृत्त व्यक्तींच्या मानसिक घालमेलीचा उल्लेख होता. गत आयुष्यात अनुभवलेली पदे, प्रतिष्ठा, पैसा हे जणू भुते बनून त्याच्या मनात पिंगा घालत राहतात; आणि पर्यायाने त्याचे स्वत:चे आणि त्याच्या भोवताली असलेल्या इतरांचे आयुष्यही जगायला कठीण किंवा जरा स्पष्टच बोलायचे तर लिव्हिंग हेल या स्वरूपाचे करतात, असे ते वर्णन होते. निवृत्त व्यक्तीची समजूत काढताना लेखकाने म्हटले होते, ‘आपण आता एक फ्युज्ड बल्ब आहोत हे सत्य स्वीकारा.’

‘फ्युज्ड बल्ब’ हा शब्द माझ्या मनात घोळत राहिला. प्रशासनाच्या कामातून प्रकृतीच्या कारणास्तव मीही सहर्ष स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती आणि पूर्ण वेळ सर्जरी करायला प्रारंभ केला होता. काहीतरी करत होतो, हात चालत होते आणि मेंदू विचारी होता. तेव्हा पूर्ण अर्थाने मी ‘फ्युज्ड’ झालो नव्हतो आणि तरीही  आपण केले ते योग्य केले की घाईगडबडीने? अजून काही वर्षे काम करू शकलो नसतो का? पगाराचे केवढे नुकसान? उरलेल्या वेळाचे करायचे काय? घरातल्या लोकांना आपण घरात हवे आहोत का? बागेत फेऱ्या किती वेळ मारायच्या?… अशा असंख्य प्रश्नांचा माझ्या डोक्यात भुंगा झाला होता. बरं, मनातले सगळे विचार व्यक्त करण्याची सोय नव्हती.

घरातल्या लोकांचा अ‍ॅप्रोच… तुझा तू निर्णय घेतला आहेस, म्हणजे थोडक्यात- भोग आपल्या कर्माची फळे- असा असायचा. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना आणि मित्रांना वेळ नसायचा, कारण ते थोडेच माझ्यासारखे ‘फ्युज्ड’ झाले होते? तेव्हा ठरवले की, ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ आणि ‘आपुलाची वाद आपणांसी’- जे काही बोलायचे ते आपण आपल्याशी. नवी प्रयोजने शोधायची. निवृत्तीनंतर आपली गरज नाही असे नाही, तर त्या गरजांच्या जागा बदलल्या आहेत. तुम्ही खूप ठिकाणी हवे आहात. ती ठिकाणे शोधून काढायची.  खणल्याशिवाय हिरा मिळतच नाही आणि मिळतो- तोही कोळशात बरबटलेला. कामाचे पारिश्रमिक अपेक्षित ठेवायचे नाही. शासकीय भाषेत टाडा मिळाला बास झाले. खाजगी क्षेत्रातील Monetary Compensation चा विषय येथे आणायचा नाही. एकदा ठरल्यावर मग मी सायन रुग्णालयातील माझ्या शस्त्रक्रिया वाढविल्या. दर रविवारची गावोगावची शिबिरे वाढवली. करोनाच्या प्रतिबंधनात्मक नियमांमुळे गावांमधून शस्त्रक्रिया करणे कठीण होते, पण निदानात्मक शिबिरे (Diagnostic Camps) करून रुग्णांना मुंबईला आणणे शक्य होते. आणि त्याच कामाला प्रारंभ झाला. प्रयोजन तेच होते, पद्धती आणि योजना फक्त बदलल्या. फ्युज्ड बल्बमध्ये थोडीफार धुगधुगी अजूनही शिल्लक होती.

सकाळ-संध्याकाळ शहराच्या पार्क किंवा नाना-नानी गार्डनमधून फेरफटका मारला तर एक विलक्षण विरोधाभासात्मक दृश्य दिसते. तरुणाई ग्राऊंडच्या मध्यभागी क्रिकेटमध्ये दंग असते. मध्यमवयीन वर्ग हिरवळीवर योगाभ्यासात गर्क असतो आणि चालण्याच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकांवर अनेक फ्युज्ड बल्ब प्रकाशमान असतात. पार्कातली भटकी कुत्री हमखास शेपूट हलवत त्यांना साथसोबत करत असतात. या बल्बजची पूर्वपीठिका जाणून घेतली तर कोणी सिटी इंजिनीअर, कोणी चीफ अकाऊंटंट, कोणी सीईओ, तर कोणी प्राचार्य. पदावरून पायउतार झाल्यावर थोडे दिवस ‘माजी’ लावण्याचा माज किंवा मोह मंडळी करतात आणि नंतर ‘अकस्मात तोही पुढे जात आहे’ अशा न्यायाने पुसला जातो. ओळख उरते ती फक्त नावाने आणि नीतीने. पेन्शनर- अर्थात निवृत्ती वेतनधारक किंवा आजच्या शब्दांत बोलायचे झाल्यास ‘फ्युज्ड बल्ब’ या बल्बचे वॅटेज ४०, ८०, १२०, २४० होतं की तो हॅलोजन / झेनॉन होता याला कशाला काही अर्थ उरत नाही.

करोनाने गेल्या ६-८ महिन्यांत या फ्युज्ड बल्बची संख्या वाढवली आणि ती अवस्था आयुष्यात ऐन पंचेचाळिशीतच यायला लागली. काही बल्बज् मात्र त्यातही कर्तबगार निघाले. त्यांनी टॅ्रक बदलला, टॅ्रकसूट नाही. पंचतारांकित हॉटेलातली शेफची नोकरी सुटल्यावर एक मराठमोळ्या वीराने स्वत:चे बिर्याणी हाऊस काढले. गॅरेज बंद झाल्यामुळे घरी बसण्याऐवजी मंडळींनी घरोघरी जाऊन गाडी सर्विस करून देण्याचा व्यवसाय काढला. प्रश्न जर नवे होते तर त्यांना उत्तरेही नवीच शोधायला हवी होती. त्यात कल्पकतेला वाव होता, कालानुसार होणाऱ्या वयोमर्यादेला नाही. मी पूर्वी कोणीतरी होतो… तेव्हा हे काम मी आता कसे करू? हा प्रश्नच मुळात चुकीचा होता Dignity of labour  ही  Dignity Of Individual पेक्षा मोठी होती. हे ज्यांना लवकर समजले आणि आत्मसात करता आले त्यांची निवृत्ती लवकर सुखकारक झाली. समाजाला आता माझी पूर्वीसारखी गरज नाही असे म्हणून रडत बसण्यापेक्षा पुलंच्या चितळे मास्तरांचे वाक्य आठवावे… ‘अरे पुर्ष्या, टाइम्स हॅव चेंज्ड.’… समाजाला नव्या गरजा निर्माण होतात. त्या शोधून तेथे आपण कोठे चपखल बसतो हे तपासणे महत्त्वाचे. तंत्रज्ञान जितके आत्मसात करू तेवढे चांगले. तेव्हा आपण फ्युज्ड व्हायचे नसेल तर आपणच आतून प्रकाशित राहणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.

… दिवाळीच्या दिवसांत आमच्या पुण्यात किल्ल्यांची स्पर्धा होते. एकदा असाच परीक्षक होण्याचा योग आला. एकाहून एक सुंदर प्रतिकृती… राजगड, रायगड, तोरणा, जंजिरा… एका किल्ल्याला केलेली पांढरी शुभ्र घुमटाकार गोलांची केलेली तटबंदी मला फार आवडली. मी त्या रचनाकार मुलाला विचारले, ‘हे सगळे काचेचे घुमट इतके प्रमाणबद्ध अर्धवर्तुळाकार तू कसे बरे मिळवले? तो हसला आणि म्हणाला, ‘सर, मी फ्युज्ड बल्ब वापरले.’

 sanjayoak1959@gmail.com