News Flash

बहरहाल : अवकाळी अवदसा

हे एक बरं झालं की गांधींच्या दीडशेव्या जयंती वर्षांत सत्याचा आग्रह धरीत सत्ताधारी पक्षद्वयात राजकारण झडले.

(संग्रहित छायाचित्र)

गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

हे एक बरं झालं की गांधींच्या दीडशेव्या जयंती वर्षांत सत्याचा आग्रह धरीत सत्ताधारी पक्षद्वयात राजकारण झडले. दोन्ही पक्ष अहमहमिकेनं ‘सत्य’ परमप्रिय असल्याचं सांगत, प्रतिपक्षाचे असत्य सहन न होऊन एकमेकांची सोबत सोडते झाले. या चालू वर्तमानकाळातला हा आगळा सत्याग्रह अनुभवण्याचे भाग्य तुम्हा आम्हा पामरांना लाभले. या अनुभवाचे यथोचित टिपण भावी पिढय़ांकरिता करण्याकरिता लेखणी चालवितो आहोत. शालेय पाठय़क्रमात, अबोध वयात, गांधीजींच्या ‘सत्याग्रह’ नामे राजकीय आयुधाची ओळख करून देण्यात आली होती. विनोबा भावेनामक एक सत्पुरुष या आयुधाचे प्रथम धारक ठरले होते. कोणाही सोम्यागोम्यास न पेलणारे हे सत्याचे शस्त्र काळजीपूर्वक विनोबांहाती सोपवताना गांधींना कुठे कल्पना होती की, शतकभरात सत्याग्रही होण्याची पात्रता हरेक लोकप्रतिनिधी प्राप्त करेल व सर्वत्र सत्याची उधळण करीत त्यांचा पुत्रदेश त्यांच्या शिकवणुकीचे सव्याज पांग फेडेल. विनोबा ते युती हा सत्याचा प्रवास हरखून टाकणारा तर आहेच, पण ऐतिहासिक महत्त्व असलेला आहे. या प्रवासात ‘सत्य’ नामे संज्ञेने आपले रूप स्वरूप नाना गुणांनी बदलवत ठेवून स्वत:स टिकवून ठेवले ही सत्याचीही मोठीच उपलब्धी यानिमित्ताने जाणवते. अशा या मंगलमय दिवसात शेतकऱ्याबितकऱ्यांनी, मोलमजूर गरिबांनी आणि साऱ्याच वंचितांनी आपापली नेहमीची रडगाणी गाऊन उगा गालबोट लावू नये. दीडशे वर्षांचा खडतर प्रवास पार पाडून आमची राजकीय व्यवस्था परिपक्व  झाली असून, तिचे अनुयायी समष्टीच्या कल्याणाकरिताचे काटेरी सिंहासन मिळवण्याच्या एकमेव खटाटोपात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ म्हणत एकमेकांशी लढत आहेत. ज्यांना कालपर्यंत भाऊ म्हटले त्यांना अलगद पाठीत भोसकून वा पायात पाय घालून तोंडघशी पाडून भारीच मौज लुटत आहेत. एकंदरीने या महारट्ट नामे देशात पुलंनी म्हटल्याप्रमाणे, एकमेकांना रट्टे देण्याचे अंगभूत नामसामर्थ्य असलेली महारट्टी मंडळी लीलया ना ना लीला करून दाखवीत आहेत. या लीला व त्या करणारी ही चरित्रे या आधारे नवे लीळाचरित्र लिहिणारा नवा माहिमभट लवकरच या पाषाणदेशी अवतरेल, असा होरा अनेक दिवाळीअंकात, साप्ताहिकात व दैनिकात (एका ओळीचे) राशिभविष्य लिहिणाऱ्या या आमच्या परिचयातील एका होराभूषणांनी वर्तविला आहे. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय हल्ली हलाखीच्या अवस्थेस पोहोचला आहे, याचे कारण ‘वर्तमानात जगा’, ‘वर्तमानात जगा’ हा पाश्चात्य जीवनशैलीतून आलेला मूलमंत्र स्वकीय मोठय़ा प्रमाणात अनुसरू लागल्याने त्यांना भविष्याचे कौतुक उरले नाही. द्रष्ट्यांपेक्षा स्वल्पदृष्टीच्या ढापण्यांची चलती आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या महान देशीचे लोकप्रतिनिधीसुद्धा साहजिकच रयतेप्रमाणेच आजच्या पोळीवर आजचेच तूप लडबडवायच्या खटपटीत आहेत. तेव्हा काळ मोठा धामधुमीचा आहे. निकराचा आहे. हातघाईचा आहे. भावाभावात लढून गीतेतला कर्मसिद्धांत जगून दाखवण्याचा आहे; आणि सत्याग्रही आचरणाने सत्यवचनी रामाची पुनस्र्थापना करण्याचा आहे. आनंदाची बाब हीच की, या दोन्ही प्रक्रिया आमचे लोकप्रतिनिधी अंतर्वस्त्रांच्या अपुऱ्या संचानिशी, एकमेकांची जाकीट पलटी करून पार पाडीत आहेत. त्यांनी स्वत:साठी इतर कुठलाच ‘रिसॉर्ट’ शिल्लक ठेवला नाही. कोण ही तळमळ! कोण हा त्याग! इतके सारे ते का करीत आहेत? तर केवळ रयतेच्या कल्याणाचे स्वप्न पाहण्याव्यतिरिक्त त्यांजकडे दुसरे काम उरले नाही. (पक्षनेतृत्वाने त्यांचे भ्रमणध्वनी अन् बगलबच्चेही काढून घेतल्याची बोलवा आहे. अन्यथा त्यांनी एकमेकांस व्हाट्सअप करण्यात तरी विरंगुळा शोधला असता.) इतके सारे आमचे लोकप्रतिनिधी करीत असता ‘ओला दुष्काळ’ करीत बोंब ठोकायची काहीही गरज नाही, वा ‘बेकारी, बेकारी’, ‘मंदी, मंदी’ असे जप करण्याचेही औचित्य नाही. शहरी अन् ग्रामीण दोन्ही प्रकारच्या जनतेला रिझविण्याचे त्यांचे कसरतींचे खेळ अहोरात्र चालू आहेत. सर्वानी मजा घ्यावी अन् सुखेनव काळ व्यतीत करावा. सदर लेखकाने भावी पिढय़ांकरिताही या मनोरंजनाचे वानवळे मागे उरावेत म्हणून काही तपशील मिळविले आहेत. या साऱ्या तपशिलातून लोकप्रतिनिधींच्या अडचणी, विवंचना, कष्ट, विटंबना, खऱ्याची तळमळ आदी बाबींची यथोचित नोंद गुणीजन घेतील ही आशा.

 

वानवळा- एक

‘‘हॅलो, हां बोल.’’

‘‘कुठंय?’’

‘‘इथंचे.’’

‘‘मुंबईत?’’

‘‘बोल ना तू, कशाला फोन केलाय?’’

‘‘नाही त्ये पशे लागत व्हते. होìडगं आनि व्हेइकलचे पेमेंट करायला पायजे. अ‍ॅडवान्सपन नवता दिला. ’’

‘‘देतो ना म्हणावं. का पळून चाल्लोय कुटं? ’’

‘‘त्ये म्हंतायेत पळूनच गेलेत तुमचे साएब.’’

‘‘पळून नाइये फक्त लपूने. पळवापळवी होऊ नये म्हणून तर लपूने म्हणावं.’’

‘‘त्ये म्हंतायेत तुमचं सरकार बननार नाहीए. त्यांनी चॅनलला पाहिलं. चॅनेलवाले म्हनले, तुमचा मामा केलाय.’’

‘‘काय? आसं म्हंतायेत? च्यायला साहेबांच्या वाढदिवसाच्या सगळ्यांला जाहिराती वाटल्या होत्या पाच पाच लाखाच्या.’’

‘‘त्येच की. उलाथले सगळे. पन आपल्याला तिकीट मिळालं तिथंच वसूल झाले की आपले पशे.’’

‘‘तिकीट झालं, आता निवडून पन आलोय पन वसुली कुठाय? म्हनून तर रेटा लावून बसलोय. आरं इथं रिसॉर्टवरपन डोळ्यात तेल घालून राहावं लागतं. पन्नास गावची बावन टाळकीएत. कोन कुनाचा घात करंल सांगता येत नाई. रात्री अपरात्री साहेब येतात. काल तर पावनेतीनला आले. मी जागाच होतो. खिडकीतूनच लँडक्रूजर पायली. लगीच पळालो. दार मीच उघाडलं. परवापन साहेब लंचला येनार होते. आलेच नाहीत. मग उशिरा आले. म्हनले, ‘‘बरं झालं जेवलात. मिटिंगा होत्या. उशीर झाला.’’ तर मी लगीच तितलं सफरचंद त्यांला दिलं. म्हनलं, ‘‘फ्रुट?’’ तर मला म्हनले, ‘‘तुम्ही जेवले का?’’ म्हनलं, ‘‘नाय. वाट बघत होतो तुमची.’’ तुला सांगतो, लगीच साबांनी पाठीवर हात टाकला. डाळखिचडी मागवली. सादी खिचडी पन आस्ली लागली ना. बर आसुंदे. आता ठेव. त्यांना म्हणावं- म्हंजे वैनींना म्हणावं, पशे द्यायला सांगितलेत. ‘जीव झाला येडापिसा’ असा कोडवर्ड सांग. द्य्ोतीन. पंदरा घे. साडे सात साडे सात दोघांना दे. आन् परत फोन करू नको. फोनपन टॅप होतायत म्हने. ठय़ेव.’’

 

वानवळा- दोन

‘‘अं ऽऽऽ आत चर्चा करून तुम्ही येतात. अं ऽऽऽ एकूण काय खेळखंडोबा झालाय? अ ऽऽऽ, बऽऽऽ चच्रेचं गुऱ्हाळ संपतंय. अंऽऽऽ संपून बल थांबलाय का? अऽऽऽ काय सांगाल?’’

‘‘हॅ हॅ हॅ हॅ.. बलाचे दिवस या महाराष्ट्रानी पालेत पन टॅक्टरचे दिवस आनायचं स्वप्न दाखविन्याचं काम या ठिकानी आमच्या पक्षानी केलय, आनी माननीय, आदरणीय, वंदनीय पक्षप्रमुख आनि पक्षातले नेतृत्व..’’

‘‘आत काय ठरलं? तेवढंच सांगा.’’

‘‘आत आम्ही सगळे होतो. बसलो होतो. एकूण जी राजकीय परिस्थिती..’’

‘‘अंऽऽऽ ब्रेकिंग न्यूज येतीय.. अंऽऽऽ काय? काय म्हणतेयस आकांक्षा? माझा आवाज येतोय?’’

‘‘होय दीपक, तुमचा आवाज येतोय. आताच हाती आलेल्या बातमीनुसार नानांनी खेळी केलीय. ते बंगल्यातून निघालेत. काय सांगाल?’’

‘‘अंऽऽऽ नक्कीच आकांक्षा खेळी झालेलीए. नानांची गाडी निघालीए. माझ्यासमोर आता विश्वासराव आहेत. ते आत बसले होते. आत्ता बाहेर आलेत. हे आपल्या प्रेक्षकांना आपण अंऽऽऽ दाखवू शकतो.. याच गेटमधून आता सगळे आमदार बाहेर आलेत.. आकांक्षा!’’

‘‘बरं का, तर पक्षाच्या नेतृत्वानी ठरवलंय की सत्याची ही लढाई..’’

‘‘माफ करा विश्वासराव.. एवढा वेळ नाहीए. नानांची गाडी निघाली.. संदीप चोरमारे दिसतायत. पहिल्यांदाच आमदार होताना.. अंऽऽऽ.. काय एकंदरीत कुठेतरी.. रामायणातल्या बालीचा अनुभव येतोय? काय सांगाल?’’

‘‘आदरणीय पक्षप्रमुखांनी दाखविलेला विश्वास, माननीय विश्वासरावांनी टाकलेला विश्वास आनि सुजाण मतदार बंधूभगिनींचा विश्वास खरा करून, सत्याची लढाई लढून पन हनुमानाप्रमाणे एकनिष्ठ साथ द्यून सत्ता आनायचं स्वप्न या ठिकानी साकार करन्याच्या माध्यमातून एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकानी करन्याची इच्छा आहे.’’

‘‘बाली नाही, हनुमान असा संदेश मिळतोय.. आकांक्षा.’’

‘‘माझा बाईट राला..’’

‘‘उद्या करू ना. विश्वासराव तुमची ट्रॅक्टरची कॉमेंट घेतली ना..’’

‘‘एबीसीडी न्यूजसाठी कॅमेरापर्सन रवी जमदाडेसह मी दीपक सांडभोर.’’

 

वानवळा- तीन

‘‘काय? काही बातमी? केवढासा झालाय गं चेहरा. अं?’’

‘‘नाही हो वन्सं. तसं काहीच नाही. कालच फेशिअल केलं ना तर ती पार्लरवाली म्हणाली, ‘धुऊ नका चेहरा. पोअर्स बंद होतात.’ म्हणून तसं वाटत असेल. बरं झालं तुम्ही आलात.’’

‘‘बंधुराजांनी सत्याची कास धरली अन् सत्तेची सोडली. खरं सांगू का? मला नाही आवडलं.’’

‘‘यावेळी गणितं वेगळी आहेत वन्सं.’’

‘‘वीरूचं गणित कच्चं होतं, आहे आणि राहणार. मी सांगते. अगं बाकीचे फोडाफोडी करणार आणि आपण सत्यवान बनून पिंपळाखाली बसायचं?’’

‘‘वडाखाली बसली सावित्री सत्यवानाला घेऊन. पिंपळा..’’

‘‘तेच. वडाची साल पिंपळाला लावत तर मेली सत्ता मिळते. आजच्या काळात खरं बोलून साधी रजा मिळत नाही ऑफिसात. आजसुद्धा भावजयीला अ‍ॅटॅक आलाय म्हटलं तेव्हा सोडलं बॉसनं. सत्ता काय गेली मेले वासेच फिरले सगळे.’’

‘‘फूस् फूस् सस्स स्स ऽऽऽ’’

‘‘ए, वहिनी, अगं रडू नकोस. रडून काय होणार आहे? त्याला म्हणावं सरळ पक्षांतर कर. पाच वर्ष बाजूला बसायचं म्हणजे सोपं नाही.’’

‘‘इश्श.. बाजूला का बसणारेत ते?’’

‘‘विरोधात बसणं म्हणजे तेच. सत्तेचा विटाळच की! ते काही नाही तू तोंड धू पाहू. आपण मस्त पिच्चरला जाऊ. सुचेल मग काहीतरी.’’

 

वानवळा- चार

‘‘साहेब दिल्लीचं तिकीट काढलंय.’’

‘‘नागपूरचं?’’

‘‘काढलंय.’’

‘‘मुंबईचं?’’

‘‘मुंबईला गाडीनी..’’

‘‘ठीक ठीक. बाकीचीपण काढून ठेव. सगळी काढ. ईटानगर, कोहिमा, पोर्ट ब्लेअर कुठलं सोडू नको. ऐनवेळी कुठं धावावं लागेल कळत नाही. च्यायला एवढी वर्ष झाली, पण सत्यापाठचा वनवास संपत नाही. जयपूर साईट सीईंग करून घेऊ आज. मॅडमचा फोन आज तरी येत नाही. मी कालच सांगितलं. म्हटलं, स्पृश्य-अस्पृश्य काही नाही राहिलं. काळ बदललाय. मुख्य म्हणजे पाच वर्षे विरोधात बसलोय. आता नाही सहन होत. जनतेचं कल्याण करायलाच पाहिजे.’’

 

वानवळा- पाच

‘‘काय रे? तू इथं कसा आलास?’’

‘‘लपत छपत आलोय. फटाक्यांचं काय करायचं?’’

‘‘परत कराना.’’

‘‘बभ्रा होईल ना. माती खाल्ली म्हणतील.’’

‘‘कालच का नाही वाजवले रे? सात ते साडे सात अर्धा तास फुल आपलं सरकार येणार अशी हवा होती. त्या कदमनी बघ बरोबर वाजवून घेतले. चॅनेलला स्वत:च व्हिडीओ पाठवला. भिकारडय़ांनी लगीच दाखवला. ते तरी कितीवेळ बंगले, गाडय़ा आन् बिल्डिंगा दाखवनार म्हना..’’

‘‘आता वाजवू का?’’

‘‘भाड ऽऽऽ .. आता? सगळं बोंबलल्यावर? राष्ट्रपती भवनासमोर जाऊन लाव. त्यांची राजवट आलीए ना.. च्यू ७७७ साले..’’

‘‘मग काय करू. परत जाताना फटाक्यांमुळं पोरं मावनार नाईत गाडीत.’’

‘‘ए, हे बग, एक काम करा. किती माळा आहेत?’’

‘‘धा धा हजारच्या पन्नासेत.’’

‘‘एक मिन्टं, एक काम करा. एकेक सुट्टा करा फटाका आन् रात्रीतून पकापक फोडून मोकळा करा. सगळा कपटा कचरा आपल्या पक्ष कार्यालयापुढं टाका. आन् फोटो वायरल करा. जा. पळा लवकर. कुनी बगीतलं तर हान्तीन त्ये बाउन्सर.’’

 

वानवळा- सहा

‘‘दांगट, तुम्ही आपले विदर्भातले, मराठवाडय़ातले दोनचार आमदार घ्या आणि त्यांना म्हणावं ट्रोलिंगची यंत्रणा कामाला लावा. यांच्या वडिलांचे, आजोबांचे जुने व्हिडीओ लावा. ‘लूत भरल्या कुत्र्यागत सत्तेसाठी हापापलेत हे विश्वासघातकी’ असं सूत्र ठेवा. ठोका चांगले.’’

‘‘कालच तुमी हेच सांगितल्यावर लगीच कामाला लागलो. पन च्यायला ट्रोलच मिळंनात.’’

‘‘का? आमच्या काळात बेकारी माजली म्हणत होते ते खोटंच तर.’’

‘‘साफ खोटं. आहो ज्याला म्हनून टायपिंग येतंय त्ये प्रत्येक दोन पायाचं गराळ वकतंय. दहा पाच, पन्नास, चाराणे, आठाणे काय मिळंल त्या भावानी एकमेकाला ट्रोल कराय लागल्यात भडवी. मानूस फ्री घावंना.’’

‘‘बघा म्हणावं. आणि म्हणे बेकारी झाली आमच्या राज्यात. अरे, पंचवीस कोटी ट्रोल कामाला लावले देशभरात ते कोण मोजणार? आणि आठाठाणे म्हटलं तरी करा हिशेब. किती चलन येतंय, फिरतंय बाजारात. कुठाय मंदी?’’

‘‘ती शिरियल बगतीए. फोन लाऊ का?’’

‘‘अहो, तुमची बायको नव्हे, आर्थिक मंदी. पांचट विनोद या निर्वाणीच्या घडीला तरी नकोत. सत्य खणून काढा आणि टाका जनतेसमोर.’’

एकंदरीने वानवळे विपुल, पण लेखणी तोकडी अशी अवस्था झाल्याने थांबतो. या सत्याग्रहाच्या महापर्वाचा साक्षीदार होता आलं याचा अभिमान उरात मावत नाही. इतकी वर्ष खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्यांचा अन् दुष्काळानं पिडलेल्या रयतेचा महाराष्ट्र सोडून, पटकन गल्फमध्ये किंवा ऑस्ट्रेलियात जावं वाटे, पण या सत्याग्रहपर्वानं या जुन्या भूप्रदेशाला नवझळाळी प्राप्त करून दिली आहे. प्रथम सत्याग्रही विनोबांनी जमीनदारांकडची सत्ता गरीब रयतेत वाटून टाकली, तर आजच्या नवसत्याग्रही घराणेदार जमीनदारांनी रयत नागवून ती सत्ता नीट एकत्र करून तिचा ढीग लावलाय. आता त्या ढिगावर चढून बसताना घसरत, आपटत ते कोशीश करताहेत तुमच्या माझ्या कल्याणाची. यात सत्याचा आग्रह होतोय. म्हणून गांधींना श्रद्धांजली वाहिली जातीय आन् घसरून पडताना मोठीच कॉमेडी घडून महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांनाही त्यातूनच श्रद्धांजली बसतीय. त्यांचीपण जन्मशताब्दी कम्पलीट झाली ना याच महिन्यात.

बहरहाल रट्टे द्यायची आन् विनोद करायची म्हराटी परंपरा पुढं जाते आहे. लोकमान्य टिळक, ज्योतिबा फुले, आगरकर, साने गुरुजी,

डॉ. आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, एस्सेम, स्वत: पुलं.. हे सगळे महाराष्ट्राचे सुपुत्र आपल्या भाऊबंदांच्या लीला पाहून हसून हसून बेजार झाले आहेत म्हणे वरती. इतके की, पार रडायला लागलेत. काय अवकाळी अवदसा म्हणायची हो!

girishkulkarni1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:13 am

Web Title: gandhi jayanti baharhal article girish pandurang kulkarni abn 97
Next Stories
1 भालो-बाशा!
2 निर्मळ आत्मकथन
3 नाटकवाला : ‘माँ इन ट्रान्झिट’
Just Now!
X