News Flash

हाये न मन को चन पडे..

१९८२ ते ९३ या काळात- म्हणजे माझ्या शालेय जीवनात ‘गणेशोत्सव’ हा माझा सगळ्यात आवडता सण होता.

|| भूषण कोरगांवकर

पूर्वी गणेशोत्सव म्हटलं की उत्साहाला उधाण यायचं. आसमंतात एक वेगळंच चैतन्य, प्रसन्नता भरून असायची. मग तो घरचा गणपती असो की सार्वजनिक! त्यानिमित्ताने विविध कलांचं प्रदर्शन घडविणारे कार्यक्रम योजले जात. त्याचा आनंद लुटताना मन आनंदाने काठोकाठ भरून जाई. आज मात्र  गणेशोत्सवाला जे बाजारू रूप आलं आहे त्याने मन उद्विग्न होतं. अर्थात प्रत्यक्ष गणराया येतो त्या दिवशी मात्र हे सारं अमंगळ विसरून आपण पुन्हा नव्याने हर्षोल्हसित होतो..

१९८२ ते ९३ या काळात- म्हणजे माझ्या शालेय जीवनात ‘गणेशोत्सव’ हा माझा सगळ्यात आवडता सण होता. नवेद्याचा गोड वास, उकडीचे मोदक, ऋषीची भाजी, मिरवणुकांची मजा, त्यात वाजणारे मोजके फटाके, गुलाल, ढोलताशे, घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची सजावट, देखावे, मखरं, फुलांच्या माळा, भाविकांच्या रांगा.. आणि मुख्य म्हणजे खास गणपतीनिमित्त बसवली जाणारी नाटकं आणि नाच-गाण्यांचे कार्यक्रम.. अशा सगळ्या गोष्टींनी ते दिवस भारलेले असायचे. काहीतरी फार प्रसन्न सुरू आहे असं वाटत राहायचं.

नाटकात भाग घेणं, शाळेत बाईंनी बसवलेली नाटकं आणि नाच लक्षात ठेवून, त्यातलं बरंचसं कॉपी करून, थोडी स्वत:ची भर घालून कॉलनीतल्या गणपतीसाठी नाटक बसवणं, गाणी म्हणणं, वक्तृत्व- निबंध- चित्रकला- हस्ताक्षर यांतल्या जमतील तितक्या स्पर्धामधून भाग घेण्यात सारे गुंतलेले असायचे. त्यामुळे या काळात आमचा उत्साह, ऊर्जा वाढलेली असायची. आणि अशा या प्रसन्न, मंगल वातावरणात ‘बॅकग्राऊंड स्कोर’ म्हणून असायची ती प्रत्येक मंडळामधून लाऊडस्पीकरवरून (आणि तरीही सुस आवाजात!) सतत वाजत राहणारी गणपतीची गाणी. संपूर्ण गणेशोत्सवावर या सकस, जोरकस संगीताचं आणि उदबत्त्या, फुलं, प्रसादाच्या मिश्र सुगंधाचं ठळक अस्तर उठून दिसत असे.

गणपतीच्या काळात योगायोगाने, किंवा कधी कधी खास हा मुहूर्त पाहून रिलीज केली जाणारी फिल्मी आणि नॉन-फिल्मी गाणी पुष्कळ असत. आधीच लोकप्रिय झालेली गाणी तर इथे वाजायचीच; शिवाय काही नवी गाणी तर निव्वळ दहा दिवस रोज ऐकून ऐकूनच हिट् होऊन जायची. बहुसंख्य लोक हे शब्दांपेक्षा गाण्याची चाल लक्षात ठेवतात. म्हणजे शब्द विसरले गेले तरी चाल कधी विसरली जात नाही. ‘लालालाला’ किंवा ‘आआआआ’ करून गाणं गायलं जातं. शब्दांचं महत्त्व आहेच, पण गाण्याची धून जास्त महत्त्वाची. आणि चालीइतकंच, किंबहुना उत्सवी गाण्यांमध्ये चालींपेक्षा वरचढ ठरू शकतो तो गाण्याचा रिदम अर्थात ठेका! शब्दांची द्विरुक्ती हासुद्धा गाणी हिट् करणारा एक महत्त्वाचा घटक असतो. आणि अशी चटपटीत, क्वचित निर्थक शब्दांच्या द्विरुक्त्यांनी युक्त उडाव गाणी वाजून वाजून सतत आपल्या कानांवर पडत राहिली की नकळत आपल्याला त्यांची सवय होते, आपण ती गुणगुणू लागतो, आपली पावलं त्यावर थिरकू लागतात आणि गाणी हिट् होऊन जातात. मग गणपतीच्या आशीर्वादाने गाणी हिट् होतात अशी भाविकांची श्रद्धा असली तर त्यात काय नवल? पण संगीत क्षेत्रातील व्यावसायिकांना यामागचं हे खरं गणित पुरतं उलगडलेलं असतं.

गणपतीसमोर सगळ्या प्रकारची गाणी वाजत असली तरी रात्रीच्या आरतीनंतर आणि मिरवणुकांमध्ये नाचायला अशी थिरकती, तडकभडक चालींची गाणीच लागतात. तिकडे बीट्स कमी पडून चालत नाही. आणि गणपतीतला नाच म्हणजे काय विचारावं? तो एक वेगळाच आनंद सोहळा असतो. नाचणाऱ्यांच्या भावनांचा निचरा आणि बघणाऱ्यांची निखळ करमणूक. कुणी बेधुंद (आणि बेताल) नाचू लागलं की- ‘असा गणपतीत नाचल्यासारखं का नाचतोयस?’ असं आजही विचारलं जातं. त्या काळाचा विचार करायचा झाल्यास मध्यमवर्गीय आणि गरीब मराठी माणसाच्या नाचाच्या आवडीला तेव्हा या दहा दिवसांतच काय तो निभ्रेळ आउटलेट मिळत असे. आजच्यासारखे उठसूट वाढदिवस, सत्यनारायणाची पूजा, ऑफिस किंवा सोसायटीच्या पाटर्य़ा, पावसाळी सहली किंवा तत्सम निमित्ताने डीजे पाटर्य़ा केल्या जात नसत. शिवाय गणपतीत नाचायला गरबा-दांडियासारख्या जुजबी प्रशिक्षणाचीही गरज नसे. त्यामुळे गणपती ही बुद्धीपेक्षा कलेची आणि त्यातही नाच-गाण्याची देवता म्हणूनच आपल्यासमोर येत असे. आणि तिचं हेच रूप जास्त लोकप्रिय होतं, आजही आहे.

तेव्हा रेडिओ, टीव्ही आणि कॅसेट्स असे गाणी ऐकायचे मोजकेच पर्याय उपलब्ध असल्यामुळे अशी कित्येक गाणी होती, ज्यांची पहिली ठळक ओळख त्या काळात बऱ्याच जणांना गणेशोत्सवातच होत असे. काही काही गाणी तर या वर्षीनंतर थेट पुढच्या वर्षीच अशी सलग पुन्हा पुन्हा ऐकायला मिळायची. ‘फुलोरी बिना चटनी कैसे बनी’ हे भोजपुरी लोकगीतासारखं गाणं मी प्रथम गणपतीतच ऐकल्याचं आठवतं- जे बऱ्याच वर्षांनी सलमान खानच्या ‘दबंग-२’ सिनेमात वापरलं गेलंय. नाझिया हसनच्या ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये’ या गाण्याने तर कहर केला होता. ‘बूम बूम’, ‘डिस्को दिवाने’ अशी अनेक गाणी घेऊन आलेली ही तरुण, सुंदर पाकिस्तानी गायिका आपल्या भावंडांसह त्याकाळी खूपच फॉर्मात होती. शिवाय ‘बांगो बांगो बांगो’, ‘मुंगडा’, ‘एक-दो-तीन’सारखी गाणीसुद्धा सतत वाजत असल्याचं आठवतं. नाच येणारी प्रत्येक लहान-मोठी मुलगी त्या काळात ‘एक-दो-तीन’वर गणेशोत्सवात नाचलेली असणार. मराठीत ‘जवा नवीन पोपट हा’, ‘बिलानशी नागीन निघाली’सारखी गाणी तुफान लोकप्रिय होती. शिवाय नॉनस्टॉप कोळीगीते, लोकगीतांपासून ते ‘मेंदीच्या पानावर’ आणि आरत्या-भजनांपर्यंत असंख्य वेगवेगळी गाणी तेव्हा चालायची. गणपती मंडळांमधून त्यांच्या कॅसेट्सचा खप होताच; आणि मग ती ऐकून त्यातल्या निवडक कॅसेट्स घराघरांतून आपापल्या आवडीनुसार विकत घेतल्या जायच्या.

गणपतीसाठी खास तयार केली जाणारी गाणी हा तर एक स्वतंत्र विभागच होता. त्यात ‘लोकगीतं’ धाटणीच्या गाण्यांच्या जोडीने पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकरांनी गायलेली त्या काळातली बरीच गाणी आजही वाजवली जातात. त्यांचा ठेका (गणपतीत) नाचायला फार सुयोग्य नसला तरी सूर, शब्द, भाव, आवाज यांच्या बळावर ती लोकप्रिय झाली आहेत. ‘ओंकार स्वरूपा’, ‘ओंकार प्रधान’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘गणराज रंगी नाचतो’, ‘तुज मागतो मी आता’, ‘रांजणगावाला’, ‘गजानना श्री गणराया’, ‘दाता तू गणपती’, ‘आला चतुर्थीचा सण आला’ या गाण्यांशिवाय गणेशोत्सवाची कल्पनाही करता येत नाही. चित्रपटातल्या गणपतीच्या गाण्यांबद्दल बोलायचं तर ‘देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढकर कौन’ हे गाणं त्या काळात लोकप्रियतेचा उच्चांक तोडत होतं. २००० सालानंतर मात्र ‘विरुद्ध’, ‘वास्तव’, ‘डॉन’, ‘मोरया’, ‘अग्निपथ २’, ‘ओ माय फ्रेंड गणेशा’, ‘व्हेंटिलेटर’, ‘जुडवा २’ अशा काही हिंदी-मराठी सिनेमांमधून गणपतीची गाणी येऊ लागली.

कॉपीराइटच्या कायद्याला धाब्यावर बसवून चालणारा अजून एक लोकप्रिय प्रकार म्हणजे हिंदी चित्रपट गीतांच्या चालींवर बेतलेल्या आरत्या आणि भक्तीपर गाणी. पुढे साईबाबा आणि इतर देवांवरही ती लिहिली जाऊ लागली असली, तरी या ट्रेंडचा श्रीगणेशा गणेशोत्सवातच झाला असावा.

सार्वजनिक गणेशोत्सवांमधून हौशी कार्यक्रमांसोबतच नावाजलेली व्यावसायिक नाटकं आणि गाण्याचे कार्यक्रमही होत असत. अगदी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांनाही भरपूर मागणी असायची; जी आजकाल जवळपास हद्दपारच झाली आहे. प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार अनीश प्रधान त्यांचा अनुभव सांगतात की, ‘घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्ताने रसिक आजही शास्त्रीय संगीताच्या कलाकारांना, शिवाय कीर्तन, भजन, पोवाडे गाणाऱ्या लोकधर्मी कलाकारांना घरी खाजगी बठकांसाठी निमंत्रित करतात. पूर्वीच्या तुलनेत या सगळ्याचंच प्रमाण मात्र कमी झालेलं आहे. सार्वजनिक मंडळांतूनही या लोकधर्मी कलांना पुष्कळ मागणी होती; जी आता फारच कमी झाली आहे. या सगळ्याची जागा बराच काळ लाइव्ह ऑर्केस्ट्रांनी आणि लावणी व इतर लोकनृत्यांच्या कार्यक्रमांनी घेतली. आजकाल तर हेसुद्धा कमी होऊन सरळ रेकॉर्ड लावून नाचणं हे आíथकदृष्टय़ा अधिक किफायतशीर असल्यामुळे त्याचंच प्रमाण वाढलेलं दिसत.’ अनीशजींच्या मते, आजकाल समाजात एकसाचीपणा वाढत चालला आहे, त्याचंच हे लक्षण आहे. पूर्वी बॉलीवूड, हौशी कार्यक्रम, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भक्तिसंगीत, पॉप म्युझिक, नृत्य, नाटकं सगळंच एकत्र सुखेनव नांदत असे. प्रत्येकासाठी दिवस वाटून दिले जात. कधी कधी एकाच दिवशी वेगळ्याच जॉनरचे कार्यक्रम लागोपाठ ठेवले जात. आजकाल केवळ बॉलीवूड आणि मराठी सुपरफास्ट गाणी इतकंच प्रामुख्याने उरलंय. त्यांचं असंही एक निरीक्षण आहे की, गणेश मंडळांतून वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांच्या आवाजाची पातळी आज खूप जास्त वाढली आहे. या पातळीवर अगदी सुमधुर गाण्यांचा आवाजही कर्कश्शच येतो. (कदाचित म्हणूनच मला शाळकरी वयात ही लाउडस्पीकरवरची गाणी ऐकायला मजा येत होती आणि आता ती सजा वाटते!)

अजून एका गोष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे. ते म्हणजे ढोलताशे. हे पूर्वीपासून गणपती मंडळामध्ये वाजत असत. आता मात्र त्यांच्या पथकांचं प्रमाण आणि त्यातही तरुण पिढीचा, विशेषत: मुलींचा त्यातला सहभाग खूप वाढलेला आहे. त्याला एक सुंदर पोशाखी रूपही आलं आहे. त्यांच्या रीतसर तालमी चालतात. ढोलताशे हा खुल्या मदानात किंवा मोकळ्या रस्त्यांवर वाजवायचा प्रकार आहे. अनेक वाद्यांच्या एकत्रित वाजवण्यामुळे जो एक सामूहिक आवाज तयार होतो तो चतन्य निर्माण करतो. पण सध्या ट्रॅफिक आणि बांधकामांचाच आवाज एवढा वाढलेला असतो की त्याच्यामुळे बऱ्याचदा हा आवाज चतन्य आणि उत्साहापेक्षा ‘बीपी’च वाढवणारा होऊन बसतो.

एकीकडे सार्वजनिक मंडळं आणि घरी गणपती आणणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते, पण त्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीत सोहळ्यातली आत्मीयता, विचार आणि नियोजन मात्र कमी होताना दिसतंय. रेडिमेड आरास, रेडिमेड नवेद्य आणि रेडिमेड मनोरंजन असं सगळं वेळ, कष्ट आणि पसे यांची बचत करायचा प्रकार सुरू झाला आहे. सगळ्याचंच  industrialisation आणि commercialisation होतंय. (यालाच ‘विकास’ म्हणतात!) पण त्यात होणारी पर्यावरणाची हानी मात्र कित्येकांच्या (यात सरकार आणि जनता दोघेही आले.) अजूनही लक्षात येत नाही याचं सखेद आश्चर्य वाटत राहतं. थर्मोकोल, प्लास्टिक, प्लास्टर ऑफ पॅरिस, फटाके, विजेची रोषणाई, ट्राफिक जॅम, विसर्जनाचा ज्वलंत प्रश्न आणि कानाचे पडदे फाडणाऱ्या साउंड सिस्टम्स यांत उत्सवातली प्रसन्नता मरून उरतो तो केवळ भक्तीच्या नावाखाली चालणारा सवंग बाजार! आपल्या जीवनाचा वेग आणि त्यातली गुंतागुंत इतक्या प्रमाणात वाढली आहे, की नकळत त्याचं प्रतिबिंब संगीतात आणि उत्सवातही दिसून येतं.

पूर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून एक गाणं हमखास वाजवलं जायचं.. ‘गणपती बाप्पा गांव चले, हाय न मन को चन पडे..’ या गाण्याची चाल, शब्द आणि ठेका यांत असं काहीतरी होतं की ते ऐकताक्षणी मनात हुरहुर, बेचनी दाटून येत असे. दिवसेंदिवस एकसाची आणि एकमार्गी बनत चाललेल्या प्रखर उत्सवी गोंगाटामुळे आजकाल ही उदासी गणपतीच्या आगमनाच्याही आधीपासून साचून राहते.

पण मग गणपतीचा पहिला दिवस उजाडतो. सोशल मीडियाद्वारे रोज एकमेकांच्या घरात डोकावणारी, पण प्रत्यक्षात महिनोन् महिने गाठीभेटी नसलेले ‘डिस्कनेक्टेड’ लोक गणपतीदर्शनाच्या निमित्ताने प्रत्यक्षातही ‘कनेक्ट’ होऊ लागतात. घरगुती मोदकांचा गंध, केळीची पानं, फुलं, चारीठाव जेवण, सामूहिक आरत्या, झांजा, भरजरी पारंपरिक कपडे हे सगळं प्रत्यक्ष उपभोगलं जातंच; शिवाय (अर्थातच) सोशल मीडियावर फोटो टाकून मिरवलंही जातं. आणि यातही पाश्र्वसंगीत म्हणून जेव्हा सार्वजनिक मंडळातल्या लाउडस्पीकरवरून ‘गजानना श्री गणराया’चे सूर दुरून ऐकू येतात तेव्हा मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.

Bhushank23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 12:17 am

Web Title: ganesh chaturthi festival 2019
Next Stories
1 हवं संगीताचं मुक्त व्यासपीठ
2 पुण्यातील दोन मंडळांच्या गणेश मूर्तीची संभाजी भिडे गुरुजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना
3 प्रविण तरडे व राकेश बापट यांनी साकारला इको फ्रेंडली श्री गणेश
Just Now!
X