सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास..

Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

सदू धांदरफळेचा नमस्कार.

यार दादू, तिकडे तुमच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही आणि आमच्या इथे मुंबईत भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत. अरे, मी मांस-मच्छी खाणारा माणूस असल्याने मार्केटमध्ये जोवर चिकन, मटण, मासे मिळतात तोवर मी भाजीपाल्याकडे फारसा पाहतही नाही. कोंबडी, बकरे, मासे आपला जीव वाचविण्यासाठी निदान पळू तरी शकतात रे. ज्याला पळण्याची संधीही मिळत नाही अशा गरीब बिचाऱ्या भाजीपाल्याला कापून, शिजवून खाणे माझ्या भूतदयावादी मनाला पटत नाही. त्यात पूर्वीसारख्या चवदार भाज्याही हल्ली मिळत नाहीत. दादू, तुला एक विचारू? कुणीतरी म्हणत होते की, गावे हागणदारीमुक्त झाल्यापासून भाज्यांचीही चव गेलीय. खरे असेल का रे हे?

अरे, पूर्वी कुणाचा चारचौघांत अपमान झाला की आम्ही बम्बया स्टाईलमध्ये ‘इज्जत का भाजीपाला कर दिया’ म्हणायचो. आता भाजीपाल्याचे भाव इतके वाढलेत की आता यापुढे कुणी ‘इज्जत का भाजीपाला हो गया’ म्हटलं तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीची किंमत वाढली असा घ्यावा लागेल काय?

माझं असं एक निरीक्षण आहे की आपल्या बॉयफ्रेंडला ‘मेरा शोना, मेरा बाबू, मेरा बच्चा’ असा मेसेज करणाऱ्या चिरंजीव बॉयफ्रेंडकांक्षिणी, कांद्याचे भाव कितीही वाढले तरी आपल्या बॉयफ्रेंडला ‘माझ्या कांद्या’ असं म्हणत नाहीत. ‘त्याला’ ‘माझ्या कांद्या’ म्हणणारी अशी एखादी ‘ती’ जर तुम्हाला आढळली तर त्याचा अर्थ इतकाच, की त्या दोघांचं लग्न झालंय! असो.

सतराव्या शतकात संत सावता माळी म्हणाले होते.. ‘कांदा-मुळा-भाजी, अवघी विठाई माझी!’ तुला सांगतो दादू, संतांना अंतज्र्ञान असते म्हणतात ते उगीच नाही! मला खात्री आहे- एकविसाव्या शतकात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडणार हे त्यांना अंतज्र्ञानाने नक्की दिसले असणार! आणि म्हणूनच त्यांनी जाणत्या राजांच्या जन्माआधीच ही सारी भाजीपाल्याची प्रॉपर्टी आपल्या सातबाऱ्यावर चढवून ठेवली असणार! पुन्हा असो.

मित्रा, माझ्याविषयी माझा बॉस आणि बायको म्हणतात ते खरंच आहे. माझा दिग्विजयसिंग झालाय. कधी काय लिहावं, बोलावं आणि कधी काय लिहू, बोलू नये हे मला कळतच नाही. अरे, हेच बघ ना, घरीदारी, कॉलनीत सगळीकडे गणपतीची तयारी सुरूअसताना मी ही महागाईची सुई अडकलेली एलपी रेकॉर्ड लावून बसलोय. रस्त्यातल्या खड्डय़ांमुळे मानेचे, पाठीचे आणि कमरेचे विकार जडलेल्या जनतेला निदान गणपती तरी धडधाकट अवस्थेत घरी आणता यावेत म्हणून रस्त्यातले खड्डे मातीने बुजविणाऱ्या प्रशासनाला धन्यवाद द्यायचे सोडून मी इथे भाजीपाल्याच्या जुडय़ा सोडत बसलोय. अरे, माझ्या घराच्या चारही बाजूला चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. तेथे  गणपतीबाप्पाचं आगमन झालंय की नाही ठाऊक नाही, पण लाऊडस्पीकर आणि डीजेची मात्र विधिवत प्राणप्रतिष्ठा होऊन तेथून ‘चार बोतल व्होडका’, ‘जुम्मे की रात’, ‘माझा पोपट पिसाटला’सारखी आध्यात्मिक गाणी वाजू लागली आहेत. अशा आध्यात्मिक कल्लोळात मला घराबाहेर पडायची हिंमतच होत नाही. मी दारे-खिडक्या बंद करून आपल्या बालपणीचे गणपतीचे दिवस आठवू लागतो.

गणेश चतुर्थीच्या दोनेक महिने आधी माळ्यावरून गणपतीचा पाट काढून पाण्याच्या घंगाळात किंवा अंगणात पागोळीखाली दोनेक दिवस भिजवल्यावर घासून लख्ख करायचा आणि कुठल्या तरी पेपरात किंवा मॅगझिनमध्ये छापून आलेला, आपल्याला आवडलेला म्हणून कापून ठेवलेला गणपतीचा फोटो घेऊन बाबांबरोबर गणपतीच्या कारखान्यात जायचं. बाबा मला पुढे करायचे, म्हणायचे, ‘तूच सांग काकांना, तुला कसा गणपती हवाय!’ मी हातातला फोटो दाखवून मला जमेल तसं काकांना सिंहासन कसं हवंय, हातात त्रिशूळ पाहिजे की मोदक की कमळ (आमचे बाबा काँग्रेसी असूनही त्यांनी माझ्या या सूचनेला कधी विरोध केला नाही. किती ती सहिष्णुता! असो.), सोंड उजव्या बाजूला हवी की डाव्या बाजूला, हे सारं समजावून सांगायचो. आणि बाबा कौतुकाने माझ्याकडे पाहत गालातल्या गालात हसत उभे असायचे. मग आम्ही सांगितलेली मूर्ती कशी ‘पेशल’ आहे, त्यासाठी मेहनत कशी जास्त लागेल आणि पसे कसे जास्त पडतील यावर मूर्तीवाले काका बाबांशी बोलायचे. बाबा निघता निघता त्यांना म्हणायचे, ‘पोराने सांगितलंय त्या वर्णनाशी थोडीशी जरी मिळतीजुळती मूर्ती बनवलीस तर नक्की पसे वाढवून देईन.’ काका म्हणायचे, ‘तू निर्धास्त राहा. कसली भारी मूर्ती बनवतो बघ एकदम.’

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्ती आणायला जाताना मी मुद्दाम तो फोटो घेऊन जायचो. फोटोत आणि पाटावर दोन्हीकडे गणपती बसलेला असायचा, इतकंच त्यात साम्य असायचं. माझा पडलेला चेहरा पाहून मूíतकार काका जवळ यायचे आणि डोक्यावरून हात फिरवत काहीतरी सांगून माझी समजून काढायचे आणि ‘पुढच्या वर्षी नक्की तुझ्या मनाप्रमाणे मूर्ती बनवून देतो,’ असं वचन द्यायचे. आम्ही हसऱ्या चेहऱ्याने बाबांच्या हातातील गणेशमूर्तीकडे पाहायचो आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत घराकडे निघायचो.

घरच्या घरी केलेली आरास, आजीच्या हातचे मोदक, विविध प्रकारची फळे, रात्र रात्र जागून मखरांसाठी बनवलेल्या नक्षत्रमाळी, खळ लावून चिकटवलेल्या पताका, सकाळ-संध्याकाळ साग्रसंगीत चालणाऱ्या आरत्या, दर्शनाला येणाऱ्या पाहुणे मंडळींकडून मिळणारा खाऊ, पाचव्या दिवशी भक्तिभावाने होणारे बाप्पाचे विसर्जन, विसर्जनावेळी डोळ्यांत आसवे आणून काठावर उभी असलेली आम्ही बच्चे कंपनी, एक न् दोन.. घरात बसल्या बसल्या तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा सिनेमाच जणू डोळ्यांसमोरून सरकत जातो. वाईट एकाच गोष्टीचे वाटते, की इतकी वष्रे नेमाने घरी येणाऱ्या या बुद्धीच्या देवतेकडे बुद्धी मागायची मला कधी बुद्धीच झाली नाही.

गणपतीच्या दिवसांत घरातले कत्रे पुरुष एकीकडे रात्रभर जागरण करून तीनपत्त्यांचा जुगार खेळत असताना त्यांना आध्यात्मिक पाठिंबा म्हणून आम्ही पोरंही बाजूच्या खोलीत चिल्लर पणाला लावून कॅरम खेळत असू. आज जेव्हा गणेशोत्सवाचं व्यापारीकरण झालेलं पाहतो, तेव्हा मला राहून राहून वाटतं कीलहानपणी आपण देवासमोर खेळलेल्या जुगाराबद्दल देवाने आपल्याला ही शिक्षा दिली असावी. कुणीतरी म्हटलेलं आहेच की- ‘जैसे ज्याचे कॅरम तसे कव्हर देतसे ईश्वर!’

आज मुंबई-पुण्यातल्या सगळ्याच उत्सवांना व्यावसायिक रूप आलंय. नवसाला पावतो म्हणून एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या गणपतीचा गवगवा होतो. घरचा गणपती सोडून लोक वीस- वीस तास अशा सेलिब्रिटी गणपतीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. आमचा दादादेखील त्यातलाच. वर्षभर कुठेच जायचं नसलं तरी आठवडय़ातून एकदा तरी विरार लोकलमध्ये चढायचा प्रयत्न करतो. कुठे कसली निदर्शने असली, मोर्चा असला की आपला काही संबंध असो-नसो, तो तिथे जातोच. तिथला गडबड-गोंधळ, धक्काबुक्की सहन करतो. प्रसंगी पोलिसांकडून रट्टेही खातो. म्हणतो, ‘‘काय करणार! वर्षांला एकदा सेलिब्रिटी गणपती पाहायचा असेल तर वर्षभर इतकी सवय आणि पूर्वतयारी करावीच लागते.’’ अरे, मागच्या वर्षी एके ठिकाणी दर्शनाच्या रांगेत माझ्या पुढे उभे असलेल्या आणि उत्साहाने फसफसणाऱ्या गृहस्थास मी विचारले की, ‘‘बाबा रे, इतका वेळ रांगेत उभे राहण्याचा तुला कंटाळा येत नाही का?’’ यावर तो म्हणाला, ‘‘नोटा बदलण्यासाठी आपण तासन् तास रांगेत उभे राहिलोच की! इथे तर भाग्य बदलून मिळते.’’ आता बोल!

मी तसा उदारमतवादी असल्याने अगदी झोमॅटोवाल्यांनी डिलीव्हरी केलेले मोदकही मला खायला आणि माझ्या देवाला नवेद्य म्हणून चालतात. सेलिब्रिटी गणपतीचे दर्शन किंवा विसर्जन अशा ठिकाणी मी शक्यतो जात नाही. तिथल्या गर्दीत हरवून जाण्याची मला भीती वाटते. लहानपणी आमच्या आईने आम्हाला जगात कुणालाच येत नाही असं युनिक गाणं शिकवलं नाही. वडिलांनीही जगात कुठेच मिळणार नाही असं एखादं लॉकेट आमच्या गळ्यात घातलं नाही. अंगाखांद्यावर गोंदवून घेण्याची हिंमतही आम्हाला झाली नाही. त्यामुळे मी एकदा हरवलो की सापडण्याची शक्यता कमीच. आणि स्वत:च्या घरी माझी लोकप्रियता पाहता बायको-पोरं मला शोधण्याचे कष्ट घेतील अशी खात्रीही वाटत नाहीये. असो. परत विषयांतर व्हायला नको.

दादू, तुला सांगतो- उंच मूर्तीची स्पर्धा, जबरदस्तीने वसूल केली जाणारी वर्गणी, डीजेचा गोंगाट, सवंग नाचगाण्यांचे कार्यक्रम, पर्यावरणाची हानी, कार्यकर्त्यांची अरेरावी, अमुकच ठिकाणचा गणपती पावतो अशी अंधश्रद्धा अशा कित्येक अनिष्ट गोष्टी आज आपल्या सणांत घुसलेल्या असल्या तरी मी आठवलेंच्या भाषणातही गंभीर आशय शोधणारा प्रचंड आशावादी माणूस असल्याने मला या परिस्थितीत सुधारणा नक्की होईल असे वाटते. तुरळक का होईना, पण शाडूच्या मूर्ती बसविल्या जाऊ लागल्या आहेत. थर्माकोलसारख्या वस्तू टाळून इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचा टक्काही वाढतोय. उत्सवासाठी जमविलेल्या पशांची उधळपट्टी टाळून त्यातून वाचवलेल्या पशांतून समाजोपयोगी कामं करणाऱ्या संस्था पुढे येत आहेत. घरी धातूची मूर्ती आणून घरातच तिचं विसर्जन करणारे, निर्माल्य पाण्यात न टाकता त्याचं कंपोस्ट करणारी मंडळीही दरवर्षी वाढत आहेत. या छोटय़ा छोटय़ा लुकलुकणाऱ्या पणत्यांमध्येच मला उद्याचा देश दिसतोय. आणि मला दिसणाऱ्या माझ्या या नव्या भारतात धर्माचं आचरण नीतीपोटी होईल, भीतीपोटी नाही अशी मला भाबडी आशा नाही, तर खात्री आहे.

दादू, आता पत्र आवरते घेतो. रात्रीचे पावणेबारा वाजलेत आणि खिडक्या-दारे बंद असूनदेखील (झोपलेली बालके, वृद्ध, आजारी लोक यांचा विचार न करता) रात्री इतक्या उशिरा रस्त्यावरून जोरजोरात डीजे वाजवत गणपती आणला जात असल्याचा आवाज येतोय. झुंडीतल्या आणि नशेतल्या लोकांना बोलण्यात काही अर्थ नसतो. म्हणून मी त्या गणाधिपतीलाच हाक देऊन म्हणेन.. ‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी जरा लवकर (म्हणजे रात्री अकरा वाजायच्या आत) या!’

तुझा लंबोदर मित्र

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com