News Flash

जगण्याच्या विखंडतेचे विरूप दर्शन

आधुनिकोत्तर काळातील ‘असंगती’चा सर्वंकष वेध घेणे, हे या कादबंरीचे आशयसूत्र आहे.

|| अविनाश सप्रे

नाटककार, नाटय़ विमर्शक व कादंबरीकार मकरंद साठे यांची ‘गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी’ ही आशय व आविष्काराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. आधुनिकोत्तर काळातील ‘असंगती’चा सर्वंकष वेध घेणे, हे या कादबंरीचे आशयसूत्र आहे. अशा असंगतीमागे ‘संगती’ नावाची काहीएक संकल्पना केंद्रवर्ती स्वरूपात गृहीत धरलेली असते आणि त्याच्या विरोधात असंगती असते असे मानले जाते. पण संगतीची अशी संकल्पनाच अमान्य असेल वा ती अस्तित्वातच नाही अशी भूमिका असेल तर मग ‘असंगती’चा विचार कसा करायचा? वर्तमानातला हा एक मूलभूत पेच आहे आणि तो सहजासहजी सोडवता येणार नाही असे या काळात वावरणाऱ्या लेखकाला वाटते आणि प्रश्न वरवर दिसतात त्यापेक्षा जास्त खोलातले आहेत असे लक्षात येते. या कादंबरीतून लेखकाने मूलत: तात्त्विक असणाऱ्या या समस्येशी झोंबी घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ‘विंचवाला उतारा’ म्हणून लेखक अनेक आशयसूत्रे, विचारव्यूह, संदर्भ यांची जाणीवपूर्वक सरमिसळ करतो. जीवनातील असंभवता, योगायोग, अतार्किकता, अनित्यता, अपघात इ.चा सढळपणे वापर करतो. अभिरुची विचाराच्या पारंपरिक उतरंडीला आणि ती निर्माण करणाऱ्या मूल्यविचारांना नाकारतो. परिचिताचे अपरिचितीकरण करतो. परिस्थिती ‘सलग’ न पाहता उलटीपालटी करून पाहतो. घटना-प्रसंग कालक्रमाने न पाहता खंडित करून पाहतो. सत्यकाम, अगस्ती, गणपती,  गार्डन ऑफ ईडन या नावांमागच्या मिथकांचे विरूपीकरण करतो. प्रत्यक्ष वास्तव इतके ताणतो, की त्यातून अतिवास्तवतेचे अवकाश तयार होते. या साऱ्यातून कादंबरीचा एक वेगळाच, अपारंपरिक, चक्रावून टाकणारा रूपबंध तयार होतो. निवेदक म्हणतो त्याप्रमाणे ‘सर्व दृष्टीने गोंधळलेला काळ आहे हा’- तेव्हा सरधोपट व बाळबोध करून तो वाचकांपुढे ठेवणे सोयीचे असले तरी आशयातले सत्त्वच घालवल्यासारखे होईल. लेखक म्हणूनच अशी जोखीम घ्यायला तयार नसावा. कादंबरीची सुरुवात जिथे आहे, तिथेच शेवटही आहे असे कादंबरीच्या शेवटाकडे आल्यावर लक्षात येते. आणि मग या सुरुवात व शेवटामधला ‘अवकाश’ म्हणजे निर्थकतेचा भरणा आहे की काय, असा सुन्न करणारा प्रश्न मनात निर्माण होतो. कादंबरीमध्ये सत्यकाम, अगस्ती, नर्सबेन, आयेशा, गणपती आणि विभाकर या पात्रांचा इतिहास आला आहे. त्यांच्यासह कमलाकर, रणजित, मेनका, मृदुला अशी अनुषंगिक पात्रेही आहेत. या साऱ्यांच्या इतिहासाबरोबरच त्यांच्या जगण्यातले वर्तमान, त्यांच्यासंबंधीचे सत्य आणि त्यातली संदिग्धता, त्यांच्या कृतीमागचे कार्यकारण भाव आणि त्यासंबंधीचा संशय, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे होत गेलेले विघटन यासंबंधी कादंबरीचा सर्वसाक्षी निवेदक भाष्य करत करत विदारक वास्तव निर्माण करतो. या सर्व व्यक्तिरेखा तशा परस्परांशी संबंधित नाहीत. योगायोगाने वा अपघाताने त्यांचा परस्परांशी संबंध येतो. या व्यक्तींच्या जीवनात विचित्र वाटतील अशा घटना घडत असतात. त्यांचे वर्तनही सर्वसाधारण वाटत नाही. त्यांचे असणे ‘विस्थापिता’सारखे वाटते. त्यांच्यामध्ये त्यांच्या उपरेपणाची जाणीव वास करून आहे. त्यांना भीती वाटते- जगण्याची, मरणाची, असण्याची, नसण्याची, स्वत:ची, इतरांची. आणि या अवस्थेवर मात करण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न ते सतत करत असतात आणि आभासी वास्तवात वावरत राहतात. या व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने माणूस हा एक रचित (कन्स्ट्रक्ट) आहे का? त्याची ओळख (आयडेंटिटी) काय आहे, असेही प्रश्न उपस्थित होतात. या साऱ्याकडे तत्त्वज्ञानाच्या अंगाने पाहिलं पाहिजे असं सत्यकाम अगस्तीबरोबरच्या चर्चेच्या ओघात म्हणतो. ते एकूणच कादंबरीकडे कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे, हे सुचवणारे आहे.

कादंबरीमध्ये मुंबईचे बॉम्बस्फोट, बाबरी मशिदीचा विध्वंस, गुजरातची दंगल, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीतले शिखांचे हत्याकांड, फाळणीच्या वेळची हिंसा आणि प्रचंड प्रमाणावर झालेले स्थलांतर, भारतात आलेली मुक्त अर्थव्यवस्था आणि तिने निर्माण केलेली भोगवादी जीवनशैली, भाजपचे सरकार इ. संदर्भ येतात. पण म्हणून ही राजकीय वा सामाजिक समस्यांचे चित्रण करणारी कादंबरी असे स्वरूप तिला येत नाही. कादंबरीतील  पात्रांच्या खासगी व कौटुंबिक जीवनातील उलथापालथ करणारे तपशीलही येतात. पण म्हणून ती ‘कुटुंबकथा’ होत नाही. व्यक्ती आणि समष्टीच्या स्तरावर या व अशा उलथापालथींचे परिणामस्वरूप आजच्या या काळातल्या माणसाचे जे भागधेय निर्माण झाले आहे, त्याकडे लक्ष वेधण्यात लेखकाला रस आहे. नव्या संस्कृतीने जो संभावित आणि सोयीस्कर मुखवटा माणसाच्या चेहऱ्यावर चढवला आहे, तो काढायचाय. त्याच्या शरीरावर तथाकथित विकासाची आणि प्रगतीची जी वस्त्रं चढवली आहेत, ती फेडायची आहेत. त्याला बांधून ठेवणाऱ्या भ्रमाच्या शृंखला तोडायच्या आहेत.

एका वेश्येच्या पोटी जन्माला आलेल्या, तत्त्वज्ञानात पीएच. डी. केलेल्या आणि सध्या साई सोसायटीत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या सत्यकाम आणि कट्टर हिंदुत्ववादी घरात जन्मलेला आणि मर्चंट नेव्हीमध्ये अनेक वर्षे नोकरी करून आता टोकाचा निसर्गवादी झालेला अगस्ती यांच्यात वारंवार होणारे धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान, देव, दैव, आधुनिकता, निसर्ग, पर्यावरण, विकास, स्वातंत्र्य इ.वरचे वादविवाद, चर्चा वाचकाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. आपली मुलगी काव्या हिला झालेल्या ऑटिझमची जी लक्षणे अगस्ती नोंदवतो, ती खरं तर आजच्या काळातली युगबाधाच अधोरेखित करतात. या घुसळणीतील एक टप्पा म्हणजे सद्य:काळ होय. या टप्प्यावर अभूतपूर्व झपाटय़ाने सर्वंकष बदल होत आहेत आणि या बदलांशी मॅच होण्याइतका अवसर सामाजिक विचारांना, मानवाच्या भावनांना आणि एकंदरीतच संस्कृतीला मिळालेला नाही आणि यानंतर तो कधीही मिळणार नाही, असे निरीक्षण निवेदक नोंदवतो. कादंबरीच्या वाचनाचे दोन ठळक परिणाम वाचकावर होतात. एक- जीवनातल्या निर्थकतेपासून पलायन न करता त्याला धैर्याने आणि प्रामाणिकपणे सामोरे जायला हवे. त्यात आत्मसन्मान आहे, डिग्निटी आहे. आणि दोन- फक्त आधुनिकतेतच प्रत्येक व्यक्तीला फुलायला आणि व्यक्त व्हायला मुक्त अवसर मिळतो. म्हणूनच उत्तर आधुनिकतेने निर्माण केलेल्या अराजकाला भिडण्याचे सामथ्र्य असलेली नवी आधुनिकता निर्माण करायला हवी.

  • ‘गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी’
  • मकरंद साठे, पॉप्युलर प्रकाशन,
  • पृष्ठे- २००, किंमत- ३५०रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 12:08 am

Web Title: garden of eden urf sai society by makarand sathe mpg 94
Next Stories
1 दखल – किशोरांच्या आत्महत्या : समस्या आणि उपाय
2 डिटेक्टिव्ह मौर्य
3 पश्चत्ताप
Just Now!
X