१९व्या शतकात महाराष्ट्रात बहुपदरी परिवर्तन घडून आले. हा काळ सामाजिक- सांस्कृतिकदृष्टय़ा गतिमान अभिसरणाचा, राजकीय- शैक्षणिक- वाङ्मयीन आणि सांस्कृतिक घटितांनी भरलेला, अनेक व्यक्तींनी गजबजलेला होता. ब्रिटिश राजवटीची सुरुवात, रेल्वे- तारायंत्र, वीज इत्यादी शोध, १८५७ साली झालेली मुंबई विद्यापीठाची स्थापना, गोदी- गिरण्या, कारखाने यांचा उगम, छापखान्यांच्या प्रारंभाने रुजू लागलेली मुद्रणसंस्कृती, मूकपट व त्यामागोमाग बोलपटांची निर्मिती, या साऱ्यांनी १९ व्या व २० व्या शतकातील महाराष्ट्र ढवळून निघाला. या काळातील अनेक घटना, प्रसंग आणि व्यक्ती आजदेखील तत्कालीन महाराष्ट्राच्या जडणघडणीविषयी आस्था व कुतूहल वाटणाऱ्याला खुणावत राहतात. या दृष्टीने संशोधनाची सातत्यपूर्ण आस असणाऱ्या डॉ. अनंत देशमुख यांनी ‘गतकाल’ या पुस्तकाच्या रूपाने महाराष्ट्राच्या प्रबोधन काळाचे उत्खनन करणे स्वाभाविक म्हटले पाहिजे.
आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. देशमुख म्हणतात, ‘‘आधुनिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अशा असंख्य कोऱ्या जागा लागतात, ज्यांच्या संबंधाने लिहिले गेले पाहिजे, असे उत्कटत्वाने वाटते.’’ त्यांची ही भूमिका अनेक अंगांनी तत्कालीन महाराष्ट्राचा वेध घेण्यास उपयुक्त ठरली आहे. अव्वल इंग्रजी काळात सुरू झालेल्या प्रबोधनयुगात अनिष्ट व कालबाह्य़ रूढींच्या चौकटी खिळखिळ्या व्हायला हव्यात ही जाणीव तीव्रतेने व्यक्त होऊ लागली. सुधारकांनी मांडलेल्या विचारांना सनातन्यांचा प्रखर विरोध होऊ लागला. १९२० च्या आगेमागे महाराष्ट्रात बहुजन समाजाने ब्राह्मणी वर्चस्व आणि नेतृत्व झुगारून द्यायला सुरुवात केली. अखिल भारतीय पातळीवर महात्मा गांधींचा प्रभाव पडत असताना महाराष्ट्रात भिन्न विचारप्रवाह कार्यरत राहिले. ‘सत्यशोधकांची रणधुमाळी’, ‘अथ ‘कुलकर्णी लीलामृत’ पोथी निरुपण’, ‘एका विवाहाची अनोखी दास्तान’, ‘दिवेकर शास्त्र्यांचे बुवाबाजीविरुद्ध बंड’ अशा लेखांमधून तत्कालीन महाराष्ट्राच्या वातावरणातील स्थित्यंतराची स्पंदने ठळकपणे उमटली आहेत.
या पुस्तकातून उलगडत जाणाऱ्या विविध पैलूंच्या आढाव्यातून वाङ्मयीन संदर्भ, शैक्षणिक संदर्भ, कलाविषयक संदर्भ, मुंबई शहरातले बदल, स्त्रीजीवन, व्यक्ती व त्यांचे आयुष्य यांची वैशिष्टय़े हाती लागतात आणि त्या कालपटाची व्यामिश्रता आपल्याला थक्क करते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींच्या आठवणी पुस्तकभर विखुरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, प्रभात चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या नलिनी तर्खूड, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पण विस्मृतीत गेलेले प्राच्यविद्या संशोधक डॉ. प. कृ. गोडे, ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केलेले डॉ. ग. य. चिटणीस, मनस्वी मर्ढेकर, १९ व्या शतकात बुवाबाजीविरुद्ध घणाघाती युद्ध पुकारणारे दिवेकरशास्त्री, कादंबरीकार वा. म. जोशी, महत्त्वाच्या चार नृत्यशैली महाराष्ट्रात रुजविणाऱ्या मॅडम मेनका, कादंबरीकार प्रेमा कंटक, मुंबईच्या सार्वजनिक भोजनगृहाच्या इतिहासातील अन्नपूर्णा सखुबाई, संशोधनपिंड जपणाऱ्या इरावती कर्वे, रँग्लर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे अशा विविध व्यक्तींवरील लेख त्या व्यक्तीचे कर्तृत्व, वेगळेपण आणि त्यांनी विशिष्ट क्षेत्राला दिलेले योगदान अधोरेखित करतात. खेरीज त्या काळातील व्यक्तिमत्त्वांची समांतरपणे केलेली तुलना एखाद्या लेखाला आगळे परिणाम देऊन जाते. उदा. डॉ. ग. य. चिटणीसांवरील लेखात त्यांची बुद्धिमत्ता अधोरेखित करतानाच र. धों.सारखा प्राध्यापक नोकरीचा राजीनामा देऊन संततीनियमनाचे कार्य अंगिकारतो आणि डॉ. चिटणीस त्याच काळात याबाबतीत उदासीन राहतात याविषयीचे आश्चर्यदेखील व्यक्त होते.
‘गतकाल’मधील, विशेषत: तत्कालीन स्त्रियांच्या कामगिरीची नोंद घेणारे लेख समाजाच्या स्त्रियांकडे पाहण्याच्या बंदिस्त चौकटींची जाणीव करून देतात. उदा. पुण्यातील तत्कालीन शाळांवरील लेखात पुढीलप्रमाणे वर्णन येते- ‘शाळेत येणाऱ्या मुलींना रस्त्यातून येताना समाजाकडून त्रास होत असल्याने त्यांच्या घरी बैलगाडय़ा पाठवून त्यांना शाळेत आणाव्या व पोहोचाव्या लागत. हुजुरपागा शाळेच्या मागची उंच भिंत एखाद्या किल्ल्यासारखी गूढ वाटे.’
‘आनंदीबाई जोशी व गोपाळराव अलिबागला फिरायला जात तेव्हा सनातनी त्यांच्यावर शेण फेकत’ किंवा ‘गोविंदराव कानिटकर काशीताईंना प्रार्थना समाजाच्या सभांना लपूनछपून घेऊन जात’ ही अन्य काही लेखांतील विधाने स्त्रियांची घुसमट मुखरीत करतात. याला जोडूनच नमूद करण्याजोगा आणखी एक मुद्दा म्हणजे स्त्रियांनी केलेल्या आणि वाङ्मयीनदृष्टय़ा दुर्लक्षित राहिलेल्या लेखनाची नोंदही डॉ. देशमुख आवर्जून घेतात. उदा. मराठीतील पहिल्या दिवाळी अंकावर लिहिताना पहिल्या स्त्री नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या ‘भास’ कवितेकडे ते लक्ष वेधतात. तर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सुशिक्षित स्त्री-पुरुष नात्याचे दर्शन घडविणारे शांताबाई कशाळकरलिखित ‘माझे जीवन’ प्रकाशित होऊ शकले नाही याविषयीची खंत व्यक्त करतात.
संदर्भबहुलता, एका विषयाचा अनेक अंगांनी शोध, विषय वैविध्य ही या पुस्तकाची ठळक वैशिष्टय़े आहेत. साहित्यिकांवरील अश्लीलतेचे खटले, ‘आठवणींच्या कवितां’चा संच, विविध चित्रांवरून झालेले वाद, मुंबई-रेवस मार्गावर बुडालेली रामदास बोट, पत्रलेखनातील उत्कट भावबंध व त्या निमित्ताने जीए – सुनीताबाई, श्री. कृ. कोल्हटकर व आनंदीबाई शिर्के, कवी अनिल व कुसुमावती यांच्यातील हृद्य बौद्धिक संवादाच्या आठवणी, रा. भि. जोशी- सुधा जोशी व प्रभाकर पाध्ये यांचे आगळे ‘घर तिघांचे’, शाहू महाराज- सयाजीराव गायकवाड- चिंतामणराव पटवर्धन व औंधचे पंतप्रतिनिधी हे चार प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, आगबोट प्रवासाच्या आठवणींचा शोध, श्रीधरपंत टिळक यांची आत्महत्या, मं. वि. राजाध्यक्ष यांचे वाद-संवाद हे ‘अभिरुची’तील सदर, शिकून नशीब काढण्यास मुंबईत आलेले धोंडो केशव कर्वे, नरहरपंत जोशी इत्यादींचे एकत्र कुटुंबाचे प्रयोग, ब्रिटिश राजवटीत उभे राहिलेले विविध डाकबंगले व त्यांच्या बांधकामातली रसिकता, या काळात इथे आलेल्या परदेशी स्त्रिया, नाटय़मन्वंतर, तसेच प्रभात फिल्म्ससारख्या जुन्या नाटय़चित्र संस्थांमधील वातावरण असे नानाविध विषय या पुस्तकात सामावलेले आहेत. या विषयांचा शोध घेताना लेखकाने विविध ठिकाणी नोंदवलेली निरीक्षणे किंवा उपस्थित केलेले प्रश्न मार्मिक आहेत.
संशोधनाबद्दलचा ध्यास व निष्ठा या पुस्तकात अनेक ठिकाणी जाणवते. उदा. इराणी कवी मखय्याम यांच्याबद्दल यथार्थ लेखन अद्याप झालेले नाही. एखादा अभ्यासक हे आव्हान स्वीकारेल का? किंवा संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश द्विखंड २००३-०४ साली प्रकाशित झाला, तरी कृष्णाजी विनायक पोटे ऊर्फ भानुदास यांच्यावर आपल्याकडे नोंद नाही, ही विधाने संशोधकांना दिशा सुचविणारी आहेत. भविष्यातील संशोधनाबाबत दिशा सुचविण्याबरोबरच एखाद्या अभ्यासकाने काम करताना पूर्वसुरींच्या कामाची समग्र जाणीव कशा प्रकारे ठेवावी, याच्या खुणादेखील या पुस्तकात सापडतात. ‘महानगरीय जीवनावरील त्यातही झोपडपट्टीय जीवनावरील साहित्याचा विचार करताना डॉ. वसंत अवसरे यांच्या ‘माहीमच्या झोपडय़ा’सारख्या कवितेचे विस्मरण अभ्यासकाने होऊ देऊ नये.’ यासारखे विधान यातूनच येते.
वाङ्मयीन व्यवहाराविषयी, तत्कालीन साहित्यिक- सांस्कृतिक घडामोडी व घटितांविषयीची लेखकाची जिज्ञासा या पुस्तकातून ठळकपणे प्रकट होते. ‘पडुं आजारी मौज हीच वाटे भारी’ या कवितेचा कर्ता भानुदास याचा शोध, १८८७ साली ‘गृहिणी’ मासिकात प्रसिद्ध झालेले आनंदीबाई जोशी यांचे त्रोटक चरित्र, र. धों. कर्वे यांचे ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक, त्यात प्रसिद्ध होणारी ‘समाजसुधारणेच्या मार्गातील खाचखळगे’ ही शकुंतला परांजपे यांची लेखमाला, ‘एकाकी’ या अनिलांच्या कवितेचा जन्म, ‘नारद’ या टोपण नावाने अनंत काणेकरांनी चित्रा साप्ताहिकात चालवलेले ‘बोलका ढलपा’ हे सदर, असे या पुस्तकातील दुर्मीळ वाङ्मयीन संदर्भ चिकित्सक अभ्यासकांच्या कुतूहलाला प्रेरणा देणारे आहेत. ‘संशोधनाच्या बिकट वाटेवर जे प्रवास करतात त्यांना अधिक चिकित्सक, अधिक वस्तुनिष्ठ, अधिक सत्यदर्शी, प्रसंगी कठोर व्हावे लागते’ याविचारांची बैठक या लेखनामागे आहे; खेरीज विवेकाची उचित जोड सोबतीला असल्याने पुस्तकाची लेखनशैली उपरोध- उपहास या पलीकडे जाऊन एकाच घटनेकडे अनेक कोनांतून पाहण्याचे भान देते. तत्कालीन वास्तवाला भिडतानाच वास्तवाच्या आणखी पुढे जाऊन उत्खनन करण्याची खुली दिशा देते. गतकालाचे हे संचित त्यामुळेच विचारप्रवर्तक आणि मौलिक ठरते.
‘गतकाल’ – डॉ. अनंत देशमुख,
स्वयम् पब्लिकेशन्स, ठाणे, पृष्ठे – २७४ , मूल्य – ३२० रुपये.