समीर गायकवाड

जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या झंझावातात ग्रामीण आणि शहरी जग यांतलं द्वैत आता हळूहळू मिटत चाललं आहे. या पुसट होत चाललेल्या खुणांचा मागोवा घेणारं सदर.. ‘गवाक्ष’!

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
3 April 2024 Panchang Horoscope Today
३ एप्रिलचे १२ राशींचे भविष्य व पंचांग: वृषभ, सिंहसह ‘या’ राशींचा आजचा दिवस असेल आनंदी; तुमची रास काय सांगते?
Mithun Chakraborty son Namashi on abhishek bachchan
“…तर माझा भाऊ सुपरस्टार झाला असता”, अभिषेक बच्चनचं नाव घेत मिथुन चक्रवर्तींच्या मुलाचं वक्तव्य

एकेकाळी गावात तराळ असायचा. गत- कालखंडात गावाबाहेर उपेक्षित दलितांची वस्ती असे. हे महारवाडे, मांगवाडे, रामोशीवाडे गावांनी आणि जातीपातीचा अभिनिवेश असलेल्या गावकऱ्यांनी मनस्वी जोपासले होते. त्याचा गावकीला आसुरी आनंद होता.. या अमानवी दृष्टिकोनाचा पाशवी अभिमान होता. गावकुसाबाहेरच्या या बहिष्कृत, अंधारल्या जगात खितपत पडलेल्या लोकांना गावात यायला मज्जाव असे. जर यायचं झालंच तर त्याच्या अटी असत. या लोकांनी गावात येताना कसं यायचं, त्यांचं वर्तन कसं असावं, त्यांची देहबोली कशी असावी याचे काही दंडक असत. ते न पाळणाऱ्यांना त्याची सजा दिली जाई. आज काळ बदललाय. अस्पृश्यता बऱ्यापकी नष्ट झालीय. बुरसटलेल्या विचारांचा पगडा असलेल्या वृत्तीचं वर्चस्व ज्या प्रांतांत आहे, तिथल्या सनातनी लोकवस्त्या वगळता सर्वत्र बदल होत चाललाय. मानसिकता काही कारणांनी का होईना, बदलते आहे. आता गावोगावचे महारवाडे गेले. मात्र त्यांची जागा भीमनगरांनी घेतलीय. नावं बदलली, तरी वृत्ती मात्र काहीशी तशीच आहे. छुपा भेद आहेच. पण पूर्वीइतका जहालपणा आता उरलेला नाही. ‘अरे ला कारे’ म्हणणारा वर्ग आता बाह्य सरसावून उभा ठाकतो.

तर अशा या वंचितांच्या दुनियेतील एका घटकास गावात नित्य प्रवेश असे. पण त्यालाही काही नियम असत. हा घटक म्हणजे महारकी करणारा तराळ. एका खांद्यावर वाकळ, गळ्यात हलगीच्या वाकाची दोरी, लहानशी झोळीवजा पिशवी. गावात डोईवर टोपडंटापडं घालण्यास मनाई असल्याने डोकं बोडकंच राही. तशीच त्याची फिरस्ती होई. त्याच्या एका हातात काठी असे. या काठीच्या तळाला चार-पाच घुंगरांचा गुच्छ तारेने बांधलेला असे. गावच्या वेशीतून प्रवेशापासून ते गावाबाहेर पडेपर्यंत ठरावीक अंतराने आणि टप्प्याटप्प्याने त्याला या काठीचा विशिष्ट आवाज करावा लागे. गावात येऊन गल्लोगल्ली दवंडी देण्याचे काम तराळाकडे असे. त्याकाळी गाव म्हणजे फार फार तर सात-आठ आळ्यांची पन्नास-शंभर उंबऱ्याची लोकवस्ती असे.

तेव्हा ऋतू आताच्यासारखे लहरी नव्हते. चाकरमान्याने आपली दिनचर्या घडय़ाळाच्या काटय़ावर हाकावी तसे ऋतुचक्र चाले. क्वचित त्यात बदल होत, पण त्यात फारशी दाहकता नसे. अवकाळी ऊन, पाऊस, वादळवारं असे, पण त्याचा बोलबाला नव्हता. लोक निसर्गाला पुजत, त्याची काळजी घेत. त्याला जीव लावत. तेव्हा नुसतं ओरबाडण्याकडे कल नव्हता. गावाची ठेवणदेखील ठाशीव असे. चहू दिशेला शीव असे, वेस असे. वेशीवरचं देऊळ, चावडी, पार, गावतळं, जातींच्या प्रभावानुसार आळ्यांची रचना असा सगळा मामला असे.

गुरं वळायला नेणाऱ्या गुराख्यांसाठी कुरणं होती. माळ होते. हाळ होते. डोळ्याला साफ दिसेल असं निळंआभाळ होतं. हिरवाई होती. पाऊलवाटा होत्या. त्यात दगडधोंडे होते अन् काटेकुटेही होते. माणसांच्या डोक्यावर स्वार झालेली जातीपातीची अन् खोटय़ा इभ्रतीची भूतंखेतं सोडली तर लोकांची नियत चांगली होती.

अशा त्या गावांत तराळ यायचा. यायचा म्हणजे कसा? तर त्याच्या घरी गावकीच्या कारभाऱ्याचा माणूस जायचा. बहुतकरून घरगडीच जायचा. गावाबाहेरच्या कुडांच्या घरांत गावातून एखादाच इसम हप्त्याकाठी यायचा, अन् तोही फक्त तराळाच्या घरी. आलेला माणूस स्वत:चं शरीर इतकं पुसायचा, की आजूबाजूची माणसं त्याला नुसती न्याहाळत बसायची. त्याच्या निकट जायची कुणाला अनुमती नसे. तो तराळाच्या दाराबाहेर येऊन त्याला नावाने पुकारे. तराळाच्या घरी गावातून माणूस आला म्हणजे काहीतरी निरोप आला आहे याची खात्रीच. तराळाला तो निरोप त्याच्या घरी क्वचितच सांगितला जाई. जरी सांगितला गेला तरी गावात दवंडी दिल्याशिवाय त्याच्या वस्तीत वाच्यता करण्याची परवानगी नसे.

मग हा तराळ आपला जामानिमा करून बेगीनं गावात निघे. पूर्वी प्रत्येक गावात महार, मांग, रामोशी, चांभार, कुंभार, परीट, कोळी, सुतार, न्हावी, लोहार, गुरव, सोनार हे बारा बलुतेदार होते. बलुतेदारांना लोक जातींशी जोडतात, पण खरं तर त्याहीआधी त्यांना श्रमांशी जोडलं पाहिजे. कारण अख्ख्या गावाची कामं त्यांना करावी लागत. गावकीची पडतील ती कामं करणारा हा वर्ग होता. खऱ्या अर्थाने ते सालदार होते. गावच्या सरपंच, पाटील, सावकार, देशमुख, देशपांडे, कोतवाल, कुळकर्णी, नाईक, खोत यांच्याकडे बलुतेदाराचं सगळं घर बांधलेलं असे. त्यांच्या घरातला कर्ता पुरुष, मुख्यत्वे बाप नसला तर मुलाने, आईने, बायकोने, सुनेने, लेकीने ही कामं केली पाहिजेत असा शिरस्ता होता. यांच्यात तराळाचं आयुष्य सर्वात बिकट असे. गावात येताच ज्यानं वर्दी दिलीय त्याच्या वाडय़ाबाहेर आपली सावली दारावर पडणार नाही अशा बेताने त्याला उभं राहावं लागे. त्याला सांगितलेली वर्दीची दवंडी पिटत त्याला फिरावं लागे. त्याच्या काठीचा आवाज होताच गल्लीतल्या घरांतल्या बायाबापडय़ा दाराआड जात आणि त्याचा कानोसा घेत. तराळ गल्लीत आलाय म्हणजे काहीतरी वेगळंच ऐकायला मिळणार, हे ठरलेलं. सगळ्या गल्ल्या, आळ्या पालथ्या घालून तो अखेरीस चावडीवर येई. हलगी वाजवत दवंडी देई.

त्याला हेच काम होतं असं नव्हे. गावकीचं टपाल, कागदपत्रांची भेंडोळी, लखोटे पंचक्रोशीतील गावोगावच्या पाटील, तलाठय़ास, महालकरी, मामलेदारास नेऊन द्यावे लागत. हवालदार- कोतवालाचे निरोप पोचते करावे लागत. हजार तऱ्हेची कामं करावी लागत. गावात हाळी देत फिरताना जो कुणी जे काही काम सांगेल ते मुकाट करावं लागे. कुणी मेलं तर त्याचा नुसता सांगावा देऊन भागत नसे, तर त्याच्या गोवऱ्या टाकायचं कामही लागे. तेव्हा म्हणच होती, ‘पाटलाचं लग्न अन् महाराला भूषण!’ तर या लग्नासाठी त्याला रक्त ओकेपर्यंत राबावं लागे. सगळं वऱ्हाड गाडीघोडय़ावर, छकडय़ात असे अन् हा मलोगणती पायी जाई. वऱ्हाडी बलांच्या चारापाण्याची व्यवस्था केल्याशिवाय याच्या पोटात उष्टे खरकटे पडत नसे. दवंडीच्या कामाबद्दल त्याला जे मिळे ते अगदीच किरकोळ असे. पण आपल्याला गावात यायला मिळतं याचं समाधान मोबदल्यापेक्षा त्याला अधिक सुखकर वाटे. गावातल्या अन्य बलुतेदारांनाही त्यांच्या कामाच्या बदल्यात सामानसुमान, धान्य, कापडचोपड दिलं जाई.

आता बलुती लोप पावलीत. कुणी कोणतंही काम केलं तरी चालतं. भेदभाव कमी झालाय. पण काहींच्या अंत:करणात तो विखार अजूनही कायम आहे. कालौघात दवंडीही नष्ट झालीय. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दवंडीचं नवं डिजिटल रूप अवतीर्ण झालंय. आजकाल संदेशवहन जितकंसोपं, सुलभ झालंय तितकं  त्याकाळी नव्हतं. तेव्हा अत्यंत कठीण, दुर्लभ होतं ते. टपाल, टेलिग्राम आज कालबा झालेत. फोनची सद्दी संपलीय. संगणक, स्मार्टफोनच्या गारुडात अवघं विश्व बुडून गेलंय. एक ट्विट करताच आपल्या भावना आपल्याशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे त्वरित पोहोचतात. ते लोकही त्यावर व्यक्त होतात. त्यांच्या व्यक्त होण्यावरही काही जण प्रतिसाद देतात. हे सगळं दृश्यस्वरूपात दिसतं. तराळाने दिलेल्या दवंडीचं असंच होतं. त्यावर लोक व्यक्त होत, पण त्या प्रतिसादांना दृश्यस्वरूप नव्हतं. दवंडीच्या रूपाने पूर्वीच्या गावजीवनात घोषणा होत. ज्यांनी ही दवंडी अनुभवली आहे त्यांच्या स्मृतींच्या कुपीत ती दडलेली असेल. आता सोशल मीडिया गावाच्याही उंबरठय़ावर येऊन थडकलाय. गावाने वाईट वागणूक दिलेला तराळ आता नाहीये, पण आपसात कलह माजवणाऱ्या या डिजिटल नवदवंडय़ांचा गावात सुकाळ झाल्यास उरलासुरला सलोखाही संपण्याची भीती गावकुसाच्या मातीला वाटतेय.

sameerbapu@gmail.com