समीर गायकवाड

जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या झंझावातात ग्रामीण आणि शहरी जग यांतलं द्वैत आता हळूहळू मिटत चाललं आहे.

या पुसट होत चाललेल्या खुणांचा मागोवा घेणारं सदर.. ‘गवाक्ष’!

वेशीच्या तोंडावर असलेल्या मारुतीच्या मंदिरात पूर्वी उनाड पोरे खेळत असायची. शिरापुरी, लपंडाव, आंधळी कोिशबीर असे नानाविध खेळ रंगायचे. मंदिर म्हणजे खूप काही अजस्र आकाराचं भव्यदिव्य असं काही नव्हतं. हेमाडपंथी वा आणखी कुण्या नावाजलेल्या शैलीतली स्थापत्यशैलीही नव्हती. साधंसुधं दगडी बांधकाम होतं. गावातल्या माणसांगत आडमाप आकाराचे धोंडे कुण्या गवंडय़ाने एका चळतीत रचलेले. म्हाताऱ्याकोताऱ्यांच्या काळजाच्या खपल्या निघाव्यात तशा जागोजाग कोपच्या उडालेल्या. त्यातला चुना बाहेर डोकावणारा. एखादा चिरा कललेला. मधेच एखादी देवळी. दिव्याच्या काजळीने काळी झालेली. दगडी भिंतीवरही काळी वर्तुळे उमटलेली. रामा गुरवाच्या डोळ्याखालीही अशीच काळी वर्तुळे होती. मंदिरातल्या कणाकणावर प्रेम करणारा, कमरेत वाकलेला रामा गुरव. रामाचं रूपडं अनोखं होतं. झुपकेदार मिशा. राठ काळे ओठ. मोठाले डोळे. लोंबायला झालेल्या कानाच्या जाडसर पाळीत भिकबाळी. गळ्यात कसल्याशा पांढऱ्या-तांबडय़ा मण्यांची माळ. हातात तांब्याचं भलंमोठं जाडजूड कडं. ताटलीएवढा हाताचा पंजा आणि कडक खर्जातला आवाज. गाऊ लागला की त्याचा आवाज बदलल्यासारखा वाटे. एरव्हीची कर्कशता जाऊन मृदुता जाणवे. रामाची भीतीही वाटे. खेळता खेळता मारुतीरायाच्या मूर्तीस धडकणाऱ्याच्या पाठीवर त्याच्या दगडी हाताची पाच बोटे उमटत.

सकाळी पूजाअर्चा आटोपली की घरी जाऊन पोटपाणी करून आलेला रामा संध्याकाळची दिवाबत्ती करेपर्यंत देवळात पडून राही! एका अंगावर झोपलेला, पोट पुढे आलेला उघडाबंब रामा मंदिरात दिसला नाही असा दिवस नव्हता. वडील औदुअण्णा त्याच्या लहानपणीच वारलेले. बारमाही देवळात असणारा गावातला हा एकमेव इसम. डोळे मिटूनही त्याचे चौफेर लक्ष असे. ‘एश्टी’तून उतरलेला माणूस आधी वेशीवरच्या देवळासमोर येई. हात जोडून उभा राही आणि काहीबाही पुटपुटे. काहीजण गालातदेखील मारून घेत. तर कुणी कानाच्या पाळ्या पकडून माफीच्या आविर्भावाने काहीतरी मागत. लोकांना असं करताना बघणाऱ्या रामाच्या चेहऱ्यावरचे भाव विलक्षण तृप्ततेचे असत. त्याच्याकडे कुणी पाहत नसलं तरी तो आशीर्वादासाठी हात वर करे. गावकऱ्यांना हवे ते वरदान देण्यासाठी हात वर करणाऱ्या रामाला मूलबाळ नव्हतं. पन्नाशीत गेला होता तो. त्याला पोरंबाळं झाली असती तर एव्हाना नातवंडे त्याच्या मांडीवर खेळत असती.

एका रखरखीत उन्हाळ्याच्या दिवशी गावातल्या बोबडय़ा केशवच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं पोर चुकून देवळात आलेलं. त्या दिवशी दिवाबत्ती झाली तरी देवळात कुणी आलं नाही. दुपारी ते रामाच्या कुशीत झोपलेलं. त्याच्या फाटक्या चवाळ्याची ऊब त्याला लागली असावी. सांजच्याला रामाने त्याला खाऊपिऊ घातलं. पोरदेखील चांगलं रमलं. देवळाच्या पलीकडे ना वस्ती, ना वर्दळ. खेरीज देवळातही कुणी आलं नाही. ते पोरही आईबाची आठवण काढेना. रामा त्याला घेऊन खेळत बसला. घोडा झाला. उंट झाला. पाठकुळी घेऊन झालं. मारुतीच्या मस्तकाचा गंध काढून त्याने त्याच्या कपाळाला लावला. त्याला खेळवत असताना तो काहीतरी मंत्र-आरत्या पुटपुटत होता. अंधार दाटून आला आणि बोबडय़ा केशवचं अख्खं घर तिथं आलं. त्याने रामावरच तोंडसुख घेत धोतराचा सोगा आवळत ते पोर खवाटीस मारलं. सगळ्यांनी एकच कालवा केला. त्या गलक्यात पोर रडू लागलं. गायीच्या खुरांवरची धूळ खाली बसावी तशी ती माणसं पांगली. गाभाऱ्यात जाऊन रामा लहान लेकरासारखा ढसाढसा रडला.

त्या दिवसानंतर त्याने आशीर्वादासाठी कधीही हात वर केला नाही. देवळातला त्याचा वावर घुमा झाला. त्यानं पोरांना मारणंही सोडून दिलं. गावानंही त्याच्यातल्या या बदलाकडे लक्ष दिलं नाही. रामाला याचं वाईट वाटलं असावं. त्याचं चित्त विचलित झालं. त्या साली हनुमान जयंतीला कळस धुवायला वर चढलेला रामा पाय घसरून खाली पडला. मणके मोडले. डोक्याला मार लागला. थोडाफार दवापाणी करून त्याला घरी आणलं. रामाने अंथरून धरलं. त्याच्या खोपटात त्याचा म्लान देह निपचित पडून असायचा. एकदा त्याची बायको चांगुणा देवळात आली आणि सगळ्या पोरांना म्हणाली, ‘‘गुरवानं धोसरा काढलाय. एकडाव भेटून जावा माझ्या चिमण्यांनो.’’ डोईवरून घेतलेला पदर उजव्या हाताने ओठाखाली दाबत कातर आवाजात ती बोलली. सगळी चिल्लर तिच्या मागोमाग तिच्या घरी गेली.

बलागत दांडगा असलेला रामा पार वाळून गेलेला. काटकीएवढे हातपाय झालेले. खोल गेलेल्या निस्तेज डोळ्यांतून अश्रू निरंतर वाहत असावेत. कारण तिथे ओघळाचा डागच तयार झालेला. मिशा खाली पडलेल्या. गालफाडे आत गेलेली. हनुवटी वर आलेली. नाक सोलून निघाल्यागत झालेलं.

भेगाळलेल्या ओठातून लाळेचे पाझर लागलेले. पोरांना पाहताच त्याच्या डोळ्यांत चमक आलेली. पापण्या थरथरल्या. ओठ हलले. कंठातून आवाज फुटत नव्हता. हाडावरचे कातडे लोंबत असलेला अशक्त हात किंचित उचलल्यासारखा वाटला. त्याच्या सगळ्या अंगाला विलक्षण कंप सुटलेला. चांगुणेच्या डोळ्यांना धारा लागलेल्या. एकेका पोराला ती रामाच्या तळहातापाशी नेऊ लागली. त्याचे खडबडीत हात हलत नव्हते, पण तो पोरांना चाचपत होता. त्या हाताने कधीकाळी पोरांना खडीसाखर, चिरमुरे वाटले होते. पोरांच्या गालावरून हात फिरवले होते. आता मात्र ते हात पुरते गलितगात्र झालेले.

त्या रात्री खूप उशिरा देवळातला लामणदिवा शांत झाला. रामा गुरव अनंताच्या प्रवासाला निघून गेला. गावाने नवा पुजारी बघितला. एरव्ही रसरशीत वाटणारे मंदिर रामा गेल्यानंतर कधीच सचेतन वाटले नाही. मुळात तिथं होतं तरी काय? जीर्ण झालेली वास्तू. नित्य ओतलेल्या तेलाने वेगळाच दर्प प्राप्त झालेली मारुतीरायाची शाळीग्राम पत्थरातली घडीव काळसर मूर्ती. मारुतीच्या मागे काही फुटांवर आणखी एक छोटासा गाभारा होता. त्यात राम, लक्ष्मण अन् सीतामाई होत्या. गावात स्वतंत्र राममंदिर नव्हतं. इथल्या मूर्तीवर चढवलेली फुलं दुपारनंतर सुकत. बघावं तेव्हा तिथे अर्धवट जळालेल्या एक-दोन उदबत्त्या दिसत. बारक्याल्या पाकोळ्या सर्व कानाकोपऱ्यांत असायच्या. पाकोळ्यांचा, तेलाचा, फुलांचा, जळून गेलेल्या उदबत्तीचा मिळून वेगळाच असा खास गाभाऱ्याचा वास यायचा. रामा गेला आणि काही महिन्यांनी देवळाच्या आढय़ातला एक वासा मोडला. मग लोकांनी वर्गणी काढून जीर्णोद्धार केला. सिमेंट- काँक्रिटचं भव्य मंदिर उभं केलं. जुन्या शैलीहीन मूर्ती बदलल्या. नवीन कोरीव घोटीव मूर्ती आल्या. मोतीचुराचे प्रसादवाटप सुरू झाले. फ्लेक्सवरती इवल्याशा मारुतीरायाशेजारी गावातल्या तरुण पोरांचे मोठाले फोटो झळकू लागले. सगळं मंदिर चकाचक झालं. पण रामा असतानाचा मंदिरातला ‘राम हरवला’!

आता देवळाजवळ काही जुनीजाणती सागवानी माणसं नक्षीदार गप्पा मारत बसलेली असतात. खरं तर हे स्वत:च बिनमंदिराचे राम होत. गप्पांचा बहर ओसरल्यावर तिथल्या लिंब-पिंपळाची गळणारी पाने एकटक निरखत राहतात. देवळात पाकोळ्यांना आता थारा नाही. तरीही एखाद्या कोनाडय़ात त्या नजरेस पडतात. एखादं पोर आजी-आजोबाच्या मागे हट्टानं आलेलं. तेही अगदी बिनसुध झोपी गेलेलं असतं. झाडांवरची पाखरेही चिडीचूप होऊन गेलेली असतात. रामनवमी, हनुमान जयंती दणक्यात होते. पण एरव्ही मनोभावे नमस्कार करणारी आणि कानशिले धरून पुटपुटणारी माणसं आता कमी झालीत. पण जी आहेत त्यांचा राम पिकातून डोलतो. दंडाच्या पाण्यातून खळाळत वाहतो. बाभळीच्या बेचक्यातल्या घरटय़ात चिवचिवतो. शाडू लावलेल्या कुडाला रेलून बसतो. सारवलेल्या अंगणातल्या वृंदावनापाशी दिवेलागण होताच हात जोडतो. अन् अंधारलेली रात्र होताच बाजेवर पडून आकाशीच्या चांदण्या निरखीत राहतो. कदाचित त्यात त्याला रामा गुरव दिसत असावा! या लोकांना राम सर्वार्थाने कळलाय का, हे ठाऊक नाही; पण यांच्या जीवनात अजूनही राम आहे असं म्हणता येईल. ‘रामायण’ हा गावाकडच्या माणसांचा जगण्याचा आधार होता आणि आहे. म्हणूनच ग्रामीण भागातली कौटुंबिक घडण अजूनही टिकून आहे असं वाटतं.

उत्तरेकडे ग्रामीण भागात ‘जो नही राम का वो नही काम का’ असं म्हटलं जातं. संभाषण संपल्यानंतर तिकडे अजूनही ‘जय रामजी की’चा नारा असतो. आपल्याकडे गावकरी मंडळी  कधीही कुठेही भेटली तर ‘राम राम’ घालतातच. एखाद्या माणसाचं लक्षण बिघडलं तर ‘त्याच्यात आता राम उरला नाही’ असं म्हटलं जातं. इतकंच नव्हे, तर अजूनही खेडोपाडीच्या अंत्ययात्रेत ‘रामनाम सत्य है’चा पुकारा होतो, तर उत्तरेकडे ‘राम बोलो भाई राम’चा गजर होतो. देहातले पंचप्राणच जणू रामाशी जोडलेत. आताचे रामवेध राजकीय की सामाजिक, हा वेगळा विषय आहे. त्याच्या चच्रेची ही जागा नाही. ‘कण कण में बसे है राम’ असं म्हणणारा आपला समाज राममंदिराच्या मुद्दय़ावरून भावनाप्रधान झालेला दिसतो. मंदिरासाठी माणसं कशी इरेला पेटलीत, याचा वेध घेतल्यावर समोर येणाऱ्या अनेक तथ्यांपैकी एक तथ्य असं आहे- की यात शहरी लोक अधिक आहेत. त्या तुलनेत ग्रामीण कमी आहेत. या फरकाचं उत्तर गावाकडच्या श्रद्धा, भक्ती आणि जीवनपद्धतीत दडलं आहे; जी शहरी जीवनात लोप पावलीय. कदाचित यामुळेच भव्यतेचे वेध लागलेला समाज मंदिरातल्या रामाच्या शोधात असावा. खरं तर आपल्या अंतरीच्या खऱ्या रामास ओळखता आलं पाहिजे.

sameerbapu@gmail.com