समीर गायकवाड

गावात ‘कुणीतरी गेलं’ ही बातमी नुसती कळली तरी भानातात्या लगोलग ‘त्या’ घरचा रस्ता नीट धरायचा. म्हणजे काय? तर, तो वाटंत भेटंल त्याला संगट घ्यायचा. म्हणजे बखोटीला मारून न्यायचा. ती वेळ सकाळची असेल आणि समोरचा इसम त्याच्या ‘सकाळच्या कार्यक्रमा’साठीच्या ‘हातघाई’त असला आणि मयताची बातमी कानी आलेल्या भानातात्याशी त्याची गाठ पडली, की समोरच्या माणसाचं काही खरं नसे. ‘‘लाज वाटत नाही का? तो अन्याबा तिथं मरून पडलाय, अन् तू डबा घेऊन चाललायस? चल जरा रस्त्यानं. पुढं वाईच कळ आली तर बस मग वाटंनं. पर आधी माझ्यासंगं चल.’’ भानातात्या टाळकऱ्यापासून माकडचाळंवाल्यापर्यंत कुणालाही जोडून न्यायचा. अजून एखादं सावज ‘गाव्हेपर्यंत’तरी भानातात्याला साथसोबत देण्याचं काम त्यांना करावं लागे. ‘भाऊशी वाकडं तर नदीवर लाकडं’ ही गावबोलीतली म्हण अशाच भानातात्यासारख्या माणसामुळे अज्ञात ज्ञानीजनांस सुचली असावी. कारण भानातात्याशी वाकडं घेतलेल्या माणसाला तो ‘लाकडं’देखील नीट रचू द्यायचा नाही!

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
chaturang article loksatta
‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती
Gajkesari Rajyog In Three Rashi On 27th March 2024 Horoscope
२७ मार्चपासून अडीच दिवस ‘या’ ३ राशींची प्रगती कुणी अडवू शकत नाही; दुप्पट शक्तीचा गजकेसरी योग देईल लक्ष्मीकृपा

भानातात्या म्हणजे भानुदास जगन्नाथ रोकडे. त्याच्या पापभीरू वडिलांना तीन भाऊ. त्यांचा शब्द कुटुंबात प्रमाण होता. सुखसमृद्धीनं आणि दूधदुभत्यानं त्यांचं घर भरलेलं. केव्हाही पाहिलं तर ढेलजेत जुंधळ्याची गव्हाची पोती रचलेली दिसत. कुणाच्या घरी चूल पेटलेली नसली, की त्याच्या घरची बाईल तोंडावर पदर झाकत वयनीबायकडं यायची. वयनीबाय म्हणजे भानातात्याची आई. गावातल्या भुकेल्या-कष्टल्या जीवांची आई ती! सगळं गाव तिला ‘वयनीबाय’ या लडिवाळ नावानं हाक मारायचं. बंद्या रुपयासारखं गोल गरगरीत मोठं लठ कुंकू कपाळी लेणारी वयनीबाय मग आपल्या पतीकडे पाही. तिचा इशारा होणार हे ठाऊक असलेल्या जगन्नाथ रोकडय़ांचा हात तोपर्यंत ज्वारीच्या पोत्यात गेलेला असे. लखलखत्या पितळी शेरात गच्च भरलेलं ते काळ्या मातीच्या पोटातलं पिवळं सोनं त्या माऊलीच्या पदरात ओतताना तिच्या डोळ्यांत पाणी आलेलं असे आणि वयनीबायचा हात तिच्या गालावर मायेने फिरत असे. तर जगन्नाथांच्या मुखी ‘पांडुरंगाची कृपा’ इतकेच किमान शब्द येत.

जगन्नाथ रोकडय़ांच्या याच स्वभावानं त्यांच्या घरात नवी भिंत झाली. वयनीबायला गावात मिळणारा मान बघून तिच्या जावांचा चडफडाट होऊ लागलेला. घरात खाणारी तोंडंही वाढली. पोराबाळांनी घर भरलं तसं बाहेरून पदर पसरणाऱ्या बायाबापडय़ांना घरातली अन्य माणसं ठिसफीस करू लागली. त्यावरून खटके उडू लागले. वारकरी त्यागवृत्ती रोमरोमात भिनलेल्या त्या दाम्पत्याने पडती बाजू घेतली, अन् तिथंच त्यांच्या दुर्दैवाची मेढ रोवली. घर तुटलं. शेतशिवाराच्या वाटण्या झाल्या. जगन्नाथ रोकडय़ांचा स्वभाव, व्यवहार पाहू जाता त्यांना सगळे फसवणारेच भेटले. त्यांच्यावर जळणारे गावातले म्होरके आतून खूश झाले. काही भल्या माणसांनी चार शब्द सांगायचा प्रयत्न केला; पण पहिला विजय नेहमीच दुर्योधनाचा होतो, तसंच तिथंही झालं.

जगन्नाथांना चार मुलं होती. भानुदास थोरला. बाकी सगळी नावंदेखील नाथपंथीयच.. गहिनी, नेमी, निवृत्ती! भानुदासाचा स्वभाव आधीपासूनच कुऱ्हाडीच्या पात्यासारखा लखलखीत असल्यानं त्याला भावकीला वठणीवर आणायला फारसा वेळ लागला नाही. हत्तीच्या बळाचे त्याचे भाऊ रान कसायचे, त्यात त्यांना यशही होतं. भानातात्यानं त्याच्या कळत्या वयात आई-वडिलांचे अपमान पाहिलेले. तेव्हापासून मनात भावकीची तिडीक बसलेली. ज्या आईबापानं गावासाठी घर तुटू दिलं, त्या गावानं मात्र काहीच केलं नाही. यामुळे गावकीवरही त्याचा राग. त्यातूनच त्याच्या मनानं जगावेगळी उचल खाल्ली. गावातल्या प्रत्येकास ‘पोचवायचंच’ हा त्याचा निर्धार! अर्थात सुरुवातीस क्रोधापायी यात ओढला गेलेला भानातात्या या विधीचं एक अंग कसा होऊन गेला, हे त्यालाच कळलं नव्हतं. नंतरच्या काळात त्याच्या मनात आपुलकी, माया कशी येत गेली, हे गूढ झालेलं.

कुणाच्याही घरची मृत्यूची बातमी कळताच त्याचं ‘गुत्तं’ आपल्याला वतनात मिळालं असावं असा त्याचा आविर्भाव राही. कंबरेचा कासोटा आवळत खांद्यावर उपरणं टाकून स्वारी ढांगा टाकत निघे. वाटंत माणसं गोळा करण्यामागं त्याचा हेतू साधासरळ असे. ज्या घरात मयत झालेलं असे तिथली सगळी माहिती गोळा करून तो तिथं जाई. सगळ्यांच्या कुंडल्या हाती आल्यावर तो प्रत्येकाचे ग्रह स्वत:च्या हाताने ठोकून काढी!

मयताच्या घरी जाताच त्याचं पहिलं काम असे- मयताचे हातपाय दुमडून ठेवणे! जर मयत होऊन खूप वेळ झालेला असेल, मयताचे हातपाय थिजून गेले असले, की त्या घरातील लोक भानातात्याच्या शिव्यांचे धनी होत. मग बऱ्याचदा मयताचे गुडघे-खांदे चक्क निखळतील अशा बेतानेच तो मुडपून टाकायचा! मयताला निलगिरीतेल चोपडण्यापासून उदबत्तीचा अख्खा पुडा लावण्यापर्यंतची कामं करताना त्याच्या तोंडाची टकळी सुरू असे. प्रश्नांची सरबत्ती होई. ‘कधी मेला.. कसा मेला.. त्याला दवापाणी केलं नाही का.. खाऊ घातलं की नाही.. सेवा केली की नाही.. शेवटचे नवे कपडेलत्ते कधी दिले.. लाडकोड पुरवले का.. शेवटची इच्छा काही होती का.. घरात सगळ्यात जास्त जीव कुणावर होता.. मयत कधी करायची..

सगळ्या नातलगांना कळवलं का..’ अशी फैर झडत असे. मयताविषयी तो लिंगभेद कधीच करत नसे. अपवाद अखेरची अंघोळ घालतानाच्या वेळचा असे.

मयताच्या अंत्यविधीचं सामान घराबाहेर येऊन पडलं की भानातात्याला आवरणं आणखी कठीण होई. हे सामान आणायलादेखील त्यानंच कुणालातरी घाई करून पाठवलेलं असे. बांबू आणि कामठय़ा यांची तिरडी बांधणी करताना कुणी फालतू सूचना केल्या तर त्याचा शालजोडीतला उद्धार होई. तिरडीवर कडबा रचून झाला, की त्याची घाई वाढे. अशा वेळी मयतापाशी कुणी हेल काढून रडत असलं, की तो वस्सकन् अंगावर जाई आणि अब्रूचं खोबरं होईल असं बोले. ‘जितंपणी नव्हती गोडी अन् मेल्यावरती आतडी तोडी’चा नेमका वापर करे.

मयताची अंघोळ उरकल्यावर त्याची पूजा-आरती झाली, की मयताचे कलेवर अक्षरश: भानातात्याच्या ‘ताब्यात’ असे. सुतळ्या करकचून आवळायचा, कपाळावर रुपयाचं नाणं खोचायचा, विडय़ाची पाने बांधायचा, पूर्ण ताकदीनिशी तुळशीचं पान जबडा खोलून आत कोंबायचा तो. मयतानं काही ‘कारभार’ करून ठेवलेला असला, की त्याचा शेलक्या भाषेत ‘उद्धार’ दरम्यानच्या काळात होई. बांधाबांधी करून झाली, की खांदेकऱ्यांची तो झाडाझडती घ्यायचा. यानिमित्ताने मयताच्या घरातल्या पाव्हण्यारावळ्यांना झोडून काढायची संधी त्याला मिळे.

जिथं अग्नी दिला जायचा तिथं ‘पुढची तयारी’ भानातात्याच्या खाक्यानुसार झालेली असे. ‘लाकडं की गवऱ्या’, ‘त्यांची चळत कशी रचायची’- यावर काही लोक अक्कल पाजळायला पुढे आले, की भानातात्या त्याचा पाणउतारा करी. ‘‘लईच मरतुकडा होता, कंबरेत पार आरलेला बा’’ असं म्हणत तो खोचक हसायचा, तर कधी ‘‘रेडय़ागत कंबारडं हुतं बाबाचं, काय खाऊन पदा केल्ता क्वाण जाणो!’’ अशी टवाळकीही करायचा. त्याला अडवायची कुणाची बिशाद नव्हती. त्याच्या जोडीला चार-पाच मदतनीसांची टोळी होती. भानातात्या कितीही आजारी असला, तरी हे उद्योग करायचा आणि त्याचा कंपू त्याला ‘खाद्य’ पुरवत राहायचा! मयताचं डोकं कुणीकडे करावं इथंपासून लाकडं नीट रचा याची फर्माने तो सोडी. ‘‘अमक्यातमक्याच्या दहनात पाय तसेच राहिले होते.’’ असं तंबाखूचे बार भरत सहजतेनं तो हसत सांगायचा. कवटीपाशी ठेवायच्या खोबऱ्याच्या वाटय़ा तो हुंगून बघायचा. खऊट वास आला, की वाण्याच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहायचा. मयत स्त्री असली, की माहेरच्या लोकांना ‘लवकर आवरा’ची घाई उडवून द्यायचा. ‘‘शांती, पंचक असलं काही निघालं का?’’ असं कुणी चुकून जरी विचारलं, की भानातात्याच्या मेंदूच्या बत्तीतलं मेंटल भक्कन पेटून उठे. त्यामुळे तसलं काही केलेलं असलं तरी त्याचा राग अंगावर घेत लोक ते विधी करत.

अग्नी देताना तो जवळ उभा राही. अग्नी देणारा कोवळा पोर असला, की त्याच्या खांद्यावर हात ठेवी आणि त्याला धीर देई. इतकंच काय, त्याच्यातला संवेदनशीलपणा जाणवे. बाकी सगळा कामालीचा रासवटपणा होता. तीन फेऱ्या मारताना मडक्याला छिद्र पाडणारा माणूस भानातात्याच्या हमखास शिव्या खाई. अशा वेळी लोकदेखील शंभर सूचना करून आणखी गोंधळ उडवून देत. कुणी काय सांगे तर कुणी काय! मग भानातात्या गप्प राहून सगळं ऐकत राही आणि वेळ बघून खस्सकन् बोले, ‘‘तुझं सरण रचताना तुझ्या पद्धतीनं करू बाबा! हिथं तू गुमान राहा!’’ हा डोस कामी येई. दहन देऊन झाल्यावर चितेत खडामीठ टाकणं, घासलेट फेकणं, गवऱ्यात- लाकडात कोंबलेले बोळे ‘अल्लाद’ पेटवणं हे कार्य सुरू होई. या वेळी लोकांच्या सूचना पुन्हा सुरू होत. मग भानातात्या भीडभाड न ठेवता ज्याचा-त्याचा सातबारा सगळ्यांच्या देखत वाचून दाखवी. त्याच्या या खोडय़ा ज्यांना माहिती असत, ते त्याच्याशी आवर्जून बोलत. पण मोजकंच. न जाणो, उद्या हा आपल्या सरणात घोळ घालून ठेवायचा, आपल्या अब्रूचा पंचनामा करायचा!

भानातात्या आता अंथरुणाला खिळून आहे. नव्वदी कधीच पार केलीय त्यानं. क्वचित कुणाच्या मयतीला जातो. गेला तरी शांत बसून असतो. त्याची गात्रं शिथिल झालीत. कानाच्या पाळ्या लोंबू लागल्यात. गालफडे खोल गेलीत. डोळ्यांतल्या आडाचं पाणी आटून कोरडं ठाक झालंय. कपाळावर आठय़ांच्या नक्षीनं जोर धरलाय. चेहरा रापून निघालाय. केस शुष्क झालेत. हातापायावरचं कातडं ढिलं झालंय. हनुवटी लकालका हलते, मान थरथरते. जुनाट लिंबाची काठी टेकवत कुणाचा तरी हात धरून तो मसणवटीत येतो. गावाबाहेरच्या ओढय़ाजवळ आता मसणवट आहे. तिथल्या चिवट चिखलात उगवलेल्या रानवेलींचा तीव्र वास येतो. हवेत उडणारे राखेचे कण भानातात्याच्या फेटय़ात जाऊन स्थिरावतात. तो ते झटकत नाही, त्याला अंतिम सत्य ठाऊक आहे. आता मयतीचे खूप शॉर्टकट झालेत यावर तो काही बोलत नाही. लोकांनी रीतीरिवाज बदललेत यावर आपलं मत व्यक्त करत नाही. धडाडून पेटलेल्या चितेतल्या अग्नीकडे एकटक पाहत राहतो. तो असा शांत, म्लान बसलेला पाहून तो अग्नीदेखील कासावीस होत असावा, त्यापुढे माणसांची काय कथा! आकसत चाललेल्या मरणाची भानातात्याला भीती नाही. पण पलतीरावर जाण्याची घाईही नाही. तो खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ झालाय.

sameerbapu@gmail.com