समीर गायकवाड

काळ बदलला तशी गावकूसही बदललीय. त्याने गावाची रया गेली असं जुनी माणसं म्हणतात. नव्या पिढीस जगणं सुसह्य़ झाल्यासारखं वाटतंय. माणसांचं येणं-जाणं, मालाची ने-आण सुलभ झालीय. परिणामी शहरातून आणाव्या लागणाऱ्या वस्तू आता गावातच मिळतात. आता गावात डझनावारी दुकानं झालीत. एके काळी गावात एकच दुकान होतं. ते जगन्नाथ वाण्याचं! तो मर्ढेकरांच्या कवितेतल्या गणपत वाण्यासारखा नव्हता.

marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
Astrology By Date Of Birth Number 5, 14 and 23 nature and personality
Astrology By Date Of Birth : ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या सविस्तर
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

तो बेरकीही नव्हता. बापजाद्यांनी दुकानाला दिलेलं अस्ताव्यस्त कोनाडय़ाचं स्वरूप त्यानं बदललं होतं.

आत-बाहेर खिसे असलेली जाडय़ाभरडय़ा कापडाची परण, ढगळ पायजमा, तळाशी नक्षीची किनार असलेली तपकिरी रंगाची पुठ्ठय़ाच्या बांधणीची टोपी असा त्याचा वेश. डोईच्या पचपचीत तेलाचे थर टोपीवर उमटलेले असत. बुशशर्ट घातलेला असला, की त्याच्या कॉलरला आतून काळा तेलकट थर साचून राही, जणू वंगणच लावलेलं! कपाळावर आठय़ांचं जाळं सदान्कदा पसरलेलं राही; नावाप्रमाणे जगाचा भार वाहावयाचा आहे की काय, असं वाटे! त्याला मनमुराद हसताना कधी कुणी पाहिला नसावा, इतका त्याचा चेहरा कोरडा असायचा. रिकाम्या वेळेत पल्लेदार मिशांना ताव देणं हा त्याचा आवडता उद्योग. त्याच्या पसरट चेहऱ्यावर त्या मिशा बिलकुल शोभत नसत. व्हंडं कपाळ, खोबणीत गेलेले मिचमिचे डोळे, बसकं नाक, रुंद राठ ओठ, आखूड हनुवटी यामुळे त्याचा चेहरा बऱ्यापैकी षटकोनी दिसे! तो कितीही साफसुफ राहत असला, तरी त्याच्या कपडय़ांवर धुळीची, तेलाची पुटे चढत. त्याचा अवतार कळकटून जाई. दुकानातील नानाविध वस्तू एकत्र होऊन त्याचा एक वेगळाच दर्प त्याच्या अंगाला येई. जगन्नाथास आणखी एक सवय होती- डोक्यावरची टोपी काढून झाली, की तो दाही बोटांनी टकुरं खराखरा खाजवे. त्यामुळं टोपी नसली, की डोक्यावरचे पांढरेकरडे केस विस्कटलेले दिसत.

रिकाम्या वेळेत तो सतत कपडे झटकायचा, झटकणीनं इकडं तिकडं फडकं मारायचा. धूळ, माशा उठवून लावायचा. पण त्यानं फारसा फरक पडत नसे. या गोणीवरची धूळ त्या गोणीवर जाई, इकडच्या माशा तिकडे बसत. दातकोरणं पुडीत बांधून ठेवून उदबत्तीच्या काडीनं दातातल्या फटी तो कोरत राही. पुष्कळदा ती काडी ओठांच्या कोपऱ्यात बसून राही. तिला घोळवत त्याचा गिऱ्हाईकांशी संवाद चाले. त्याच्या हातात तांब्याचं जाडजूड कडं राही; डब्याडुबडय़ावर कडं आदळून विशिष्ट आवाज काढला की त्याची पत्नी बायडाबाई ओळखायची की आपल्याला आवाज दिला जातोय. ती समोर यायची. मग जगन्नाथ तिला काम सांगायचा. धान्य मोजून द्यायचं, नरसाळं लावून रॉकेल ओतायचं, पानाची गड्डी मोजून द्यायची.. अशी लहानसहान कामं बायडाबाईच्या वाटय़ास येत. फावल्या वेळेत दोघे मिळून माल लावत, वजनवार पुडय़ा बांधून ठेवत. कसायाच्या कब्जातल्या बकरीसारखी होती बायडाबाई. वाण्याच्या तलफेनुसार ‘तव्यातून ताटात आणि मोरीतून खाटात’ हेच तिचं जीवन. डझनभर पोरं तिला झालेली, त्यातली तीनच जगली. बारमाही एक पोर तिच्या काखेत असे. माहेरचे दोर तुटलेली ती बापुडी जगन्नाथापुढे झुकून राही.

बायकोला नजरेच्या जरबेत ठेवणाऱ्या जगन्नाथाच्या ओठावर साखर, डोक्यावर बर्फ असायचा. कोंबडा आरवायच्या आधी त्यानं दुकानाची फळकुटं हटवलेली असत. फळ्या हटवून आतून आगळ सरकावून दार उघडलं, की दुकानदारी सुरू होई. गावातल्या लोकांना जे काही म्हणून लागे ते त्याच्या दुकानात मिळे. तेव्हा लोकांच्या गरजाही कमी होत्या, खाण्यापिण्याचे चोचलेही कमी होते. त्यामुळे मालाचे वाणही कमी होते. लोकही मिळेल त्या वस्तू घेत. नगाला नग असा सगळा मामला. हा व्यवहार क्वचित रोखीत होई; चीजवस्तूच्या बदल्यात पशाऐवजी धान्य दिले जाई. बहुतांशी उधारीच राही. वाण्याकडे चोपडय़ांचा ढीग राही. दिमतीला एक दगडी पाटी होती, ज्यावर तो रोजची उधारी लिही. तीच उतार पुन्हा चोपडीत येई.

गावात सर्व तऱ्हेची माणसं होती. त्यांच्या आवडीनिवडी जगन्नाथास चांगल्याच ठाऊक होत्या. गावही फार मोठं नव्हतं. दोन शीवेतलं अंतर सात-आठ गल्ल्यांत मावायचं. गावातली सगळी माणसं एकमेकांना नावानिशी ओळखत. कुणाचा कोण, कुठल्या आळीतला.. सगळं माहीत असायचं. कुणाच्याही घरी पाहुणारावळा आला तरी कानोकानी खबर व्हायची. कुणाच्या घरात काय स्वयंपाक होतोय, काय शिजतंय, हे घराच्या ओटय़ासमोरून जाणाऱ्या माणसाला आपसूक कळायचं, खमंग वास दरवळायचा. चूल विझवताना विस्तवावर टाकलेल्या पाण्याचा चर्र आवाजदेखील ऐकू यायचा. सबब कुणाच्या घरात खाण्यापिण्यावरून तंटा झाला तरी लगोलग कळायचं. लोक त्याचा बभ्रा करत नसत, की त्यावरून निंदा करत नसत. चवीनं चर्चिल्या जाणाऱ्या गोष्टीत कुणाच्या गरिबीस, हतबलतेस स्थान नसे. मात्र, सगळ्या गावगाडय़ाचा पाढा तीन लोकांपाशी वाचला जायचाच. एक गणा वारीक, दुसरा पाणक्या नामू आणि तिसरा जगन्नाथ वाणी! गप्पांच्या ओघात सगळी बित्तंबातमी त्यांच्यापाशी चर्चिली जायची. जगन्नाथाला दुकानातले वाण कमी-जास्त करायला, आवक ठरवायला ही माहिती कामी येई.

गोडय़ा तेलाच्या पिंपापासून मालदांडीच्या ज्वारीपर्यंतचा माल त्याच्याकडे होता. एका कोपऱ्यात ठेवलेलं घासलेटचं टिपाड आपल्या उग्र दर्पाने अस्तित्व दाखवून देई. दुकानात छोटे चौकोनी खण असलेली लाकडी फडताळं होती. त्यावरच्या काहींच्या काचा फुटलेल्या, काहींना तडे गेलेले. धुराने त्यांचा रंग लालसर पिवळट झालेला. ऐसपस भक्कम सागवानी पाटावर जाडजूड गादी अंथरलेली असे, ती जगन्नाथाची बैठक! तिचे मांजरपाटाचे खोळ तेलकट- कळकट डागांनी भरलेलं असे. षटकोनी आकाराच्या ‘साठे बिस्किटां’चे पत्र्याचे डबे एकेक करून त्यानं साठवलेले होते. वरचे तोंड कापून त्यात दोन खाने करून त्यात डाळी ठेवलेल्या असत. त्यांनाही मग बिस्किटांचा गंध येई! लाकडी खोक्यातून आलेली चहा पावडरची भुकटी एका डब्यात असे. त्याचा वाण एकच असूनही गिऱ्हाईक जोखून भिन्न भावाने विके.

‘लिप्टन टायगर’ चहापत्तीच्या पुडय़ा, शेवकांडय़ा, रंगीबेरंगी बाहुलीच्या आकारातल्या गोळ्या.. अशा शेकडो वाणांपासून बलपोळा ते गुढीपाडव्यापर्यंतच्या सणांचे साहित्यही त्याच्याकडे मिळे. ‘किसान तोटय़ा’पासून ‘पिवळा हत्ती’, ‘चारमिनार’ सिगरेटपर्यंतचं व्यसनही त्याच्याकडं विक्रीस होतं. तेव्हा त्या सिगरेट महाग वाटत; ‘उंट छाप विडीकट्टा’ त्यामानाने लोकाश्रयीत व खिशाला सोसवणारा होता. त्याच्याकडे मसाल्याचे पदार्थही होते. सुईदोरा, बटण, विविधरंगी दोऱ्यांची रिळे, लांब सुयांसह लोकरीचे बंडलही होते. कुणी लोकर मागितली, की त्या घरात पोटुशा माहेरवाशिनीचे दिवस भरल्याची चाहूल जगन्नाथास आपसूक लागे. खेरीज सगळ्या गावाचा किराणा त्याच्याकडे असल्यानं कुणाच्या घरात काय ‘शिजतंय’, हे त्याला खऱ्या अर्थाने कळे!

पणत्या, चिमण्या, गॅसबत्तीचे मेंटल, कंदील, मेणबत्त्यांचा खप मोठा होता. वीज आल्यानंतर त्याच्या दुकानात बल्बही आले. काळ बदलेल तसे वाण बदलण्याचे कौशल्य त्याच्याकडे होते. गावकरीही डोळे झाकून विश्वासाने खरेदी करत. त्यानंही त्यांचा विश्वास जपलेला. परगावी जाताना चोराचिलटाच्या भयापायी पशाचा बटवा लोक त्याच्याकडे ठेवून जात. गावाहून परतलं, की बटवा सहीसलामत मिळे. तेव्हा लॉकर नव्हते, बँक खातं नव्हतं; होता तो शब्दांचा भरवसा! पशाची नड असल्यावरही जगन्नाथच कामाला येई. पैसे द्यायला उशीर झाल्यावर मात्र काहीतरी चीजवस्तूचा दंड घेई. अगदीच गरीब माणसाकडून पैसे चुकते झाले नाहीत, तर मात्र तो त्याला आणखी मुदत देई.

विधुर जगन्नाथाचं वार्धक्याकडे झुकल्यानंतर गणित चुकलं. पोरांना दुकानदारी टिकवता आली नाही. मागून आलेली दुकानं पुढे गेली. त्याच्या अंधारलेल्या बंद दुकानात आता जाळ्याजळमटंही नाहीत. तिथल्या भिंतीत बायडाबाईचे नि:शब्द उसासे मात्र ऐकता येतात. पोपडे उडालेल्या भिंतीस टेकून बसलेला जगन्नाथ सांजेस अजूनही जुन्या चोपडय़ा उघडून बसतो, पहाटेच्या स्वप्नात दुकानातली लगबग अनुभवतो. आताशा दुर्मुखलेल्या चेहऱ्याची जर्जर बायडाबाईही त्याच्या स्वप्नात येत असते. चुकलेलं गणित उमगल्याचं त्याच्या डोळ्यांच्या ओलसर कडांत आता स्पष्ट दिसतं.

sameerbapu@gmail.com