30 March 2020

News Flash

‘ऐ चिकणे, जरा सुनो’

फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या साइटस् मी अगदी आवर्जून पाहतो. काही अंशी मला त्यांचे व्यसन लागले आहे, हा आमच्या मातोश्रींचा दावाही खराच आहे.

| July 13, 2014 01:10 am

फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या साइटस् मी अगदी आवर्जून पाहतो. काही अंशी मला त्यांचे व्यसन लागले आहे, हा आमच्या मातोश्रींचा दावाही खराच आहे. राजसत्ता बदलून टाकण्याची ताकद आणि जनमानसाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती या सोशल मीडिया साइटस्मध्ये आहे, हे आपण सर्वानी मान्य केले आहे. प्रश्न आहे तो त्यांच्या विधायक उपयोगाचा! अल्पकाळामध्ये सर्वदूर पसरणारा संदेश देण्यासाठी, अनेक लोकांच्या मनातील सामायिक भावना जागृत करण्यासाठी फेसबुकइतके प्रभावी माध्यम नाही. ज्यांना आपण आजवर भेटलो नाही, ज्यांच्याशी कधी हातमिळवणी केली नाही अशांशी अप्रत्यक्षरीत्या तोंडपाटीलकी करण्याची संधी ‘फेसबुक’ उपलब्ध करून देते. मला अनेकदा उत्तमोत्तम कल्पना, काही प्रभावी विचार, काही दिलखेचक दृश्ये या फेसबुकच्या साइटवरून मिळतात आणि ती मी संकलित करून ठेवतो. परवा आलेली व्हिडीओ क्लीपही अशीच संग्राह्य़ ठरली.  
कोणत्याही शहराच्या रस्त्याच्या सिग्नलवर हटकून भेटणारे तृतीयपंथीयांचे टोळके, लालभडक रंगवलेले तोंड, खणखणीत वाजणाऱ्या हातांच्या टाळ्या, आवेशपूर्ण खोचलेला पदर, वेगवेगळे अंगविक्षेप करीत, गाडय़ांच्या बंद काचांवर हक्काने टकटक करीत थोडसे भयप्रद वाटणारे, कधी अंगावर येणारे असे हे तृतीयपंथीय!  मी ज्या शल्यशाखेमध्ये काम करतो, तिथे िलगभेदाची आणि अव्यक्त िलगाच्या अनेक शस्त्रक्रिया आम्ही करतो आणि त्यामुळे या तृतीयपंथीयांच्या आंतरिक शास्त्रीय जडणघडणेची मला पूर्ण कल्पना आहे. अनेकदा ते माझ्यासाठी औत्सुक्याचा तर कधी आव्हानात्मक शस्त्रक्रियेचा विषय ठरले आहेत. पण त्यांच्या सामाजिक अभिव्यक्तीबद्दल मात्र माझ्या मनात गोंधळ आहे. सिग्नलवर पसे मागणे, एखादे नवे दुकान किंवा नवा उपक्रम चालू झाल्यास टोळक्याने जाऊन ढोलकी बडवून हक्काने खंडणी उकळणे, एखाद्या घरात छोटे बाळ जन्माला आल्यावर त्याला उचलून घेण्याचा आपला पहिला हक्क बजावताना देणगी लाटणे तसेच लग्नसमारंभात आपला अग्रपूजेचा मान राखणे या सर्व सामाजिक चालीरीतींमधून त्यांच्या ठायी निर्माण झालेली आक्रमकताच दिसून येते. ती त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांना आवश्यक वाटते. कारण आपण समाजाने त्यांना सन्माननीय अस्तित्व आजवर नाकारलेले आहे. स्वातंत्र्यानंतर सहा दशकांनंतरच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भरावयाच्या वेगवेगळ्या अर्जामध्ये स्त्री आणि पुरुष या दोन िलगांव्यतिरिक्त इतर िलग ‘इंटरसेक्स्’ आता कोठे छापले जाऊ लागले आहे. तेव्हा आपण समाजाने या किन्नरांना नाकारून त्यांच्यावर अन्यायच केला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.  
या पाश्र्वभूमीवर परवा आलेला फेसबुकवरचा व्हिडीओ मला समाधान देऊन गेला. सात ते आठ तृतीयपंथीयांचे टोळके.. सर्वाना अतिशय उंची काठपदराच्या साडय़ा नेसविलेल्या. नेसविण्याची पद्धत विमानातल्या एअर होस्टेसप्रमाणे. आणि विमान सुटण्यापूर्वी दिल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या सूचनांच्या धर्तीवर ६० सेकंदांची रस्त्यावरच्या सुरक्षेची माहिती देणारी ही चित्रफीत. हातात मेगाफोन घेऊन या किन्नरांचा नायक सिग्नलला उभ्या असलेल्या गाडीचालकाला संबोधतो-‘सीटबेल्ट लावा’, ‘गाडी हळू चालवा’, ‘मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरा..’ आणि हे सर्व त्यांच्या खास शैलीत.. टाळ्या वाजवत.. ‘‘ए चिकणे’’, ‘‘ऐ हिरो, गर्लफ्रेंड के बाजू में बठ के पहिले सीटबेल्ट लगाने का.’’ उत्सुकतेने सर्व वाहनचालक आपापल्या गाडय़ांच्या काचा खाली करून हे किन्नर पथनाटय़ पाहतात आणि मिनिटभरात सिग्नल हिरवा झाल्यावर त्यांनी दिलेला संदेश अमलात आणत मार्गस्थ होतात. मला अत्यंत प्रभावी असा हा प्रबोधनाचा मार्ग दिसला.  उण्यापुऱ्या ६० ते ८० सेकंदांत सुरक्षेचे नेमके स्क्रिप्ट लिहिणे, ते अतिशय कुशल किन्नरांकडून घडवून घेणे आणि त्याचे प्रभावी सादरीकरण सिग्नलवर करणे, ही कल्पनाच अद्भुत आणि सशक्त, सकारात्मक विचारांची वाटली. ज्यांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागते आहे अशा तृतीयपंथीयांनी समाजाच्या सुरक्षेसाठी सक्रिय विचार देणे ही खूप आश्वस्त करणारी कृती आहे. या तृतीयपंथीयांच्या अंगी असलेली ताकद, कलागुण यांचा अधिक कल्पकतेने विचार व्हावयास हवा. रस्ते ओलांडताना, वाहन चालविताना घ्यावयाची सुरक्षेची काळजी, सामाजिक स्वच्छतेचे भान, स्कूलबसच्या संदर्भात पाळावयाचे नियम, रस्त्याच्या कडेला लहान मुले खेळत असताना घ्यावयाची सुरक्षा अशा वेगवेगळ्या सुरक्षेसंबंधांतील छोटय़ा फिल्मस् आणि छोटी पथनाटय़े या तृतीयपंथीयांकडून आपल्याला निश्चितपणे करून घेता येतील. माझ्या मते, हे काम अशासकीय, स्वयंसेवी संस्थांनी- ‘एनजीओज्’नी करावे आणि त्याला शासकीय आíथक मदत लाभावी. समाजाच्या आपण उपयोगी पडतो आहोत, काहीतरी काम करून पसे कमावतो आहोत अशी स्वाभिमानाची भावना यामुळे किन्नरांच्या मनात निर्माण होईल आणि त्यांची धाकदपटशा करण्याची, भिवविण्याची आणि भीक मागण्याची प्रवृत्ती काही अंशी तरी कमी होईल. आजवर आपण त्यांना त्याज्य मानले आहे. आता त्यांच्या अस्तित्वातील ताजेपण अनुभवण्याची वेळ आली आहे. अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्याला त्यांना सहभागी करून घेता येईल. त्यांच्या स्वत:च्या बांधलेल्या संघटना आहेतच; त्यांना सन्मान देण्याची वेळ आणि तुम्हीही समाजाच्या उपयोगी पडू शकता, हे दाखवून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. लक्ष्मीसारख्या त्यांच्यातील एका धडाडीच्या नायकाने अनेक वेळा त्यांच्या सामर्थ्यांची प्रचीती दिलीच आहे. पण त्यांना स्वीकारण्यामध्ये समाज आजही दोन पावले मागे आहे, त्याला बदलण्याची गरज आहे.
महाभारताकडे मागे वळून पाहिले तर अर्जुनासारख्या धनुर्धारीलाही बृहन्नडेचे आयुष्य चुकले नाही आणि अर्जुनाच्या रथावर शिखंडी उभा राहिला नसता तर भीष्माचा पाडाव अशक्यच होता, हे स्पष्ट होते. तृतीयपंथीय हे असे समाजाचा अविभाज्य अंग होते आणि यापुढेही राहतील. वैद्यकशास्त्र प्रगत होत राहील, िलगांवरच्या शस्त्रक्रिया अधिकाधिक उत्तम प्रकारे पार पाडल्या जातील; पण त्याचबरोबर तृतीयपंथीयांना मानसन्मान देण्यासाठी आपण आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यांच्याच भाषेत सांगावयाचे झाले तर – ‘‘ऐ चिकणे, सुन रहे हो ना!’’                                                                                                 
                                                      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2014 1:10 am

Web Title: gay everlasting part of society
टॅग Lokrang Loksatta
Next Stories
1 झुरळ आख्यान
2 घर आणि घरपण
3 गाणे
Just Now!
X