News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘घर’

चित्रपटांतली गाणी अनेकदा त्यातला आशय पातळ करतात; पण इथं मात्र गाण्यांनी दाहकता कमी होण्याऐवजी वाढवलीय.

(संग्रहित छायाचित्र)

मृदुला दाढे- जोशी

mrudulasjoshi@gmail.com

‘दुखणे बसले चिंध्या फाडीत

गरगर फिरती त्याचे डोळे,

नसानसांतून घुमते त्याचे हास्य भयानक

उरल्यासुरल्या रक्तकणांतून!

समोर त्याच्या करिते नर्तन,

एक आठवण त्या प्रलयाची!’

इंदिरा संतांनी या ओळी लिहिल्या तेव्हा त्यांच्या मनात काय काहूर माजलं असेल! कुठल्या तरी भयंकर प्रसंगाची आठवण त्या अनामिकेच्या मनातून जाता जात नाहीए. ‘घर’ हा चित्रपट अशाच एका काहुराचा आहे.. एका सरभर अस्तित्वाचा आहे.. न विसरता येणाऱ्या एका व्रणाची ही कहाणी आहे.

१९७८ साली आलेला, माणिक चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि दिनेश ठाकूर यांची पटकथा, रेखा आणि विनोद मेहरा यांच्या प्रमुख भूमिका असलेला एन. एन. सिप्पी निर्मित ‘घर’ हा चित्रपट एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा होता. भले त्यात अनेक त्रुटी आहेत; परंतु मनाला व्यथित करणारी गोष्ट अशी की, त्या चित्रपटातल्या अनेक गोष्टी आजही तशाच आहेत.. एवढय़ा वर्षांनंतरही! बलात्कार! एक सक्ती.. भावनांचा खून. प्राजक्ताच्या फुलांना कुस्करून टाकणारी या पृथ्वीवरची सगळ्यात भयंकर घटना. शरीरासोबत मनाचीही लक्तरं करणारा बलात्कार एका स्त्रीच्या मनावर किती प्रकारचे आघात करून जातो.. तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या तिच्या पतीची काय अवस्था होते.. आणि प्रचंड गुंतागुंतीच्या भावनिक, शारीरिक, सामाजिक संघर्षांमधून पुन्हा हे नातं, हे ‘घर’ कसं सावरतं याची ही कहाणी! यातल्या आरतीचं दु:ख हे एका बलात्कारितेचं तर आहेच; पण त्याहूनही जास्त एक जिवापाड जपलेला कोवळा गाभा, अनाघ्रात कोंब कुस्करला गेल्याचं आहे. तो गाभा म्हणजेच तिचं ‘घर’!

चित्रपटांतली गाणी अनेकदा त्यातला आशय पातळ करतात; पण इथं मात्र गाण्यांनी दाहकता कमी होण्याऐवजी वाढवलीय. कारण गाण्यांनीच त्या दोघांमधलं नातं जिवंत केलंय. त्यात प्रेक्षकांना पूर्ण गुंतवलंय. ज्याची पुढे हत्या होणार आहे, तो रोमान्स गाण्यांनी फुलवलाय. जे भावविश्व उद्ध्वस्त होणार आहे, त्यात प्रेक्षक पूर्णपणे गुरफटतात ते या गाण्यांमुळे. त्यामुळे हा धक्का त्यांनाही प्रचंड तीव्रतेनं बसतो. यातल्या चार मुख्य गाण्यांपैकी तीन गाणी ही फक्त त्या दोघांमधली ओढ, असोशी, खूप वरच्या दर्जाचं सहजीवन व्यक्त करणारी आहेत. ‘आजकल पॉंव जमीं पर’, ‘आपकी ऑंखों में कुछ’ आणि ‘तेरे बिना जिया’ ही तीनही गाणी ‘तो’ भयंकर प्रसंग घडण्याआधीची. आणि नंतरचं एक गाणं ‘फिर वही रात है’ मात्र सगळ्यात गहन, तरल! ‘पंचम’ राहुल देव बर्मननं कमालीचं हळवं होत या गाण्यांना चाली दिल्यात. हा पंचम वेगळा आहे हे ठायी ठायी जाणवतं. कारण मुळात गुलजारसाहेबांसाठी चाली करणारा पंचम वेगळाच होता.

यातलं पहिलं गाणं येतं ते नुकत्याच प्रेमात पडलेल्या आरतीची अवस्था व्यक्त करण्यासाठी..

‘आजकल पांव जमीं पर नहीं पडते मेरे

बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए?’

ते फुलपाखरी दिवस.. पाय जमिनीवर न ठरण्याचे..

गाण्याची सुरुवात होते ती सितार आणि व्हायोलिन्सच्या मस्त इंट्रो पीसने. हे पीससुद्धा असे बांधलेत की त्यातून ती उत्कंठा, आवेग जाणवावा. पहिला ‘म ग रे ग’ हा तुकडा वाढत्या लयीत जातो तो त्याचसाठी.. सितारला बिलगून व्हायोलिन्स येतात आणि मस्त गिटारच्या भन्नाट पीसने गाणं सुरू होतं.. ‘आज कल पांव’ म्हणताना लताबाईंची दमदार एन्ट्री होते, त्यात एक खास बात आहे. पावलं जमिनीवर ठरत नाहीत असं म्हणायचंय, त्यामुळे षड्जाचा भक्कम आधार, ‘पांव’ हा शब्द तिथं स्थिरावण्यासाठी घेतलाय. (खरं तर मजेदार विरोधाभास हा. कारण पावलं स्थिरावत नाहीयेत खरं तर!) आपले पाय आणि जमीन यांच्यातलं नातं षड्जाशिवाय कोण स्पष्ट करणार? त्यामुळे ‘आज कल पांव’ हे शब्द पंचमावरून पटकन सा वर येतात आणि पुढचीच ओळ- ‘बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए?’ ही प्रश्नार्थकच संपते. अधांतरी सोडण्यासाठी त्यात ओळीच्या शेवटच्या शब्दांना वरच्या वर पंचमस्वर उचलून घेतो. सामान्य दिग्दर्शकाने पुन्हा षड्जावरही आणली असती ही ओळ. यात ‘उडते हुए’ हेच शब्द प्रत्येक कडव्याच्या शेवटी असाच लोभस प्रश्न घेऊन येतात. या गाण्याच्या म्युझिक पिसेसमध्येसुद्धा हे ‘उडणं’ आहे. तिसऱ्या कडव्याआधी अतिशय सुंदर बासरीचा पीस आहे. आकाशात पतंग उडवल्यासारखे येणारे चार स्वर.. हे तरंगतच येतात.

या संपूर्ण गाण्यात केवळ डोळ्यांनी जे दोघं बोलतात ते केवळ अप्रतिम आहे. यात विकास (विनोद मेहरा) डोळ्यांनी प्रश्न विचारतो. ते फार लोभस आहे. तिच्याबरोबर तिची ही अवस्था तोही जगतोय ना! संपूर्ण गाण्यात त्याचा अतिशय देखणा वावर आहे. ‘जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है!’ असं रेखा म्हणते तेव्हा त्यानं डोळ्यांनीच तिला ‘काय?’ म्हणून विचारलंय. फार गोड आहे हा संवाद. तुझ्या-माझ्या हातावरच्या या रेखा (भाग्यरेखाच त्या!) लोकांसाठी फक्त हातावरल्या रेषा असतील; पण खरं तर मी बघितलंय तुझ्या-माझ्या नशिबांना एकत्र येताना! काय विलक्षण भावना आहे ही! हे खरं तर युगुलगीतच. एकही शब्द न उच्चारता यातला विनोद मेहराचा वावर दाद देण्यासारखाच.

या गाण्यात एक सुंदर मूव्हमेंट बघायला मिळते. वरच्या ‘सा’पासून खालच्या ‘सा’पर्यंत येऊन पुन्हा वरचा ‘सा’ गाठणं.. तेही एकाच ओळीत! ‘जाने क्या होता है हर बात पे कुछ होता है!’ म्हणताना वरच्या फांदीवर बसलेल्या पक्ष्यानं उडून खालच्या फांदीवर यावं, क्षणभर तिथं बसून पुन्हा वर जावं.. तशा वाटतात या ओळी. ‘थाम लेना जो कभी देखो हमे उडते हुए’ यात ‘सांभाळ तू बावरल्या वेडय़ा तुझ्या फुला.. सावर रे सावर रे उंच उंच झुला!’ हा भाव आहे. तीच उत्कटता.. तोच भावनांचा उंच झुला.. आणि स्वत:ला त्याच्यावर सोपवताना वाटलेला तोच विश्वास!

आरतीला सून म्हणून न स्वीकारणाऱ्या वडिलांना न जुमानता अखेर विकास स्वत:च्या घरावर पाणी सोडून आरतीशी लग्न करतो. संसार सुरू होतो. त्यांचं एकमेकांत विरघळून जाणं फार सुंदर व्यक्त झालंय पुढच्या गाण्यात..

‘आपकी आंखो में कुछ महके हुए से राज है

आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है!’

एकमेकांवर अनुरक्त असलेले दोघे किती उत्कट! तिच्या प्रत्येक बारीकसारीक अदा.. आणि त्यातच गुरफटलेला विकास.. ती सुंदरच.. पण तिच्यापेक्षा जास्त सुंदर तिचं डोळ्यांतून बोलणं..! बघणं..! त्यात एक रहस्यमय महक आहे..! इतकं सुंदर टेकिंग आहे या गाण्याचं- की ‘लब हिले तो मोगरे के फूल’ या ओळीच्या क्षणभर आधी ती खुदकन् हसते. शुभ्र दंतपंक्तींच्या कुंदकळ्या चमकून जातात. प्रत्येक ओळीला रेखानं दिलेला प्रतिसाद विलक्षण बोलका आहे. त्या स्तुतीनं सुखावलेली आरती ज्या नजरेनं बघते त्यात खरोखर ‘किनारे भेटल्याचा’ भास आहे.. आणि ‘मम स्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला नकळता’ ही अनुभूती ‘आपकी खामोशियां ही आपकी आवाज है’ म्हणताना जाणवते.. त्याच क्षणी लताबाईंचा ‘आपकी’ हा शब्द लख्ख प्रकाशझोत टाकत प्रवेश करतो. रेखाचे डोळे आणि हा आवाज यांचा दिव्य प्रकाश एकाच वेळी पडद्यावर अनुभवायला मिळतो. ‘राज है’ म्हणताना त्यांनी पंचमावरून शुद्ध निषादावर घेतलेली झेप किशोरदांपेक्षा वेगळी आहे. फार मनस्वी. गाण्यावर ‘लता’जादू पसरायला सुरुवात होते. ‘खूब’वरची हरकत खास स्त्रीत्व घेऊन येणारी. ‘आपकी बदमाशियों के ये नये अंदाज है’ म्हणताना त्यात लताबाई खुदकन् हसतात.. त्याचं टायिमग, त्यातली नैसर्गिकता फक्त अनुभवायची आपण. तिथं काळीज लक्कन् हललेलं असतं आपलं. हे गाणं अगणित वेळा ऐकताना हाच अनुभव कसा काय येऊ शकतो? हे प्रश्न निर्थक असतात. ‘अंदाज है’ शब्दावर एक मस्त जागा घेऊन लताबाई शेवटची सुगंधी जखम देतात.

अखंड त्याच्या प्रेमात न्हाऊन निघालेल्या आरतीचं गाणं ‘तेरे बिना जिया जाये ना..’

..आणि सर्वात तरल गाणं- त्या भयंकर घटनेनंतरचं- ‘फिर वही रात है..’ पुढच्या भागात!

(पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:04 am

Web Title: ghar movie lokrang afsana likh rahi hoon article abn 97
Next Stories
1 व्हर्निसाज.. एक अनोखा बाजार
2 विचारभिन्नता नसेल तर सारंच एकरंगी होईल..
3 हास्य आणि भाष्य : अर्कचित्र
Just Now!
X