अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

अजूनही करोनाच्या उगमाविषयी अनेक दावे-प्रतिदावे चालू आहेत. प्रसारमाध्यमांसाठी ते एक उत्तम खाद्य आहे. विशेषत: अमेरिकेमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असल्याने तऱ्हेतऱ्हेची कट-कारस्थाने सिद्धांत तसेच अचूक भविष्यवेधाचे दाखलेदेखील प्रसृत होत आहेत. अशा करोनापर्वात समस्त अमेरिकेला रानटी गांधीलमाशीच्या रूपाने एक नवाच शत्रू गवसला आणि या बातमीने बाजी मारली. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोना विषाणूसारखीच दहशत एका गांधीलमाशीने आणली.. आणि तीही अमेरिकेवर! ती आली कधी? कुठून? तिच्या जातीच्या माश्या अजून आहेत का?.. याची दाही दिशांनी शोधमोहीम सुरू झाली. समस्त अमेरिकेला सावधगिरीचा इशारा मिळाला. अमेरिका भयभीत झाली. कोणत्याही कारणांनी लोकांच्या मनात येणारी धास्ती हा कच्चा माल अतिशय उपयुक्त आहे. हॉलीवूडी चित्रपटांना ‘असे’ खलनायक हे कमालीचे प्रिय असतात.(ते कमी पडले तर परग्रहवासीयांचा हल्ला हमखास यशस्वी होऊ शकतो.) साहजिकच रानटी गांधीलमाशीची वार्ता येताच सामाजिक माध्यमांसोबत प्रसारमाध्यमांनाही भूतकाळ आठवला. १९६६ साली आलेल्या ‘द डेडली बीज’ नामक भयपटात रानटी मधमाश्यांची प्रचंड मोठी झुंड माणसांवर हल्ला करीत असल्याचे चित्रण होते. त्याने अमाप गल्ला कमावल्यामुळे अशाच धाटणीचा ‘सॅव्हेज बीज’ १९७६ मध्येही येऊन गेला होता. हे संदर्भ आवर्जून देत ‘अमेरिकेच्या वॉिशग्टन राज्यात खुनी गांधीलमाशी दाखल’ ही बातमी सर्वानी अतिशय ठळकपणे छापली वा दाखवली.

Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?

‘आशियाई राक्षसी गांधीलमाशी (एशियन जायंट हॉन्रेट)’ ही आपल्या हाताच्या अंगठय़ाएवढी, साधारणपणे दोन इंच आकाराएवढी असते. जपान, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया या पूर्व आशियाई देशांत गांधीलमाश्या आढळतात. झुंडीने येऊन धाड घालणारी ही प्रजाती आहे.  खाद्य मिळवण्यासाठी त्या सहजगत्या ८ ते १० किलोमीटरचा पल्ला सहज पार करू शकतात. या गांधीलमाशीची नांगी ही पाव इंच लांब असून, तिचा डंख माणसांसाठी घातक ठरू शकतो. जपान व फिलिपाइन्समध्ये या रानटी गांधीलमाश्यांच्या दंशामुळे दरवर्षी किमान ५० ते ६० माणसे दगावतात. त्यामुळे त्यांना ‘खुनी गांधीलमाश्या’ असेही म्हटले जाते. अनेक कीटकांचे भक्षण करणाऱ्या या गांधीलमाश्यांसाठी मधमाश्यांचे पोळे हे आवडीचे खाद्य आहे. त्या मधमाश्यांवर हल्ला करून त्यांचा ९० मिनिटांत अक्षरश: फडशा पाडतात आणि निवांतपणे छोटय़ा गांधीलमाश्यांचे पोषण करतात.

ही भलीमोठी गांधीलमाशी अमेरिकेत आली कशी, हे शोधण्याचे आव्हान गुप्तचर खाते आणि शास्त्रज्ञांसमोर ठाकले आहे. मागील वर्षी याच प्रजातीची गांधीलमाशी कॅनडात सापडली होती. चौकशीच्या चक्रातून ही गांधीलमाशी मालवाहू जहाजातून आली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आता सर्वत्र पहारे वाढवले आहेत. वॉिशग्टन राज्याच्या शेती विभागातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. ख्रिस लूनी म्हणाले, ‘‘ही रानटी गांधीलमाशी भीतिदायक आहे. त्यामुळे आपण काळजी व खबरदारी घेणे आवश्यकच आहे.’’ ही चिंता माणसांसोबतच मधमाश्यांसाठीही होती. मागील ८-१० महिन्यांपासून अमेरिकेतील मधुमक्षिकापालकांनी मधमाश्यांच्या पोळ्यांचा मोठय़ा प्रमाणात अकाली मृत्यू होत असल्याची तक्रार दाखल केली होती. याचा अर्थ तिचा प्रसार तर झालेला नाही?

अमेरिका चिंताक्रांत झाली..

सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील उत्क्रांतीतून सजीवसृष्टीचे आगमन झाले. याच काळात सपुष्प वनस्पती निर्माण झाल्या. फुलं, कीटक, गांधीलमाशी ते मधमाशी यांचा दाखल होण्याचा काळ एकच असावा असं मानलं जातं. जगातील महत्त्वाच्या ९० पिकांची फलधारणा मधमाश्यांशिवाय होऊ शकत नाही. तीळ, मोहरी, कारळ, जवस, सूर्यफूल या तेलबिया; कांदा, गाजर, मेथी,  काकडी ही भाजीपाला पिके, तर आंबा, डािळब, नारळ, िलबूवर्गीय फळपिके आणि लसूण-घास, मेथी-घास या चारा पिकांच्या परागसिंचनासाठी मधमाश्या अनिवार्य आहेत. सुमारे २.५ लाख फुलझाडांच्या परागसिंचनासाठी मधमाश्या गरजेच्या आहेत. थोडक्यात, मधमाश्यांविना शेतीचा गाडा चालू शकत नाही. पर्यावरणातील नोबेल अशी ख्याती असलेल्या ‘टायलर’ पुरस्काराने सन्मानित डॉ. पवन सुखदेव यांनी ‘‘मधमाश्या परागसिंचन करून आपल्याला अमाप अन्नधान्य मिळवून देतात. याकरता त्या कुठलेही देयक (इनव्हॉइस) पाठवत नाहीत,’’ असं म्हटल्याचा उल्लेख मार्च महिन्यातील याच स्तंभात केला होता.

सध्या जगात परागसिंचन करणाऱ्या मधमाश्यांच्या २५० प्रजाती आहेत. १९७४ च्या तुलनेत त्यांच्या संख्येत ३० टक्क्यांनी घट झाल्यामुळे जगातील कीटकशास्त्रज्ञ व शेतीशास्त्रज्ञ कमालीचे गंभीर झाले आहेत. १९४७ ते २०१७ या काळात अमेरिकेतील मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या ६० लाखांवरून २.५ लाखांवर आली, तर २०१८-१९ मधील हिवाळ्यात ४० टक्के वसाहती नाहीशा झाल्याने अमेरिका हादरून गेली होती. मधमाश्यांच्या अभावामुळे अमेरिकेला दरवर्षी तब्बल १५ अब्ज डॉलरचा फटका बसत आहे असा तेथील शेती खात्याचा अंदाज आहे. या पाश्र्वभूमीवर रानटी गांधीलमाशीचं आगमन हे आक्रमण मानलं गेलं आहे.

सामाजिक जीवशास्त्र या ज्ञानशाखेचे जनक व विख्यात कीटकशास्त्रज्ञ प्रो. एडवर्ड विल्सन हे मधमाशीला ‘मानवजातीसाठी समाजप्रिय कीटकमित्र’ असं संबोधन देतात. एका पोळ्यात सुमारे ५० हजार मधमाश्या असू शकतात. त्यात एक राणी माशी, १२० नर माश्या व १५ ते २० हजार कामकरी माश्या असतात. दोन ते तीन वष्रे आयुष्य असणारी राणी माशी पोळ्यात राहून अंडी घालत असते. पोळे बांधणे, ते स्वच्छ ठेवणे, मृत माश्यांची विल्हेवाट लावणे, फुलांमधून परागकण व मध गोळा करून वरच्या कप्प्यात ठेवणे, संरक्षण करणे अशी विविध प्रकारची कामे कामकरी मधमाश्या करीत असतात. कोणीही आज्ञा देत नसूनही सर्व माश्या नेमलेली कामे नित्यनियमाने करतात, हेच या वसाहतीचं वैशिष्टय़ आहे. मधमाश्यांची गंधसंवेदना ही अतिशय तीक्ष्ण असते. त्यांना पाच किलोमीटर परिसरातील गंध जोखता येतो. पाहणी करून पुरेशी पुष्पसंख्या असल्यास त्या गुंजन व नर्तन करून परिसरातील सहकाऱ्यांना संदेश देतात. त्यानंतर त्या भागात वसाहत वसवली जाते. मुंग्यांचं वारूळ, कोळ्यांचं जाळं, मधमाश्यांचं पोळं या गृहरचनांचा उपयोग वास्तुकलेत व द्रव्य (मटेरियल) निर्मितीसाठी करता येईल का, यावर तिकडे सखोल संशोधन चालू आहे. कला, विज्ञान व समाजविज्ञान या सर्व ज्ञानशाखांचे शास्त्रज्ञ जीवविविधतेच्या खोलात जाऊन नवनवीन निष्कर्ष सादर करीत आहेत. ४० वष्रे मधमाश्यांचा अभ्यास करणारे जीवशास्त्राचे संशोधक प्रो. थॉमस सीले यांचे ‘हनीबी डेमॉक्रसी’ हे पुस्तक मधमाश्यांच्या वर्तनावर सखोल भाष्य करते. त्यात त्यांनी ‘‘मधमाश्यांची वसाहत आणि मानवी मेंदू यांच्या निर्णयप्रक्रियेत खूप साम्य आहे. आपल्या मेंदूतील एकच मज्जातंतू कधीही निर्णय घेत नाही. लाखो मज्जातंतू सामुदायिकरीत्या निर्णय घेतात. मज्जातंतू व मेंदू यांच्यासारखेच मधमाश्या व पोळ्यामधील संबंध असतात. मधमाश्यांचा सतत जीवन-मरणाचा संघर्ष चाललेला असतो. नवीन जागेचा शोध घेऊन त्याच्या योग्यतेविषयी खल करून वसाहत स्थापण्याचे कार्य अखंडपणे चालू राहते. ही सर्व प्रक्रिया सामुदायिकरीत्या व लोकशाही पद्धतीने होते. मधमाश्यांकडून माणसांनी लोकशाही समजून घेणे आवश्यक आहे. मानवजातीचे कल्याण हा आपला सर्वाचा सामायिक उद्देश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मधमाश्यांमधील सहकार जवळून पाहिला तर कोणीही थक्क  होईल,’’ असे म्हटले आहे.

आजमितीला भारतातील १२ पिकांचे उत्पादन हे मधमाश्यांवर अवलंबून असून त्यासाठी किमान ८० लाख मधमाश्या वसाहतींची आवश्यकता आहे. मात्र, सध्या उपलब्ध आहेत केवळ १५ लाख वसाहती! महाराष्ट्रात अंदाजे १३ ते १५ हजार वसाहती आहेत. आणि आपली गरज आहे दोन लाख वसाहतींची! फुलकिडी, पतंग, भुंगे, फुलपाखरे, गांधीलमाश्या हे परागसिंचन करतात, परंतु त्यातील ८० टक्के वाटा हा मधमाश्या उचलत असतात. तर मग कृषी विद्यापीठे व महाविद्यालये तसेच कृषीविज्ञान केंद्रे हे याबाबतीत काय करतात? ‘असून अडचण, नसून खोळंबा’ हे जाणणाऱ्या शेतकऱ्यांना ‘असे’ प्रश्न पडत नाहीत. पण तिकडे नियतकालिके व परिषदा यांच्या जगात मधमाश्यांविषयक नक्कल केलेली माहिती पुरवून शिक्षणतज्ज्ञांच्या जगात फावत असते.

कीटकनाशकांच्या वापरातील वाढ, जंगलविनाश व वृक्षतोड यामुळे जगभरातील मधमाश्यांच्या वसाहतींना जोरदार ओहोटी लागली आहे. त्यात आणखी स्थानिक समस्यांची भर असते ती वेगळीच. मधमाश्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी उंचीवरची जागा शोधावी लागते. शहरांमध्ये वृक्षांच्या खुजीकरणास पसंती वाढत आहे. त्यामुळेही त्यांची संख्या घटत आहे.

लातूरचे दिनकर पाटील हे महाराष्ट्रातील अग्रणी मधुमक्षिकापालक आहेत. शेजारच्या कर्नाटकापासून जम्मू-काश्मीपर्यंत त्यांच्या मधमाश्यांचा संचार चालू असतो. ‘‘मधमाशी शब्दातील ‘मध’ या उल्लेखामुळे सगळा घोटाळा झाला आहे. मधासाठी पोळ्यांचा सर्रास खून सुरू झाला. खरे तर त्यांना परागसिंचक (पोलिनेटर) मक्षिका म्हटले पाहिजे. मध कसा मिळवायचा याचे ज्ञान अत्यल्प लोकांना असते. पोळे राखून मध चाखता येतो, हे भल्याभल्यांना माहीतच नाही. पोळे घेऊन मध विकणे हे विध्वंसक आहे. आपल्याकडे मधमाश्यांची शिकार करूनच मध हस्तगत केला जातो. कायदे व शिक्षण यामुळे प्राणी व पक्षी यांची हत्या बेकायदेशीर ठरली आहे आणि ती गर असल्याचे काही प्रमाणात लोकांनी स्वीकारले आहे. हेच मधमाश्यांबाबत तातडीने होणे अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायतींपासून सर्वच पातळ्यांवर मधमाश्यांच्या उपयोगितेचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. बालपणापासूनच निसर्गाचे ज्ञान मिळाले तरच त्यांना योग्य वेळी मानवजातीच्या सख्यांची महती समजेल.’’

मधासोबत मेण व दंश-औषध पुरविणाऱ्या मधमाश्यांबाबत भारतीय उपेक्षा विलक्षणच आहे.

१९१९ साली जागतिक पातळीवर मध निर्यातदार राष्ट्रांत चीन आघाडीवर होता. त्यानंतर न्यूझीलंड, अर्जेटिना, जर्मनी व युक्रेन यांच्यानंतर आपला सहावा क्रमांक येतो. चीनची निर्यात २३.५ कोटी डॉलर, तर आपली अवघी एक कोटी डॉलर!

भारतामधील मधमाश्यांच्या वसाहतींमध्ये घट होण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करण्याचे श्रेय कोलकाता विद्यापीठातील परागसिंचन अभ्यास केंद्राचे वैज्ञानिक डॉ. पाíथव बसू यांना जाते. त्यांनी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘बायॉलॉजिकल कॉन्झव्‍‌र्हेशन’ या तटस्थ विश्लेषण करणाऱ्या नियतकालिकातील निबंधात ते म्हणतात, ‘‘वैज्ञानिक जगताने संशोधन करताना शेतकऱ्यांना सहभागी करून न घेण्याची परंपरा आम्ही मोडली. तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणत्या जातीच्या मधमाश्या का व किती कमी झाल्या आहेत याची अनमोल माहिती दिली.’’ सध्या भारतात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थान या राज्यांत मधुमक्षिकापालनास प्रोत्साहन मिळते. सफरचंद, डािळब, कांदा उत्पादकांना मधमाश्यांच्या आगमनाने फलधारणा वाढते याची जाण असल्यामुळे ते मधुमक्षिकापेटय़ा ठेवण्यास सांगतात. एका पेटीस ८०० ते १००० रुपये दर असतो. मधमाशी मंडळ, खादी व ग्रामोद्योग आयोग व केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्था काही प्रयत्न करीत असतीलही, परंतु त्यांना केवढी झेप घेता येऊ शकते हे केंद्र सरकारच्या लक्षात येऊन त्यांना त्याकरता पुरेसे पाठबळ मिळेल असा सुदिन येवो. अन्यथा २० मे’ला जागतिक मधमाशी दिन ‘साजरा’ करण्यापुरते त्यांचे अस्तित्व ठरले आहेच. तिकडे युरोपीय देश,अमेरिका व चीनमध्ये मधमाश्या वाचविण्यासाठी फुलझाडे लावण्यापासून मधुमक्षिकापालकांना सुविधा व प्रोत्साहन देण्याचे अनेकविध प्रयत्न केले जात आहेत.

मधाचा विषय निघाला की आपल्या पूर्वजांची कीर्ती भरभरून उगाळताना आयुर्वेदातील मधमाहात्म्य सांगितले जाईल. ‘एका मधमाशीची हत्या हे गोहत्येपेक्षा भीषण कृत्य आहे..’ ही आदिवासी म्हण सांगितली जाईल. ज्ञानेश्वरांचा ‘मधुरसादोशें, मधुकरी जयेचे जैसे’ (मधाच्या रक्षणासाठी मधमाश्या कितीही त्रास सहन करतात.) हा दाखला दिला जाईल. अल्बर्ट आइनस्टाईन यांचे ‘पृथ्वीतलावरील अखेरची मधमाशी नाहीशी झाली तर त्यानंतर मानवजातीचे आयुष्य हे केवळ चार वष्रे एवढेच असेल..’ हे प्रतिपादन आपल्यापुढे फेकले जाईल आणि वर्तमान तिथेच विराम घेईल. त्यामुळे मधमाश्या आणि मध यांच्या वृद्धीसाठी नेमके काय केले जाणार व पुढे कसे, हे काही हाताला लागत नाही.

बंगळुरु येथील ‘अत्री- अशोक ट्रस्ट फॉर इकॉलॉजी अँड द एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेच्या संशोधनातून पश्चिम घाटातील जंगलसफाई करणारे भुंगे व इतर कीटक झपाटय़ाने नष्ट होत आहेत असे लक्षात आले आहे. एकंदरीत जगातून कीटकसृष्टी लयास जात आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणाऱ्या असंतुलनातून रानटी गांधीलमाश्या, कधी टोळधाड, तर कधी विषाणूहल्ला या बाबी आपले जगणे हैराण करत राहणार आहेत. यंदाच्या पर्यावरणदिनी हा ‘करोनाबोध’ घेणे आपल्याला शक्य होईल? या वर्षीचा संदेश विशेष ‘जीवविविधता जपणे’ असा आहे. ती कशी जपावी, तसेच लोकशाही कशी राबवावी, हे शिकण्यासाठी (व पुढील पिढय़ांना दाखविण्यासाठी) मधमाश्यांकडेच पाहावे लागेल. शेती व संस्कृती यांचा अविभाज्य घटक असणाऱ्या मधुमक्षिकांचे रक्षण हे आपले आद्यकर्तव्य मानले तरच मानवजातीचे आदिम खाद्य अक्षय राहू शकेल. अन्यथा आपली यात्रा ही ज्ञानेश्वरांच्याच ‘काटय़ाच्या अणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड, एक वसेचि ना’ या कूट अभंगातील ‘फळेचि ना!’ या दिशेने होईल. आपली वसुंधरा भा. रा. तांबे यांच्या शब्दांत आपल्याला सुनावेल- ‘मधु मागशि माझ्या सख्या परी, मधुघटचि रिकामे पडती घरी.’