|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

तिन्हीसांज उलटल्यावर तीरमीर आल्यागत तो निघत असे. जाण्यासारखं एकही ठिकाण नव्हतं, तरी हमखास याच वेळी तो आठवल्याप्रमाणे चालू लागे. चालण्यापुरती जागा मिळवण्यासाठी हल्ली फार सायास पडत. कर्कश कर्णे वाजवणाऱ्या वाहनांतून रस्त्यावर दाटी करून बसून राहिलेली माणसं त्याला खुळी वाटत. या वेळी आजकाल बऱ्याचदा रस्त्यावरची ही पंगत दृष्टीस पडे. त्याच्या खोलीपासूनचा सगळ्यात जवळचा हा रस्ता हल्लीच असा लेकुरवाळा दिसू लागला होता. त्यानं आठवलंच असतं, तर पत्ता विचारायलाही माणूस न सापडण्याचे दिवस त्याला सहजी आठवले असते. पण आठवणींचा पोत जाळत गहिवर काढण्याचा माणूसगुण नव्हताच त्याच्याकडे. तो दिसणारं दृश्य पाही. कधी कधी दिसत्या दृश्यानं त्याला हसू फुटायचं. ही हसण्याची अन् चालण्याची खूण सोडता त्याच्या त्या शहरात, त्या खोलीत जिवंत असण्याच्या भ्रमाला इतर पुरावे नव्हते. खोली इमारतीच्या जिन्याच्या खोबणीत दाबून कोंबलेली ओलसर अंधारी गर्ता होती. तिच्या एका लाकडी भिंतीपलीकडून शेजारच्या आवारातल्या विलायती कुत्र्याचं गुरगुरणं, भुंकणं सोबत देई. कुत्रा भुंकला की त्याला हसू येई. कुत्र्यानं नुसतं भुंकू नये तर लचका तोडावा; अन् नसेल तसं करता येत, तर उगी राहावं असं मालक कुत्र्याला सांगताना त्यानं कित्येकदा ऐकलं होतं. माणसं मूर्ख असण्याचं अस्सल उदाहरण म्हणून त्यानं कुत्र्याच्या मालकाकडे नि:शंक बोट दाखवलं असतं.

खूपच उन्हाळा अन् दुष्काळ असलेल्या लांबच्या गावाहून आलेल्या लोंढय़ातला एक इमारतीच्या राखणीकरता नांदत होता. त्याचा सगळा संसारपसारा एका तिरप्या खाटेखाली दडपून तो त्यावर निजत असे. रात्री निजलेला आढळल्यास अंगावर पाणी टाकण्याची धमकी त्याला एका घरमालकानं देऊन ठेवली होती. मग कधी झोप अनावर झाली असता- टाकून देण्याकरिता देण्यात आलेलं, पण यानं टाकून न दिलेलं – फुटक्या काचेचं हेल्मेट घालून राखणदार झोपी जाई. राखणदाराच्या केविलवाण्या मूर्खपणाचं मात्र त्याला हसू येत नसे. तरीही राखणदारानं बोलून सलगी वाढवण्याचे केलेले सगळे ओशाळवाणे प्रयत्न त्यानं निर्धारानं हाणून पाडले होते. नसता मूर्खपणा! ओळखी, नाती, मैत्री.. सगळाच! फेकू पाहता झुळुकीसरशी अंगाशी लटकणारी गुंतवळ.

खिडकी पाडलेल्या लाकडी भिंतीतून तिरप्या रेषेत वरच्या बाजूला समोरच्या इमारतीतल्या घराची एक स्वच्छ खोली दिसे. तिच्या खिडकीच्या गजांना धरून एक लहानगी पोरगी तिच्या आजी-आजोबांच्या पाठीवर आळीपाळीनं पाय देताना दिसली, की विनाकारण तो हरखून जाई. त्या पोरीच्या किलबिल आवाजात गायलेल्या गाण्यांनी गजबज उकाडा शिंपणाऱ्या उन्हाचं निळं चांदणं होई. मग त्या ओलाव्याची साय मनावर पसरायच्या आत तो निघे. एक-दोनदाच दिसलेलं ते दृश्य. ते केवळ दिसून संपलं नव्हतं, तर हटवादीपणानं आठवण बनू लागलं होतं. आठवणी निर्थक असतात. बांधून टाकतात उगाच. परस्पर ठरवत जातात मी कोण आहे ते.

चालायला लागलं की दृश्यं दिसतात. पुढे चालत राहिलं, की बदलत राहतात. चालायला जागा हवी मात्र. या शहराचंही इतर शहरांसारखं चालणाऱ्यांशी जमेनासं झालं होतं. मात्र धक्के सहन करीत पुढे जाणाऱ्याला शहर आपल्यात मुरवून घेत असे. त्याला गर्दीचा फायदा ठाऊक होता. अस्तित्वाचे सगळेच संदर्भ गर्दीत हरवून जात. मोकळं वाटे. ओळख निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन अनेकांनी शहरात गर्दी केली होती. त्यामुळे लोंढय़ातून पार होताना त्या चिकट आशाळभूतपणाची लागण होण्याचा धोका रोज धाक घालीत असे. पण दृश्यं वाढत अन् बदलत राहत. त्यात हरवून पाऊल पुढे टाकलं असता भीतीही स्वप्नांप्रमाणेच निर्थक बनून जाई. नकोच वाटायला कुणाला कुतूहल आपल्याबद्दल आणि कळूच नये कुणाला माझा श्वास. लपून राहावे अदृश्यागत! खुट्ट निमित्ताने गर्दी भांडते, आरडते, मागे पळते अन् एकटं पाडते. अशा अनेक एकटय़ांनीच तर बनवलीय ही गर्दी. जशी गर्दीच्या एकत्रित स्वप्नांची भीती वाटते, तशी गर्दीत एकटं पडण्याचीही अपार भीती वाटते. हरवून जाणं हा एकच उपाय. त्याकरिता त्यानं सायास करणं चालूच ठेवलं होतं. पण अजूनही विचार करता करता तार लागते. त्यातून कल्पना आणि संदर्भ येतात, मग ठेचकाळायला होतं.

कार्यकारणभावाचं नसतं कुभांड भरवतात लहानपणीच डोक्यात. त्या खिडकीतल्या बाहुलीला जपायला हवं. स्वत:लाही जपायला हवं. चालत राहायला हवं. अनेकदा बरोबर चालू लागलेल्या विचारबीजाची धावगती सरस होऊन ठरवलेलं काम पार पडत नसे. मग तो परत फिरे. चाल मंदावत दृश्यं समग्रतेनं पाहत अवेळी खोलीकडे येत असे. या वेळचं इथलं दृश्य एकसारखं दिसे. आडनिड चौकोनी प्रकाशतुकडय़ातून निरनिराळे आवाज स्रवत असत. तिरप्या खाटेवरला राखणदार हातातल्या चौकोनी प्रकाशाकडे दंग होऊन पाहत असे. अशा वेळी त्याच्याकडून राखणीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं असे. त्याच्या अस्तित्वाची कोणतीही दखल न घेणारा असा राखणदार त्याला आवडत असे. त्यानंही तळहातीच्या चौकोनी प्रकाशात पाहत दिवसच्या दिवस काढून पाहिले होते. सजीव ते निर्जीव या दीर्घ कंटाळवाण्या प्रवासाचा एक मोठा तुकडा अशा निर्थक गोष्टींमुळे संपून जातो ही मोठीच उपलब्धी!

सततच्या अर्थशोधानं थकून वा कंटाळूनच बहुधा माणसांनी घाऊकरीत्या हे वर्तणूकबदल केले असावेत. तळहातीच्या, भिंतीवरच्या, मेजावरच्या चौकोनी, आयताकृती प्रकाशाकडे पाहत राहण्यानं काळ सरतो. अर्थ न लागता सरलेला काळ म्हणजेच तर जगणं. पण राखणदार निर्मळ हसतो. खिडकीतली बाहुली आनंदानं गाते, नाचते. उत्तररात्री एकटाच जागा असता अनोळखी पक्षी जवळच्या झाडावरून त्याचं आर्त सांगतो. या सगळ्यात जाणवण्याइतकी खेच असते. या सगळ्याशी नातं बांधायला हवं असं वाटायला लावणारी खेच. तिचा त्रास होतो. केवळ चालण्यानं सगळे प्रश्न सुटणार नाहीत. किंवा सुटतीलही, जर या साऱ्यातील निव्र्याजता मिळाली तर. ही मनसोक्त दारू प्यायची वेळ. घरामागच्या आडात भर मध्यरात्री उडी घ्यायची उबळ येण्याची वेळ. भगभगीत मातीत पाऊल पोळत करपून जायची आणि अनिवार वासनातृप्तीची अशी ही वेळ. अशा विशिष्ट वेळांच्या विरामचिन्हांमुळेच काळभाषा वाचण्याचा क्षीण प्रयत्न करता येतो. गर्दीनं घडवलेल्या तथाकथित सामाजिक वा राजकीय घटनांच्या उकीरडय़ांनी कालरेषा सजवण्याचे मूर्ख चाळे माणसांनी बंद करावे. त्यातून तयार होणाऱ्या परंपरा अन् रीतीच्या जन्मखुणांनी माझं अस्तित्व डागाळतं आहे. माझ्या आपसूक असण्याला खिडकीतल्या बाहुलीच्या आनंदगाण्यातला निर्मळ स्वर हवा, अवेळी आर्त सांगणाऱ्या पक्ष्याची तीव्रता हवी, भग्न भवताल मागे टाकून पळालेल्या राखणदाराची भाबडी आस हवी.

दारूची बाटली लवंडताच होणाऱ्या आवाजानं स्थिर शांततेला चरे पडतात. मग इशाऱ्याची वाट पाहत असल्यागत पाखरं गाऊ  लागतात, दूधवाले, पेपरवाले ओरडू लागतात अन् आवाज गर्दी करू लागतात. याच वेळी ती बाहुली शाळेत जायला निघे. आजी-आजोबांसवे लडीवाळ खटय़ाळपणा करीत छोकरी उडय़ा मारीत इमारतीपुढे येई. हे दृश्य पाहायला खोलीबाहेर राखणदाराच्या खाटेपाशी जावं लागे. त्याच्या भर्र पेटलेल्या स्टोव्हच्या आवाजानं बाहुलीचे बोल तुटक ऐकू येत. शाळेत न्यायला आलेल्या रिक्षामध्ये बसून ती निघून जाई. त्या दिशेला पाहत आजी-आजोबा काही वेळ पुतळ्यागत उभे राहत. मग दारी पडलेला पारिजातकाचा सडा हळूवार टिपू लागत.

‘‘हे तुमचं आलंय बरं का काल. रात्री वाट पाह्य़ली बराच वेळ पन तुमी आले नाई. मंग झोपी गेलो,’’ राखणदारानं पत्र हाती देत म्हटलं.

‘नोकरीचं काही जमतंय का? नसल्यास उगाच जीवाला घोर लावून दूर राहू नकोस. घरी ये. इथं गावातच जमवू काहीतरी दुकान. ओळखी आहेत. आधार आहे. नाही म्हणायला घरचे दोन घास कुठे जात नाहीत. आजोबांनी घेतलेली थोडी जमीन उरली आहे. ती विकून भांडवल येईल..’ वगैरे वगैरे नेहमीचीच गिचमिड वाचून आलेल्या तिरमिरीनं लाल डोळ्यांतली उरलीसुरली झोप उडवून लावली.

‘‘चा घेनार का?’’ ओशाळं हसत राखणदारानं कप पुढे केला.

बसावं त्याच्यापाशी अन् रडावं भोकाड पसरून असं वाटत असतानाच तो चालू लागला. रस्त्यावर पंगत अजून बसायची होती. चालायला खूप मोकळी जागा होती. त्याच्या निरुद्देश निर्थक अस्तित्वाला आपल्या अनुपस्थितीनं एकटं पाडत घराघरांत गर्दी सजत होती.. बाहेर पडण्याकरिता. हा काळ त्यानं निभावून न्यावा अन् राहावं तगून. बाहुलीच्या गाण्याला, पक्ष्याच्या आर्ततेला अन् राखणदाराच्या अश्रापी गजबजीला अन्यथा अर्थ उरणार नाही.

girishkulkarni1@gmail.com