|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

नियमितता सिद्ध करणारे ऋतुबदल मी पाहिले आहेत. तीच नियमितता हरवून दिल्या पशागत खोटा ठरलेला पावसाळाही मीच अनुभवतो आहे. बालपणीचा पाऊस खुळा होता माझ्यागत. तो कुणा कवीच्या ‘नेमेचि येतो मग पावसाळा’सारख्या ओळी सिद्ध करायला जसा येई, तसा बालगीतातून खोटा पसा देऊन खटय़ाळकी करणाऱ्या लहानग्यांना रिझवायलाही येई. मानपानाचा हट्ट न करता निमूट दिली टावेल- टोपी घालून पाहुण्यांशी भेटाभेट करायला गरीब जावयागत आनंदानं सजून येई. अनेक बालगीतांनी ज्याच्याबद्दल कुतूहल तयार केलं तो भविष्यकाळ निरनिराळे रंगीत झगे घालून वर्तमानाचं रूप घेऊन आला. त्यानं काही कुतूहलं शमवली. मात्र, शेवटी कुतूहल जागवणारी निरागसताच संपवली. माणसाच्या एकूण कहाणीची अपरिहार्यता सांगणारं हे ‘मोठं होणं’ पावसाळा पाहत पाहतच साकारलं. या प्रवासात अन्य अन्य मिळवलं, पाहिलं, अनुभवलं, भोगलं आणि अन्य अन्य हरवलं. पावसाळा ही त्यातली एक हरवलेली गोष्ट. म्हणजे पाऊस पडतो अजूनही; अन् त्यावरच्या जुन्याच कवितांचे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. पण हमखास पाऊस पडण्याचा काळ म्हणून जो पावसाळा होता तो हरवला. मग कुणी म्हटलं की, नव्या काळाचे नवे ऋतू असावेत, नवी रीत असावी. तेही बरोबरच म्हणत आम्ही सगळ्यांनी हे नवे ऋतुमान भोगायला सुरुवात केली. हे नवे ऋतुमान एककल्ली, आत्मरत, अविवेकी अन्असंस्कृत आहे. साहजिकच नव्या कविता स्रवत नाहीत. आत्म्याचा कोरडेपणा प्रक्षुब्ध अन् बुभुक्षित. गणेश गायतोंडेसारखा. स्वत:सह सगळ्यांनाच ‘मीच परमेश्वर आहे’ हे म्हणायला लावणारा. त्याचं नायकत्व स्वीकारलेली गोष्ट गुंगवून टाकणारी. या बदलत्या ऋतुमानानंही ‘बिंज वॉच’ केलेत की काय सेक्रेड गेम्सचे ऋतू, असा प्रश्न पडावा इतका सर्वत्र दुष्काळ! पवित्र खेळ म्हणत अश्रापांचे बळी द्यायची प्रथा प्रस्थापित करणारी ही कथानकं कशी आवडू लागली मला? कसा भाग झालो मी या कहाणीचा? या माझ्या प्रक्षुब्ध, बुभुक्षित होण्यानं हरवला का पावसाळा? कुणास ठाऊक! मी खोटा पसा देताना मला खरं-खोटं कळत नव्हतं. पावसाळ्याला मात्र ते नक्की कळत असणार. तोच तर ठरवतो माणसाचं शहाणपण! मग तो कसा चुकला माझी पारख करायला? का निरपराध्याला शिक्षा करण्याचा गायतोंडे बाणा अंगीकारला त्यानं? कसं पाहिलं असेल त्यानं नेटफ्लिक्स? त्याला काय करायचंय म्हणा सबस्क्रिप्शन? आमचं सगळंच तर हल्ली ढगात असतं. मग त्यानं पाहिली ढगातून इकडून तिकडे पाठविली जाणारी चित्रं- तर त्यात नवल कसलं? पण म्हणून इतकं गुंगून जायचं माणसासारखं? ढगांच्या मऊ मुलायम गाद्यागिरद्या तशाच रंगीत अन् मखमली राहिल्या असाव्यात, जशा त्या बालपणी होत्या. फोटो काढून इन्संटून पाहा; खात्री पटेल. म्हणजे आभाळ तेच आहे,  ढगही तेच आहेत, तर पावसाळाही असणारच! जर नेटफ्लिक्स नसतं तर आला असता का नेमाने? उगाच जर-तरच्या रानात हरवायचं काम नाही. नेटफ्लिक्स यायच्या आधीच त्यानं चुकारपणा चालू केला होता. नेटफ्लिक्स आल्यावर त्याच्या चुकारपणाला कारण मिळालं असेल असं म्हणू फार तर.

अर्थात कारणं काहीही असोत; पावसाळा हरवला तो अलीकडेच. मला लक्षात यायला उशीर झाला, कारण मी ते सेक्रेड गेमचे ऋतू पाहण्यात, त्या कथेतलं पात्र होण्यात रमलो होतो. मात्र, काहींच्या ते बरंच आधी लक्षात आलं. मातीत राबणारे अन् घाम गाळणारे दोन हाताचे काही जण स्वत:लाच गॉड समजण्याच्या गुंगीत नव्हते. नेटफ्लिक्सचा विकास अजून त्या बिचाऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता. म्हणजे साधनं पोहोचली होती, पण बिंज वॉच करण्याची सांस्कृतिक ठेवण अजून पडायची होती. एकापरीनं भारतात विकास शहरांत अन् सावकाश होतो हे बरंच म्हणायचं. त्यामुळेच तर ही नव्या ऋतूची नवी संस्कृती न अंगीकारलेली माणसं तो हरवलेला पावसाळा शोधायच्या कामी लागली.

रमून गेली त्याच्या स्वागताच्या पूर्वतयारीत. कुणी डोंगरातनं नक्षी काढली. कुणी येऊन माळ शृंगारले. मग काही ठिकाणी पाऊस आला. झाल्या स्वागतानं अगदी भारावून जात त्यानं आल्या गावात मुक्काम ठोकत पावसाळा अवतरविला. हे भाग्य सगळ्याच राबणाऱ्यांच्या नशिबी नव्हतं. लक्षात नसल्यासारखा पाऊस अनेक गावांत पडलाच नाही. आणि काही ठिकाणी इतका पडला, की जणू गुरुजींची लाल गोळी दाताखाली चावली आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’चा मंत्रजप करणारे ‘गुरुजी’ हे सेक्रेड गेमच्या प्रलयकारी खेळाचे सूत्रधार पात्र. ‘मीच ब्रह्मा, सृष्टीकर्ता’ असं तत्त्वचिंतन सर्वामुखी करणारे अवलिया. त्यांना मानवी दु:ख साहवेना म्हणून त्यांनी नांदत्या सृष्टीचा बीमोड करून नवी सृष्टी निर्माण करण्याचा चंग बांधलेला. त्यांच्या विचारांची, गुणांची एकच भूल सगळीकडे. पावसाळा हरवल्यानंतर आलेल्या दिवसांनी जणू गुरुजींचा विचार असल्यागत कोरडेपणा सर्वत्र पसरवला. पावसाळ्यानंही गणेश गायतोंडेगत समुद्रात अडकून पडण्यात धन्यता मानली. शोधा म्हणाला किती शोधायचंय ते. नाहीच सापडणार. अन् तरीही ज्यांच्या ठायी कुतूहल होतं लहानपणीच्या लपंडावाचं, ते शोधत राहिले पावसाळ्याला. ज्यांना सापडला होता त्यांच्याकडून प्रेरणा घेत राहिले शोधाची. बरोबरच होतं त्यांचं. दुसरा ट्रॅक सरताजचा होताच ना सेक्रेड गेम्समध्ये. प्रामाणिक, संवेदनशील पोलीस अधिकारी! लेखकाच्या कल्पनेतच शोभावं असं हे पात्र कर्तव्यदक्षतेनं हरवलेल्या बापाची, सहकाऱ्याची आठवण ठेवत, सृष्टी टिकवून धरण्याची जिकीर करत राहतं.

असेच काही सरताज म्हणजे खरोखरी डोईवर घेऊन नाचवावे असे कर्मवीर- या नुकत्या सरलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या चारच दिवस आधी आमच्या या पुण्यात जमले होते. हेच ते दोन हातांनी पावसाळा शोधणारे, सुसंस्कृत ऋतूची वाट पाहणारे. कुणा गुरुजीच्या नादी न लागता दोन हातांच्या कष्टातच साफल्य शोधणारे. सृष्टीचा विनाश, लय टाळू पाहणारे हजारो सरताज! त्यांनीही खेळच मांडला होता गेली चार वर्ष सातत्यानं ‘वॉटर कप’ नावाचा खेळ खेळत. त्यांनी ‘अहं ब्रह्मास्मि’चा सकारात्मक अर्थ लावत ‘पाणी मीच देणार’ असं घोषवाक्य निवडलं होतं. मी परमेश्वर नाही. मात्र, परमेश्वराला साध्य नसलेली कष्ट करण्याची कला मला अवगत आहे. तिच्या जोरावर गुरुजींचा प्रलयाचा पवित्र खेळ मी थांबवेन. काळ्या मातीत राबून या दुष्काळाचं ऋण फेडेन अन् करुणेनंच ज्याचं देवत्व साकारतं असा माणूस बनेन. देईन अभय घरच्या स्त्रीला, दारच्या चिमणीला, अंगणातल्या वेलीला, गावातल्या पिंपळाला, रानातल्या हिरव्या गर्दीला. नाही जाणार परमेश्वर शोधत कुठल्या शीतगुपीत आश्रमात वा सुवर्णाकित मंदिरात. मात्र, माझ्या कष्टानं पंचमहाभूतांची पूजा बांधेन. त्याकरता माझ्या जनुकातल्या पूर्वजांच्या भलेपणाची ओळख पुरेशी आहे.

अव्यक्त स्वगत मनी धरून जमलेले ते हजारो सरताज पाहायला मी गेलो होतो. मी त्यांच्याही खेळाचा भाग होतो. मी इकडेही होतो अन् तिकडेही. उत्पत्ती अन् लय दोन्ही निपजणाऱ्या नुक्लियसगत माझ्यात सारंच उफाळून येत होतं. चारच दिवसांनी हमखास येणाऱ्या सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या ऋतूची उत्कंठा जशी; तशी या जमलेल्या हजारो भाबडय़ांच्या रखरखीत कष्टांतून मनभर पाझरणारी माणुसकीची ओलही. आमच्या या खेळाचे लेखक सत्या, आमीर, किरण सगळ्यांचा आपुलकीनं सत्कार करीत होते. स्वत:चं अधिकारपण बाजूला ठेवून काटेकरच्या घरी जाणाऱ्या सरताजसारखंच हे अवधान. गेली चार वर्ष मी हे अनुभवतोय. इथे डोळ्यात आसवं यायला अभिनय करावा लागत नाही. एकेका गावाचं कर्तृत्व पाहत, ऐकत राहावं, बिंज वॉच करीत राहावं असं वाटतं. अन् ही काही केवळ चित्रं नव्हेत, ही अगदीच माणसं आहेत. उष्ण रक्ताची, हाडामांसाची.

मला होणारी उपरती पावसाळ्याला का बरं होत नसेल? चित्रांच्या खेळापेक्षा हजारपटीनं भव्य खेळ मांडलेल्या महाराष्ट्रात त्यानं का बरं येऊ नये नेमानं? यंदा तर चार हजाराहून अधिक गावांनी काम केलं. नववधूगत भुई सारी सजवली, तरी तू येईनास. मधेच त्या गायतोंडेगत सांगली- कोल्हापुरात हिंसेचा वर्षांव करून गेलास. गडय़ा, तू जुनी ओळख विसरू नकोस. या चित्रातून सांगितली जाणारी गोष्ट अन् गोष्टीतून लागणारी आमची ओळख अपुरी अन् एकसुरी आहे. आम्ही  बदललो आहोत मान्य; पण जुन्या चुकांचा शोधही घेत आहोत. जागे होतो आहोत. एकमेकाला जागे करीत आहोत. कदाचित तुझ्यापर्यंत आमच्या या वॉटर कपची माहिती आमच्या माध्यमांनी पोहोचवली नसेल. आमच्या या मातीतल्या खेळात माध्यमांना चकचकीतपणा न सापडल्यानं त्यांनी पाठ फिरवली असेल. पण तू तर ढगातच बसलायस. दिसतच असेल की सारं तिथून. एव्हाना झाला असेल दुसरा सीझन पाहून तर आमच्याही खेळात सामील होऊन त्याला पवित्र कर.

कमी असले तरी आमच्यातही सरताज तयार होत आहेत. आम्ही कष्टाचा हा छाप साऱ्या भुईवर चितारून तिला नांदतीच ठेवू. पुढल्या वर्षीपासून या भुईवरचं हरेक हिरवं पातं, बांधावरचं झुडूप अन् वेशीवरचं जंगल जिवंत करू. श्रमांच्या या वारीची परंपरा आता जलसंधारणासोबत गवत, झाड, जंगल अन् माणूसपणाच्या नव्या दिंडय़ांतून पुढे नेली जाईल. आम्ही किती राबलो हा मुद्दा नसून आम्ही राबते, पेरते झालोय हे तुला सांगण्याचा प्रयत्न आहे. या भुईवर जन्मलेली सारी तुझी लेकरं वाट पाहत असताना गायतोंडेगत अवसान गाळून कलेवर टाकू नकोस.

पण हे सारं तुला सांगण्याचा, बोल लावण्याचा अधिकार माझ्यापाशी उरलेलाच नाही कदाचित. दोन्ही गोष्टींत मी पात्र साकारतो आहे. पवित्र खेळात माझ्या ‘मी’पणाला नवी ओळख मिळते आहे, तर वॉटर कपच्या खेळात माझा ‘मी’पणा कापरागत उडून जातो आहे. या शहरी अस्तित्वाच्या हातघाईत मी तुझी उत्कंठेनं वाट पाहणं विसरून गेलो. ऋतू कोरडे कृतघ्न झाले, कारण मी माझं माणूसपण खुडून काढायला निघालो. या भुईवर काही उगवून आणण्याचं अवसान नसताना बेधुंद विध्वंस करीत राहिलो. गायतोंडे बनणं भुरळ पाडत राहिलं. मात्र आता आंगठे कापून नवे सरताज सृष्टीसंवर्धनाची कला एकलव्याच्या एकाग्रतेनं शिकू पाहत आहेत. अजूनही एक पावसाळी महिना उरलाय. शक्य झालं तर या दख्खनी पठारावर ये. सोलापूर, नगरमार्गे औरंगाबाद, जालना, बीड करत मराठवाडा भिजवून विदर्भाची तहान भागव. पुसद, वाशीम, अकोल्यात गावं, शिवारं भिजव. माझ्या दृष्टीला बांध आहेत. मला सगळं दिसत नाही. माझ्या पुणेरी दिवाणखान्यात बसून चुकून तुला अपशब्द बोललो असेन. सेक्रेड गेम्सच्या पात्राची भूल थोडी उरली असेल; पण तू एवढी बार माफ करून उदार हो. तुझी वाट पाहत मी जागा असेन. सभ्य, सुसंस्कृत, निर्माणरत होण्याची माझी इच्छा आहे.  स्वत:पलीकडे पाहायची माझी इच्छा आहे. मी केलेल्या लयानंतरची क्लांतता संपवून मी कामाला लागलो आहे. पसा खोटा आहे, हे मला कळलं आहे. आता तुला फसवणार नाही. तुझा अवमान करणार नाही. सोलापुरात आलास तर बार्शी तालुक्यातल्या सुर्डीला नक्की थांब. सुर्डीकरांनी  शिकस्त केलीये तुझ्या स्वागताची. त्यांनी यंदाचा वॉटर कप जिंकलाय. तूही मुक्तहस्ते त्यांची ओटी आनंदानं भर. जलओहोळाच्या खळखळाटात नाचत मग लेकरं माणसाची निरागसता टिकवणारं नवं बालगीत गातील..

ये रे ये रे पावसा,

तुला दिला पस असा

पस फुलविला कष्टानं

गाऊ पावसाचं गाणं!!

girishkulkarni1@gmail.com