09 August 2020

News Flash

बेलसरची लढाई

‘‘सांगा की तुम्ही, काय करायचंय? कुठं बसायचंय? लगेच येतो.. हॅ हॅ हॅ हॅ हॅ.’’

|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

 

‘‘१ मे रोजी काय करताय?’’

‘‘सांगा की तुम्ही, काय करायचंय? कुठं बसायचंय? लगेच येतो.. हॅ हॅ हॅ हॅ हॅ.’’

‘‘नाही नाही, तसलं काही नाही, महाश्रमदान करायला जायचंय.’’

‘‘च्यायला! हे काय काढलं नवीन?’’

‘‘अहो, जुनंच आहे. गेली तीन वर्ष चालू आहे. तुम्ही टीव्हीवर कार्यक्रम पाहिला नाही का?’’

‘‘नाही. ते टीव्हीचा रिमोट आमच्या हातात नसतो ना.. हॅ हॅ हॅ हॅ हॅ.’’

‘‘आमिर खान आणि किरण राव करतात बघा तो कार्यक्रम.. तुफान आलंया.. तुमच्या मिसेसही पाहात असतीलच की?’’

‘‘मिसेसला डिश्टब केलं तर तुफान येतंया. काय काय बघती आपण विचारत नाही. जगात शांतता नाही, निदान घरात तरी टिकू द्या.. हॅ हॅ हॅ हॅ हॅ.’’

असे अनेक हसतमुख, आज्ञाधारक, चाकरमानी, उच्चविद्याविभूषित, सार्वजनिक माध्यम चव्हाटे गाजवणारे, देश-परदेश हिंडणारे, फक्त सिंगल माल्ट पिणारे, दर शनिवारी सिंहगड चढणारे, मुलं परदेशात असलेले, मुलं देशात आली असल्यानं तिरुपतीला निघालेले, इंग्रजी चॅनेलवरच्या भांडाभांडय़ा आवाज मोठा करून ऐकणारे, नुकताच मोठ्ठा फ्लॅट स्वस्तात बूक केलेले, नवं बार कॅबिनेट विकत आणलेले, ‘मृत्युंजय’ कादंबरी अठ्ठावीस वेळा वाचलेले, वाचताच येत नसलेले.. सगळे. सगळ्यांना गाठून मी १ मेचं नियोजन विचारीत होतो. कामामुळे सतत प्रवास करणाऱ्यांच्या यादीत मीही नोंदला गेलो होतो आणि त्यामुळे बराचसा संवाद यंत्राद्वारे होत होता. त्यामुळे समोरच्याला आपली नक्की काय ओळख पटली आहे, याचाही अंदाज येत होता. कुणाला मी ‘बसायची’ आवड असलेला, तर कुणाला अतिशहाणा, नसत्या उचापत्या करणारा आदी वाटत होतो. काही लोक आचरट समजत असावेत मला; कारण ते हॅ हॅ हॅ हॅ हॅ चा ईमोजी लिहून मगच पुढे संवाद लिहीत असत. बरं, यंत्रातल्या चित्रलिप्यांचे अर्थ हा व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित असल्याचा पुरावाच असल्यागत जो तो वेगवेगळा लावणार आणि ते करताना रिमोट हाती नसल्याचं रडगाणंही गाणार. ‘या समाजात स्वार्थरहित सामाजिक कामं करणं अत्यंत अवघड आहे’ वगैरे वाक्यं मी घरातल्या घरात आणि एकांतात पुटपुटू लागलो होतो. विद्यार्थीदशेतला कुणी आलाच समोर, तर –

‘‘कसं केलं असेल शिवाजी महाराजांनी वा महात्मा फुल्यांनी?.. कसा काय गांधीजी गोळा करत असत आलम देश!’’

‘‘ते ग्रेट होते.’’ असं फट्कन तो विद्यार्थी सांगे अन् शेवटचं शिसाळं अगदी आतल्या रिंगणात घालण्याचा मार्ग दाखवी; आडवळणानं सांगू पाही की, ‘बाबा रे, तू कशाला नको ती कामं अंगावर घेतोस आणि पुन्हा जमत नाही म्हणून रडगाणं गातोस? इथं नेटफ्लिक्स अन् अमेझॉन आल्यापासून वेळ कुठं उरलाय आम्हा तरुणांना? बिंज वॉच करून जागेपणीच स्वप्नं पडायला लागतात परदेशात जायची. त्याकरिता आम्ही भाषा, संगीत, पोशाख, मीम्स, फूड सगळ्याची प्रिपरेशन्स करीत असतो. त्यात तू रुरल इंडियाच्या कुठल्या कहाण्या सांगतोस. बोअरच होणार त्या. इथं भारतातली प्रत्येक वेब सीरिज एक तर शिव्या द्यायला शिकवतेय किंवा गोळ्या झाडत सेक्स करायला. जो तो पंडित आहे अन् हरहुशार कॅलिफोर्नियात. आता श्रमदान वगैरे ओल्ड स्कूल झालंय डूड!’

खरं सांगतो, हे सगळं असं ऐकत होतो मी. का? तर, गेल्या वर्षी पुण्यातल्या अडीचशे जणांना महाश्रमदानाला घेऊन गेलो होतो. खूपच हुरूप अन् ऊर्जा मिळाली होती तेव्हा. मी मोठय़ा फुशारकीनं पुढच्या वर्षी हजार माणसं नेण्याचा विडा उचलला होता. आणि या वर्षी त्या संकल्पाला हजार जळवा लागल्यागत उत्साहाचा क्षय होत होता. एका वर्षांत जग बदलतं असा व्हॉट्सअ‍ॅप निरोप नुकताच आला होता; काही मार्ग सापडतोय का, हे पाहण्याकरता व्हॉट्सअ‍ॅप बॅकअपही चाळून पाहिला. अनेक भरवशाच्या मंडळींच्या जेन्युइन अडचणी निघाल्या. माझी स्वतचीही अडचण होतीच की. कितीही सांगितलं असलं, तरी ऐनवेळी शूटिंग लावलं जाणार नाही याची खात्री बिलकूल नव्हती. कदाचित त्यामुळेही माझ्या आवाहनात जोर नव्हता. मग ठरवलं आणि निर्मात्या परकीय कंपनीच्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगितलं की, मी आधी सांगितल्याप्रमाणे २९ तारखेला भारतात जाणार आहे. बरं परदेशात चित्रीकरण चालू असल्यानं परस्वाधीन मामला. पण सुदैवानं फार अडचणी न येता परत आलो.

मी नसताना हेमंत आगरकर नावाच्या माझ्या बालमित्रानं मात्र एकाकी किल्ला लढवत ठेवला होता. संयमानं माणसं गोळा करीत त्यांचा गट बनविला होता. अनेकांना १ मे तारीख सोयीची नसते, म्हणून ८ एप्रिल ते २२ मे या ‘वॉटरकप स्पर्धे’च्या ४५  दिवसांच्या कालावधीतल्या प्रत्येक शनिवारी अन् रविवारी श्रमदानाला जाण्याची परवानगी त्यानं पाणी फाऊंडेशनकडून मिळवली. आता कुणालाच पळवाट उरली नाही. मग तालिका बनवल्या, बस ठरवल्या, बसचे मार्ग आखले, हातमोजे आणले, वर्गणी गोळा केली आणि स्वत:ची नोकरी सांभाळून रात्रीचा दिवस करीत ४०० माणसं तयार केली.

मी येताच मला आदल्या दिवशी स्वत:च्या कंपनीत घेऊन गेला. मला म्हटला, कर जरा आवाहन. मग मीही ठोकली दोन भाषणं. तळमळीनं. अनेकांना पाणी फाऊंडेशन, वॉटरकप स्पर्धा, महाराष्ट्रातला दुष्काळ या कशाचीही सुतराम गंधवार्ता नव्हती. ज्यांना होती, त्यांनीही गांभीर्याने त्या माहितीची दखल घेतली नव्हती. आजच्या काळात हरघडी एक नवं आभासी जग तयार होतं. गुरफटून टाकतं तुम्हाला स्वतत. कधी आचरट राजकीय वादविवादातून वा एखाद्या चित्रपटाच्या, मालिकेच्या तपशिलांतून अशी बुडबुडय़ांची विश्वं तयार होत राहतात. प्रेझेंटमध्ये राहण्याच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यात रममाण होतो. पण एखादा गंभीर विषय मात्र थेट बीनमध्ये जातो. मी ज्याला महत्त्वाचं मानतो, त्याहून महत्त्वाचंही काही असू शकतं याचा मला विसर पडतो. मला तसंच वाटत होतं. समोर अनेक निर्विकार चेहरे पाहून. कदाचित आणिक महत्त्वाचं काही असेल, व्यक्तिगत असेल, कदाचित सामाजिकही असेल. तुझ्याबरोबर यावं असं तुला एकटय़ाला वाटून उपयोग नाही. तुझी सोबत हवीशी वाटायला हवी. माणसात गेलं की अनेक दर्शनं घडतात. स्वतची, स्वतच्या उणिवांची.

पण सुदैवानं हेमंतानं आधीच सगळी रानं तयार करून ठेवली होती. आता जणू फक्त माझी वक्तृत्व स्पर्धा घ्यायला मंडळी बसवली होती. ‘अगदी ऐनवेळी ‘मी’ भाषण केल्यानं टेक मिहद्रा कंपनीचे शंभर अभियंते महाश्रमदानाला आले’ असं मला ट्वीट करता यावं यासाठीची सारी तयारी हेमंत अन् दीपा दिघे या दोघांनी करून ठेवली होती. मग काय विचारता, कोण उत्साह मिळाला! निरोपांना उधाण आलं. शेवटच्या क्षणी उडणारे गोंधळ उडाले. फोनवर फोन झडले. ऐनवेळी काही पळाले. हेमंता रात्रभर जागाच होता. संयमानं एकेकाच्या प्रश्नांना उत्तरं देत बसनिहाय याद्या प्रसिद्ध करीत होता. त्यांचे थांबे ठरवीत होता. माझ्या एका बालमत्रिणीनं मला निरोप केला,

‘‘काय? आपण जात आहात, की उंटावरूनच? परदेशात आहात म्हणे.’’

‘‘उद्या स्वत: येऊन खात्री करा.’’ या माझ्या उत्तरावर –

‘‘प्रतिनिधी म्हणून नवरा पाठवीत आहे.’’ असा टोला!

असो. तर बरं का, अशा धांदलीत रात्र सरली अन् पहाटे भुडभुड पाणी डोईवर ओतून निघालो. गतवर्षीप्रमाणे यंदाही ज्योती सुभाष ही माऊली, किरण यज्ञोपवीत हा सुहृद आणि वृषाली ही अर्धागी ऊर्फ सर्वेसर्वा बरोबर होतेच.

बेलसर गाठीस्तोवर झुंजुमुंजु होऊन गेलं होतं आणि तान्ह्य उन्हात शिवार डोळ्यांत भरत होतं. आमच्या पाचशे माणसांशिवाय हजारो माणसं आली होती. होय हजारो! बरीचशी कामालाही लागली होती. मला वारं प्यायल्या खोंडागत झालं. प्रत्येक गटापाशी जाऊन धपाधप घाव घालायला लागलो. एकेका माणसाला उराशी धरून ठेवावं असं भरतं आलं. कोण नव्हतं तिथं? पिढय़ा पोसलेल्या आज्या होत्या, बरसते पावसाळे पाहिलेली जुनी खोडं होती, शासकीय नोकर होते, उच्चशिक्षित अभियंते होते, घरं चालवणाऱ्या आया होत्या, माध्यमांवरचे होते, पुस्तकं वाचणारे होते, काही लांबून आले होते, तर कुणाची ही सलग तिसरी खेप होती, पहिल्यांदाच येणारे हरखून जात होते, तर लहानग्या शाळकऱ्यांना जणू दहा हात फुटले होते.. माणसंच माणसं! पण ही ‘गर्दी’ नव्हती. स्वकष्टाचं सामर्थ्य पणाला लावायला आलेला समूह होता. निर्माण करायला पिढय़ान् पिढय़ा एकत्र येणारी या मातीची परंपरा जपायलाच जणू सारी जमली होती. वेरुळचं कैलास लेणं म्हणे आज्यापंज्यांनी कोरायला सुरू केलं अन् नातवापतवंडांनी शेवटचा तुकडा उडवला. पिढय़ा बदलल्या, पण ना छिन्नीचा ठोका बदलला वा हातोडय़ाचा जोर. या काय नुसत्या कथा नसाव्यात असं वाटावं अशी एकसारखी नक्षी जमिनीवर कोरत ही अठरापगड मराठी माणसं दुष्काळाला परास्त करायच्या घोषणा देत होती. नाचत, गात श्रमत होती. बेलसरच्या या पठारावरच शिवरायांनी स्वराज्याची पहिली लढाई जिंकली होती याची एकमेकांना पुन्हा पुन्हा आठवण देत, दुष्काळाविरुद्धची ही लढाई आपण जिंकणार याचा विश्वास वाढवत होती.

या भाबडय़ा, पण कृतिशील उत्साहाचं अपार अप्रूप वाटत होतं. या वर्षी गावागावांत दौरा करता आला नाही. मागल्या वर्षी आपण गावं चेतवली होती. यंदा काय झालं असेल, अशा आत्मप्रौढीतून आलेल्या शंकेवर घाव पडून निचरा होत होता. स्वयंप्रेरणेनं माणसं आली होती. चहूकडे रानं पेटली होती. हेमंतासारखी अनेक माणसं महाराष्ट्रभर उभी राहिली आणि म्हणूनच या वर्षीही आम्ही दुष्काळाविरुद्धच्या लढाईत पाऊल पुढेच टाकलं आहे. अर्थात, प्रचंड मोठय़ा या संघर्षांला अजूनही अनेक हातांची गरज आहे. २२ मे पर्यंत हा श्रमयज्ञ धडधडत राहणार आहे. पाहा, जमलं तर दोन हात चालवून या. शंभर वर्षांनी कोणी वाचला इतिहास, तर तुमचं नाव गुडबुकात असलं तर बरं. नाही?

girishkulkarni1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2019 12:10 am

Web Title: girish kulkarni story in loksatta 2
Next Stories
1 विश्वकर्मा
2 वैचारिक आनंद आणि कृतीची प्रेरणा
3 ‘अश्वविश्व’
Just Now!
X