माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. लग्न होऊन अगदी एक-दीड र्वषच झालेलं. पैकी पत्नीने थोडक्यात सारांश सांगताना सांगितलं, ‘डॉक्टर, लग्न झाल्यावर आतापर्यंत मी बघत आले, सहन करत आले. मुलाचे आईवर प्रेम असावं, त्याने तो आदरभाव ठेवावा हे मान्य. पण मला सांगा, इतकं प्रेम योग्य आहे का, की त्या प्रेमापोटी त्या मुलाने आईच्या ‘ताटाखालचं मांजर’ बनावं? इतकं सतत आईच्याच भावनांना जपावं? आईने एकटीने, हिमतीने, कष्टाने वाढवलं, त्यामुळे तिचा योग्य तो आदर करावा, सेवा करावी हे मान्य; परंतु म्हणून तुझ्या आयुष्यातील तुझ्या जोडीदाराला तेच प्रेम मिळण्याची, त्या प्रेमातील काही वाटा मिळण्याची अपेक्षा ठेवली तर काय गर आहे त्यात? पण आईपुढे सर्वकाही गौण असेच त्याला वाटते. लहानपणीच वडील गेल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा यात सहभाग असला तरी आईच्या ‘अतिप्रेमा’तून याचं व्यक्तिमत्त्व खुरटलेलंच राहिलं. आता त्याने थोडं तरी बदलावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि म्हणूनच माझी चिडचिड होते. अर्थात, माझंही काही चुकत असेल तिथे मी बदलायला तयार आहे. पण डॉक्टर यातून मार्ग दाखवा आम्हाला.’
त्यानंतर दोनच दिवसांनी आई-वडील व एक कुमारवयीन मुलगा असं त्रिकोणी कुटुंब माझ्याकडे आलं. मुलगा अकरावीत होता. त्याने करिअरचं कोणतं क्षेत्र निवडावं यावरून त्यांच्यात वाद होत होता. आई-वडील दोघंही व्यवसायाने डॉक्टर, जनरल प्रॅक्टिशनर. मुलगा बुद्धिमान, आत्तापर्यंत एकदम चांगल्या नव्हे, उच्चतम मार्कानी यश मिळवलेला. परंतु सध्या त्याची प्रचंड चिडचिड होत होती. अभ्यास जणू सोडून दिला होता. फक्त टीव्ही बघणं आणि मग जायचं म्हणून कॉलेज, क्लासला जायचं हाच त्याचा दिनक्रम झाला होता. रात्रीसुद्धा जागून उगाच कॉम्प्युटर/मोबाइलवर गेम्स खेळणं, कारण झोपच यायची नाही. थोडक्यात, नराश्य आलं होतं. त्याचे वडील म्हणाले, ‘त्याला नराश्य येणार नाही तर काय? त्याला इच्छा आहे बायोटेक्नॉलॉजी, लाइफ सायन्सेस घेऊन रिसर्च वगरे करायची. त्याच्या अ‍ॅप्टीटय़ूड टेस्टप्रमाणे ती सर्व क्षमता आहे, त्याचे मार्कही ते सिद्ध करतात. पण त्याच्या आईला वाटतं की, त्याने डॉक्टरच व्हावं. स्पेशालिस्ट/ सुपर स्पेशालिस्ट व्हावं, जे तिला काही कारणाने जमलं नाही. तिचं स्वप्न त्याने पूर्ण करावं. तिचं म्हणणं की, हेच स्वप्न बघत तिने त्याला लहानाचा मोठा केला, आत्ता त्याने असं वागून कसं चालेलं? लहानपणी, अगदी आत्तापर्यंत तोही डॉक्टर होईन म्हणायचा, पण आता कळायला लागल्यावर त्याने हा विचार पक्का केला आहे. आणि खरोखरच चांगलं क्षेत्र आहे हे. मग ती त्याला आधी प्रेमाने समजावून, मग आता प्रेमाने ब्लॅकमेल करून मेडिकललाच जाण्याविषयी दुराग्रह करते आहे. त्यातूनच हे सगळं घडतंय. मी किती समजावलं तरी काही फरक नाही. उलट माझ्यावरही राग धरून बसली आहे. माझी तर ‘इकडे आड तिकडे विहीर’, अशी अवस्था झाली आहे. प्लीज आता तुम्हीच मार्ग काढा.’
त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एक जोडपं आलं होतं. त्यातली पत्नी सांगत होती की, ‘डॉक्टर आमचा प्रेमविवाह आहे. दोघे एकमेकांना शाळेपासून ओळखतो. लहानपणच्या मत्रीचं प्रेमात रूपांतर कधी झालं ते कळलंच नाही. कॉलेजला असताना तर आम्ही खूप धमाल करायचो, आम्हाला सुचायचंच नाही एकमेकांशिवाय. सतत एकत्र, घरी असताना मोबाइलवर फोन नाही तर एसएमएस वगरे. कुठेकुठे एकत्र फिरायला गेलो, सिनेमे बघितले, हॉटेिलग केलं. अजूनही ते दिवस नुसते आठवले तरी मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं. दोघंही नोकरीत सेटल झाल्यावर मग लग्नाचा निर्णय घेतला. आमची जात वेगवेगळी असल्याने वाटलं होतं विरोध होईल. पण दोन्हीकडच्या आईवडिलांनी अगदी सहज होकार दर्शवला. वाटलं होतं की, स्वप्न पूर्ण झालं. आता एकत्र राहताना सुख आणखीनच वाढेल. पण प्रियकराच्या भूमिकेतून नवऱ्याच्या भूमिकेत गेल्यावर काय फरक पडलाय अमितमध्ये काही कळत नाही. सारखा माझ्यावर पाळत ठेवून असतो. मी कोणाशी बोलते, कोणाकडे बघते यावर सारखं लक्ष ठेवतो. सोसायटीतील आमच्याच वयाच्या त्याच्या मित्रांबरोबर ज्यांच्याशी मी आधी बोलायचे, त्यांच्याशीही बोलू देत नाही आणि बोललं तर त्याला एवढा संताप येतो की, विचारता सोय नाही. असं वाटतं की, हेच होतं का त्याचं प्रेम? याच अमितवर मी प्रेम केलं? खरंच अगदी निराश झाले आहे मी. काय करावं काहीच कळत नाही.’
एकामागोमाग आलेल्या या तिन्ही केसेसचा मी विचार करू लागलो तेव्हा मला जाणवलं या तिन्ही केसेसमध्ये अतिप्रेमामुळे समस्या उभ्या राहिल्या आहेत.
पहिल्या दोन केसेसमध्ये आईचं प्रेम आहे तर शेवटच्या उदाहरणात पतीचं अतिप्रेम आहे. आपण हवं तर त्यास ‘अतिरेकी प्रेम’ असं म्हणू या. प्रेम ही जगातील प्रत्येक माणसामधली व माणसासाठी आवश्यक व उदात्त अशी अनुरूप भावना आहे. प्रेमावरच जग जगतं असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यातून मातृप्रेमाची ख्याती ती काय वर्णावी? ‘प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधू आई’, असं माधव जुलियन यांनी आईच्या प्रेमाचं वर्णन करताना म्हटलं आहे. आई म्हणजे जणू प्रेमाचं, वात्सल्याचं दुसरं नाव असं ते म्हणतात.
तर प्रियकर प्रेयसीचं प्रेम या गोष्टीवर तर बॉलिवूड, हॉलिवूड (सर्व चित्रपट, नाटकं) जगत आले आहेत. ते नसतं तर चित्रपट तरी निघाले असते की नाही अशी शंका मनात येते. राज कपूरपासून ते त्याचा नातू रणबीर कपूपर्यंत सर्व पिढय़ांची (कलाकारांच्या) रोजीरोटी याच प्रेमावर अवलंबून आहे. हे प्रेमसुद्धा एक उदात्त भावना आहे. जगरहाटी याच प्रेमामुळे तर चालू राहाते.
पण आपण या तीनही उदाहरणात बघितलं ते नुसतं प्रेम नव्हतं तर ते अतिरेकी किंवा अविवेकी प्रेम होतं. प्रेमाचा अट्टहास होऊन त्यात कुठेतरी स्वामित्वाची विचारसरणी/अविचार अंतर्भूत झालेला आढळतो. ‘माझं मूल’ किंवा ‘माझी पत्नी’ ही माझीच आहे, माझीच राहिली पाहिजे. मी म्हणेन तसंच त्या व्यक्तीने वागलं पाहिजे, हा तो अविवेक! पहिल्या केसमध्ये वडाच्या ‘सावलीतील खुरटलेलं दुसरं झाड’ अशी त्या मुलाची अवस्था अविवेकी प्रेमाने केली होती.
तर दुसऱ्या उदाहरणातही माझं मूल म्हणजे माझी अपुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जन्माला घातलेली माझी प्रतिकृती (उ’ल्ली) आहे असा स्वामित्व हक्क ती आई प्रस्थापित करू पाहात होती.
तर तिसऱ्या उदाहरणातील नवरा पत्नीवर (प्रेमिक प्रेमिकेवर नव्हे!) स्वामित्व दाखवत होता. तू माझीच आहेस, दुसऱ्या कुणा पुरुषाची नाहीस, असा अविवेक त्याला हळूहळू संशयाकडेही नेऊ शकत होता!
आजची आपली कुटुंबव्यवस्थाही बदलते आहे. ज्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा योग्य तो मान राखणं जास्त अपेक्षित होत चाललं आहे. प्रत्येकाचं अवकाश दुसऱ्याने जपून तरीही एकमेकाचे हात हातात घेऊन पुढे जात राहाणं अपेक्षित आहे. प्रेम करताना त्यातील विवेक फार महत्त्वाचा आहे. प्रेमाबरोबर अपेक्षाही आपोआप येतात. परंतु अपेक्षा करणं व अट्टहास करणं वा दुराग्रह यात फरक आहे. तोच दुराग्रह आपण टाळला पाहिजे. तेवढा ‘नित्य अंकुश’ ठेवणं आवश्यक आहे. मनात अपेक्षांची संख्या वाढवण्यापेक्षा नित्य सुसंवादातून त्या चíचल्या जाणं आवश्यक आहे. त्यातील योग्य त्या अपेक्षा ठेवून बाकीच्या सोडून देणंही डोळस किंवा विवेकी प्रेमाची पुढची पायरी आहे.
त्याचबरोबर प्रेम करणं म्हणजे लाड करणं असंही आपण मानत असतो. अनेकांना असं वाटतं की, प्रेमात दोन्ही जिवलग व्यक्तींनी एकमेकांशी कोमलपणानेच वागायला हवं, एकमेकांशी सहमतच असायला हवं. कधीच तक्रार/टीका करू नये, आपल्याला कधी आरामदायी कोशाबाहेर ढकलू नये, जसं आपण आहोत तसंच राहावं व बदलण्याचा प्रयत्न करू नये हे सर्व झाले ‘लाड’. पण प्रेम करणं म्हणजे लाड करणं नव्हे. विवेकी प्रेमात परिवर्तनाची शक्ती आहे तर लाडामुळे (अविवेकी प्रेमामुळे) तुम्ही क्षीण होता. सहिष्णुतेच्या नावाखाली लाड तुमच्यातल्या कमतरता तशाच ठेवतात, तुमच्या अहंकाराला दुखावण्याचा धोका पत्करून प्रेम तुम्हाला प्रामाणिक प्रतिक्रिया देतं, ज्यामुळे तुम्ही बदलू शकता. लाड हे नशेसारखे असतात, थोडाकाळ विरंगुळा देतात, तर प्रेम ध्यानधारणेप्रमाणे चिरंतन शांती देतं. म्हणूनच आपल्यावर कुणी प्रेम करावं वा आपल्याला बदलावं असा ध्यास प्रत्येकाने घेतला पाहिजे. मग तुम्हाला काय हवंय लाडं की प्रेम, हे तुम्हीच ठरवा.