पराग कुलकर्णी

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्याद्वारे यश मिळवण्यासाठी काय काय केले पाहिजे हे तसे आपल्याला माहीत असते. आत्मविश्वास वाढवा, सकारात्मक विचार करा, बदलांना सामोरे जा, धोके पत्करा, इत्यादी इत्यादी. आपल्या सगळ्यांकडेच ही माहिती असते, पटलेलीही असते आणि आपण ती आचरणात आणण्याचा प्रयत्नही करतो. पण सुरुवातीच्या उत्साहानंतर हळूहळू आपली गाडी पुन्हा आधीच्याच मूळ रस्त्यावर परत येते. असे का होते? हे चांगले विचार आणि त्यानुसार होणाऱ्या कृती जिथे रुजतात, फुलतात किंवा बऱ्याचदा नुसत्याच कुजतात, त्या मानसिकतेत याची कारणे लपलेली आहेत. या मानसिकतेत आपली आयुष्याकडे बघण्याची दृष्टी आणि त्याद्वारे आपण आयुष्यात काय मिळवतो किंवा गमावतो हे ठरते. आजची आपली संकल्पना म्हणजे अशाच मानसिकतेबद्दल आहे.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

स्टॅनफर्ड विद्यापीठातल्या मानसशास्त्राच्या प्राध्यापिका असलेल्या कॅरोल ड्वेक यांनी मानवी मनाच्या मानसिकतेचा सिद्धांत मांडला. मानवी प्रेरणा, व्यक्तिमत्त्व आणि विकास हे त्यांचे अभ्यासाचे विषय. माणसाच्या मूळ प्रेरणा काय असतात, त्या कशा निर्माण होतात आणि त्याचा आयुष्यावर कसा परिणाम होतो यावर त्यांनी संशोधन केले आणि या दोन मानसिकतेच्या सिद्धांताच्या स्वरूपात त्यांचे विचार मांडले. कॅरोल यांच्या मते, आपण आपल्या क्षमतेकडे, गुणांकडे, कौशल्यांकडे कसे बघतो यावरून आपली मानसिकता ठरते. ती दोन प्रकारची असू शकते – ‘फिक्स्ड माइंडसेट’ (निश्चित मानसिकता) आणि ‘ग्रोथ माइंडसेट’ (विकास मानसिकता).

फिक्स्ड माइंडसेट असलेल्या लोकांच्या मते आपली बुद्धिमत्ता, क्षमता या जन्मजात असतात. जे आपल्याला मिळाले आहे ते आयुष्यभर राहते आणि त्यात प्रयत्न करूनही फारसा बदल होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही एकतर बुद्धिमान, हुशार असता किंवा नसता. याचा एक परिणाम असा होतो की, असे विचार करणारे लोक हे सतत आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याच्या मागे असतात. त्यांना मिळणारे प्रत्येक यश म्हणजे या बुद्धिमत्तेचे, हुशारीचे प्रमाणपत्र असते- स्वत:साठी आणि लोकांसाठीही! त्यामुळे बऱ्याचदा खरेच हुशार ‘असणे’ यापेक्षाही हुशार ‘दिसणे’ आणि म्हणूनच यशस्वी दिसणे हे जास्त महत्त्वाचे ठरते. सतत यशच मिळत राहावे ही त्यांची अपेक्षा असते आणि त्यामुळे अपयशाची एक भीती त्यांच्यात निर्माण होते. यश ज्याप्रमाणे तुमच्यातील क्षमतेचे समर्थन करते त्याचप्रमाणे अपयश हे तुमच्या बौद्धिक कमकुवतपणाचं, क्षमता नसल्याचं लक्षण आहे असे हे लोक मानतात. त्यामुळे जेथे यशाची खात्री नसते ते काम शक्यतो टाळून त्याबरोबर येणाऱ्या अपयशापासून आणि अपयशी दिसण्यापासून वाचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘कम्फर्ट झोन’ला हे लोक घट्टपणे कवटाळून बसतात.

याउलट ग्रोथ माइंडसेट असणाऱ्या लोकांना आपली बुद्धिमत्ता, क्षमता, गुण आणि कौशल्य आपण शिकून, सरावाने, अनुभवाने वाढवू शकतो असे वाटते. करावे लागणारे प्रयत्न ही त्यासाठीची गुंतवणूक आहे, असे हे लोक मानतात. अपयश म्हणजे शिकण्याचाच एक भाग आहे हे लक्षात घेऊन, त्यापासून योग्य तो धडा घेऊन ते अवघड परिस्थितीतही आपले काम चालू ठेवतात. या लोकांसाठी अपयश हे त्यावेळेच्या त्या कामापुरते मर्यादित असते- माणूस म्हणून ते स्वत:ला कायमस्वरुपी अपयशी समजत नाहीत. शिकण्याच्या याच वृत्तीमुळे नवीन गोष्टी करून बघण्यास आणि त्यामुळे कधी गरज पडल्यास इतरांसमोर स्वत:चे हसे करून घेण्यासही त्यांची ना नसते. यश-अपयश यापेक्षा आपण शिकलो किती, यावर त्यांचे जास्त लक्ष असते. हुशार दिसणे यापेक्षा हुशार असणे आणि ती हुशारी, बुद्धिमत्ता सतत वाढवण्याचा प्रयत्न करणे याला ते जास्त महत्त्व देतात.

थोडक्यात काय तर, फिक्स्ड माइंडसेट असणारे लोक हे आयुष्यातल्या अनुभवांना यश-अपयश, जय-पराजय या मापात तोलतात, तर विकास मानसिकता असणारे आपल्याला शिकायला काय मिळाले आणि त्याद्वारे खरेच आपली गुणात्मक वाढ होते आहे का, असा विचार करतात. पण वाचताना तुम्हालाही जाणवले असेल की, या दोन मानसिकता आणि त्यांची लक्षणे ही जरा जास्तच टोकाची, दोन ध्रुवांवरची वाटतात. आपण या दोन्हीपैकी एक काही तरी असतो का? तर नाही. मानसिकतेच्या मोजपट्टीवरची ही दोन टोके आहेत. आपण बऱ्याच वेळेला या दोन ध्रुवांमध्ये कुठे तरी असतो. तसेच आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पलूंसाठीची आपली जागाही वेगवेगळी असू शकते. कदाचित आपल्या व्यवसायासाठी आपण विकास मानसिकतेचे असू आणि त्यासाठी लागणारे कौशल्य उत्साहाने वेळ देऊन, प्रयत्न करून आत्मसात करत असू. पण त्याचवेळी नात्यांच्या  बाबतीतली आपली निश्तिच मानसिकता असेल- ज्यामध्ये आपण लोकांना चांगले-वाईट अशा मापात तोलत असू. मतभेद म्हणजे नात्याचं अपयश समजत असू आणि वेळेनुसार, अनुभवानुसार दुसऱ्या लोकांत, आपल्या स्वत:मध्ये आणि नात्यातही बदल होऊ शकतो यावर विश्वास ठेवत नसू. थोडक्यात, आपलं व्यक्तिमत्त्व या दोन्ही मानसिकतेच्या मिश्रणातून बनलेले असते. पण यातला मुख्य मुद्दा हा आहे की, आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या पलूंच्या संदर्भात आपण या मोजपट्टीवर सध्या कुठे आहोत हे ओळखणे आणि शिकण्याचा अनुभव घेण्याचा दृष्टिकोन ठेवून ग्रोथ माइंडसेटकडे जास्तीत जास्त सरकण्याचा प्रयत्न करणे.

ग्रोथ माइंडसेट हा आज प्रत्येक क्षेत्रात खूपच महत्त्वाचा मानला जातो. यश-अपयश हे अंतिम ध्येय नसून, एखादे काम खरेच चांगल्या प्रकारे करणे, सतत शिकण्याचा दृष्टिकोन ठेवणे आणि पुरेशा सरावाने आपले कामातील कौशल्य वाढवत राहणे हे ग्रोथ माइंडसेटमुळेच शक्य होते. आपण याआधी बघितल्याप्रमाणे आपला मेंदूही सरावाने नवीन गोष्टी शिकण्याने बदलू शकतो (न्युरोप्लास्टिसिटी), हे आता अनेक प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेली माणसे आपण पाहिली तर ती ग्रोथ माइंडसेटचीच असतात. ही मानसिकता आपण आपल्या आयुष्याचे नियंत्रण स्वत: करू शकतो हा विश्वास देते आणि वाईट परिस्थितीतूनही पुढे चालण्यास मदत करते. ताण-तणाव कमी करण्यासाठी, सुखी-समाधानी जगण्यासाठी, इतरांसोबत चांगली नाती जोपासण्यासाठी या अशा मानसिकतेची आवश्यकता आहे. आपले यश नेमके  कशात आहे हे आपणच ठरवायचे असते. त्या यशापर्यंत घेऊन जाणाऱ्या रस्त्यावरही आपल्याला एकटय़ालाच चालायचे असते. थकवणारे, दुखवणारे, भीती दाखवणारे, गोंधळात पाडणारे आणि आनंद देणारे असे सगळे निखळ अनुभव या रस्त्यांवर आपल्याला स्वत:लाच घ्यायचे असतात; फक्त हा रस्ता बरोबर दिशेला जातो आहे ना, हे वेळोवेळी तपासून बघण्यासाठी आपण या मानसिकतेच्या दोन प्रकारांचा उपयोग करू शकतो. नाही का?

parag2211@gmail.com