News Flash

पाडवा आणि गोडवा

हे सगळं बाहेर सुरू असताना साडेतीन मुहूर्तांमधला हा पूर्ण मुहूर्त गाठण्याची घराघरांमध्ये गडबड असायची.

|| मंगला गोडबोले

गुढी पाडवा… नवे वर्ष… नवी उमेद जागवणारा उत्सवी सण! घरोघरी गुढ्या उभारून उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या या सणाचा अलीकडच्या काही वर्षांत ‘इव्हेण्ट’ झालेला असला तरी गेल्या वर्षी अकस्मात आलेल्या करोनासाथीने त्यावर अक्षरश: काजळी धरली. यंदा तरी हा सण उत्साहात साजरा करता येईल असे वाटत असतानाच पुन्हा करोनाने उसळी घेतली आहे. या सणाच्या गतरम्यतेबरोबरच त्याच्या सद्य: नकारात्मकतेतील सकारात्मकता शोधणारा लेख…

शिवाजी महाराजांचा कोणताही सण, उत्सव असला की अलीकडे जशी आसमंतात ‘शिवकल्याण राजा’मधली गाणी घुमत असतात, तसा माझ्या लहानपणीच्या आठवणीतल्या गुढी पाडव्याला कायमच माणिकबाईंच्या अमर आवाजातला ‘बॅकग्राऊण्ड स्कोअर’ असायचा. वेगवेगळ्या रेडिओ प्रसारणांमधून वेगवेगळ्या वेळी एकच गाणं ऐकू यायचं त्या दिवशी…

‘विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरीऽऽ प्रभु आले मंदिरी।’

गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांनी हे गीत पाडव्यासाठी लिहिलं असेल की नसेल, कोण जाणे; पण बाळ माटे यांच्या स्वररचनेत आणि माणिकबाईंच्या किंचित अनुनासिक, पण गोलाकार आवाजात ‘रामभक्तीचा गंध दरवळे, गुढ्या-तोरणे घरोघरीऽऽ’ वगैरे कानावर आलं की पाडव्याची सुंदर वातावरणनिर्मिती व्हायची. पुढचे काही दिवस खरोखरच रामभक्तीचा गंध दरवळायचा. पुढे नऊ दिवसांनी रामनवमी आणि लागूनच येणाऱ्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती हे सण असल्याने कथा-कीर्तनांमधून, व्याख्यानांमधून सतत रामकथा ऐकायला मिळायची. कुठे ‘गीत रामायणा’चे हौशी प्रयोग व्हायचे. कुठे राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकरांची ‘रामकथामाला’ सुरू असायची. कुठे रामरक्षेचं सामूहिक पठण व्हायचं. रामाचं जीवनचरित्र आणि त्यातले आदर्श चारित्र्याचे, नात्यांचे, निष्ठांचे नमुने या ना त्या रूपाने मनावर बिंबवले जायचे.

हे सगळं बाहेर सुरू असताना साडेतीन मुहूर्तांमधला हा पूर्ण मुहूर्त गाठण्याची घराघरांमध्ये गडबड असायची. नवं वर्ष सुरू होणार, त्याचं नवं पंचांग आणा, गुढी उभारण्यासाठी योग्य अशी काठी मिळवा, काठीवर लटकवण्याचा गडू/ तांब्या घासून लख्ख करून ठेवा, रेशमी वस्त्र/ खण, फुलांचे हार, साखरेच्या गाठ्यांच्या माळा, आंब्याची व कडुनिंबाची पानं मिळवा… आणि रामरायाच्या विजयाचं प्रतीक असणारी उंच, डौलदार गुढी आपल्या घराच्या उजवीकडे उभारा… या कामांत मंडळी गर्क असायची. आपल्या परिसरात आपलीच गुढी सकाळी लवकरात लवकर उभारली जावी आणि तीही उंचात उंच असावी असं प्रत्येकाला वाटे. चौदा वर्षांचा वनवास संपवून, रावणाला संपवून श्रीराम अयोध्येला परतले, तो हा दिवस! या दिवशी सगळी दु:खं, संकटं संपणार आणि सुखसमृद्धीचं जीवन सुरू होणार म्हणून हा दिवस साजरा करण्यात औचित्य वाटे. याच दिवशी ब्रह्माने ब्रह्मांड निर्माण केलं, याच दिवशी शालिवाहन शक सुरू झालं अशा कथाही सांगितल्या/ ऐकल्या जात. एकूण असाधारण महत्त्वाचा असा हा दिवस मानला जाई; म्हणून साजराही केला जाई.

मुळात हे चैत्र महिन्याचं आगमन. चैत्रात एक चैन दडलेली असतेच नाही तरी! पानगळ संपलेली. वसंत ऋ तूची चाहूल लागलेली. सगळा निसर्ग रंगात आलेला. पाऊस-थंडीचा त्रास संपून थोड्या उन्हाळ्याचे, पण स्थिर हवामानाचे दिवस आलेले. आंब्याचा मोहर… मोगरा, मदनबाण बहरू लागलेला. त्यांच्या गार, गोड परिमळाने फुलपाखरं, पक्षी भ्रमंतीला निघालेले. या सगळ्याचा आनंद लुटायला माणसंही थोडी निवांत झालेली. रब्बी पिकं हाताशी आल्याने बळीराजा विसावलेला. आणि मोठ्यांचं आर्थिक, तर मुलांचं शैक्षणिक वर्ष संपल्याने सगळेच नवं काहीतरी सुरू करण्याच्या उमेदीत… असं वर्षभरातलं सगळ्यात लोभस चित्र दाखवणं ही चैत्राची खासियत!

अशा ‘सुशेगात’ वातावरणात खाणंपिणं, कपडालत्ता, नव्या उद्योगांची सुरुवात, मोठी खरेदी याकडे माणसं वळली नसती तरच आश्चर्य! त्यामुळे पाडवा या सगळ्याची चंगळ करून गोडवा वाढवे. गुढी पाडव्याच्या दिवसाची सुरुवात मात्र कडुनिंबाच्या पानांची कडू-जहर गोळी गिळण्यापासून करावी लागणं हा एक अन्याय असे. कडुनिंबाची पानं वाटल्यावर त्यात भले साखर, लिंबू, हिंग, ओवा, मध असं काहीही आणि कितीही घातलं तरी त्या कडवटपणावर काहीही उतारा मिळत नसे. पण सगळं कडू, अप्रिय एकदाच गिळून टाकलं की पुढे सगळं गोडच गोड समोर येईल अशा भाबड्या विश्वासासोबत ती गोळी घशाखाली ढकलली जाई. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी नीट पूजा करून सन्मानाने ती गुढी खाली उतरवली की सण संपे. आणि नवं वर्ष जगायला नव्या उत्साहाने सुरुवात होई.

पंचागाऐवजी दिनदर्शिकेवर भागवून घेण्याच्या ‘कालनिर्णय’पूर्वीचे हे दिवस. पुढे रामकथा प्रवचनांमधून सांगण्याला छोट्या पडद्यावरच्या धारावाहिक ‘रामायणा’चा पर्याय आला. गुढीच्या उंचीपेक्षा ती टी. व्ही.च्या अ‍ॅण्टेनाला, डिशला कुठे काही अडथळा आणत नाही ना, हे बघण्याकडे लोकांचा कल वाढला. ऋतुचक्रही थोडं मागेपुढे व्हायला लागलं. खरीप आणि रब्बी पिकांचे हंगाम बदलले. मुळामध्ये गुढी पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानावी की आपापल्या व्यवसायानुसार १ जानेवारी, १ एप्रिल हे वर्षारंभ मानावेत, यावर वाद सुरू झाले.

मध्यंतरी अचानक कुठून तरी छोट्या खोक्यात मावणाऱ्या घडीच्या मिनी गुढ्याही चलनात आल्या. साहजिकपणेच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी त्या मोठ्या प्रमाणावर उचलल्या… आपल्याशा केल्या. दाराबाहेर, खिडकीबाहेर उंच फडकणारी विजयपताका बैठकीच्या खोलीतला शो-पीस बनली. पण संपूर्ण अंतर्धान मात्र पावली नाही. सण-समारंभांचा सोस आणि रोजच्या कंटाळवाण्या दिनक्रमातला उत्सवी बदल माणसांना हवाहवासा वाटला तर काय आश्चर्य!

काळाच्या ओघात घरगुती पाडव्याचे सामाजिक ‘इव्हेण्टस्’ व्हायला लागले. भव्य उद्घाटनं, बक्षीस समारंभ, नव्या प्रकल्पांचे शुभारंभ ऊर्फ ‘लाँचिंग सेरेमनी’ वगैरेंना हा मुहूर्त आवडायला लागला. कोणे एकेकाळी जेव्हा रक्तपेढ्या नव्याने सुरू होत होत्या तेव्हा खास पाडव्याच्या दिवशी रक्तदान शिबिरे घेतलेली मी पाहिली आहेत. आता कशाचाही ‘इव्हेण्ट’ करण्याचं कसब आपल्या रक्तात इतकं भिनलंय, की आपण पाडवा ‘वापरल्या’शिवाय राहिलोच नसतो.

पण…

गेल्या वर्षाने अनेक बाबतीत हा नवा ‘पण’ उभा केला. का, कसं, कधी, कुठे, कोणामुळे वगैरे प्रश्न सोडवण्याचंही त्राण राहू नये, इतकं एका अज्ञात रोगाने जगाला ग्रासलं. माणसानं त्याच्याशी दोन हात करण्याचा पवित्रा घ्यावा, किंवा समझोत्याचं हस्तांदोलन करता येत नाही म्हणून सारखं दोन हात दूर राहावं… त्याला काही फरक पडत नाही, हे वर्षभरात दिसून आलं. गेल्या वर्षीच्या पाडव्यावरही या व्याधीचं सावट होतंच. पण तेव्हा त्याची व्याप्ती, प्रभावक्षेत्र, गांभीर्य आपल्याला पुरेसं कळलं नव्हतं. फार तर महिन्या-दोन महिन्याचा खेळ असेल; नंतर सगळं जीवन पूर्वपदावर येईल अशा कल्पनेत (भ्रमात?) आपण होतो. ‘नॉर्मल’च्या जागी ‘न्यू नॉर्मल’ येईल, वगैरे शब्दखेळात मन रमवीत होतो. पण ‘तो’च आपल्याला खेळवतोय असे तेव्हा समजत नव्हतो.

यंदाचा पाडवा जास्त कठोर वास्तव दाखवत समोर आलाय. एकीकडे ‘माणसाच्या जगण्याला अनेक प्रकारे झळ लागणारं विराट संकट’ ही एक भावना आहे. तसंच दुसऱ्या बाजूने आपल्या अनेक कल्पना, अपेक्षा, गरजा, मागण्या यांचाही फेरविचार करण्याची गरज- निदान संवेदनशील माणसांना- नक्कीच जाणवू लागली आहे. एकविसाव्या शतकाची पहिली दोन दशकं संपली आहेत. आहार, विहार, वेग, प्रवास, प्रसिद्धी, यंत्र, तंत्रं, संपर्क, सेवा, माध्यमं, मनोरंजन अशा नाना क्षेत्रांच्या अमर्याद शक्यता या काळाने आपल्यासमोर खुल्या केल्या आहेत. एका अर्थाने या सगळ्यांच्या नादाला आपल्याला लावलंय. इतकं, की आपल्याला इतकं खरोखरच हे हवंय का, यांच्या मोहजालात काही महत्त्वाचं गमावलं तर जात नाहीए ना, हा विचार करण्याचीही क्षमता अनेकांनी गमावली आहे. आता सुमारे वर्षभर या रोगाच्या कलाकलाने घेत, नाना मर्यादांचं आयुष्य कंठताना, बव्हंशी स्थानबद्ध राहताना कुठे कुठे तरी अशा काही प्रश्नांचे धुमारे फुटायला लागलेत. सतत जगण्याचा ‘इव्हेण्ट’ करण्याची गरज आहे का? शेकडो माणसांना गोळा करून लग्नकार्ये केली तरच ती थाटामाटाने केली असं म्हणावं का? करमणूक, कपडे, बूट, चपला, खेळणी, प्रसाधनं नक्की किती मिळाली की आपल्याला पुरेशी असतील? घरं, घरातली माणसं यांना गृहीत धरणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं बरोबर आहे का? किरकोळ मोबदला देऊन ज्या दैनंदिनीच्या सेवा आपण विकत घेतो, त्यांच्या नसण्याने आपण कसे हवालदिल होतो? त्यांना त्यांचं योग्य ते श्रेय द्यायला नको?

आयुष्यच गमावण्याची वेळ येते तेव्हा आयुष्यभर खटाटोपाने कमावलेल्या गोष्टींची काय कदर उरते? नाही. नाही. इथे धाडकन् ‘हाऊ मच लॅण्ड डझ ए मॅन नीड?’ या

लिओ टॉलस्टायच्या प्रसिद्ध गोष्टीपर्यंत मला नक्कीच जायचं नाहीये. मात्र, मधल्या काळात अती उपभोगाने मांद्य आलेले मेंदू यातल्या काही विचारांपर्यंत येत असतील तर तेही वाईटातून निघालेलं चांगलंच म्हणावं लागेल का, हे तपासायला हवं.

पाडव्याने नव्या युगाची सुरुवात होते असं सुचवणारे शब्द, विशेषणं त्याला जोडलेली दिसतात. कोंकणी लोक त्याला ‘संवत्सर पाडवो’ (उच्चारी : सौंसर पाडवो) म्हणतात. आंध्र- तेलंगण- कर्नाटकात ‘उगादी’ या नावाने गुढी पाडवा साजरा होतो. तो शब्द खरं तर ‘युगादि’- ‘नव्या युगाची सुरुवात’ या अर्थाने येतो. करोना- काळातला आताचा पाडवा हा पण एका अर्थाने आत्मनिर्भरतेचं, विवेकपूर्ण विचारांचं युग सुरू करणारा पाडवा ठरू शकतो. अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं तर पाडव्याचा गोडवा कमी व्हायचं कारण नाही. जुन्या काळात बहिणाबाईंनी आपल्यासाठी म्हणून ठेवलंच आहे…

‘गुढी पाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी।

नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली अढी

गेलं साल, गेली अढी, आता पाडवा… पाडवा

तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा… वाढवा!’

mangalagodbole@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 12:09 am

Web Title: gudi padwa marathinew year festival that awakens new hope akp 94
Next Stories
1 इस्पिकची राणी!
2 रफ स्केचेस :  पाण्यावरची सही
3 अरतें ना परतें… : आतल्या आवाजांचा गलबला
Just Now!
X