05 April 2020

News Flash

खेळ मांडला.. : मैदानावरील गिनिपिग

ल्समध्ये करोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे आता हे तिन्ही सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

सिद्धार्थ खांडेकर

siddharth.khandekar@expressindia.com

‘‘हल्लीचे फुटबॉलपटू हे गिनिपिग असतात,’’ असं मध्यंतरी इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेडचा विख्यात फुटबॉलपटू वेन रूनीनं उद्वेगानं म्हटलं होतं. ‘संडे टाइम्स’मध्ये एका स्तंभात वेन लिहितो- ‘‘जगभर फुटबॉल, टेनिस, रग्बी, फॉम्र्युला वन स्पर्धा बंद होत असताना प्रीमियर लीग मात्र परवापर्यंत सुरू होती. अशा वेळी बहुतेक फुटबॉलपटूंच्या मनात प्रश्न आला, की हे सगळं पैशासाठी सुरू आहे का? प्रीमियर लीग बंद करण्यासाठी इतकी वाट का पाहिली गेली? आर्सेनलचा व्यवस्थापक (मिकेल आर्तेता) करोनामुळे आजारी पडला. सरकार, इंग्लिश फुटबॉल असोसिएशन, प्रीमियर लीग या सगळ्यांचेच नेतृत्व कमी पडले. या सगळ्या दुर्दैवी कालखंडात फुटबॉलपटूंना आपण गिनिपिग असल्याचेच वाटले असेल!’’ तो स्वत: एव्हाना प्रीमियर लीगमध्ये खेळत असता, तर इतके कडवट भाष्य करू शकला असता का, हा प्रश्न आहे. तो भरात असताना मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक सर अलेक्स फग्र्युसन होते. ते रोखठोकपणासाठी ओळखले जायचे. वास्तविक युरोपातील इतर बहुतेक मोठय़ा व्यावसायिक साखळ्या स्थगित किंवा रद्द होत असताना प्रीमियर लीग खेळवली जात होती, कारण तेथील पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या ‘सामूहिक रोगप्रतिकारकता’ (हर्ड इम्युनिटी) धोरणाशी ते सुसंगतच होते. इंग्लंडमध्ये इतर प्रमुख युरोपियन देशांच्या तुलनेत करोनाविरोधी निर्बंध बराच काळ शिथिल ठेवण्यात आले होते. परंतु प्रादुर्भाव वाढत गेल्यामुळे ही स्पर्धा ४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली. पण त्याही वेळी स्पर्धा सुरू होऊ शके ल, याची शाश्वती आता कोणीही देऊ शकत नाही. इटलीत करोनाचा कहर सर्वाधिक आहे. तिथं इटालियन सेरी- एमधील एका फुटबॉलपटूला करोनाची लागण झाली. स्पेनमध्ये एका युवा फुटबॉल प्रशिक्षकाचा करोनामुळे मृत्यू झाला. अमेरिकेत एनबीए बास्केटबॉल लीगमधील एक बास्केटबॉलपटूने ‘निष्कारण करोनाचा बागुलबुवा होतो’ हे दाखवण्यासाठी एका पत्रकार परिषदेत समोरच्या माइकच्या बोंडुकांना हात लावला, मग डेस्कवरही हात थोपटले. दोन दिवसांनी त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले! पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धेत खेळण्यासाठी आलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू अलेक्स हेल्स करोनाची लक्षणे आढळल्यामुळे मायदेशी परतला. पाकिस्तानात गत आठवडय़ाच्या सुरुवातीला करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक लक्षणीय वाढ झाली. या काळात (तरीही) पीएसएलचे उपांत्य सामने आणि अंतिम सामना खेळवला जाणार होता. पण हेल्समध्ये करोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे आता हे तिन्ही सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या बाबतीत सारंच अनिश्चित आहे. ही स्पर्धा रिकाम्या मैदानांमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव आला. पण प्रेक्षक नसले, तरी स्पर्धेचा, संघांचा पसारा मोठा असतो. त्यात बहुतेक सर्व परदेशी व्हिसा स्थगित केल्यामुळे किमान १५ एप्रिलपर्यंत स्पर्धा सुरू होत नाही. पण तरीही बीसीसीआय प्रमुख आणि एकेकाळी आयपीएलमध्ये भलताच सक्रिय राहिलेल्या सौरव गांगुलीने स्पर्धा गुंडाळल्याचे जाहीर केलेले नाही. हा आशावाद म्हणावा की बेजबाबदारपणा? कारण १५ एप्रिलच काय, पण त्यानंतरही किमान आणखी १५ दिवस करोनाच्या प्रादुर्भावाबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. यासाठी परदेशी क्रिकेटपटू मोठय़ा संख्येने येणार, तेव्हा ती वेगळी गुंतागुंत ठरते. परदेशी क्रिकेटपटू नाही आले किंवा बोलावले गेले नाहीत (ही जवळपास अशक्यकोटीतली बाब, पण पुसट शक्यता म्हणून गृहीत धरू), तरी देशी क्रिकेटपटू, प्रशिक्षक वर्ग, ब्रॉडकास्टिंग युनिट, पदाधिकारी, फ्रँचायझी मालक आणि त्यांचा लवाजमा, पंच आणि सामनाधिकारी हा वर्ग थोडक्या संख्येचा नाही. शिवाय, विविध शहरांमध्ये जाण्यासाठी ही मंडळी विमानप्रवासच करणार, जो सध्या सर्वाधिक जोखमीचा ठरू लागला आहे. आता १६ एप्रिल ते ६ जून या काळात सामने घटवून ही स्पर्धा खेळवण्याचा अट्टहास सुरू आहे. यासाठी दोन गट वगैरे पाडून ती खेळवण्याची तयारी सुरू आहे.

पीएसएल किंवा ईपीएलप्रमाणेच आणखी एक स्पर्धा खेळवण्याचा सोस संयोजकांना थोपवता आलेला नाही. रशियातील येकॅटेरिनबर्ग शहरात सध्या फिडे कँडिडेट्स स्पर्धा सुरू आहे. विद्यमान बुद्धिबळ जगज्जेता मॅग्नस कार्लसन याचा आव्हानवीर ठरवण्यासाठीही स्पर्धा मंगळवारी सुरू झाली. तिच्या उद्घाटनासाठी येकॅटेरिनबर्गच्या सभागृहात हजार पाहुणे उपस्थित होते! या उद्घाटन सोहळ्यासाठी आठ बुद्धिबळपटू, ज्यांच्यात ही स्पर्धा खेळवली जातेय, ते मात्र अनुपस्थित होते! करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली, त्यावेळी सारे नियम धुडकावून काहीजण थेट बुद्धिबळपटूंच्या टेबलांपाशी गेले. ‘सुरक्षित अंतर’ किंवा सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पथ्य पाळले गेले नाही. नेदरलँड्सचा बुद्धिबळपटू अनिश गिरीने डाव सुरू करण्यापूर्वी माजी जगज्जेता अनातोली कारपॉवशी हस्तांदोलन केलं. त्याचा प्रतिस्पर्धी रशियाचा इयन नेपोपनाचीनं मात्र हा प्रस्ताव विनम्रपणे नाकारला. या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसून आलेली अशी बेफिकिरी करोनाविषयक जाणिवा त्या देशात पुरेशा रुजल्या नसल्याचं दर्शवते. याचं एक कारण दिलं जातं ते म्हणजे, रशियात काही करोनाचा धोकादायक प्रादुर्भाव झालेला नाही. पण स्पर्धा सुरू झाल्याच्याच दिवशी याच येकॅटेरिनबर्ग शहरात करोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला! सहभागी झालेले काही बुद्धिबळपटू या स्पर्धेविषयी फारसे उत्सुक नाही. स्पर्धा व्हायलाच नको होती, असं वँग हाओ या चिनी बुद्धिबळपटूने स्पष्ट सांगितले.

इंग्लिश प्रीमियर लीग, पीएसएल, कँडिडेट्स स्पर्धा (सध्या क्रीडाविश्वात सुरू असलेली एकमेव प्रमुख स्पर्धा), आणि आगामी येऊ घातलेली आयपीएल यांच्या संयोजकांची धोरणे पाहता खेळाडू खरोखरच गिनिपिगच वाटू लागतात. विख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याचा हजारावा सामना इटलीमध्ये रिकाम्या स्टेडियममध्ये खेळला. रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा सोस या लीगमधील एका फुटबॉलपटूच्या जिवावर उठला आहे. जवळपास तशीच किंमत आर्सेनल प्रशिक्षक मिकेल आर्तेताला मोजावी लागत आहे. इंग्लिश क्रिकेटपटू अलेक्स हेल्सवर किमान स्पर्धेत खेळण्याविषयी पर्याय उपलब्ध होता. परंतु करारबद्ध झाल्यानंतर करार मोडणे त्याला जड गेले असावे. या परिस्थितीत लिव्हरपूलचे प्रशिक्षक युर्गन क्लॉप यांनी घेतलेली भूमिका खरोखरच कौतुकास्पद ठरते. लिव्हरपूल प्रीमियर लीग जिंकण्यापासून अवघा एक सामना दूर आहे. पण आमच्या विजयापेक्षा सर्व संबंधितांचे आरोग्य मला सर्वाधिक मोलाचे वाटते, असे त्यांनी मध्यंतरी ट्वीट केले होते. लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखे फुटबॉलपटू जगाला काळजी घ्या म्हणून बजावत आहेत. युरो २०२०, कोपा अमेरिकासारख्या मोठय़ा आणि महत्त्वाच्या स्पर्धा वर्षभर पुढे ढकलल्या जात आहेत. पण काही स्पर्धा संयोजकांनी करोनाचा धोका ओळखण्यात विलंब केला किंवा थेट बेफिकिरी दाखवली. आयपीएलसारखे काही संयोजक मात्र कोणतीही किंमत मोजून स्पर्धा खेळवण्याच्या तयारीत आहेत. पण यात सर्वाधिक किंमत मोजावी लागणार ती खेळाडू आणि प्रशिक्षकांनाच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 2:22 am

Web Title: guineapig on the field lokrange khel mandala siddharth khandekar article abn 97
Next Stories
1 पराधीन आहे जगती..
2 समकालीन ग्रामगोष्टी..
3 मूल्ययुक्त सुसंस्कृतपणाचे भान वाढवणाऱ्या कथा
Just Now!
X