सुषमा करोगल sushama.karogal@gmail.com

गुजराती साहित्यविश्वातील प्रतिभावंत लेखक सीतांशु यशश्चंद्र यांना नुकताच सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यनिर्मितीचा घेतलेला वेध..

सीतांशु यशश्चंद्र हे गुजराती साहित्यविश्वातील प्रतिभावंत, ज्येष्ठ लेखक आहेत. त्यांना जाहीर झालेला‘सरस्वती सन्मान’ हिंदीतील प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या हस्ते २२ जानेवारीला दिल्लीत प्रदान करण्यात आला. सीतांशुंना आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या साहित्यविषयक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. रणजीतराम सुवर्णचंद्रक, नर्मद सुवर्णचंद्रक, गुजरात साहित्य परिषद व गुजरात साहित्य अकादमीचे पुरस्कार, त्याचबरोबर साहित्य अकादमी, राष्ट्रीय कबीर सन्मान, गंगाधर मेहर सन्मान, पद्मश्री, भारतीय भाषा, कवी कुसुमाग्रज राष्ट्रीय काव्य पुरस्कार हे त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणता येतील. त्यांना मिळालेला ‘सरस्वती सन्मान’ हा वस्तुत: ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’च्या बरोबरीचा; पण सरस्वती सन्मानाची फारशी चर्चा आपल्याकडे होताना दिसत नाही. आणि त्यातही काही विशिष्ट अपवाद वगळता, इतर भारतीय भाषांतील साहित्यासंबंधी आपणास फारशी उत्सुकताही असत नाही.

कच्छमधल्या भूज इथं सीतांशुंचा जन्म झाला, पण महाविद्यालयातले शिक्षण व अध्यापनाची काही वर्षे मुंबईत गेल्याने सीतांशुंची मराठी साहित्याशी व साहित्यिकांशी चांगलीच जवळीक आजही आहे. १९९१-९२ सालच्या सुमारास म. स. विद्यापीठाच्या मराठी विभागात अरुण कोलटकर व दिलीप चित्रे आले होते, तेव्हा त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून सीतांशुंशी असलेले त्यांचे ‘कवितिक नाते’ लक्षात आले होते. तेव्हा सीतांशुंच्या सन्मानाच्या निमित्ताने त्यांच्या कवितेचा परिचय करून देणे योग्य ठरेल.

सीतांशुंची साहित्यनिर्मिती विविध स्वरूपाची आहे. ‘केम मकानजी क्यां चाल्या’, ‘ए माणस मद्रासी लागे छे’, ‘खग्रास’, ‘अश्वत्थामा आजे पण जीवे छे’, ‘नक्कामो माणस छे नरसिंह मेहता’, ‘आखानी ओळखाणो’, ‘तोखर’, ‘एक सपनुं बडुं शैतानी’ यांसारख्या त्यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमी समृद्ध केली आहे. केतन मेहतांच्या ‘माया मेमसाब’ या प्रसिद्ध चित्रपटाची पटकथा सीतांशुंनी लिहिली आहे, तर ‘सीमांकन अने सीमोल्लंघन’, ‘रमणीयतानो वाग्विकल्प’, ‘अस्य सर्ग विधाओ’ या ग्रंथांतून त्यांचे सैद्धांतिक विवेचन, तौलनिक साहित्याभ्यास व समीक्षणात्मक लेखन प्रसिद्ध झाले आहे. आयनेस्कोच्या ‘द लेसन’चा गुजराती अनुवाद ही त्यांची महत्त्वाची कृती आहे. मात्र भारतीय साहित्य पातळीवर त्यांची ओळख कवी म्हणून आहे.

मी गुजराती भाषिक परिसरात राहत असल्याने साहजिकच गुजराती साहित्यासंबंधी काहीशी जिज्ञासा होती. गुजराती अभ्यासक स्नेहीजन होते; त्यामुळे गुजराती कवितेविषयी, विशेषत: नव्या कवितेविषयी जाणून घेण्याची, वाचन करण्याची संधी मिळाली. १९६० नंतर आधुनिकतेचा सर्वंकष आविष्कार पाहायला मिळतो तो सुरेश जोशींच्या साहित्यातून. १९६० नंतरच्या काळात युरोपीय आधुनिकता व आधुनिकतावादी कला-वाङ्मयीन संप्रदाय, त्यातील प्रतीकवाद, फ्रॉइडप्रणीत कामाविष्काराचे विश्लेषण, सररियालिझम आदींसारख्या पश्चिमी संप्रदायांनी व विचारप्रणालींनी मानवी अस्तित्वाविषयी ज्या प्रकारची संवेदनशीलता कलानिर्मितीमधून प्रकट केली, तिच्या परिशीलनाचा एक अर्थपूर्ण संदर्भ गुजरातीतील १९६० नंतरच्या साहित्यात, कवितेत दिसून येतो. त्यात सुरेश जोशींनंतर लाभशंकर ठाकर, गुलाम मोहम्मद शेख आदींसह सीतांशुंचे योगदान मौलिक स्वरूपाचे आहे. ‘मनीषा’, ‘क्षितिज’, एतद्’, ‘कृति’, ‘उन्मूलन’ इत्यादी नियतकालिकांतून आणि ‘रे’ मठाच्या चळवळीतून आधुनिकतेचे हे काव्यसंवेदन प्रकट होत होते. ‘रे’ मठाच्या चळवळीतील सीतांशु हे एक अग्रणी नाव. ‘ओडिस्युसनुं हलेसु’, ‘जटायु’, ‘वखार’ या त्यांच्या काव्यसंग्रहांतून व अप्रकाशित कवितांतून त्यांच्या कवितेतील अनेक वैशिष्टय़े समोर येतात. त्यांच्या अनेक कवितांतून गुंतागुंतीच्या, जटिल अनुभवांची मांडणी अगदी विलक्षणरीत्या केल्याचे जाणवते. दृश्यरूपातील कडव्यात व ओळीत असलेली असमानता, बाह्य़स्तराऐवजी अंत:स्तरातून झालेली तिची गुंतवण लक्षात येते. आधुनिक जगण्यातील हरवलेले माणूसपण, परकेपण, परात्मता, खंडितता, कोसळलेले सांस्कृतिक आधारसंचित व्यक्त होताना निर्माण झालेल्या प्रतिमा, रूपके आदी घटकांतून या संवेदनावकाशाची जटिलता व गहिरेपण व्यक्त होत जाते.

महानगरातल्या आधुनिक माणसांच्या अस्तित्वाला आलेली वस्तुरूपता, क्युरिओ शॉपमध्ये मांडून ठेवलेल्या हस्तिदंती निर्मुखतेची क्रयरूपता, हरवलेले स्वायत्तपण, त्याने झालेले शोषण, भयग्रस्तता, ‘एका बाजूला आहे हे दिसणारे नगर/ एका बाजूला आहे हे न दिसणारे नगर’ असे मुंबई व पोम्पई यात आलेले निराधारत्व, संत परंपरेतील निरंजन अवस्थेचा व्यत्यास असलेले,‘कुठंय माझं घर?’ असे संवेदन व्यक्त होताना आलेल्या स्वप्नदृश्यात्मक, विरुपित, विपरीत प्रतिमा त्यांच्या जाणीवसंदर्भात अर्थपूर्ण व अपरिहार्य ठरत येतात. सीतांशुंच्या ‘जटायु’सारख्या संग्रहातील कवितांत अनेक घटकांचे वास्तव संदर्भ येतात. हे परिचित, मूर्त, गोचर घटक त्यांच्या कवितेत इतक्या अनपेक्षित सररियालिस्टिक रीतीनं, प्रतिमांतून येतात की, या परिचिताचे अपरिचित आभासात्मकतेत रूपांतर घडवले जाते. चिंचपोकळीच्या फॅक्टरीत मग शिंग घालून ओरडणाऱ्या पशूंचं स्वप्नसदृश, आभाससदृश जग साकारतं. त्यात मशिनरी रहस्यभऱ्या उभ्या असतात, तापानं फणफणते सर्चलाइट असतात, कमर्शियल वायिरगच्या सापळ्यांत बेभान बरळत सुटलेले जाहिराती बल्ब असतात. अशी सजीव-निर्जीवांची उलटापालट होत वास्तव हेच एका पातळीवर अतिवास्तव होतं. वास्तवाचं नवं आकलन प्रकट होतं. स्वप्न पाहणाऱ्याचे स्वप्नदृश्याशी असलेले नाते अनुभवातील अनोळखीपणाच्या नव्या मिती व्यक्त करते. यातील मगनचे, तोतऱ्या मुलाचे पात्र, निरनिराळे मंच, नेते, अधिकारी आदींचे वर्तनचित्रण, प्रतिमाविश्व एकाच वेळी असंगती, विडंबन यातून हसवू पाहते. पण ते पुरतेपणी हसूही देत नाही. मात्र, मनाला औपरोधिक डंख मारून जाते.

सीतांशुंच्या कवितांत मानवनिर्मित व्यवस्थेतील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, इ. घटकांच्या गुंतागुंतीचे अनेक संदर्भ मानवी अस्तित्वाला ग्रासून टाकणाऱ्या स्वरूपात व्यंग, उपहास, उपरोध यातून येतात. ‘मोअें’सारख्या दीर्घ कवितेत वास्तवाच्या विखंडीत रूपाचा एक एक तुकडा मांडण्याला महत्त्व देत येतो. त्यातील एका खंडात अवलोकनकर्ता इतिहासतज्ज्ञांना एकामागून एक प्रश्न विचारतो. प्रश्न विचारताना त्यालाही प्रश्न पडतात. त्यात इतिहासपूर्व काळ येतो. शिकारी व शिकार या आदिम प्रेरणांचे सूचन होते. भूत आणि वर्तमान यांचे परस्परसंबंध, त्यांचे वेगळेपण आणि गुंतलेपण व्यक्त होत त्यात असलेल्या शक्यता सूचित करतानाही तिचा रोख मात्र वर्तमानावर आहे. वर्तमान, आता व इथे हे त्यांच्या कवितांतील एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. कवितेत ते अनेक मार्गाने येते. सीतांशुंच्या पुढील ‘वखार’ या संग्रहात त्यांची कविता अधिक समकालीन होत भारतीय वास्तवाचे प्रस्तुत घटक भेदकतेने व्यक्त होताना त्यातील सामाजिक, राजकीय संघर्षजाणिवेला अधिक धार चढलेली दिसते. त्यात स्थानिक घटितांच्या वैश्विक संदर्भाचा खोलवरचा शोध घेतला जातो. त्या एकाच वेळी स्थानिक आणि वैश्विक, वैयक्तिक आणि राजकीय, कालसापेक्ष आणि कालातीत होतात. तिची मुळे उत्तरआधुनिक काळातल्या गुजराती संदर्भातील भारतीय वास्तवातली आहेत. पण तिच्यातील ध्वनी अधिक व्यापक अवकाशात घुमत राहतो. आपण निर्माण केलेली कवितेची मानकं आपणच सतत ओलांडावीत ही प्रक्रिया सीतांशुंच्या कवितांत नित्य दिसते.

सीतांशुंच्या कवितेत पाश्चिमात्य कला संप्रदायाच्या परिशीलनाचे संवेदन आहे, पण त्याचबरोबर तिची मुळे या मातीत खोलवर रुजलेली आहेत. या रुजण्याची ही प्रक्रिया कवितेत अनेक स्तरांवर, अनेक अंगांनी येते. ‘प्रलय’सारख्या गुंतागुंतीचा अनुभव प्रकट करणाऱ्या कवितेत पाण्याचे, जगण्याचे अनेकविध बंध आणि ‘काही नाही, अरे किती सगळं हे काही नाही’ यातून सूचित होणारी ‘नथिंगनेस’ची सर्वव्यापी जाणीव साकार होते. नरसिंह मेहतांचे ब्रह्मरूप वर्णन करणारे पद तसेच ठेवत, सीतांशु त्याला चौदिशांना पसरलेल्या पाण्याच्या प्रलयात बुडून जाण्याची भयाकुलता देतात.

कोणतीही साहित्यकृती हे संस्कृतीचे अविभाज्य अंग असल्याने तिचे आकलन हे सांस्कृतिक घटिताचे, वस्तूचेही आकलन असते, याची जाणीव मला ‘जटायु’चा अनुवाद करताना अनेकवेळा झाली. अनुवाद करताना अनेक ठिकाणी अडखळल्यासारखे होत होते. ‘प्रलय’ कवितेतच एके ठिकाणी ‘पाणियारे दीवानी थरकत ज्योत’ अशी ओळ आली. अनुवाद केला, तरीही याआधीच्या ओळीतील नागाची प्रतिमा, त्याच्या मस्तकावरचा मणी, कामिनीचा संदर्भ यांच्याशी त्याचा काहीएक अर्थपूर्ण अनुबंध निर्माण होतो असे वाटेना. तेव्हा सीतांशुंशी चर्चा केली. आपल्या ऋजू, ज्ञानसंपन्न विनयशीलतेने त्यांनी माझ्या अनेक अडचणींचे सहजभावाने निरसन केले. तुळशी वृंदावनापाशी दिवा लावण्याच्या परंपरेचा संकेत, तसेच गुजरातेत बायका पाणियाराजवळ, पाण्याच्या ओटय़ाजवळ दिवा लावतात. लोकजीवनातल्या या संकेतानं पाणी आणि जीवन, पाण्याच्या रूपानं येणारा मृत्यू, मृत्यू आणि काम, जीवन यांचे विविध अर्थबंध यांसारख्या अर्थवलयांचे सूचन होत असल्याचे जाणवले. लोकजीवनातला हा संकेत कितीतरी अर्थवान होत त्यांच्या कवितेत आला आहे. सीतांशुंच्या कवितेत अशा जागा वारंवार भेटतात. भारतीय लोकमानसातल्या खोलवरच्या श्रद्धा, संकेत, प्रतिमा, चिन्हे यांना सर्जनपातळी लाभते. आख्यान परंपरेचे, तसेच पद, दुह्यसारख्या रचनेचे विविध रूपबंध नवार्थतेनं सर्जित होऊन येतात.

सीतांशुंच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भाषेबद्दलची त्यांची जागरूकता! कवितेत आपण अर्थाची पुष्कळता अनुभवत असतो, त्यात कार्यकारणभाव नव्हे तर काव्यात्म संबंध प्रत्ययाला येत असतो. सीतांशुंच्या कवितेत अनेकदा असे दिसते की, भाषेच्या अंगाने कवितेच्या निर्मितीप्रक्रियेत शिरल्याने कवितेच्या आशयाला मर्यादा न येता आशयासाठी बराच मोठा अवकाश आपोआप उपलब्ध होतो. तसेच बोलीतील गतिमानतेने, जिवंत प्रवाहीपणाने शोधासाठी तिला अधिक अवकाश उपलब्ध करून दिला जातो. कवितांतील आशयसूत्रात असलेली विविधता आणि या सर्व आशयसूत्रांद्वारे माणसाचा विचार या वैशिष्टय़ासाठी ते विविध स्तरांतल्या लोकांच्या भाषेचा समुचित, कसून वापर करतात. तीर्थक्षेत्री वंशावळी सांगणाऱ्या पंडय़ाचे संभाषित, संथारो करताना वापरली जाणारी जैनवाणी, मारू गुर्जरी अपभ्रंश, सामूहिक प्रार्थना, बालकथेतील भाषा, बम्बैया हिंदी, वर्तमानपत्री मजकुरातील वस्तुनिष्ठ कथन करणाऱ्या भाषेचा वरपांगी स्तर व त्याखालील स्वप्नसदृश अतिवास्तव, नुकत्याच शिकू लागलेल्या मुलांसाठीची बाराखडी रचना, विद्यापीठातील विद्वतसभेतील कार्यवृत्तांतवजा निवेदन, गुजरातेतील ‘वाघरी’ या समाजाची बोली, पारावर बोलली जाणारी भाषा, कुत्री, गुळाची टाकी, चिता, यंत्रे, पाण्याचा थेंब, रेल्वेगाडी, लहान मुले.. यांसारख्या असंख्य ध्वनी व आवाज यांच्या संमिश्रतेतून त्यांचा भाषापोत घडलेला आहे. त्यातील गतिमानता कविताविषयक लोकप्रिय धारणांना धारेवर धरते. आणि जगण्यातल्या यांत्रिकतेवर, मानवी सभ्यतेच्या गळ्याला नख लावणाऱ्या यांत्रिक दृष्टिकोनावर, कर्मकांडी झुंडीवर मात करायची असेल तर सर्जनशील कल्पकतेची गरजच जणू काही अधोरेखित करते.

कोणतीही साहित्यकृती असो, ती एक शोधयात्रा असते. जगण्यातल्या लहान-मोठय़ा सत्याचा शोध कविताही घेत असते. तिच्यातून प्रतीत होणाऱ्या जगण्याच्या अनुभवातून घडलेल्या लहान-मोठय़ा सत्यांशी निगडित अशा या शोधासाठी प्रतिभा, अंत:स्फूर्ततेची गरज असते. उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘घेरो’ या कवितेत वेढय़ाच्या प्रतिमेसंदर्भात कथनकर्त्यां ‘मी’चे ‘स्व’शी इतस्तत:, स्वैर, वरवर असंबद्ध वाटेल अशा बोलण्याचा मोकळा अवकाश येतो. त्यात ‘या आकाशगंगेच्या खळखळ वाहत्या पाण्याशी माझ्या तहानेचा कसलाच संबंध नाही?’ असा प्रश्न विचारला जातो. या ओळीपाशी थांबत वाचक माणसाला भोगाव्या लागणाऱ्या तुटण्याच्या वेदनेची सत्यप्रतीती घेत अस्वस्थ होतो. सत्याचा शोध हा संपूर्णत: संपून जातो असेही नाही. काही कोडी घट्ट तशीच राहतात, काही उकलतात. वाचकाला नवा अर्थ, नवा स्तर, शोधाची नवी जागा सापडते. कवितेच्या अनेकार्थक्षमतेची खूण पटते व ही शोधप्रक्रिया सुरूच राहते. भारतीय साहित्याचा परीघ वाढवणाऱ्या या कवीने सत्यशोधाच्या या यात्रेत आपल्याला ही प्रतीती दिलेली असते.