29 November 2020

News Flash

‘हमरस्ता नाकारताना’ : काही रोखठोक प्रश्न

‘हमरस्ता नाकारताना’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या संदर्भातील एक वेगळी बाजू..

(संग्रहित छायाचित्र)

अरुंधती देवस्थळे

सुप्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळे यांच्या कन्या सरिता आवाड यांनी लिहिलेल्या ‘हमरस्ता नाकारताना’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या संदर्भातील एक वेगळी बाजू..

आत्मकथनात नेहमीच एकांगी मांडणीचा धोका असतो. काही प्रमाणात तो लेखकाचा हक्कही असतो. पण तसं करताना सत्याचा अपलाप होऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं असतं. कठोर नाही, परंतु थोडंसं आत्मपरीक्षण असावं, माणूस म्हणून हातून झालेल्या चुकांची जाणीव लेखकाला असावी असं वाटतं. अशी पुस्तकं जेव्हा बाजारात येतात तेव्हा संबंधित कुटुंबाविषयी कणभरसुद्धा माहिती नसणारी माणसं लिहिलेलं सगळं खरं मानून बोलू लागतात तेव्हा आपण एका नामवंत, विद्वान व हयात नसलेल्या व्यक्तीवर अन्याय करतो आहोत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर मन:स्ताप लादतो आहोत याचेही भान ठेवले जायला हवे. व्यक्तिगत आयुष्यात केवळ दु:खंच पदरी आलेल्या आईला- सुप्रसिद्ध अभ्यासू लेखिका सुमती देवस्थळे यांना- त्यांच्या मृत्यूनंतर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा आणि त्यावर स्वत:च्या उदोउदोचा झेंडा रोवण्याचा ‘हमरस्ता नाकारताना..’मधील प्रयत्न हा त्या काळाचे साक्षीदार असलेल्या आम्हा कुटुंबीयांना केवळ सोयीस्करपणे सत्य डावलणारा वाटतो. एका सुशिक्षित, सुसंस्कृत व आधुनिक माय-लेकींचे उत्कट संबंध दुरावले याला फक्त ‘जात’च जबाबदार आहे आणि त्यातही चूक फक्त आईचीच आहे, हे खरं नाही.

आयुष्यभर सुमतीबाईंना त्यांच्या लेखन आणि अध्यापनाबद्दल केवळ आदरयुक्त कौतुकच मिळालं. खरं तर त्यांच्या शैलीचं चरित्रलेखन म्हणजे धारदार सुरी. डेफिनिटिव्ह बायोग्राफीचं सच्चेपण आणि त्या व्यक्तीची आणि भोवतालच्या घटनांची सामान्य वाचकांपर्यंत पोहोचेल अशी लालित्याने केलेली उकल हे अभ्यासाइतकंच कौशल्याचं काम. टॉलस्टॉय, श्वाईत्झर, झोला, मार्क्‍स वगैरे विदेशी मंडळी मराठी वाचकांच्या चांगल्या परिचयाची झाली ती तब्येतीची साथ नसूनही  सुमतीबाईंनी झपाटल्यागत केलेल्या कामामुळेच! कुठल्याही समीक्षकांनी वा वाचकांनी त्यांच्या एकाही पुस्तकाबद्दल निर्व्याज स्तुतीव्यतिरिक्त दोषारोप करणारं कधीच लिहिलं नाही. जनमानसातील हे स्थान म्हणजे सुमतीबाईंच्या आयुष्यात त्यांना लाभलेलं घसघशीत सुख! ते सुख शैशवापासून पुढे हयातभर त्यांना केवळ मन:स्तापाच्या डागण्या देत राहिलेल्या लेकीनेच आज त्यांच्या अनुपस्थितीत ओरबाडून घ्यावे, हे दुर्दैवी आहे.

सोदाहरण सांगते : सरिताच्या रमेशशी झालेल्या लग्नाला विरोधाचं कारण केवळ त्याची ‘जात’ हे नव्हतं. सत्य हे आहे की, या लग्नाआधी- १९७४ मध्ये आमच्या कुटुंबात मोठय़ा मावसभावाचा मुंबईत झालेला विवाह हा आंतरजातीय होता; ज्याला सुमतीबाईंचं पूर्ण कुटुंब व सगळे नातेवाईक झाडून हजर होते. सुमतीआत्याने त्याचं केळवणही केलं होतं. त्यामुळे केवळ जातीय कारणास्तव माय-लेकीत तणाव आला, हे खरं नव्हे. तरीही आपण ४० वर्षांपूर्वीच्या सामाजिक स्थितीबद्दल बोलतोय. तेव्हाच्या आमच्या सदाशिवपेठी कुटुंबात ‘जात’ हा मुद्दा होता, हे कोणीही नाकारणार नाही. पण त्याहून मोठे मुद्दे होते ते- रमेशला आयआयटीतून काढून टाकलं जाणं, त्याला धूम्रपानासारखं व्यसन असणं, कुटुंबाची डळमळीत आर्थिक परिस्थिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघांचं कुटुंबातील थोरांशी उद्दामपणे व कायम आक्रमक पवित्र्यात वागणं. आज सर्वाना हा प्रश्न विचारावासा वाटतो, की तुमच्या मध्यमवर्गीय, सुशिक्षित घरात लाडाकोडात वाढलेल्या मनस्वी मुलीने असा जोडीदार निवडला तर तुमच्यात असेल धाडस तिच्या लग्नाला होकार द्यायचं? असेल- तर मग आहे हक्क तुम्हाला सुमतीबाईंची झाडाझडती घ्यायचा. तेंडुलकरांचं ‘कन्यादान’ नाटक आमच्या कुटुंबात घडताना दिसत होतं, ते जातीविषयक पूर्वग्रहाने. या धाकटय़ांकडून घरातल्या तमाम मोठय़ांना होणाऱ्या कास्ट बॅशिंगवरून! कोणाच्याच हातात नसलेल्या बामणीपणावर या जोडप्याने इतके प्रहार केले की असं निष्कारण बोचकारे काढणारं आक्रमण लहानथोरांनी नंतरच्या प्रत्येक विरळ भेटीत का सहन करावं, याचं उत्तर कोणी देईल?

सरिताच्या शैशवातल्या बंडखोरीपासून सुमतीबाईंचं नवं कष्टपर्व सुरू झालं. त्यात आरोप-प्रत्यारोपांत सुमतीबाईंना भावांचा भावनिक आधार जरुरीचा वाटू लागला आणि हेच नेमकं सरिताला डाचत गेलं. ‘आपण विरुद्ध आई’ या संघर्षांत आईच्या बाजूने उभी राहणारी माणसं तिला परकीच नव्हे, तर शत्रूच्या गोटातली वाटू लागली. आणि ही शत्रुत्वाची बीजं तिने आयुष्यभर वागवली- कवचकुंडलासारखी! त्यातूनच ‘मामा आईला प्रसिद्धी लाभल्यावर आमच्याकडे येऊ लागले..’यासारखं गलिच्छ विधान सरिता करून जाते. हे दोन्ही उच्चपदस्थ भाऊ, बहिणीच्या प्रसिद्धीआधीच आपापल्या कार्यक्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवणारे ठरले होते. यातून स्पष्ट आहे की- असा विचार फक्त एक आजारी मनच करू जाणे. पण या आजाराचा त्रास इतरांनी किती सहन करावा?

कायम आर्थिक तंगीशी एकटीच झगडत वाट काढणाऱ्या सुमतीबाईंची लेकीबद्दलची काळजी आणि असुरक्षितता तिला आज इतकी वर्ष उलटल्यावरही कळू नये? लग्नाचं दान मनासारखं पडलं नाही म्हणून सुमतीबाईंनी आयुष्यभर स्वीकारलेली भावनिक उपासमार आणि विजोड जोडप्याच्या नशिबी येणारी अव्यक्त आणि तरी पावलोपावली जाणवणारी अवहेलना नशिबी आलेल्या एका आईनं, तिच्या लाडक्या लेकीसाठी आर्थिकदृष्टय़ा सुस्थित, सुसंस्कृत- म्हणजे थोरांचा मान ठेवणारा, ऋजुतेने नव्याने जोडली जाणारी नाती जाणू पाहणारा, समाजमान्यतेत बसणारा मुलगा जीवाचा आटापिटा करुन शोधावा.. आणि त्यात मुळीच न बसणाऱ्या मुलाला तिने विरोध करावा- हा राईचा पर्वत करण्याएवढा महत्त्वाचा मुद्दा आहे? खरंच? काही मतभेद कालसापेक्ष असतात. विरोधाचं वादळ विरतंच की! माय-लेकींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्याने ती कमी कशी होत जाईल याचा प्रयत्न करायचा असतो. पण ही तेढ जेव्हा नात्यातला कॅन्सर बनते तेव्हा सगळंच संपतं. सुमतीबाईंना शेवटच्या दिवसांतही सरिता नकोशी वाटायची ती या भांडखोर तेढीमुळेच.. जिनं त्यांच्या नात्यातली ओलच शोषून घेतली होती! सरूबाई, दिलीत तुम्ही खुल्या मनाने संधी या नात्याला? ही वादविवादाची प्रचंड खुमखुमी, विखाराने कायमच समोरच्याला धारेवर धरणारे वितर्क, आजारी आईला ‘बिलो द बेल्ट’ मारत राहिलात तुम्ही जन्मभर.. आणि आम्हा सर्वाच्या दुर्दैवाने मरणानंतरही! आयुष्य आणि नात्यांमधील टोमणे म्हणजे केवळ तर्कशास्त्र नसतं, हे तुम्हाला या वयात अपेक्षित असलेल्या परिपक्वतेत कळू नये? तुमच्या लग्नानंतर मनात कडवटपणा असूनही आई कर्तव्याला कधी चुकली? आणि त्या बदल्यात तुम्ही नक्की काय केलंत आईला सुख देण्यासाठी? अंशुमानच्या वेळचं बाळंतपण सुमतीबाईंना प्रकृतीची साथ नसल्याने झेपणारं नव्हतं, पण आईवर आपलेपणाने माया करणं तुम्ही एव्हाना पार विसरून गेला होतात. आईच्या दु:खावर, अपेक्षाभंगावर आपण जाणती फुंकर घालावी हे तुम्हाला कधी जाणवलंच नाही. तुम्हाला जो अन्याय वाटत होता त्याला दुसरी बाजूही होती, हे सत्य कायम आत्ममग्न असणाऱ्या तुम्ही धुडकावून लावलंत. पदोपदी तिरकस बाण सहन करत आलेली, आतून पार फाटलेली, विदीर्ण चेहऱ्याची आई आठवते का तुम्हाला? या विदीर्णतेला आपण आणि आपलं वर्तन किती कारणीभूत आहे असं कधीच वाटलं नाही तुम्हाला? तुम्हाला तिच्या कुटुंबाला प्रिय आणि आदरणीय असलेली तुमची आई कधी समजलीच नाही, की फक्त मूर्तिभंजनाचा आनंद तुम्हाला लुटायचाय? सुमतीआत्या आज असत्या तर ‘सुमती मस्ट डाय’ म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा मरण स्वीकारलं असतं.

सरिताबाई , आज तुमच्या विरोधात तुमच्याच आईच्या बाजूने मला आणि आपल्या इतर कुटुंबीयांना उभं राहावं लागावं यापरतं दुर्दैव नाही. सत्य हे आहे की, तुम्ही जात ही अक्षरश: एका शस्त्रासारखी वापरलीत- सगळ्या कुटुंबाच्या विरोधात. तुम्ही उभयतांनी आई, अण्णा आणि विराजशी जे वर्तन केलंत, त्यातून जी स्फोटक भांडणं झाली, त्याला साक्षीदार आहेत. आणि म्हणूनच दादामामांनी तुम्हाला आईच्या खंगण्याचं मोठ्ठं कारण मानलं आणि तुम्हाला आयुष्यातून वजा केलं. अण्णामामांशी तुमचं वागणं प्रचंड दुटप्पी! त्यांनी आईचं मृत्यूपत्र अंमलबजावणीसाठी तुम्हाला पाठवलं याचा तुम्हाला प्रचंड राग. ते तसे का वागले हे विचारलंत कधी स्वत:ला? त्यांच्यासमोर हार्ट पेशंट असलेल्या त्यांच्या धाकटय़ा बहिणीच्या तोंडावर सिगरेटचा धूर काढून गुदमरून टाकणाऱ्या रमेशचा क्रूरपणा आणि त्याने सुमतीबाईंना लागणारी ढास आठवतेय? बौद्धिक चलाखीने हा सगळा विरोध तुम्ही केवळ ‘सदाशिव पेठ विरुद्ध जात नामक बुजगावणं’ असा मांडताय? त्यात सत्याचा अपलाप आहे. अण्णामामांना ‘मला माफ केलं असेल तर घरी या’ अशी गळ घातलीत आणि वयाच्या सत्तरीत पक्षाघातानं पिडलेले मामा तुमच्यासाठी धापा टाकत तुमच्या घराचे मजले चढले, हे विसरून त्यांच्यावर तुम्ही दोषारोप केलेत.

संपूर्ण पुस्तकात स्वत्वाला कायम गोंजारणाऱ्या आणि नाती फक्त स्वत:च्या सोयीनुसार वापरणाऱ्या लेखिकेनं कधी स्वत:ला स्कॅनरखाली ठेवलंच नाहीये! सिंहावलोकन करताना प्रत्येक कुटुंबीयाच्या लहानसहान दोषांसाठी फटकारे ओढणं आणि आत्मगौरवाची एकही संधी न सोडणं- हे सगळंच घृणास्पद! चुकांचा उल्लेख पूर्णपणे टाळणं आणि मुद्दय़ांना कलाटणी देऊन संदर्भाशिवाय मांडणं, याकरता काय म्हणायचं या लेखिकेला? जातीचं भावलं पद्धतशीरपणे वापरून घेऊन सगळे प्रश्न एका जाडजूड जाजमाखाली ढकलण्यात आले आहेत.

काही  प्रश्न : आज सर्व मामे-मावसभावंडं एकत्र आहेत. तुमचा मात्र अगदी एकाशीही.. सख्ख्या भावाशीही काहीही संबंध नाही, यालाही कारण ‘जात’ की तुमचं काटेरी वर्तन? आनंदबरोबर सहजीवन सुरू केल्यावरही विराज तुमच्याकडे येत-जात असे. त्रिपदीचं त्याने मुक्तकंठाने कौतुक केलं होतं. त्यानंतर संबंध का बिघडले? खरं तर या क्षुल्लक गोष्टी वागण्याचे पुरावे म्हणून समाजासमोर आणाव्या लागताहेत, कारण इथे जातीचं भांडवल केलं जातंय. संपूर्ण पुस्तकात परांडे, देवस्थळे कुटुंबीयांतील कोणाबद्दलही तुम्हाला आदर नसावा? प्रत्येकाच्या वागण्यातली उणीदुणी पुस्तकात ‘उल्लेखनीय’ वाटावीत, हा तुमच्या स्वत:लाच गुणी वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वातला काहीतरी दोष असावा असं नाही वाटत तुम्हाला? या लग्नाने मला आयुष्यभराचा ‘आयडेंटिटी क्रायसिस दिला’अशी कबुली देताना याचा परिणाम जवळच्यांवर काय झाला असणार याचाही विचार आवश्यक नव्हता? आयुष्याच्या अखेरीला ‘तू आता बामनीपणातून मुक्त झालीस’ हे रमेशचं विधानही प्रचंड बोलकं. म्हणजे आयुष्यभर जात तुमच्या सहजीवनातून मुक्त झालीच नाही, अंतर्मनात कायम ठुसठुसत जिवंत राहिली. मग हे एकतर्फी बदल अपेक्षित ठेवणारं हमरस्त्याबाहेरचं लग्न विचारांच्या  कसोटीवर कितपत उतरतं?

‘आईची पुस्तकं ओरिजिनल नाहीत, इकडून तिकडून केलेला रिसर्च..’ असं कौटुंबिक संभाषणात बोलून दाखवणाऱ्या लेकीला आईने पुस्तकाची प्रत नाकारावी हे समजण्यासारखंच आहे ना? आईच्या सविस्तर दोषारोपणामागे नेमकं काय असेल? हे पुस्तक लेखिकेचं पहिलंच पुस्तक- आणि तेही प्रसिद्ध आईच्या आजवरच्या प्रतिमेवर  प्रश्नचिन्ह मांडणारं असल्यामुळे गाजू शकतं; पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. सुमतीबाई आजवर तुम्हाला त्यांच्या पुस्तकांतून भेटत, त्याहीपेक्षा अतिशय प्रेमळ, मनस्वी, चौफेर वाचन आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडल्याने मोठय़ा मनाच्या आणि शीघ्रकोपी असूनही अतिशय संवेदनशील होत्या. परंतु त्यांचं व्यक्तिचित्रण सदोष उद्देशामुळे वेगळंच केलं गेलं आहे.

arundhati.deosthale@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2019 4:14 am

Web Title: hamrasta nakartana sarita awad book review abn 97
Next Stories
1 नाटकवाला : खानदानी अ‍ॅक्टर
2 संज्ञा आणि संकल्पना : खेल खेल में..
3 गवाक्ष : रस्त्याचं ऋण
Just Now!
X