25 November 2020

News Flash

हँगोव्हर!

सेशन हाच आमचा सिनेमा असतो आणि सेशन हेच क्रिकेट. या काळात आम्ही मालिकासुद्धा पाहात नाही. त्यामुळे आमुची मोठी हानी होते.

| March 29, 2015 01:43 am

कोणाचा जीव कोठे रमतो, कोणाचा कोठे!
आमचा जीव मात्र सेशनात रमतो!
सेशन हाच आमचा सिनेमा असतो आणि सेशन हेच क्रिकेट. या काळात आम्ही मालिकासुद्धा पाहात नाही. त्यामुळे आमुची मोठी हानी होते. अभ्यासपूर्ण चर्चेचा एक विषय कमी होतो. परंतु आम्हांस त्याची पर्वा नसते. फार कशाला, सेशन असले म्हणजे मग आम्हांस व्हाटस्यापचेसुद्धा भान राहात नाही. तुम्हांस सांगतो, गेल्या lok01काही दिवसांत आम्हांस का कमी गुडमॉर्निगच्या आणि गुडनाइटीच्या तस्बीरी आल्या? आम्हांस का कमी टिबलक्ष ज्योक आले? (टिबल-क्ष : पक्षी – आपली आवड! काय? आलें ना लक्षांत?) पण त्यातला एक मेशेजसुद्धा आम्ही फॉरवर्डीला नाही. कारण – सेशन!
आता तुम्ही पुसाल, की ये सेशन सेशन क्या है?
तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्यहो, सेशन म्हणजे सर्वसामान्य पत्रकारू-नारू ज्यास विधिमंडळ अधिवेशन म्हणतात तो उत्सौ! आमच्यासारखी पत्रकारितेत मुरलेली, ज्येष्ठजाणती वार्ताहरी मंडळी मात्र सेशनास सेशनच म्हणतात आणि सभागृहास हाउस. कोणी त्यास अधिवेशन, सभागृह असे संबोधत कामकाजाचे समालोचन करू लागला ना, तर जाणत्यांनी खुशाल जाणावे की बकरा कवळा आहे. अजून याचे गोट तयार व्हायचे आहेत. अजून याचे पाय विधान भवनाच्या लॉब्यांस नि बूड
गॅलऱ्यांतील खुच्र्यास सरावायचे आहे.
पूर्वी आमुचेही असेच होते. ना आमदारे ओळखीची होती, ना मिनिस्टरे. प्रेस गॅलरीतून खाली पाहिले की सगळी डोकी सारखीच वाटायची. कामकाजाची समज तर नव्हतीच. क्वेच्चन आवर, झिरो आवर, पॉइंटॉफॉर्डर असे शब्द कानावर पडले की आम्हांस बावचळल्यासारखेच व्हायचे. म्हणजे अनेक दिवस आमचा असाच समज होता, की डिजिटल घडय़ाळी कधी कधी एकसमायवच्छेदेकरून चार चार शून्ये दिसतात. तर त्यांस झिरो आवर असे म्हणतात! पुढे सरावाने सारे जमून गेले. इतके की आता त्याची चटकच लागली आहे. म्हणजे बघा, गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या क्यालेंडरी फक्त तीनच ऋतू उगवतात. हिवाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पी!
तर कळविण्यास अत्यंत दु:ख होते, की यंदाचा अर्थसंकल्पी ऋतू आता संपत आला आहे. अखेरचे काही दिवस उरले आहेत. ते सरले की मग सारे कसे शांत शांत होईल. तो गोंधळ, तो गदारोळ, ते आरोप, त्या टीका, ते टोले, ते चिमटे, त्या उखाळ्या, त्या पाखाळ्या, त्या घोषणा, ते सभात्याग, ती पायऱ्यांवरची फलकबाज निदर्शने, ती चित्रविचित्र पोशाखांतील आमदारांची दर्शने.. सारे सारे संपेल.
त्या दिवशी या विरहविचारानेच आमच्या मनी मळभ दाटून आले होते. हाउसमध्ये देवेंद्रजी फडणवीस,
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, अर्थसंकल्पावरील चर्चेस उत्तर देत होते. त्या चर्चेत आम्हांस तसा काही रस नव्हता. ते आकडे तर आमुचे लघु व गुरू असे दोन्ही मेंदू गदागदा हलवूनच सोडतात. हां, आता त्यांच्याजागी आमचे सुधीरभौ मुनगंटीवारजी असते तर भाग वेगळा होता. त्यात अच्युत्य मनोरंजनाची हमी होती. तिकडे मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होते. घोषणांमागून घोषणा होत होत्या. पुण्याला हे आणि मुंबईला ते. एफेसायचे ते आणि एलबीटीचे हे. एरवी अशा घोषणा म्हणजे वार्ताहरींसाठी भक्कम इंट्रोची अन् दमदार कॉपीची हमी. पण आमचे लक्ष त्यात नव्हते. काळजाच्या गूढगर्भीसारखे सेशनसमारोपाचे उदास काही जीवघेणे विचार पिंगा घालत होते.
पण असे करून चालणार नव्हते. प्रश्न कर्तव्याचा होता. बातमीचा होता. आम्ही पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे कान दिला. ते सांगत होते.. ‘‘टोलबाबतचे सरकारचे धोरण आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. मात्र राज्यातील गोरगरीब जनतेस दिलासा मिळावा यासाठी येत्या १ एप्रिलपासून दारिद्रय़रेषेखालील सर्व कुटुंबांच्या चारचाकी वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्यात येणार आहे.’’
घोषणा महत्त्वाची होती. आम्ही सावरून बसलो. ते बोलत होते.. ‘‘शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटाची सरकारला पूर्ण कल्पना आहे. या संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गारपीट, अवकाळी आणि दुष्काळग्रस्तांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याचा आमच्या सरकारचा विचार आहे.’’
‘‘हे आरक्षण आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यास त्याविरोधात अपील करण्यासाठी म्हणून आमचे सरकार खास अपील महामंडळाची स्थापना करणार आहे.’’
हा अत्यंत क्रांतिकारी असाच निर्णय होता. मुख्यमंत्र्यांचे भाषण रंगत चालले होते.. ‘‘शिक्षण हा काही विनोदाचा विषय नाही. विद्यार्थ्यांना नवे तंत्रज्ञान मिळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे राज्यातील चौथीपर्यंतच्या सर्व मुलांना १४ जून २०१६ पासून मोफत वायफाय आणि व्हाटस्याप पुरविण्यात येणार आहे. यामुळे गळतीची समस्या निश्चितच संपेल.’’
‘‘महाविद्यलयीन शिष्यवृत्तीधारक विद्यर्थ्यांसाठी मोबाइलवरील मोफत डाउनलोडची मर्यादा वाढविणेही सरकारच्या विचाराधीन आहे.’’
व्वा! मनीं आले ही तर आपल्या ग्रामीण आवृत्तीसाठी लीड स्टोरी. आगे बढो देवेंद्रजी!..
‘‘स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधणे हे सरकारचे उद्दिष्ट असून, आता यामध्ये बेघरांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यांना शौचालय बांधण्यासाठी ७० टक्के अनुदान देण्यात येईल.’’        
‘‘त्याचबरोबर शहरी भागात सेलेब्रिटी क्लस्टर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सेलेब्रिटींनी स्वच्छतासेल्फी काढावी अशी ही योजना आहे.’’
‘‘राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठय़ा प्रमाणावर घट झाली असून, उत्पन्नवाढ हे सरकारपुढील एक मोठे आव्हान आहे. हे लक्षात घेऊन यापुढे अर्थसंकल्पीय भाषणावर करमणूक कर लावावा अशी सूचना मा. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. सरकार तिचा गांभीर्याने विचार करीत असून, पुढच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या डीव्हीडी विक्रीस ठेवण्याचाही सरकारचा विचार आहे.’’
घोषणांमागून घोषणा होत होत्या. देवेंद्रजींच्या तडफदार भाषणाने अवघे हाउस गदागदा हलत होते. एवढे, की आमचा तर आसनावरून तोलच गेला..
कसेबसे सावरलो आम्ही. डोळे उघडून पाहिले तर बाजूचा आमचा सहकारी पत्रधर्मास जागून कुत्सित हसत विचारत होता.. ‘‘काय, हँगोव्हर उतरला नाही वाटतं रात्रीचा?’’
इत्यलम्!!     lr10

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2015 1:43 am

Web Title: hangover at assembly session
Next Stories
1 नानाची गोष्ट..
2 थाप!
3 सभा
Just Now!
X