बरोबर एक वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या संपादकवर्गाने सर्वसामान्यांच्या स्वास्थ्याकरिता आयुर्वेदशास्त्राधारे काय मार्गदर्शन आहे, हे सांगण्याकरिता मला लेखनाची संधी दिली.
वर्षभरातील सुमारे २६ लेखांमध्ये आतापर्यंत आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वानाच अत्यावश्यक असणाऱ्या जलपानापासून सुरुवात करून दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल, मध, विविध मद्यप्रकार, तऱ्हेतऱ्हेची धान्ये-कडधान्ये, जवळपास बारा प्रकारच्या पालेभाज्या आणि तेवीस प्रकारच्या फळभाज्यांचा आढावा घेतला. हे लेख लिहिताना मी नेहमीच सर्वसामान्य मराठी बहुश्रुत व वाचनाची रुची असणारा वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेवला. या विविध लेखांत खूप शास्त्रीय परिभाषा टाळून आपल्या दैनंदिन जीवनात, आपले आरोग्य टिकवण्याकरिता व तसेच अनारोग्य समस्या होऊ नये आणि झाल्या तर त्या दूर होण्याकरिता, औषधांव्यतिरिक्त पाणी, धान्य, भाज्या यांचे मानवाकरिता योगदान साध्या व सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. या लेखांचे वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर स्वागत केले हे सांगावयास नकोच. ‘लोकसत्ता’चा वाचकवर्ग खूप मोठा आहे. तो जसा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, सोलापूर, रत्नागिरी अशा लहानमोठय़ा शहरांत आहे, तसाच ग्रामीण भागातही मोठय़ा संख्येने आहे हे अनेकानेक दूरध्वनींमुळे व माझ्या पुणे-मुंबईच्या चिकित्सालयातील प्रत्यक्ष वाचकांच्या भेटीमुळे जाणवले.
एक गमतीदार आठवण वाचकांकरिता आवर्जून सांगत आहे. पुणे मुक्कामी दर गुरुवारी मी सकाळी पुण्याच्या मंडईमध्ये, कारखान्यातील पन्नास-साठ कर्मचाऱ्यांच्या दुपारच्या जेवणाकरिता लागणाऱ्या भाज्या खरेदीकरिता जातो. दीड महिन्यापूर्वी एक फळविक्रेता माझ्या समोर आला. त्याने माझ्या ‘स्वास्थ्य आणि आयुर्वेद’मधील फळभाज्यांच्या लेखांचे खूप कौतुक करून पुढीलप्रमाणे पावती दिली- ‘आपण अनेक पालेभाज्या, फळभाज्या यांची खूपच चांगली माहिती देता. ही माहिती वाचून मराठी वाचक नुसते कांदे, बटाटे रोजच्या भाज्यांकरिता विकत घेण्यापेक्षा विविध फळभाज्या नक्की घेतील, असे आम्हा मंडईवाल्यांना वाटते.’ ही सुखद प्रतिक्रिया ऐकून कोणत्या लेखकाला बरे वाटणार नाही!
ही लेखमाला लिहिताना माझ्यासमोर सर्वाच्या स्वास्थ्याकरिता आत्तापर्यंत सांगितलेल्या धान्ये, कडधान्ये, विविध भाज्यांव्यतिरिक्त पुढील विविध खाद्यपदार्थाचा विचार राहून गेला. आपल्या दैनंदिन जीवनात लहानथोर, श्रीमंत-गरीब रस्त्यावर, शेतावर, खाणीत वा अन्य लहानमोठय़ा कामात असणारे कर्मचारी, श्रमजीवी वर्ग तसेच खूप श्रीमंती लाभलेले भाग्यवान, सर्वानाच रोजच्या जेवणात विविध तोंडीलावणी, चटण्या, कोशिंबिरी हव्या असतात. दिवसेंदिवस सर्वच मराठी माणसात विविध फळांची मागणी व वापर खूपच वाढलेला आहे. जवळपास वीस फळे ही तर सर्वच लहानमोठय़ा शहरांतील मंडी बाजारात, फळबाजारात तुम्हा-आम्हाला खुणावत असतात. नुसती भाकरी, पोळी वा भात खाऊन कोणाचेच समाधान होत नाही. विविध प्रकारच्या भाज्या, आमटी, उसळी, कढण, सार याकरिता जवळपास पंधरा-सोळा मसाल्याचे पदार्थ सर्वच वाणी मित्रांकडे गिऱ्हाइकांची वाट पाहात असतात.
माझ्याकडे अनेक पालक माझ्या ‘प्रिन्स वा प्रिन्सेसची तबियत’ सुधारून द्या, म्हणून आग्रह धरत असतात. ही पालक मंडळी औषधे मागतात. त्यांना औषधे देण्यापेक्षा मी पुढीलप्रमाणे सल्ला देत असतो – ‘ज्यांना आपली मुले जेअेडी ‘जाड’ व्हावीशी वाटतात, त्यांनी आपल्या मुलांचे नित्य सुकामेवा देऊन एलअेडी ‘लाड’ करावेत. अलीकडे सर्वच समाजात श्रीमंत व गरीब, शहरी व ग्रामीण भागात पाव, बिस्कीट, चॉकलेट यांची खूपच चलती आहे. पाव, बिस्किटे, दात बिघडवणारी चॉकलेट्स यांच्यामुळे आरोग्य सुधारते की नाही हे ज्याचे त्याला माहीत, पण पुढील जवळपास वीस विविध सुका मेवा पदार्थ घरी आणून त्यांचे बारीक बारीक तुकडे करून सकाळी नियमितपणे दिले तर आपली मुले उत्तम आरोग्य राखतील, हे मी सांगावयास हवे का? अक्रोड, काकडी बी, काजू, खजूर, खरबूज बी, खारीक, खोबरे, चारोळी, जरदाळू, पिस्ता, बदाम, बेदाणा, मनुका, सुके अंजीर व सुकेळी. काही पालकांना असे वाटते, की हा सर्व सुका मेवा खूप महाग असतो, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. निकृष्ट अन्नदर्जा असणाऱ्या बेकरी संस्कृतीपेक्षा सुका मेवा केव्हाही चांगलाच. घरोघरी आज नाश्त्याला काय व दुपारी मधल्या वेळेत खायला काय करू किंवा डब्यामध्ये लहान मुलांना काय देऊ, असा सर्वच गृहिणींना रोजचा प्रश्न पडतो. त्याकरिता पोहे, चुरमुरे, विविध प्रकारच्या लाहय़ा, डाळे यांची रोचक माहिती सर्वच महिलांकरिता, विशेषत: नव्याने संसारात पदार्पण करणाऱ्या तरुण मुलींना आवश्यक आहे.
आयुर्वेदीय थोर प्राचीन ग्रंथात केवळ आहाराचाच विचार केला आहे असे नसून, विविध ऋतूंमध्ये, कालानुरूप, हवापाण्यात बदल होत असताना आपण कसे राहावे, कसे राहू नये, याचा साधकबाधक विचार केलेला आहे. सर्व जगभर अलीकडे एकमेकांच्या हिताकरिता खूपच उपकारक माहितीची देवाणघेवाण होत असते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी, मानवाचे सामान्य आयुष्यमान पन्नास समजले जायचे. आत्ताच्या आधुनिक जगात जीवनमान खूपच वाढले आहे. समाजातील खूप मोठा वर्ग वयाची ऐंशी सहज गाठतो. आता अशा सर्वच ‘युवावृद्धांना’ आपण शंभरी गाठली पाहिजे असे साहजिकच वाटते. दीर्घायुष्य किंवा शतायुषी जीवनाकरिता ठोस उपाय काय, हा प्रश्न सर्वत्र चर्चिला जातो. त्याकरिता आयुर्वेदिक ग्रंथांच्या आधारे खूपच विचारांची, सोप्या, सुलभ उपायांची देवाणघेवाण करता येते. शतायुषी व्हा!    (समाप्त)