News Flash

जागू मैं सारी रैना..

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांनी नुकतेच (१३ सप्टेंबर) सहस्रचंद्रदर्शनाचे आवर्तन पूर्ण करून वयाची ८१ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या सांगीतिक प्रवासावर

| September 15, 2013 01:02 am

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांनी नुकतेच (१३ सप्टेंबर) सहस्रचंद्रदर्शनाचे आवर्तन पूर्ण करून वयाची ८१ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या सांगीतिक प्रवासावर टाकलेला झोत..
स्व रमयी गानप्रभा डॉ. प्रभा अत्रे. जीवनभर स्वरसाधनेचं व्रत घेतलेली एक स्वरयोगिनी. अलिप्तपणे वावरणारं अभिजात भारतीय संगीतातलं एक प्रतिभावंत, रसिलं व्यक्तिमत्त्व. गेली जवळजवळ ६० वर्षे रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणारं आणि बुद्धीला आवाहन करणारं गाणं पेश करणारी चतुरस्र कलावती. संगीताशी एकरूप झालेली प्रभाताईंची ध्यानस्थ मूर्ती तसेच सर्वसामान्यांनाही शास्त्रीय संगीताची गोडी लावणारी त्यांची गानप्रस्तुती यामुळे जाणकारांसह सामान्यांपर्यंत सर्वानाच हव्याहव्याशा वाटतात.
संगीताचा कुठलाही वारसा नसताना, घरात संगीताचं वातावरणही नसताना प्रभाताईंनी आपले गुरूवर्य सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर गेल्यानंतरसुद्धा एकलव्याप्रमाणे आपली संगीतसाधना सुरूच ठेवली. त्यांच्या सांगीतिक वाटचालीचा हा टप्पा कित्येकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
विज्ञान व कायद्याची पदवी. संगीतात डॉक्टरेट. डॉक्टरेटचा विषयही अगदी वेगळा-  सरगम : एक सशक्त सांगीतिक सामग्री’!  प्रभाताई म्हणतात, संगीत क्षेत्रातील कोणतंही शोधकार्य हे संगीताचं प्रकटीकरण, प्रस्तुतीकरण समृद्ध करणारं असावं. उच्च शिक्षणामुळे त्यांच्यात परंपरेकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती तसेच त्यात जाणीवपूर्वक बदल करण्याचं धाडसही आलं. परंपरेशी प्रामाणिक राहून नवीन वाटा शोधत प्रभाताईंनी आपली स्वतंत्र गायनशैली लोकप्रिय केली. त्यामुळेच त्यांनी गायलेले ख्याल, ठुमरी, भजन, गझल असे सर्व घाट त्यांचा असा खास प्रभा’रंग घेऊन येतात.
प्रभाताईंच्या ख्याल सादरीकरणात रागस्वरूपाचे नवे पैलू धुंडाळणारी रसपूर्ण सांैदर्यदृष्टी आढळते. अतिविलंबित ते अतिद्रुत असा लयीचा वापर.. कधी लयीसोबत जाणारी, तर कधी जाणीवपूर्वक लयीचा हात सोडून मुक्त वावरणारी कलाकुसरीची, स्वरकणांनी युक्त मिंड.. भावपूर्ण, सुकूनभरी आलापी.. बंदिशीतील शब्दांचे सुस्पष्ट, नादमय सांगीतिक उच्चार.. विलंबित ख्यालाच्या बंदिशीचा केवळ स्थायीचा वापर करून सांगीतिक अमूर्ततेचा साधलेला अनोखा परिणाम.. सौंदर्याचा परमोत्कर्ष गाठणारी, वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण आकृत्या रंगवणारी, भावनेनं ओथंबलेली अभिनव सरगम.. माधुर्य कायम ठेवून येणारी वैविध्यपूर्ण, वेगवान तान असे प्रभाताईंचे अत्यंत सुंदर सादरीकरण असते.  
ख्यालानंतर येणारी प्रभाताईंची ठुमरीही आपलं खास वैशिष्टय़ घेऊन येते. ती ऐकताना उत्तरेतली पूरब-पंजाब शैलीची नजाकतीची ठुमरी एवढय़ा उंचीवर नेऊन ठेवणारी ही गायिका महाराष्ट्रात जन्मलेली, वाढलेली आहे यावर क्षणभर विश्वासच बसत नाही. प्रभाताईंच्या ठुमरीमध्ये नखरा आहे, दर्द आहे, चैन आहे. ती खानदानी आहे. कोठीवरच्या ठुमरीपेक्षा ती वेगळी आहे. त्या म्हणतात, पहिला स्वर लावल्याबरोबर कळलं पाहिजे, की ही ठुमरी आहे. नुसत्या हरकती घेतल्यानं ठुमरी होत नाही. तिचं मर्म आहे ते तिच्या विशिष्ट दर्दभऱ्या शब्दफेकीत, स्वरबांधणीत आणि स्वराविष्कारांमध्ये.’ प्रभाताईंचं गझलवरही असंच खास प्रेम आहे. त्यांनी गझल गायली तीदेखील स्वत:च्या अनोख्या ढंगात.
भारतीय संगीतात प्रत्यक्ष कलाप्रस्तुती करणाऱ्या फारच थोडय़ा कलाकारांनी आपले विचार लिखित स्वरूपात समर्थपणे आणि नेमक्या पद्धतीने मांडले असतील. प्रभाताईंनी संगीतावर लिहिलेल्या पुस्तकांनी भारतीय संगीत वाङ्मयात अनमोल भर घातली आहे. या पुस्तकांची भारतातील आणि भारताबाहेरच्या अनेक भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. बदलत्या काळाचं परंपरेशी नाते सांगणारे त्यांचे तर्कसंगत, सुस्पष्ट विचार वाचकांवर प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाहीत.
प्रभाताईंनी मधुरकंस, शिवकली, अपूर्वकल्याण, तिलंग भैरव, दरबारीकंस, पटदीप मल्हार असे काही नवीन राग रचले आहेत. त्या म्हणतात, नवीन राग निर्माण करणं फारसं कठीण नाही. पण प्रस्थापित रागात नावीन्य आणणं अतिशय कठीण असतं.’ भारतीय संगीतरचनाकारांमध्ये प्रभाताईंचं आपलं असं विशिष्ट स्थान आहे. त्यांच्या बंदिशींमध्ये शब्दांची नादमयता, राग आणि घाट यांचं नेमकं दर्शन, लय- तालाचा विचार, त्याचबरोबर कर्नाटकी शैलीची गमक आणि सरगम यांचा अनोखा स्पर्श अशा अनेक गोष्टी समोर येतात. त्यांच्या बंदिशींची पुस्तकं संगीतक्षेत्रात लोकप्रिय आहेत.
किराणा घराण्याच्या भीमसेन जोशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ गायक मंडळींच्या पश्चात आज या घराण्याची जबाबदारी प्रभाताई समर्थपणे पेलत आहेत. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता गेल्या काही वर्षांपासून प्रभाताईंच्या गायनाने होते आहे.  भीमसेनजींनंतर त्यांना हा मान मिळाला आहे.
प्रभाताईंनी अनेक शिष्यांना भरभरून शिकवलं. काहींना घरी ठेवूनही शिकवलं. आजही पुणे-मुंबई अशा दोन्ही ठिकाणी त्या शिष्यांना मार्गदर्शन करत आहेत. कोणतीही शासकीय वा अन्य कुणाची मदत न घेता गुरू-शिष्य परंपरा आणि विद्यापीठीय शिक्षा यांचा समन्वय साधणारं स्वरमयी गुरुकुल’ त्यांनी पुण्यात सुरू केलंय. जगभरातून येणारे शिष्य तिथे शिकत आहेत.
प्रभाताईंच्या गाण्यात सहजता आणि प्रसन्नता यांचा अनोखा मेळ आहे. सुध-मुद्रा, संयमित हावभाव, साथीदारांशी, रसिकांशी सन्मानपूर्वक वागणूक, गाणं चालू असताना मध्येच बोलणं वगैरे रसभंग करणाऱ्या गोष्टी न करणं, कार्यक्रम वेळेवर सुरू करणं- अशा अनेक गोष्टींमुळे प्रभाताईंची मैफल रसिकांच्या अंतरीची ठेव बनते.  
एक महान कलाकार असण्याबरोबरच प्रभाताईंचं व्यक्ती म्हणून संवेदनशील असणं, नम्र असणं, लहान-मोठय़ा सर्वाशीच आदरानं वागणं.. हे त्यांना आणखीनच मोठं बनवतं. प्रभाताईंचं समाजकार्यही मोठं आहे. गेली अनेक दशकं त्यांच्या वडिलांनी उभ्या केलेल्या शिक्षणसंस्थेची त्या समर्थपणे जबाबदारी पार पाडत आहेत. त्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागतो. त्या म्हणतात, समाजाकडून नुसतं घ्यायचं नसतं, आपणही आपलं तन-मन-धन त्याला द्यायचं असतं.’
प्रभाताईंच्या संगीतक्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय कालिदास सन्मान, टागोर अकादमी रत्न अशा अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी विभूषित केलंय. जगद्गुरू शंकराचार्यानी गानप्रभा’, तर प्रभाताईंच्या अमृतमहोत्सव प्रसंगी रसिकांनी त्यांना स्वरयोगिनी’ या सार्थ विशेषणांनी गौरवलंय.
आपल्या संपूर्ण सांगीतिक कारकीर्दीतील प्रवासाबद्दल प्रभाताई लिहितात, साधनेच्या वाटेवर मी एकटी चालत असले तरी असंख्य हितचिंतक, रसिक आणि शिष्य यांचा कारवाँ माझ्याबरोबर आहे.’ प्रभाताईंच्या सहस्रचंद्र वर्षांचं हेच संचित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:02 am

Web Title: hindustani classical vocalist dr prabha atre
Next Stories
1 कॉफी हाऊस
2 सूरा मी वंदिले..
3 लाचखोरी: ब्रिटिश आणि मोगल बादशहाची!
Just Now!
X