25 January 2020

News Flash

निसर्गाच्या लाडात वाढलेली कविता

नलेश पाटील यांच्या काही समकालीन समानधर्मी कवीमित्रांनी त्यांच्या कवितांची मौलिकता संक्षिप्त स्वरूपात पुस्तकात विशद केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रमण रणदिवे

‘निष्पर्ण वृक्षालाच आपले घरटे समजून

एक भटके पाखरू त्यात अंडे घालून निघून गेले.

चारा भरल्या चोचीने व वारा भरल्या पंखाने ते परत आले.

तेव्हा त्यास अंडय़ाच्या जागी एक चिमणे पान दिसले.

आनंदाने बेहोष झालेले ते इवलेसे पाखरू

क्षणाचाही विलंब न लावता,

झाडाच्या प्रत्येक फांदीवर अंडी घालत सुटले.

पाहता पाहता झाडाचे घरटे हिरव्या

चिवचिवाटात बुडून गेले!’

दिवंगत नलेश पाटील या सुप्रसिद्ध निसर्ग- कवीच्या ‘हिरवं भान’ या कवितासंग्रहातील ही एक कविता. उत्कृष्ट  निर्मितीमूल्य असणारा हा देखणा संग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. संग्रहात एकूण १६३ कविता आहेत.

नलेश पाटील हे महाराष्ट्राला निसर्ग कवी म्हणून परिचित आहेत. त्यांचा हा संग्रह म्हणजे तपश्चय्रेच्या वाटचालीतील वाढत्या प्रतिभेचा शब्दोत्सव आहे. साधी-सोपी भावमधुर शब्दकळा, मोहमयी प्रतिमा हे या कवितांचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. वाङ्मयीन गुणवत्तेच्या निकषांवर ही कविता नि:संशय श्रेष्ठ आहे.

नलेश पाटील यांच्या काही समकालीन समानधर्मी कवीमित्रांनी त्यांच्या कवितांची मौलिकता संक्षिप्त स्वरूपात पुस्तकात विशद केली आहे. झाड, गाणे आणि पक्षी सर्वानाच माहीत असतात. ते जीवनाच्या पसाऱ्यातच असतात. त्यातूनच कवितेचा जन्म होतो. एका सृजनातून दुसरे सृजन निर्माण करणे हे आणखी कठीण काम असते आणि त्याकडे पाहण्याची सृजनशील मानवी दृष्टी असणे अधिक आव्हानात्मक असते. नलेश पाटील  यांना ते लीलया साधले आहे. गोड आवाजाची देणगी त्यांना जन्मत:च लाभली होती. आपली रचना तरन्नूममध्ये पेश करताना त्यांचे सूर अर्थाचा प्रकाश बाहेर टाकीत असत. यामुळेच त्यांची कविता कानावाटे थेट काळजात उतरत असे.

शब्दांना स्वत:ची चाल असते. अर्थालाही स्वत:ची ढाल असते. तशीच नि:शब्दतेलाही आशय संपन्नता असते. संवादाची क्षमता गाण्याएवढी क्व चितच लोकाभिमुखही असते, म्हणूनच कविता, आनंद आणि गाणे  यांचा ऋणानुबंध दीर्घकाळ चाललेला असतो.

चंद्रप्रभेची शीतल शाई वापरून जर्द उन्हाच्या पानावर छायेच्या कविता लिहिणारा हा कवी अर्पण पत्रिकेत लिहितो –

‘दिव्य सभा ही अंतरातली जिथे मी माझी नाळ शोधतो

सर्जनाच्या या नदीत माझ्या, सोन्याचा पिंपळ

सळसळतो

सोनेरी सावलीत ज्याच्या अजान वृक्ष समाधी घेतो

त्या कवितेचा जन्म माउली तुझ्या मनी मी सोडून देतो.’

इतर कवितांमधील काही ओळी –

‘पानापानात रानाच्या कानात

कुजबुज ओली हिरवी झाली

ढगाने माखीत आभाळ चाखीत

पाखरे पाऊस खुडत गेली’

किंवा

‘काठ बोले हिरवा होऊनी अंग तुझे हे कसे निळे?

पाणी बोले अरे लव्हाळ्या नको विचारु प्रश्न खुळे ’

यांसारख्या तरल निसर्ग कविता कुणाही रसिकाचे मन प्रसन्न करणार नाहीत, तरच नवल.

‘झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ

पोपटी स्पंदनासाठी कोकीळ होऊनी गाऊ’ अशा अनेक आशयघन कविता या संग्रहात आहेत. केवळ निसर्गाचे वर्णन नाही, तर निसर्गाशी तादात्म्य पावून माणसाचे त्याच्याशी असलेले आदिम नाते पाटील यांच्या कवितेतून असे अलवारपणे उमटलेले दिसून येते.

याशिवाय स्त्रीलावण्याच्या, पावसाच्या, चातकाच्या, घराच्या आणि कवितेवरही त्यांनी लिहिलेल्या अनेक कविताही या संग्रहात आहेत. त्या सर्वच दर्जेदार आहेत.

‘पावसाचे थेंब पानावर उतरताच पानाला दिसू लागते.

ओल्या नजरेने पान रानाचे मन न्याहाळते.

रानात सावळे मेघ रिमझिमतात.

अथांग समुद्र डोंगरकन्येला म्हणजे नदीला पळवतो.

उधाणलेल्या सागराचे भान हरपते.

क्षितिजाच्या कडेवर तान्हुले आभाळ खेळते.

किनाऱ्याच्या अधरांवर दुधाचे थेंब

ओघळतात.

जळाचे निळेपण मातीच्या भेटीला येते.

ऋतू तिला हिरवे लुगडे देतो.

लुगडय़ाला गाठ मारुन त्याच्या पदराला तळे

बांधतो.

पदरातला तरंग सल होता होता उतू जातो.’

अशा सुरेख कल्पना नलेश पाटलांच्या समग्र कवितेत येतात. कवी निसर्ग निरीक्षणाशी समरस होतो. उत्कट अनुभूतीला देखणा चेहरा देतो. जगाच्या रंगभूमीवर सानंद वावरणारा कल्पनातीत निसर्ग डोळ्यांच्या परडीत  भरून घेतो.

नलेश पाटील जगण्याची नव्हाळी निसर्गात शोधतात. शब्दांची अर्थघनता, नादमयता त्यांच्या प्रातिभ अवकाशावर प्रसन्न असते. जमिनीतून झरा पाझरत यावा तशा प्रगल्भ जाणिवा त्यांच्या कवितेच्या बेटावर येतात. आशयसंपन्न शब्दही अविलंब धावत येऊन ओळीतल्या जागा पटकावतात.

वाऱ्याच्या मंद झुळुकेतून कवीला वीणेचे स्वर ऐकू येतात. झाडाच्या मुळाशी असणारे हिरवे स्वप्न त्याच्या डोळ्यांना दिसते. आभाळभर हात पसरून झाडे पावसासाठी प्रार्थना करतात. प्रार्थनेतील अनादी स्वरांच्या नेपथ्याला मानवी संवेदना झंकारत असतात. कवी झाडांचे मानवीकरण करून रसिकांना निसर्गाच्या अंगणात नेतो. निसर्गही कवीच्या शब्दांना आपल्या अंगाखांद्यावर खेळायला आनंदाने संमती देतो.

मनापासून केलेली झाडांची प्रार्थना आसमंतालाही कळते. करुणाघन विरघळतात. अलगद धरणीवर उतरतात. फांद्यांचे हात हलवून झाडे स्वागत करतात. उनाड वारा फांद्यात अडकलेल्या वाळलेल्या पानांशी दंगामस्ती सुरू करतो. धुळीला मनस्वी राग येतो. ती वाऱ्याच्या दिशेने धावते. वारा तिच्याही झिंज्या धरून तिला जमिनीवर आपटतो. पसारही होतो.

निसर्गाचे असे सूक्ष्म निरीक्षण समर्पक प्रतिमा प्रतिकांसह कवितेत येते. या प्रतिमा संवेद्य तथा इंद्रियगोचर होतात. नलेश पाटील प्रतिभेच्या फांदीवर परिश्रमांची घरटी बांधतात. त्यांच्या मदतीला साधनाही धावून जाते. तेज, आनंद, चतन्य असा त्रिवेणी संगम पाटील कवितेच्या रंगात, अंतरंगात किंबहुना रक्तकल्लोळात नाचवतात.

पानाफुलात तथा कणसातही त्यांना विश्वात्मक भाव दिसतो. रोज उगवणाऱ्या सोनपिवळ्या उषेच्या तळहातावर कवी नलेश पाटील यांना देवाने लिहिलेली निसर्गाची नितांतसुंदर स्वाक्षरी दिसत असेल काय?

हिरवं भान – नलेश पाटील

पॉप्युलर प्रकाशन,

पृष्ठे- १६३,  किंमत-  ३२५  रुपये

First Published on September 8, 2019 2:07 am

Web Title: hirava bhan by nalesh patil poems collection abn 97
Next Stories
1 ज्ञानशील कलावंतांचे नेतृत्व
2 नाटकवाला : ‘करोडो में एक’
3 संज्ञा आणि संकल्पना : मन वढाय वढाय..
Just Now!
X