|| पंकज भोसले

१९५० च्या दशकापासून अतोनात वाचकप्रिय ठरलेले कादंबरीकार चंद्रकांत काकोडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आज (२१ मार्च) सुरू होत आहे. ‘दो रास्ते’सारखे हिंदी व काही मराठी गाजलेले चित्रपट त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारीत होते. ‘श्यामा’ ही त्यांची कादंबरी अश्लीलतेच्या खटल्याने वादग्रस्त ठरली. ‘शृंगारिक लेखक’ म्हणून त्यांच्यावर शिक्का मारून त्यांना मोडीत काढण्यात आले. बहुप्रसवी लेखन करूनही त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये साहित्यिक मूल्ये होती; जी हेतुत: दुर्लक्षिली गेली. या उपेक्षित लेखकाचे त्याच्या जन्मशताब्दी वर्षात तरी उचित मूल्यमापन होईल का?

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती
beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

‘दो रास्ते’ हा राजेश खन्ना आणि मुमताज अभिनित चित्रपट चंद्रकांत काकोडकरांच्या ‘नीलांबरी’ कादंबरीवरून तयार केल्याचे कळाले तेव्हा धक्काच बसला होता. राजेश खन्नाला बॉलीवूडमध्ये स्टारपदाचा दर्जा देणारा, किशोरकुमारचे ‘मेरे नसीब में ए दोस्त’ आणि इतर अनेक हिट् गाणी असलेला हा चित्रपट या नायकाला ‘काका’ हे बिरूद देणारा म्हणूनही ऐतिहासिक मानला जातो. राजेश खन्नाचा सलग पंधरावा ‘ब्लॉकबस्टर हिट्’ चित्रपट एका मराठी कादंबरीवरून निघाला, हे न पचणारे होते. ‘विकी’कोशात पडताळा घेण्यासाठी गेल्यानंतर आणखी एक धक्का बसला. या चित्रपटाला ‘फिल्मफेअर’ची सात नामांकने होती. बिंदिया चमकेगी’ या कालजयी गाण्यापासून ते संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी, दिग्दर्शक राज खोसला या दिग्गजांसह सर्वोत्कृष्ट कथेसाठी चंद्रकांत काकोडकर यांना ही नामांकने होती. त्यातही विशेष म्हणजे इतर कुणालाही पारितोषिक मिळाले नसताना सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मात्र चंद्रकांत काकोडकर यांना मिळाला होता. हा सन्मान केव्हाचा? तर ज्या वर्षी ‘श्यामा’ कादंबरी सर्वोच्च न्यायालयाने अश्लीलतेच्या आरोपातून मागे घेतली, त्या १९६९ सालचा! त्या काळापुरता तो खटला गाजला असावा. पण त्यानंतर सामूहिक विस्मृतीची इतकी पुटे त्यावर चढवली गेली, की काकोडकरांना शृंगारिक लेखक आणि लोकप्रिय लेखक म्हणत बाजूलाच ठेवले गेले.

श्री. दा. पानवलकरांच्या ‘सूर्य’ कथेवर ‘अर्धसत्य’ बनल्याची जितकी मराठी साहित्यविश्वात माहिती असते, तितकी काकोडकरांच्या कादंबरीवर ‘दो रास्ते’ बेतल्याबाबत नसते. हेच कशाला, काकोडकरांच्याच ‘अशी तुझी प्रीत’ या कादंबरीवरून ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ हा चित्रपट निघाला होता. त्याची पटकथा ग. रा. कामत आणि हिंदीतील एक लोकप्रिय कादंबरीकार राज भारती यांनी काकोडकरांसह लिहिली होती. काकोडकरांना या चित्रपटासाठीही सर्वोत्कृष्ट कथेचे नामांकन मिळाले होते, हा तपशीलही आमच्या पिढीला खरा असेल असे वाटत नाही. ‘धाकटी बहीण’, ‘लक्ष्मी आली घरा’, ‘यंदा कर्तव्य आहे’ हे मराठीतील गाजलेले चित्रपटही त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारीत असल्याच्या नोंदी खूप शोधल्यानंतर सापडतात.

एका राज्यात एकाच वेळी लोकप्रिय आणि निषिद्ध ठरविल्या गेलेल्या चंद्रकांत काकोडकरांविषयी साहित्यिक व्यासपीठांनी गैरसमजच अधिक पसरविले. या गैरसमजुतींनीदेखील त्यांच्या संख्यात्मक वाचकांत घट झाली नाही. गुणात्मक वाचकांनी त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या आणि त्या आवडल्या असल्या तरी सार्वजनिक ठिकाणी ‘आपण काकोडकर वाचतो’ याची कबुली देणे कमीपणाचे वाटून घेतले. नव्वदीतल्या सर्व पिढीवर साहित्यातील अमुक लेखक वाचण्याची यादी लादली गेली, तेव्हा त्यात काकोडकरांच्या कादंबऱ्या प्रकाशवर्षे दूरच ठेवण्यात आल्या. प्राध्यापकांनी चंद्रकांत काकोडकरांचे नाव हे फक्त ‘श्यामा’ कादंबरीवरच्या खटल्यापुरतेच आपल्या डोक्यात विद्यार्थ्यांपुढे माहितीचेंडू टोलविण्यासाठी वापरले. प्रत्यक्षात ही कादंबरी मिळवून वाचण्याची तसदी न घेता किंवा काकोडकरांच्या इतर कादंबऱ्यांतील शृंगारवर्णनांची न वाचताच खिल्ली उडविण्याची टूम त्यावेळी निघाली.

१९६९ साली ‘श्यामा’ खटल्यातून काकोडकरांना निर्दोष ठरविण्यात आले. आरोपातून सुटलेल्या ‘श्यामा’ कादंबरीची १९७१ साली सुधारलेली आवृत्ती आली; ज्यात कादंबरीच्या दुप्पट ऐवज हा या कादंबरीवरच्या पाच वर्षांतील खटल्याच्या सर्व तपशिलांनी भरला आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन लेखन स्वातंत्र्याचा सन्मान करून घेणारी ही कादंबरी आहे. पण या कादंबरीची पुढची आवृत्ती काढण्याची तसदीही नंतर प्र्रकाशकांनी घेतली नाही. १९७१-७२ या कालावधीतच संपलेली या कादंबरीची पुढची आवृत्ती काढण्याकडे काकोडकरांनी दुर्लक्ष करण्याबाबत त्यांचे नंतर वाढलेले लेखनव्याप कारण होते. पण ज्या वाचकांनी त्यांच्या कादंबऱ्यांची पारायणे केली, ज्या प्रकाशकांनी त्यांच्या कादंबऱ्यांवर भरपूर पैसा कमावला, त्यांनाही ‘श्यामा’चे ऐतिहासिक महत्त्व समजले नाही, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

१९६९ साली जयवंत दळवी यांनी काकोडकरांची विस्तृत मुलाखत घेतली. ‘सुप्रीम कोर्टापर्यंत एकाकी लढणारा सव्वाशे कादंबऱ्यांचा लेखक : चंद्रकांत काकोडकर’ या  शीर्षकाने ‘ललित’ मासिकात ६९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात ती छापून आली. काकोडकरांच्या बालपणीच्या वाचनापासून ते सुुरुवातीच्या लेखनाचे सारे तपशील त्यात आहेत. ते शृंगारिक लेखनाकडे का वळले, याची त्रोटक माहितीही आहे. या मुलाखतीला दळवींनी आपल्या साहित्यिक मुलाखतींच्या पुस्तकामध्ये का समाविष्ट केले नाही, हे कोडे आहे. पण या मुलाखतीची खरी मौज आणखीच निराळी आहे.

‘अबकडई’चे संपादक आणि लेखक चंद्रकांत खोत यांनी या मुलाखतीचा मोठा भाग (व इतर मुलाखती) आणि अन्य लेखांतील भाग एकत्रित करून ‘एका अश्लीलतेचा अंत’ या नावाचा ‘काकोडकरांचा निवेदनात्मक लेख’ १९८५ च्या दिवाळी अंकात मोठ्या खुबीने तयार केला. १९८८ साली काकोडकरांचा मृत्यू झाला. ‘ललित’ मासिकाच्या १९८९ च्या आरंभीच्या अंकात दळवींनी २० वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखतीचाच आधार घेऊन काकोडकरांवर मृत्युलेख लिहिला. एकाच मुलाखतीवरून तयार झालेला एक लेख खोतांच्या शैलीतून उतरलेला, तर दुसरा जयवंत दळवींचा! काकोडकरांना जाणून घेण्यासाठी ‘जनुकीय बदल करून’ फिरविलेले हे लेख इतकीच संदर्भमर्यादा आज उपलब्ध आहे, हीदेखील समीक्षक, वाचकांची लोकप्रिय लेखकाप्रती अनास्था दर्शविणारी बाब होय.

वास्तविक १९७० च्या दशकात आपल्या भोवतालच्या लेखक-समीक्षकांना असूया वाटावी इतका तरुण-तरुणींचा वाचकवर्ग काकोडकर यांनी जोडला होता. त्यांच्या कादंबऱ्यांतील शृंगाररसासह त्यातील नायक-नायिका मांडत असलेले जीवनविषयक प्रगत विचार घेण्याचे कामही तत्कालीन तरुण पिढी करीत होती. अन् या बाबीकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारा बुजुर्ग वर्ग त्यांचे काहीएक न वाचताच त्यांच्याविषयीचे मत कलुषित करण्यात पुढाकार घेत होता.

पोर्तुगीजांकडे गोवा असल्याच्या काळापासून गोवामुक्ती संग्रामाचे तपशील पुरविणाऱ्या त्यांच्या आरंभिक कादंबऱ्यांपासून चित्रपटीय शैलीतील कौटुंबीक तसेच तरुण-तरुणींच्या हृदयास हात घालणाऱ्या कादंबऱ्या, मुंबई-पुण्यात घडणाऱ्या फक्त विनोदी कादंबऱ्या, ‘राजाराम राजे’ या नायकावरील शंभरच्या आसपास पुस्तके, दहा हजार खपांचे ‘चंद्रकांत’ आणि ‘काकोडकर’ हे दिवाळी अंक… आणि प्रत्येक दिवाळी अंकात चार-पाच ताज्या कादंबऱ्या… अशा विक्रमी वेगात काकोडकरांनी साहित्य प्रसविले. तेही अनेक वर्षे नोकरी सांभाळून. मॅट्रिक झाल्यापासून त्यांनी ‘सायझिंग मटेरियल्स’ या मुंबईतील कंपनीत नोकरी धरली होती. १९७०-७२ पर्यंत त्याच कंपनीत ते सेल्स टॅक्स खात्याचे प्रमुख होते. पुढे त्यांच्याकडे कादंबऱ्यांची मागणी इतकी वाढली, की नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ लिहिण्यासाठी स्वत:स वाहून घेतले, अशी माहिती त्यांचे पुत्र श्वेतांक काकोडकर यांनी दिली.

शरश्चंद्र चटर्जी आणि साने गुरुजी या दोहोंच्या वाचनातून उतरलेले शब्दद्रव्य आणि शैली काकोडकरांच्या ‘निसर्गाकडे’ (१९४४) या त्यांच्या पहिल्या कादंबरीत उतरली आहे.  १९४२ च्या ‘चले जाओ’ चळवळीत भारावून गेलेल्या भारतीय तरुणांचा सहवास त्यांना लाभला होता. तो त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये झिरपलेला दिसतो. ‘श्यामा’ कादंबरीतील निशिकांत कदम याच्या जीवनाचा एक भाग १९४२ च्या चळवळीतला आहे. या चळवळीच्या काळातच त्याचे प्रेमप्र्रकरणही घडताना दिसते. पहिल्या कादंबरीचे छान स्वागत झाल्यानंतर त्यांनी ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी?’ (१९४८) ही दुसरी कादंबरी छापायला दिली. आपापल्या राज्यात बसून देशाची चिंता करणाऱ्या तरुणांची फौज या काळातील वातावरणाने तयार केली होती. काकोडकरांनी थेट बंगालमधील दुष्काळ हा आपल्या कादंबरीचा विषय केला. बंगालमध्ये ते काही गेले नव्हते. त्याविषयी वृत्तपत्रांत वाचून त्यांचा पुष्कळ अभ्यास झाला होता. शरश्चंद्र चटर्जींच्या बंगाली कादंबऱ्या मराठीतून पारायण करीत वाचल्यामुळे त्यांचा तिथल्या परिसराचा, भौगोलिक वर्णनांचा परिचय झाला होता. ‘‘बंगालमध्ये भयंकर दुष्काळाची चिन्हं स्पष्ट दिसत असूनही धनधान्य, कपडालत्ता वगैरे जीवनोपयोगी सर्व साधनं ब्रिटिश लोक इंग्लंडला घेऊन जात होते. हे सारं कुणासाठी होतं? आपल्या स्वातंत्र्यासाठी का? नाही. आपल्या सैनिकांनी युद्धआघाड्यांवर प्राणसमर्पण केले आणि बंगालच्या तीस लाख जनतेचे जे बलिदान करण्यात आलं ते आमच्या स्वातंत्र्यासाठी तर नव्हतंच नव्हतं. ते सारं ब्रिटनच्या स्वातंत्र्यासाठी- स्वार्थासाठी- साम्राज्यासाठी होतं. म्हणूनच प्रस्तुत कादंबरीला हे उपहासगर्भ नाव दिलं आहे…’’ असं काकोडकरच या कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहितात.

अर्वाचीन मराठी साहित्याचा चिकित्सक आढावा घेणाऱ्या ‘प्रदक्षिणा’ ग्रंथाच्या १९८० च्या सुधारित आवृत्तीतही या काळात मर्ढेकरांनी, पेंडशांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचा उल्लेख येतो, पण काकोडकरांच्या ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी?’चा नामोल्लेख टाळला जातो. कारण सत्तरोत्तरीतील समीक्षकांना काकोडकर हे केवळ शृंगारिक कादंबऱ्यांचे लोकप्रिय लेखक म्हणूनच माहिती होते.

पण याच कादंबरीला प्रख्यात टीकाकार कुसुमावती देशपांडे यांनी मराठीतल्या महत्त्वाच्या कलाकृतींमध्ये गणले होते. मुंबई मराठी साहित्य संघात त्यांनी ‘आजची मराठी कादंबरी’ या विषयावर दोन व्याख्याने दिली होती. त्यात त्या म्हणतात, ‘‘श्री. रा. बिवलकर यांची ‘सुनीता’, श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार’ व ‘एल्गार’ आणि चंद्रकांत काकोडकर यांची ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी?’ या चार कादंबऱ्यांनी राजकारणाचा पाया अर्थकारण आहे हे पटवून दिलेले आहे. या कादंबऱ्यांकडे बघून मला मराठी कादंबरीच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल आशा वाटू लागली आहे.’’

‘गोमंतका, जागा हो’ ही गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यास शब्दरूप देणारी कादंबरीही पुढे काकोडकरांनी लिहिली. पोर्तुगीज अंमलाखालच्या गोव्यात अहिंसा यशस्वी होणार नाही, तेथे सशस्त्र लढाच द्यावा लागेल, असे विचार काकोडकरांनी त्यात मांडले होते. ‘आपले नेहरू सरकार झोपा काढत होते. पोर्तुगीज सामान्य जनतेला चिरडून काढीत होते, अमानुष छळ करीत होते, तरी भारत सरकार शांत होतं. यावर भारत सरकारने कहर केला तो १९५५ च्या १५ ऑगस्टच्या सत्याग्रहावेळी. सबंध भारतातून हजारो सत्याग्रहींची रीघ बेळगावकडे येत होती. सबंध भारत जागृत होऊन त्वेषाने उठला होता. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही सामील झाल्या होत्या. साऱ्या जगाचे लक्ष गोव्याकडे लागले होते. पण नेहरू सरकारने या सत्याग्रह्यांना मदत करायचे सोडून त्यांना त्रासच देण्यास सुरुवात केली. त्यांना वाहने मिळू दिली नाहीत. पण सत्याग्रही हटले नाहीत. बेळगाव ते सावंतवाडी त्यांनी पायी चालण्यास सुरुवात केली…’’ असा त्रागा या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत काकोडकर व्यक्त करतात.

या कादंबरीनंतर काकोडकरांंनी ‘कीर्तिमंदिर’ या कादंबरीत साने गुरुजींची आंतरभारतीची कल्पना मांडली. देशातील सर्व प्रांतांतील मुले एकाच शाळेत एकत्र येतात आणि अंगच्या गुणांप्रमाणे वाढतात. कवी होतात, डॉक्टर होतात असे त्यात दाखविले होते. या कादंबरीला गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे दुसरे पारितोषिक मिळाले. त्यानंतर लिहिलेल्या ‘अग्निदिव्य’ कादंबरीमध्ये जन्माने कुणी गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते, हा विषय हाताळण्यात आला होता. गोवा स्वतंत्र झाला, त्यावर त्यांनी ‘गर्जा जयजयकार’ ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक मिळाले.

काकोडकरांची लेखनशैली अत्यंत साधी-सोपी, छोट्या वाक्यांची. जुन्या मराठीच्या धाटणीची. कथानक बरेचसे बाळबोध वळणाचे, तरी रंगतदार. चित्रपटासारखे गुंतवून ठेवणारे. प्रेमकथेत रुसवाफुगवा, कुटुंबातील मान-अपमान, भावनाप्रधान नायक-नायिकांचे मीलन-ताटातूट हे घटक न चुकणारे. रहस्यकथेत राजाराम राजेच्या पहिल्याच पानात सीमा या त्याच्या सेक्रेटरी कम् प्रेयसी आणि सहकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये अचूकपणे पुनरावृत्त होताना दिसतात. पण सगळ्या रहस्यकथांमध्ये राजाराम राजेची कर्तुकी मात्र भिन्न असते. या रहस्यकथा पुण्यातून रहस्यकथांची फॅक्टरी निघायच्या आधीच्या काळात सुरू झालेल्या. ‘रहस्यमाला’ म्हणून महिन्याला त्यांची निर्मिती होत नव्हती. काकोडकरांच्या सवडीनुसार त्या पुस्तकरूपाने येत. त्यांच्या चांगल्या दोन-तीन आवृत्त्या निघत.

‘काकोडकर’ अंकातल्या कादंबऱ्या कितीही भावुक, भावनाप्रधान असल्या तरी त्यांच्या संपादकीयामध्ये देशातील राजकारणावर तोफा डागण्याचा कार्यक्रम काकोडकरांनी कधी चुकविला नाही. १९८६ सालातील अंकात काकोडकर लिहितात… ‘१९८५ सालच्या अंकात संपादकीय लिहिताना आम्ही श्री. राजीव गांधींच्या धडाडीच्या राजकारणावर लिहून त्यांच्याकडून स्वच्छ, सरळ आणि प्रगतिपूर्ण राजकारणाची अपेक्षा बाळगली होती. परंतु खेदाने असं लिहावं लागतं की, ते आपल्या दिवंगत आईच्या पावलावर पाऊल टाकूनच राजकारण खेळत आहेत. सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी इंदिरा गांधींनी पंजाबचा प्रश्न चिघळू दिला. आणि आता राजीव गांधी ‘‘गुरखाभूमी’ची मागणी देशविरोधी नाही’ म्हणत बंगालमध्ये दुसरा पंजाब निर्माण करीत आहेत. सत्ता आणि पैसा दोन्ही चिरकाल हाती राहणारी गोष्ट नाही, आणि हव्यास धरणंही योग्य नाही, हे जेव्हा त्यांना पटेल तेव्हा उशीर झाला नाही म्हणजे मिळविली.’

१९८७ सालच्या अंकातील संपादकीयात ते म्हणतात, ‘‘वर्षभरात घडलेल्या ‘फेअरफॅ क्स’, ‘बोफोर्स तोफा प्रकरण’, ‘औषधातील भेसळ’, ‘पंजाब आणि गुरखालॅण्ड प्रकरणे’ वगैरे प्रश्नांनी भारतीय राजकारणाला दिशाहीन बनविलेले आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरुवातीला जी माणसं आपल्या सभोवती गोळा केली आणि आता ते ज्यांना गोळा करतात त्यांच्यावर त्यांचा स्वत:चाच विश्वास नाही असं वाटतं. यामुळे कधीही नव्हती इतकी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्याच पायात राहिलेला नाही.’’

लेखक म्हणून काकोडकर कितीही शृंगाररस प्रसारित करणारे असले तरी परखडपणे, रोखठोक राजकीय भूमिका घेणारे होते. काकोडकरांनी निसर्गवर्णनांना कात्री लावत नायक-नायिकेला मुक्तहस्ते स्पर्श, आलिंगने, चुंबने ही आवश्यक तत्त्वे फाफटपसारा न लावता करू दिली. त्यातही त्यांनी मर्यादा राखली. पण एकदा अश्लील आणि शृंगाररसाचा शिक्का बसल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या गंभीर साहित्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. काकोडकरांच्या कादंबऱ्यांंमधील तरुणी, महिला (१९५२ मधील ‘हवास मज तू’पासून) या नोकरी करून स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. कित्येक कादंबऱ्यांत त्या टायपिंग करणाऱ्या, टेलिफोन ऑपरेट करणाऱ्या, सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या आहेत. शिक्षिका, महिला पोलीस अशाही व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या आहेत. या स्त्रिया अबला नाहीत. त्या पुरुषांना सावरताना, त्यांना आधार देताना दिसतात. एकट्या राहणाऱ्या स्त्रिया त्यांच्या अनेक कादंबऱ्यांत दिसतात. त्या स्वावलंबी आणि कणखर दाखवल्या आहेत. तरी शृंगारवर्णनांबाबत तयार करण्यात आलेल्या सामूहिक संभ्रमामुळे या सक्षम स्त्री-व्यक्तिरेखांना त्या काळातील लेखिका, समीक्षिकांनीही बाजूला ठेवले असावे, किंवा प्रवाहाविरुद्ध जाऊन काकोडकरांच्या कादंबऱ्यांना चांगले म्हणण्याची धमक कुणी दाखवू शकले नसावे!

‘तिचे गाल आरक्त झाले’, ‘गालांवर रक्तिमा पसरला’ या वाक्यांची रेलचेल ‘हवास मज तू’ या कादंबरीपासून नंतरच्या सर्र्व शृंगार कादंबऱ्यांमध्ये करणाऱ्या काकोडकरांच्या कादंबऱ्यांत तत्कालीन उच्चभ्रू समाजातील जगण्याचे अंश प्रगट होतात.  ‘सुपर मार्केटवर दरोडा’ या १९६८ सालच्या कादंबरीत मुंबईत पहिले सुपरमार्केट केव्हा अन् कुठे झाले याचा तपशील मिळतो. त्यांची ‘भारत सुंदरी’ ही कादंबरी भारतीय समुदायाला ‘मिस इंडिया’ अन् ‘मिस युनिव्हर्स’ माहिती होण्याच्या तब्बल पाच दशके आधी लिहिली गेलेली! एका कादंबरीत १९५२ मध्ये ‘ताज’ हॉटेलात नायकाचे दैनंदिन भोजन करण्याचे तपशील येतात, तर अन्य एका कादंबरीत चक्क इलेक्ट्रिक शेगडी वापरण्याचे संदर्भ वाचायला मिळू शकतात. हे केव्हाचे, तर गावागावातून टक्केटोणपे खात, मुंबईतील चाळींमध्ये कसेबसे स्थिरावत साहित्य व्यवहार करणे, हा बहुतांश मराठी लेखकांचा जगण्याचा भाग होता, तेव्हाचे! ‘गजाभाऊ’ या त्यांच्या १९६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या विनोदी कादंबरीत मुंबईत जागा मिळवण्याच्या प्रश्नावर जो खल केला आहे, तो प्रश्न आजही सुटलेला नाही. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांमधील पोटतिडकी भूमिका त्यांना त्या काळातील सर्वार्थाने वेगळे साहित्यिक  ठरवते. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘मी जेवढी पुस्तके आत्तापर्यंत लिहिली आहेत, त्यांत साहित्यिक मूल्ये कोणाला सापडो अथवा न सापडो, परंतु त्यांना निश्चितच मूल्य आहे. मी मराठी साहित्यात काहीतरी भर घातली आहे. भाषांतरीत कादंबऱ्या काढणे हे फारसे मोठे काम नाही. मूळ पुस्तक लिहायला जर माणूस लागला तर वर्षाला तीन-पाच यापेक्षा जास्त तो लिहू शकणार नाही. ही काम करण्याची शक्ती सतत कायम राहीलच असे नाही.’

काकोडकरांनी वर्षाला डझनावरी मूळ कादंबऱ्या लिहिल्या… लेखनशक्ती अखेरपर्यंत कायम ठेवून! त्यांच्या काळातील समीक्षकांनी आणि वाचकांनी आपली वाचनशक्ती मात्र टिकवून ठेवली नाही. वर्षागणिक काकोडकरांना विसरण्याचे काम जोमाने होत राहिले आहे. फक्त ते पूर्णत्वाला केव्हा जाते, ते पाहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही, ही खंत आहे.

बालगोपाळांसाठीही लेखन…

‘दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी’ या अरेबियन नाइट्समधील अवीट गोडीच्या अद््भुतरम्य, रोमांचकारक आणि मनोवेधक कथा काकोडकरांनी बाल-कुमार वाचकांसाठी १९६५ साली मराठीत आणल्या. ‘श्यामा’ कादंबरीवरील खटल्याला सुरुवात झाली तेव्हा रम्यकथा प्रकाशनाने बाजारात आणलेल्या या पुस्तकाच्या १९६७ आणि १९६९ साली नव्या आवृत्त्या काढाव्या  लागल्या इतक्या त्या खपल्या, हे आज अनेकांना माहीत नसेल.

pankaj.bhosale@expressindia.com