News Flash

भावनांच्या गावाला जाऊ या…

दिवसभर मित्रमैत्रिणींबरोबर भटकंती करण्याचा, बागेत, मैदानात जाऊन हुंदडण्याचा काळ.

|| डॉ. संदीप केळकर

गेले वर्षभर करोनाने मुलांसह सर्वांनाच घरात जखडून ठेवले आहे. या सक्तीच्या ‘घर’वासाने अनेक नवे प्रश्न निर्माण केले आहेत. यंदा तर मुलांना उन्हाळी सुट्टीचे अप्रूपही उरलेले नाही, इतकी ती सुट्टीला वैतागली आहेत. तरीही येते दोनएक महिने मुलांना कशा तऱ्हेने सकारात्मक, सर्जनशील उपक्रमांत गुंतवून ठेवता येईल याविषयी…

मुलांसाठी सुट्टीचा काळ म्हणजे धम्माल करण्याचा आणि विलक्षण आनंदाचा काळ. खासकरून उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाऊन, आजोळी जाऊन किंवा रिसॉर्टवर जाऊन मौजमजा करण्याचा काळ. दिवसभर मित्रमैत्रिणींबरोबर भटकंती करण्याचा, बागेत, मैदानात जाऊन हुंदडण्याचा काळ. पण सध्या करोनाच्या वाढत्या धोक्यापायी लावलेल्या कडक निर्बंधांमुळे मुलांना (व खासकरून पालकांना!) ही सुट्टी कशी घालवायची, हा एक अवघड प्रश्न होऊन बसला आहे. असं म्हटलं जातं की, ‘प्रत्येक आव्हानामध्ये एक संधी दडलेली असते.’ तसंच या करोनाच्या बिकट काळातही अशी नावीन्यपूर्ण संधी आपण पालक आपल्या मुलामुलींना देऊ शकतो. ही संधी आहे ‘भावनांच्या गावी जाण्याची!’ मुलामुलींना भावनिक साक्षर करण्याची!! जगभर करोनाच्या आगमनानंतर गेले वर्ष- दीड वर्ष मुलांचे मानसिक आरोग्य आणि त्याच्याशी निगडित प्रश्न ऐरणीवर आले आहेत. मानवी जीवनाच्या इतिहासात प्रथमच लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये सर्वच जण- आई-बाबा, आजी- आजोबा आणि मुलंही २४ प् ७ एकत्र वेळ व्यतीत करीत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी हे घडत असल्याने हे सर्व खूपच आव्हानात्मक झालं आहे. कधी नव्हे एवढा वेळ घरातील सगळे कुटुंबीय एकमेकांबरोबर व्यतीत करत आहेत. तशात पालक ‘वर्किंग फ्रॉम होम’ असल्यास ऑफिसचं काम आणि घरातलं काम या दोन्हींचा समतोल राखणं त्यांना कठीण जात आहे. काही घरांत करोनाग्रस्त कुटुंबीयांमुळे सगळी घडी विस्कटून गेली आहे. बरं, हे अजून किती दिवस चालणार याविषयीही अद्यापि अनिश्चितता आहे. भीती, अनिश्चितता, अपेक्षाभंग, असहायता, निराशा, घालमेल, एकाकीपणा, कंटाळा, राग या व अशा अनेक ऋणभावना अधिक तीव्रतेने निर्माण होत आहेत. भावना संसर्गजन्य असतात. सोशल मीडियाच्या भाषेत बोलायचं तर ‘भावना’सुद्धा व्हायरल होतात, म्हणजेच सर्वत्र पसरू शकतात! प्रयोगांतून असंही निष्पन्न झालं आहे की, जर तीन व्यक्ती एका खोलीमध्ये तीन मिनिटांहून जास्त वेळ एकत्र असतील तर त्यातील एका व्यक्तीची प्रबळ भावना बाकी दोघांमध्ये कळत-नकळत पसरते. कल्पना करा- घरामध्ये आक्रस्ताळी मुलांबरोबर किंवा चिडखोर व्यक्तीसोबत दोन मिनिटे थांबल्यावर आपल्याला कसं वाटतं? आपल्यातही तो ‘राग’ आपसूकपणे येतो. आपण सतत इतरांबरोबर भावनांच्या संदेशांची देवाणघेवाण करत असतो. आपल्या मनातल्या भावनांचा दुसऱ्यावर कळत-नकळत परिणाम होत असतो. अशा प्रकारे भावनांचा हा अतिशय प्रभावशाली, पण अव्यक्त स्रोत आपण एकमेकांना सतत देत-घेत असतो. आणि मुख्य म्हणजे बऱ्याचदा त्याचं आपल्याला भानही नसतं.

म्हणूनच सुट्टी छान घालविण्यासाठी भावनांच्या गावा जाऊ या… घरात निर्माण होणाऱ्या या सर्व भावना समजून-उमजून योग्य प्रकारे व्यक्त करणं, स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या भावना ओळखून त्यांचे समायोजन करता येणं आणि हे सर्व परिणामकारक ‘संवादशैली’तून साधणं आवश्यक होऊन बसलं आहे. सुट्टीच्या काळात घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी, मुलांचं आणि संपूर्ण घराचं मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ‘भावनिक चातुर्य’ (Emotional intelligence) उपयोगात आणणं गरजेचं होऊन बसलं आहे. त्याविषयी या लेखात प्रस्तुत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न…

मुलांशी भावनांबद्दल बोला…

या आव्हानात्मक काळात एकाकीपणा, कंटाळा, अनिश्चितता, अपेक्षाभंग, असहायता, निराशा इत्यादी भावना मुलांच्या मनात निर्माण होणं अगदी साहजिक आहे. मुलांमधील भावनांचं भान ठेवून त्यांचा आदर, स्वीकार संवादातून करणं गरजेचं आहे. त्यांच्या मनातील विचार व भावना मनमोकळेपणानं मांडण्यास परवानगी देणं गरजेचं आहे. इथे टीका-टिप्पणी, अवास्तव प्रश्न विचारणं, लगेच ‘सोल्यूशन’ देणं, तुलना करणं टाळायचं आहे. मुलांच्या भावनांना वाट मोकळी करून देताना सर्व भावना स्वीकारार्ह आहेत, हा संदेश जाणं आवश्यक आहे. सुसंवादातून छान नातं निर्माण होतं आणि अशा आश्वासक नात्यातून मानसिक स्वास्थ्यसुद्धा! सध्याच्या अपरिहार्य परिस्थितीत मुलांनाच सुट्टी कशी घालवायची याबद्दल बोलतं करणं गरजेचं आहे. वेगवेगळे पर्याय सुचवायला इथे मदत करता येईल. काही वर्तनाला लक्ष्मणरेषा आखता येतील. उदा. मोबाइल,  टीव्ही बघण्याच्या वेळेवर निर्बंध घालता येईल. घरामध्ये एकवाक्यता ठेवली तर मुलांच्या वर्तनाला दिशा देणं सुलभ जातं. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांच्या मतांचा आदर करून, त्यामधून उपरोक्त पर्याय निवडता येऊ शकतो. त्यातून नवनिर्मितीस संधी मिळू शकते. ‘संपर्कात राहा, पण सुरक्षित राहा’ हे ब्रीदवाक्य ठेवून पर्याय शोधता येतील. मोठ्ठी सुटी कदाचित छोट्या छोट्या भागांत ऑनलाइन साजरी करता येईल. त्यासाठी निरनिराळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन पाळीपाळीनं एकेकानं यजमानपद सांभाळून अशा ऑनलाइन मुलांसाठी ‘मिनी पाट्र्या’ साजऱ्या करता येतील.

सुट्टीत उपयुक्त ‘मनाची थाळी’

सुट्टीमध्ये दिवसभर मुलांनी काय करायचं, हा प्रश्न घरातील सर्वांनाच पडतो. मग कधी मोबाइल व तत्सम स्क्रीनचा सोपा आणि सोयीस्कर पर्याय निवडला जातो. परंतु या पर्यायाचा अतिवापर त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे हे सर्वश्रुत आहे. तर मग पालकांनी नक्की काय करायचं? मुलांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. त्यांना योग्य आहार, मूलभूत, पोषक, ऊर्जायुक्त सकस अन्न इत्यादी गोष्टींकडे आवर्जून देण्याकडे लक्ष देतो. पण त्यांचं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी पालक म्हणून आपण काही करतो का? बहुतांशी याला उत्तर ‘नाही’ असंच असेल. कोव्हिडनंतरच्या काळात मुलामुलींचं मानसिक अस्वास्थ्य जगभर वाढलं आहे. मुलं आणि प्रौढसुद्धा दिवसाचे २४ तास कसे व्यतीत करतात यावर त्यांचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं असं जागतिक संशोधनातून निष्पन्न झालं आहे. त्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. सीगल यांनी एक उपयुक्त ‘मनाची थाळी’ सुचवली आहे.

जसं शारीरिक वाढीसाठी आपण योग्य वेळेला दिवसभरात सकस अन्न खातो तसंच मानसिक स्वास्थ्यासाठी ही ‘निरोगी मनाची थाळी’ खासकरून या सुट्टीत नक्कीच उपयोगी पडेल. आपलं २४ तासांचं रुटीन आपण या थाळीत सात भागांमध्ये समतोल ठेवून विभागणी करू शकतो. त्या वेळेचं विभाजन सात झोन्समध्ये करायचं आहे. प्रत्येक वेळेच्या झोन्सबद्दल माहिती आणि महत्त्व प्रथम पाहू या.

झोन १- झोपेची वेळ

शांत झोप ही मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे. साधारण आठ-नऊ तास मुलांकरता आणि सात-आठ तास प्रौढांसाठी झोप गरजेची आहे. आजच्या डिजिटल युगात झोपेची वेळ कमी होताना दिसते- जे स्वास्थ्याला अपायकारक आहे. क्वालिटी झोप ही खासकरून करोनाकाळात आपल्या रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठीही गरजेची आहे. इथे समतोल आवश्यक आहे. कमी झोप किंवा अति झोप दोन्ही टाळणं गरजेचं आहे.

झोन २- सर्जनशीलतेचा वेळ

या वेळेत काहीतरी छंद जोपासणं गरजेचं आहे. नवनिर्मिती करण्यासाठी या वेळेचा उपयोग करता येईल. बऱ्याचदा मुलं कंटाळा आला असं म्हणत असतात. शेवटी पालक स्वत:च कंटाळून त्यांना मोबाइल किंवा तत्सम स्क्रीन असलेल्या गोष्टी देतात. खरं तर ‘कंटाळा’ या भावनेनंतरच नवनिर्मितीची भावना निर्माण होत असते. पुढल्या वेळेस आपला मुलगा वा मुलगी कंटाळा आला आहे असं म्हणेल तेव्हा त्याला वा तिला लगेच आयतं उत्तर शोधून देऊ नका, तर थोडा कंटाळा येण्यास परवानगी द्या… बघा तो सर्जनशीलतेची चमक दाखवून जाईल आणि काहीतरी नवनिर्मिती करून दाखवेल. तेव्हा मुलांना कंटाळा आल्यावर लगेच ‘सोल्यूशन’ देऊ नका. थोडं थांबा. त्यांच्यासमोर विविध पर्याय ठेवा. (स्क्रीनचा पर्याय टाळा.) त्यातून कंटाळा या भावनेला सामोरं जाण्यास मुलं शिकतील आणि त्यातूनच आपोआप निर्मितीक्षम होतील.

झोन ३ – लक्ष केंद्रित करण्याची वेळ (focus time)

या वेळेत काहीतरी ध्येय ठेवून केलेली कृती अपेक्षित आहे. या झोनमध्ये आपलं चित्त एका गोष्टीवर केंद्रित करणं गरजेचं आहे. सुट्टीच्या काळात मुलांमध्ये भावनिक शब्दसंपदा वाढविण्यासाठी आपण पालक प्रयत्न करू शकतो. तीन ते आठ वर्षांपर्यंत मुलामुलींना वेगवेगळ्या मासिकांतील व्यक्तींचे फोटो एका चित्रवहीत चिकटवावयास सांगावेत. त्या फोटोतील व्यक्तीच्या भावना कुठल्या आहेत, हे विचारावं. मुलांना ‘भावनांचा शब्दकोश’ (Feeling Dictionary) तयार करावयास सांगावं. पाल्याला स्वत:च्या भावना ओळखावयास शिकवणं व भावनांबद्दल भान निर्माण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या वेळेत तुम्हाला स्वयंपाकात मदत करणं, घरच्या कामांमध्ये उपयोगी पडणं, वाचन करणं, इत्यादी गोष्टीही मुलं करू शकतात.

झोन ४ – अंतर्मनाची वेळ (Time In)

या वेळेत आपले चित्त बाह्य गोष्टींपासून अंतर्मनाकडे वळवायचं आहे. या वेळेत अंतर्मुख होऊन मुलांनी आपल्या मनाचा अलिप्तपणे ठावठिकाणा घेणं अपेक्षित आहे. या अंतर्मनाच्या प्रवासात मनामध्ये नक्की कुठले विचार आहेत, आपल्याला कसं वाटतं आहे- म्हणजेच मनातील भावना कुठली आहे याची चाचपणी करायची आहे. आत्मसंशोधन, आत्मपरीक्षण (Reflection time) करण्यासाठी हा वेळ देणं आवश्यक आहे. सध्याच्या वेगवान डिजिटल जगात माहितीचा एवढा मारा होत आहे, त्यामुळे मुलांना आणि प्रौढांनाही आत्मपरीक्षण करणं अवघड जातंय, किंवा त्यासाठी वेळही मिळत नाही. ही वेळ घरातील सर्वांनी मेडिटेशन, माइंडफुलनेस, योग, प्राणायाम या गोष्टींसाठी उपयोगात आणता येईल.

झोन ५- मोकळा, मुक्त वेळ

या वेळेत कुठलंही ध्येय न ठेवता स्वत:ला मुक्तपणे दिलेली ही वेळ आहे. या झोनमध्ये आपल्याला मनाला रिझवणारी एखादी गोष्ट- वाचन, संगीत इत्यादी करणं अपेक्षित आहे. यातील थोडा वेळ स्क्रीनला देऊ शकता.

झोन ६- व्यायामाचा वेळ (Exercise time)

या वेळेत शारीरिक हालचाल होणाऱ्या कृती- म्हणजेच जॉगिंग, एरोबिक्स, नृत्य यांसारख्या अपेक्षित आहेत. शारीरिक व्यायामांनी मन उल्हसित होतं. सिरोटोनिन, इंडोर्फिनसारखी हार्मोन्स शरीरात निर्माण होतात. मन:स्वाथ्यासाठी ती आवश्यक आहेत.

झोन ७ – संपर्काचा वेळ (Connecting Time)

या वेळेत मित्र, सुहृद यांच्याशी संपर्क साधणं अपेक्षित आहे. करोनाकाळात व्हिडीओ चॅट, फोनवर बोलणं शक्य आहे. संपर्क साधणं, दुसऱ्याशी संलग्न होणं यासाठी ही वेळ आहे.

आता थोडा वेळ देऊन तुमची आणि तुमच्या मुलांची ‘निरोगी मनाची थाळी’ सध्या कशी आहे याचं आत्मपरीक्षण करा. त्यात समतोल आहे की नाही, हे बघा. मुलांना त्यांची स्वत:ची ‘मनाची थाळी’ बनवावयास सांगा. कुठली वेळ जास्त वा कुठली वेळ अगदीच कमी आहे? तुम्ही बघितलं तर या थाळीमध्ये स्क्रीनच्या वेळेला खरं तर स्थान नाही; पण एकविसाव्या शतकात ते अशक्य असल्यानं मोकळ्या, मुक्त वेळेमध्ये थोडा वेळ स्क्रीनला दिला गेला आहे. अशा प्रकारे आपल्या चोवीस तासांचं योग्य, समतोल रीतीने विभागणी केलीत तर तुमचं आणि तुमच्या मुलांचंही मानसिक स्वास्थ्य नक्कीच निरोगी आणि सुदृढ होईल यात शंका नाही. सुट्टीची सुरुवात आपण या निरोगी मनाच्या थाळीने करू या! मामाच्या गावी जाण्याऐवजी थोडं भावनांच्या गावी जाऊ या…

(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि भावनांक विशेषज्ञ आहेत.)

sandeepkelkar66@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:07 am

Web Title: holiday for children working from home akp 94
Next Stories
1 रफ स्केचेस : अलिप्त
2 मोकळे आकाश… : मन वढाय वढाय…
3 आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
Just Now!
X