27 May 2020

News Flash

टपालकी : हॉलिडे पेशल

समदं टाईमशीर जालं की न्हाई? वैनीसायेब खुश आसनार या साली.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

काय सदाभौ? न्हाई, म्हन्लं दिवाळी जोरामंदी गेली न्हवं? शापिंग जोरदार जाली की न्हाई? वैनीसायबास्नी नौलख्खा, पठणी, तुमास्नी शिल्कचा कुर्ता पजामा, पोरास्नी ब्रान्डेड कापडं आन् ढेर सारे फटाकडे, नवीन चारचाकी. समदं टाईमशीर जालं की न्हाई? वैनीसायेब खुश आसनार या साली. तुमच्या ममईला दिवाळी कम मान्शून शेल हुता म्हनं. डबल डिश्काऊंट!

मान्शूनला म्येसेज द्या देवा. पानी कम.

सदाभौ, तेला म्हनावं, जा वापस घरला आताशा. मान्शूननं जावयासारखं चार दिस ऱ्हावं. गरजेपुरतं बरसावं. आपला वकत जाला की मागारी फिरावं. हिथंच ठिय्या टाकून बसशीला तर कसं हुयाचं? निसर्गाच्या शाळंत पावसाळे गुरुजींचा तास चालू हाई कवापास्नं. मास्तर शिकवन्यात गुंगून ग्येले हाईत. येळेचं भान न्हाई. तास संपल्याची घंटा ऐकू येईना. भाईर हिवाळे आन् उन्हाळे गुरुजी ताटकळत हुभं. अशानं निसर्गाच्या शाळंचं टाईमटेबल चुकतंय बगा की!

आवं आकाशकंदिलावर छत्री टांगून ठेवली हुती आम्च्याकडं. तिकडं पुन्याला पेठेमंदी पेशल पुनेरी पाटय़ा लावल्या हुत्या. ‘दिवाळीनिमित्त ओले फटाके वाळवून मिळतील.’ आता बोला! वल्या नारळाच्या करंज्या, वला चिवडा आन् वल्या चकल्या.. समदा फराळ ‘ओले ओले’ गाऊन ऱ्हायलेला सदाभौ!

चालतंय की!

बाकी तुम्चं म्हननं रास्त हाई. दिवाळी मंजी सणासुदीचं राजं हाई. काय तेचा थाट. काय तेचा रुबाब! चार दिस समदा माहौल बदलून जातू. समदीकडं आनंदीआनंद! समद्यांच्या मनातला दु:खाचा, गरिबीचा अंदार दूर पळतू. पिरमाचा, आनंदाचा, उत्साहाचा प्रकाश चोहीकडे पसरतंय. सालभर ज्या फेश्टिव्हलचा वेट क्येला जातु, त्यो हा दिवाळी फेश्टीव्हल. समद्यास्नी तेचा आडव्हांटिज घेयाचा आसतुच.

धा पानाच्या पेपरमंदी मणभर जाहिराती. तुमी म्हनून ऱ्हायलाय तसं हुनार बगा. जाहिरातीचा राक्षस संपादकीयचं पान खाऊन टाकनार येक दिस.

आन् मग आपल्या टपालकीचं काय? तेबी गायब हुतंय बगा. आवं आख्खं टपालखातं गायब हुईल येखाद दिस. टेक्नालाजीच्या जमान्यात टपालकीचं हशील कमी होऊन ऱ्हायलंय सदाभौ.

दिवाळी मंजी पोस्त, बोनस न्हाई तर दिवाळी. आमास्नी आजून बी याद हाई समदं. लक्ष्मीपूजनाचा दिस. वाडय़ात लगबग. दिवाळीचा माहौल. लक्ष्मीची पूजा जाली की आबासायेब सौता अंगनात अनार लावीत. प्रकाशाचं झाड आभाळात वर वर जाई. पायात कोल्हापुरी वहाणा, दुटांगी सफेद धोतर, शिल्कचा कुर्ता, काळा कोट, डोईवर फ्येटा. आकडेबाज मिशा.

च्येहऱ्यावर मंद हासू. शेजारी आम्च्या आईसाहेब नाकामंदी नथ, गळ्यामंदी कोल्हापुरी साज, काटपदराची रेश्मी साडी अन् डोईवर पदर. आक्षी लक्ष्मीनारायनाचा जोडा! आबासायेबांनी अनार उडीवला की आमी फटाक्याची लड लावायचू. धा पंदरा मिल्टं फटाकडे उडवायचू. मस पोरं असायची संगट. रानातलं सालगडी जोडीनं वाडय़ावर यायचं. आबासाहेब त्या दोगास्नी, तेन्च्या पोरान्ला कापडचोपड देत. मिठाई, लाडूचिवडा देत. पोरान्ला फटाकडे. आईसाहेब बायामान्सान्ची खनानारळानं वटी भरायच्या. धा-बारा जोडय़ा येयाच्या. आबासाहेब नेहमी म्हनायचं, रानात राबनारे हात हीच खरी लक्षुमी. तीच खरी दौलत. तिचा मान ठेवायलाच पायजेल. ठरल्येला पगार. अडीअडचनीला उचल. शिवाय ही दिवाळी. दिवाळीची ही पोस्त मंजी थँक्स-गिव्हींग शेरेमनीच जनू. मालक नौकर नातं नवतंच कंदी. आबासाहेब समद्यास्नी कुटुम्बातला हिस्सा मानायचं. पिरमानं बांधलेलं लोक हुते तवा, पगारानं न्हाई. आता ऱ्हायलं न्हाई असलं कायबी. आम्चा सुभान्या गेल्ता ममईला मागच्या दिवाळीत.

लेकाच्या घरी. तिथं काम करणाऱ्या मोलकरणी, सोसायटीचा वाचमन यास्नी फराळाचं दिलं सुभान्यानं. तेन्च्या पोरास्नी फटाकडे दिले. कायबी घेईनात. उल्टं क्याशमंदी पकं देवा आसं म्हनून ऱ्हायले सुभान्याला. पिरेम सम्पलं सदाभौ, फकस्त वेवहार उरला तुम्च्या शिटीमंदी. दिवाळीची पोस्त मंजी भावनेची, कृतज्ञतेची पोचपावती हुती. ती न्हाई उरली आताशा. दिवाळीला बोनस पायजेलच. पर ह्य़ो बोनस फकस्त पशाचा नगं. पिरमाचा, आनंदाचा, निर्मळ नात्याचा बोनस गावला की पुढच्या दिवाळीपत्तुर फिकीर न्हाई.

त्योच महाग जाला हाई. ईश्वासाची, पिरमाची मंदी हरसाल वाढून ऱ्हायलीय ना वं..

सदाभौ, दिवाळी आन् फटाकडे.

फटाकडय़ांबिगर दिवाळी?

ही आयडियाची कल्पना हजम हुत न्हाई. तुमी म्हन्लं ते खरं हाई. देश बदल रहा है. दिवाळी वही, पर सोच नई है! क्लीन दिवाळी, सायलेंट दिवाळी. पोलूशन फ्री दिवाळी.. समदं खरं हाई, पर फटाकडय़ांबिगर दिवाळी ही दिवाळी वाटत न्हाई बगा. आम्चं भोईरमास्तर लई हुश्शार! पोरास्नी शपथ दिल्ती मास्तरान्नी. पोरं येक टायमाला सौताच्या बापाला ऐकनार न्हाईत पर मास्तरान्चं ऐकनारच. आवं दोन शिपमंदी शाळा चालती गावची. हजार दीड हजार पोर हाईत. परत्येक पोरगं मस फटाकडय़ा उडवायचं आत्तापत्तुर.. घरटी हजार पंधराशे रुपयाचा धूर फकस्त फटाकडय़ांचा!

या साली फकस्त शंभर रूप. हर एक पोरानं शंभर रुप चंदा दिला मास्तरांकडं. गावातली शेठलोकं, दुकानदार, बागाईतदार ह्यंनी बी चंद्याला हातभार लावला. मस पका जमला. आवं चावडीम्होरच्या मदानात फटाक्याची पाच धा दुकानं हरसाली.

गावची फटाका असोसियेशन हुती. पर यासाली न्हाई. मास्तर फटाका असोशियेशनच्या अध्यक्षाला भेटलं. यासाली श्टाल लावू नगा म्हन्लं. गावातलं येक बी पोरगं फटाकडय़ा उडवनार न्हाई. तुमी आकाशकंदील, रांगोळ्याचं श्टाल लावा, पर फटाकडय़ा नगं. मास्तरान्नी अध्यक्षांना रिक्वेश्ट क्येली. चंद्याचं पकं दिलं. अध्यक्ष शिवकाशीला गेल्ते. सदाभौ, घराघरात लक्ष्मीपूजन जालं आन् समदा गाव चावडीम्होरं मदानात. फटाका असोशियेशननं जगात भारी नंबर १ फायर शो दावला. चावडीम्होरं आभाळ

लख-लख चंदेरी जाल्तं. आभाळामंदी कोटी कोटी दिवं लागलेलं. डोळं भरून गावानं ही आतशबाजी बगितली. अंदार गायब. समदीकडं प्रकाश! पर कुटं बी कानठळी आवाज न्हाई. कमीत कमी प्रदूषण. पंदरा मिल्टं फायर शो चालला. समदे खूष! नंतर गावामंदी येक बी फटाकडा फुटला न्हाई. भोईर मास्तरान्नी खरी क्लीन आन् सायलेन्ट दिवाळी शेलीब्रेट क्येली गावासाटी या टायमाला. मास्तरान्ची आयडीया येकदम हिट!

सदाभौ, तुमी मनकवडं हाईत बगा. काय जादू करता की काय राव? आम्च्या माईंडमदलं बराब्बर वळीखता तुमी. ‘आम्च्या टायमाची दिवाळी आता न्हाई ऱ्हायली.’ हा लई जुना डायलाग जाला बगा. गेलेल्याचं दु:ख किती दीस उगाळनार? आजचा दिस, आजची दिवाळी आनंदात जायला पायजेल.

मास्तरान्नी पोरान्ला इचारलं, आदीच्या टायमाला दिवाळीत धमाल येयाची. काहून? कारन संगट दोस्त लोग, नातेवाईक असायचे. दिवाली का असली मजा तो सब के साथ आता है! पर आता कुनी बी कुनाकडं जात न्हाई.

सदाभौ, आम्च्या गावात बी टूर आन् ट्रावेल कंपनीचं हापिस हाई आता. पायजेलच.. गावाकडचा मानूस फिरला पायजेल. देश इदेश बगायला पायजेल. जग जवळ येऊन ऱ्हायलंय सदाभौ, पर मानूस, दोस्त, बाप, पोरगा, भाऊ दूर जाया नगं. मास्तरान्नी पोरास्नी रिक्वेश्ट केली. परत्येकानं शिटीतल्या आपल्या चुलत्यास्नी, भावास्नी भनीला दिवाळीत गावाकडं बोलवा. परत्येक घरी येक तरी पाहुना आलाच पायजेल. पोरान्नी फून फिरविले. वाटणीच्या वेवहारानं दूर गेलेली भावकी जवळ आली. पुन्यांदा मनं जुळली. गावात घरोघरी प पाहुनं आलं. पोरांचं गोकुळ. पोरान्नी किल्लं बांधलं. नदीच्या पान्यात पवायला शिकून घेतलं. जुनी सवंगडी भ्येटली. आनंदाची बरसात. खरी दिवाळी साजरी जाली. समदी मास्तरांची किरपा. मास्तरान्नी ‘विद्यार्थी मित्र’ योजनेअंतर्गत परदेशातलं ईद्यार्थी बोलावलं हुतं गावात. पन्नास ईद्यार्थी आल्ते. आमच्या घरला बी हुते दोगं जन इंग्लंडचं. तेंच्याबरूबर विंग्लीश विंग्लीश वाईच अवघड गेलं आमास्नी. पर मजा आली. आम्ची ल्येक मस बोलायची तेंच्यासंगट. विंग्लीशमदनं. भोईर मास्तरांच्या ईदेशी पाहुण्यान्नी दिवाळीच्या आनंदाला चारचाँद लावलं बगा.

दिवाळी आली आन् ग्येली बी. चार दिस आनंदाचे. बाकी सब कष्टाचे. मेहनतीचे. ते चार दिस भरभरून जगता यायला पायजेल. दिवाळी मंजी वर्सभर आनंदात जगायचं टानीक हाये. क्लीन, सायलेंट, पोलूशन फ्री दिवाळी पायजेलच, पर निर्मळ, निरागस नात्यांची दिवाळी, ईश्वासाची दिवाळी, पिरमाची, प्रगतीची दिवाळी- हीच खरी दिवाळी. गावाकडची या येळची दिवाळी म्हनूनच लई आवडली बगा! आटवनीत रमायला समद्यास्नी आवडतं, पर प्रेझेंटमंदी हर पल आनंदात जगायला जमलं पायजेल. ते जमून ऱ्हायलं की जिंदगीतला परत्येक दिस, दिवाळीचा दिस होऊन जातो सदाभौ!

चला सदाभौ, लग जावो काम पर.

जुग जुग जियो! कष्ट करो जी भरके,

पुढच्या दिवाळीपत्तुर नो टाईम प्लीज..

‘हॉलिडे पेशल’ संपली बगा.

लगे रहो सदाभौ!

तुम्चा जीवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गांवकर.

kaukenagarwala@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2019 2:08 am

Web Title: holiday special tapalki article abn 97
Next Stories
1 बहरहाल : काही असंपादित राजकीय वासऱ्या  
2 दाहक जीवनाचं वास्तववादी चित्रण
3 ज्ञानसाधक स. मा. गर्गे
Just Now!
X