25 September 2020

News Flash

मधुघटचि रिकामे पडती घरी..

वाढत्या मोबाइल टॉवर्समुळे मधमाश्या आणि चिमण्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. त्यायोगे एकूणच नैसर्गिक परिसंस्थेला बाधा आली आहे. मधमाश्या आणि चिमण्यांना असलेले हे संभाव्य धोके टाळण्यासाठी

| October 14, 2012 09:55 am

वाढत्या मोबाइल टॉवर्समुळे मधमाश्या आणि चिमण्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. त्यायोगे एकूणच नैसर्गिक परिसंस्थेला बाधा आली आहे. मधमाश्या आणि चिमण्यांना असलेले हे संभाव्य धोके टाळण्यासाठी दूरसंचार खात्याने आता वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालाच्या आधारे काही मार्गदर्शक तत्त्वे मोबाइल कंपन्यांसाठी जारी केली आहेत. या अहवालात मधमाश्या व चिमण्या हे जीवसृष्टीतील दोन महत्त्वाचे घटक विद्युत् चुंबकीय लहरींमुळे धोक्यात आल्याचे म्हटले आहे. भारतात १५ ऑगस्ट १९९५ रोजी नवी दिल्ली येथे पहिली मोबाइल सेवा सुरू झाली, त्याला आता १६ वर्षे उलटली आहेत. यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. चीनखालोखाल सर्वाधिक मोबाइलधारक (८० कोटी) असलेला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मोबाइलने गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाचेच अर्थकारण चांगल्या अर्थाने बदलले हे खरे; परंतु मोबाइलचा वापर विवेकाने कसा करता येईल, याचाही विचार करायची वेळ आली आहे. त्यासाठी खूप कडक र्निबध लादण्याची गरज नाही. मात्र, मोबाइल कंपन्या व ग्राहकांनी काही पथ्ये पाळली तरी आपण बरेच काही साध्य करू शकू.

सध्या आपण फार वेगाने प्रगती करण्याच्या नादात निसर्गाला विसरत चाललो आहोत. भौतिक विकासाचे पुजारी होताना आपण निसर्गाचे मात्र मारेकरी बनत चाललो आहोत. अगदी १०-१५ वर्षांपूर्वी चिऊताईकडे बोट दाखवून आपण बाळाला ‘एक घास चिऊचा, एक काऊचा’ भरवत होतो. पण दुर्दैव असे की, या पिढीतील बाळांची ही चिऊताई आज जवळपास काळाच्या पडद्याआड गेली आहे. दिल्ली राज्य सरकारने भले तिला राज्यपक्षी जाहीर केले असले तरी ती त्यामुळे परतून येणार नाही. या चिऊताईला गमावण्याबरोबरच आपण बाळाच्या तोंडचा घासही काढून घ्यायला निघालो आहोत. कसा, विचाराल तर उत्तर साधे-सोपे आहे. ज्या मधमाश्यांमुळे परागीभवन होते, त्यासुद्धा दूरसंचार विकासाची द्वाही फिरवणाऱ्या मोबाइल टॉवर्समधून बाहेर पडणाऱ्या विद्युत् चुंबकीय लहरींना (इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज्) बळी पडत आहेत आणि त्यांच्या वसाहती नष्ट होत आहेत. याच्या परिणामी परागीकरणाची क्रिया जवळपास थांबून शेती उत्पादन घटते आहे. त्यामुळे बाळाच्या ताटातल्या दूधभाताचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे.
मधमाश्यांची आपल्याला एरवी फारशी माहिती नसलेली महती सांगायची वेळ आज आली आहे. त्यांच्याविषयी द्रष्टा शास्त्रज्ञ आइन्स्टाईन याने पूर्वीच असे म्हटले आहे की, ‘जर पृथ्वीतलावरून मधमाश्या नष्ट झाल्या तर माणूस त्यानंतर चार वर्षेही जगू शकणार नाही.’ मधमाश्या नाहीत तर परागीकरण नाही आणि मग त्याद्वारे निर्माण होणाऱ्या वनस्पतीही नाहीत. मग त्यावर अवलंबणारे प्राणीही नाहीत. अन् माणूस? तोही नाहीच! काही विकासवाद्यांनी ‘आइन्स्टाईनने असे म्हटल्याचे पुरावेच नाहीत,’ असे सांगून वादही घातले आहेत. परंतु त्यापायी मधमाश्यांची निसर्गसाखळीतील कामगिरी नजरेआड करता येणार नाही. हे सगळं घडण्यामागे जगभरातील सर्वच देशांतील मोबाइल क्रांती जबाबदार आहे. मोबाइल ज्या विद्युत् चुंबकीय लहरींवर चालतो, त्यामुळे मधमाश्या त्यांची दिशा चुकतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या वसाहतीही त्यामुळे नष्ट होतात. याला ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे म्हणतात. अर्थात त्याला व्हॅरोआ पाकोळी, कीटकनाशके, बुरशीनाशके आदी इतर कारणेही आहेत. यापैकी बुरशीनाशके व कीटकनाशके ही माणसाने खास मधमाश्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी फवारलेली असतात. त्यामुळेही मधमाश्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे.
मधमाश्यांची रोगप्रतिकारशक्ती मोबाइल टॉवर्सच्या विद्युत् चुंबकीय लहरींमुळे क्षीण होते, असे अमेरिकेतील बेल्टसहिले अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च सेंटरच्या संशोधनात आढळून आले आहे. सजीवांचे शरीर पेशी या मूलभूत घटकांचे बनते. पेशींना इंग्रजीत ‘सेल’ (Cell’) म्हणतात. मधमाश्यांची प्रतिकारशक्ती प्रणाली ही पेशींमधील (सेल टू सेल) संदेशवहन योग्य प्रकारे सुरू असते तेव्हाच व्यवस्थित काम करते. मधमाश्यांच्या पेशीतील जैवरासायनिक क्रिया या विद्युत् चुंबकीय लहरींनी नियंत्रित होतात. या क्रियांमुळेच पेशी-पेशी पातळीवर माहितीची देवाणघेवाण सुरू असते. जेव्हा पाकोळी, बुरशी किंवा इतर प्रकारचे परचक्र येते तेव्हा मधमाश्यांतील पेशी त्याच्याशी लढायला सज्ज होतात. कारण त्यांच्यात संभाषण सुरू असते. त्यामुळे त्या हा हल्ला परतवून लावतात. डॉ. वुल्फ बर्गमन यांच्या मते, जेव्हा आपण विद्युत् चुंबकीय लहरींवर चालणाऱ्या मोबाइलद्वारे संदेशवहन करतो तेव्हा ‘सेल’ टू ‘सेल’ (मोबाइल ते मोबाइल) संदेशवहन व्यवस्थित चालते. पण या लहरींच्या हस्तक्षेपाने मधमाश्यांचे ‘सेल टू सेल’ (पेशी ते पेशी) संदेशवहन कोलमडते. परिणामी कुठल्याही जंतू, तसेच बुरशी संसर्गाला त्या सहजपणे बळी पडतात.
मोबाइल टॉवरच्या विद्युत् चुंबकीय लहरी या केवळ मधमाश्यांच्या प्रतिकारशक्तीवरच परिणाम करतात अशातला भाग नाही. या लहरींमुळे नैसर्गिक चुंबकीय क्षेत्रावरही परिणाम होतो. मधमाश्या तसेच पक्षीही चुंबकीय लहरींची दिशा पाहून मार्गक्रमण करत असतात. जेव्हा मोबाइलच्या विद्युत् चुंबकीय लहरी मधमाश्या व पक्ष्यांच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम करतात, तेव्हा ते त्यांच्या घराकडे परतण्याचा मार्ग नीट शोधू शकत नाहीत. डॉ. उलरिच वॉर्नके यांनी केलेल्या संशोधनात यावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब झाले. २०१० मध्ये पंजाब विद्यापीठात मधमाश्या व मोबाइल फोनच्या लहरी यांच्या संबंधांवर संशोधन करण्यात आले. मधमाश्यांच्या पोळ्यापासून त्या पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात कुठेही गेल्या तरी तिथेच न चुकता परत येतात. मोबाइल फोन टॉवरमुळे खूप कमी कामकरी माश्या (Woker bees) घरटय़ाकडे परत आल्याचे आढळून आले. कामकरी माशी घरटय़ात परत आली नाही तर राणीमाशी तिच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह मरून जाते असे या संशोधनात दिसून आले.  मोबाइल टॉवर नव्हते तोपर्यंत मधमाश्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती. पण आता ती कमी होऊन मधमाश्या मरत आहेत. त्याचबरोबर दिशा चुकल्याने त्यांना त्यांचा आशियानाही सापडत नाही. त्यामुळे एकाच वेळी आपण त्यांच्यावर दोन घाव घातले आहेत.
मधमाश्या फुलांवर बसतात व मध गोळा करतात तेव्हा त्यांच्या पायाला चिकटलेले परागकण दुसरीकडे जाऊन पडतात. त्यातून दुसरीकडे वनस्पती उगवतात. याला ‘परागीभवन’ असे म्हणतात. या प्रक्रियेद्वारे वनस्पतींचा नैसर्गिकरीत्या प्रसार होऊन निसर्गात जैवविविधता साधली जात असते. मधमाशीला तिच्या पोळ्यापासून १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावरील अन्नाचा स्रोत समजतो. तो कसा समजतो? याचे उत्तर म्हणजे ‘व्ॉगल डान्स.’ ज्याला आपण ‘झुलवा नृत्य’ म्हणू. मधमाश्या समांतर दिशेने उजवीकडे, डावीकडे किंवा वर-खाली हलत हे नृत्य करतात. त्या माध्यमातून त्या एकमेकींना मधाचा उत्तम स्रोत कुठल्या दिशेला आहे हे सुचवीत असतात. त्यांच्या पोटात चुंबकीय गुणधर्म असलेले स्फटिक असतात. त्यांच्या मदतीने त्या १८० हर्ट्झ ते २५० हर्ट्झ कंप्रतेच्या लहरी तयार करतात. मोबाइल फोन संदेशवहन २१७ हर्टझच्या लहरींवर चालते. ही कंप्रता १८०-२५० हर्ट्झदरम्यान येते. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या लहरी आणि मोबाइल टॉवर्सच्या विद्युत् चुंबकीय यांची सरमिसळ होऊन मधमाश्यांचे नृत्य आपला ताल गमावते. ज्या नृत्यामुळे त्यांना अन्नाचा स्रोत समजतो, ती प्रक्रियाच यामुळे नष्ट होते.
एप्रिल २०११ मध्ये स्वित्र्झलडमध्ये झालेल्या संशोधनात मोबाइल संदेशवहनातील विद्युत् चुंबकीय लहरी या मधमाश्यांना घातक ठरतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पृथ्वीवरील वनस्पतींमध्ये जी जैवविविधता आहे, त्यात मधमाश्यांचा मोठा वाटा आहे. परागीभवनामुळे सपुष्प वनस्पतींच्या दोन लाख जाती पृथ्वीवर सुखेनैव नांदत आहेत. जवळपास ८० टक्के फळझाडे परागीभवनासाठी कीटकांवर अवलंबून आहेत. १९७३ मध्ये वेलनस्टेन यांनी एका संशोधनाअंती असे दाखवून दिले होते की, उच्चशक्तीच्या विद्युत् तारांमुळे मधमाश्यांवर अनिष्ट परिणाम होतो. २०१० च्या संशोधनानुसार विद्युत् चुंबकीय लहरींच्या प्रभावक्षेत्रात केवळ ७.३ टक्के मधमाश्या आपल्या पोळ्याकडे परत आल्या. तर विद्युत् चुंबकीय लहरी नसलेल्या भागांत ४० टक्के मधमाश्या परत आल्या. वन आणि पर्यावरण खात्याने अलीकडेच सादर केलेल्या अहवालात सैनुद्दीन यांनी २०११ मध्ये केलेल्या संशोधनाचा दाखला दिलेला आहे. मधमाश्यांच्या पोळ्यात दहा मिनिटे ९०० मेगाहर्ट्झ कंप्रतेच्या विद्युत् चुंबकीय लहरी मोबाइलच्या मदतीने निर्माण केल्या असता दहा दिवसांत कामकरी माश्या घरटय़ात परतणे बंद झाले. त्यांची अंडी घालण्याची क्षमता दिवसाला ३५० वरून १०० अंडय़ांपर्यंत खाली आली. शिवाय जी अंडी घातली गेली ती व्यवस्थित फलित झाली नाहीत.
फक्त भारतातच मधमाश्यांची स्थिती इतकी वाईट झालेली आहे अशातला भाग नाही. अमेरिका, फ्रान्स, ग्रीस आणि ब्रिटन अशा इतर अनेक देशांतही ती वाईट आहे. पण या देशांनी मधमाश्यांचे संवर्धन करण्यावर वेळीच लक्ष केंद्रित केले आहे.  ब्रिटिश मधुमक्षिकापालन संघटनेच्या माहितीनुसार, एका मधमाशीला एक पौंड मध गोळा करण्यासाठी १०,००० फुलांना भेट द्यावी लागते. त्यासाठी त्यांना ५०० फे ऱ्या माराव्या लागतात. त्यांनी कापलेले अंतर आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त असते. मधमाश्या जे मध गोळा करतात ते अतिशय पोषक असते. त्यात एन्झाइम्स (विकरे), खनिजे, पाणी तसेच पिनोसेमब्रिन हे अँटीऑक्सिडंट असे अनेक उपयुक्त घटक असतात. त्यांच्या एका वसाहतीत २० ते ६० हजार मधमाश्या असतात. सहा पाय, दोन डोळे, मधुसंचयिका अशी त्यांची शरीररचना असते. मधमाशीचा मेंदू हा तिळाच्या आकाराएवढा लहान, पण तुलनेने खूपच कार्यक्षम असतो. त्यांच्या मेंदूवर विद्युत् चुंबकीय लहरींचा वाईट परिणाम होतो असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. मधमाश्यांना इतर कीटकांपेक्षा जास्त- म्हणजे १७० वास-संग्राहक असतात. ताशी पंधरा मैल वेगाने त्या प्रवास करतात आणि एका फेरीत त्या सहा मैल अंतर जाऊ शकतात.
आता यात मुद्दा असा की, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी मधमाश्या फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, हे सप्रयोग सिद्ध झालेले असताना सरकारी पातळीवर मधमाश्या संवर्धन व त्यांचे पालन याकडे गांभीर्याने लक्ष पुरवले जात नाही. मधुमक्षिकापालनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘सहयोग परिवार’चे प्रशांत सावंत सांगतात की, ‘आम्ही मधमाशीपालनात बरीच वर्षे काम केले आहे. अनेकदा घरांच्या वसाहतीत लागलेली मधमाश्यांची पोळी जाळली जातात, किंवा त्यांच्यावर कीटकनाशके फवारली जातात. त्यामुळे आपण पर्यावरणाचे-पर्यायाने आपलेच नुकसान करीत असतो. असे पोळे दिसले तर ते जाळण्यापेक्षा मधुमक्षिकापालकांना पाचारण करणे हा त्यावर योग्य उपाय आहे. मधमाश्या चावत असल्यामुळे त्यांची भीती वाटणे साहजिक आहे. पण जर योग्य मार्गाने पोळे काढले तर आपण एका निसर्गातील एका महत्त्वाच्या घटकाला वाचवू शकतो. ज्वारी, बाजरी, तेलबिया, मका यांचे उत्पादन मधमाश्यांमुळे दोन ते पाचपट वाढू शकते. मधमाश्यांचा वापर शेतीउत्पादन वाढीसाठी केला जायला हवा. सूर्यफुलाचे उत्पादन मधमाश्यांमुळे सव्वासात पटींनी वाढते. फळझाडे आणि फुलझाडांचे उत्पादन २१ पटींनी वाढते. त्यामुळे फलोत्पादनात त्यांचा मोठा वापर होऊ शकतो. मधमाश्या या घटकाचा योग्य वापर केल्यास येत्या तीन ते सात वर्षांत तिसरी हरितक्रांती घडून येऊ शकते एवढी ताकद त्यांच्यात आहे. पण या नैसर्गिक जैवघटकाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्याबाबतीत शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, असा दावा सावंत यांनी केला. वध्र्याचे डॉ. पालीवाल यांनी मधमाश्यांवर मोठे संशोधन केले आहे. त्यांच्यावर विद्युत् चुंबकीय लहरींचा होणारा परिणाम तसेच शेतीउत्पादन वाढीत मधमाश्यांचे स्थान अशा अनेक विषयांवर त्यांनी शोधनिबंधातून मार्गदर्शन केलेले आहे. अमेरिकेत फलोत्पादक शेतकरी ट्रकभर मधमाश्या शेतात आणून सोडण्यासाठी पैसे मोजतात. चीनमध्ये मधमाश्यांच्या वाटेला कुणी गेले तर त्याच्यावर कडक लक्ष ठेवले जाते. ब्रिटनमधील लोकांना तर नैसर्गिक मधच लागतो. त्यामुळे त्यांना मधमाश्यांचे वेगळे महत्त्व सांगावे लागत नाही. मग आपण निदान आहेत त्या मधमाश्या कशा टिकवता येतील आणि त्यांची संख्या कशी वाढेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

फॉल ऑफ अ स्पॅरो..
मधमाश्याच नव्हे, तर चिमण्याही या मोबाईल टॉवर्सच्या विद्युत् चुंबकीय लहरींना बळी पडत आहेत. घरातील ओसरीवर नाचत दाणे टिपणारी चिमणी म्हणजे शास्त्रीय भाषेत ‘पॅसर डोमेस्टिकस.’ चिमणी ही शहरी परिसंस्थेशी नाते सांगणारा पक्षी. शहरवासीयांसाठी ‘पक्षी म्हणजे चिमणी.. फार तर कावळा’ हे समीकरण रुजलेले आहे. यावरून चिमणी आपल्या किती जवळ होती हे लक्षात येते. भारतातच नव्हे, तर परदेशातही चिमण्या मोठय़ा प्रमाणावर होत्या. लंडनमध्ये १९९४ पासून चिमण्यांची संख्या ७५ टक्के कमी झाली आहे. सेलफोनचा प्रसारही याच काळात वाढला, हा योगायोग नक्कीच नाही. युरोपातील अनेक शहरांतही विद्युत् चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. स्पेनमधील संशोधनातही हेच निष्कर्ष आलेले आहेत. या विद्युत् चुंबकीय लहरींमुळे पक्ष्यांच्या पुनरुत्पादनावर परिणाम होतो, ते आक्रमक बनतात असे आढळून आले आहे. वन व पर्यावरण खात्याच्या अहवालानुसार भोपाळ, नागपूर, जबलपूर, उज्जन, ग्वाल्हेर, छिंदवाडा, इंदौर आणि बेतूल या शहरांतून चिमण्यांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. एका प्रयोगात चिमणीची पन्नास अंडी घेऊन त्यावर पाच ते तीस मिनिटे विद्युत् चुंबकीय लहरींचा मारा केला असता सर्व अंडय़ांतील गर्भ विकृत झाल्याचे दिसून आले. हा अभ्यास पंजाब विद्यापीठात केला गेला. उच्च विद्युत् क्षेत्र असलेल्या ठिकाणी वावरणाऱ्या नर चिमण्या हिंसक बनल्याचे दिसून आले आहे. पक्ष्यांवर सूक्ष्म लहरींचा परिणाम होतो, हे १९६० मधील संशोधनात पहिल्यांदा कळून आले होते. पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या साहाय्याने दिशा ओळखून प्रवास करतात, स्थलांतर करतात. पण विद्युत् चुंबकीय लहरींची सरमिसळ झाल्याने त्यांना आता दिशा ओळखता येत नाहीत. परिणामी ते इच्छित ठिकाणी जाऊ शकत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या अस्तित्वावर होतो आहे. चिमण्यांच्या बाबतीत एक प्रतिदावा असाही केला जातो की, अति प्रथिनयुक्त अन्नघटक वाढल्यानेही त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पण असा काही परिणाम गृहीत धरला तरी तो नगण्य आहे. एकूणच या परिस्थितीचा विचार करता निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तातडीने काही बाबतींत आपल्याकडून होत असलेला अतिरेक थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
rajendra.yeolekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2012 9:55 am

Web Title: honey bee and sparrow honey bee sparrow mobile tower nature state bird the ministry of environment and forests
टॅग Nature
Next Stories
1 सायकलीला हवी प्रतिष्ठा!
2 प्रतिक्रिया
3 अक्षरलेण्यांची पन्नाशी
Just Now!
X