डॉ. मनोहर जाधव

मराठीतील आत्मकथन या वाङ्मयप्रकाराला एक परंपरा प्राप्त झालेली आहे. या परंपरेला अनेक लेखकांनी अनेक अंगाने विस्तारत नेले. ल. सि. जाधव यांचे ‘होरपळ’ हे प्रसिद्ध झालेले आत्मकथन या दृष्टीने वैशिष्टयपूर्ण म्हणावे लागेल.

शिक्षणामुळेच आपले जीवन आमूलाग्र बदलू शकते. त्यामुळेच आत्मशोधाची प्रक्रिया सुरू होते; आणि हीच प्रक्रिया आपले आणि आपल्याशी संबंधितांचे जगणे समृद्ध करते- या सूत्राचा परिचय ‘होरपळ’मधून होतो. आत्मकथनाचे शीर्षक ‘होरपळ’ असल्यामुळे साधारणत: जीवनानुभव कोणत्या प्रकारचा असेल याचा तर्क वाचकाला करता येतो.  मात्र, संपूर्ण आत्मकथन वाचल्यावर वाचकालाही त्या दाहकतेचा अनुभव तीव्रपणे येतो.

कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण नसताना ल. सि. जाधव यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मराठी आणि इंग्रजी साहित्याचे अद्ययावत वाचन, साहित्याचे आकलन करण्याची स्वतंत्र दृष्टी, वळणदार अक्षर, लेखनविषयक नियमांची समज यामुळे त्यांना त्र्यं. वि. सरदेशमुख यांसारख्या शिक्षकांचा सहवास आणि प्रेम मिळाले. त्यांच्या आणि डॉ. गो. मा. पवार यांच्या सूचनेनुसारच जाधव यांनी सेवानिवृत्तीनंतर लेखनाचा संकल्प सोडला आणि आठ-दहा वर्षांत लक्षणीय साहित्याची निर्मिती केली. ‘होरपळ’ या आत्मकथनात तर त्यांनी त्यांची खडतर आणि संघर्षमय वाटचाल नोंदवली आहे. दारिद्य्रआणि उपेक्षेचे जीवन वाटय़ाला आल्यामुळे त्यांना खूप सोसावे लागले, पण याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली नाही. जे आहे ते असं आहे आणि यातूनच मार्ग काढायला हवा, अशी एक समज त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसते.

आप्तस्वकीयांच्या मृत्यूमुळे झालेली परवड  ल. सि. जाधव यांनी चित्रित केली आहे. ती खूपच उद्विग्न करणारी आहे. बहीण विठाताईचा मृत्यू झाल्यानंतर ती जोगतीण असल्यामुळे इतर जोगतिणींनी मद्य पिऊन घातलेला गोंधळ, प्रत्येकाला शंभर रुपये दिल्याशिवाय विठाताईला पुरू देणार नाही अशी उपस्थितांना दिलेली धमकी, धाकटय़ा भावाचा अकस्मात हृदयविकाराने झालेला अंत.. मेव्हणा राजू याची शिक्षणाअभावी झालेली आबाळ आणि दारूच्या व्यसनामुळे त्याचा झालेला मृत्यू. आईच्या आजारपणात हॉस्पिटलमध्ये तिला अनेक दिवस व्हेंटिलेटरवर ठेवूनही आलेले अपयश. ल. सि. जाधव एकवीस वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी पुढाकार घेऊन जाधवांना मुलगी न दाखवता लग्न ठरवले. नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लागल्यावर अतिश्रमामुळे वडील ओटय़ावर लवंडले आणि हृदयविकारामुळे त्याच अवस्थेत गतप्राण झाले. जाधवांच्या लग्नानंतर अवघ्या तीन तासात ही घटना घडली आणि मंगल पवित्र सोहळ्याला गालबोट लागले. लग्न मंडप आक्रोशात बुडाला. नव्या नवरीला ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून नातेवाईकांनी लाखोली वाहिली. या घटनेमुळे जाधवांची पत्नी आणि आई यांच्यात बेबनाव सुरू झाला. सासूने जाच सुरू केला. परिणामी सून कंटाळून कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली. पुढे अर्थातच घटस्फोट झाला. पत्नीचा दोष नसतानाही तिला बळी जावे लागले, याची बोच जाधवांना आयुष्यभर राहिली. पुढे जाधवांचा पुनर्वविाह ठरला आणि विवाहापूर्वीच त्यांच्या होणाऱ्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज झाले आणि त्यातच त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. समोरची मंडळी जाधवांना बोल लावू लागली. इथे  जाधव ‘पांढऱ्या पायाचे’ ठरले. मानवी जीवनात अतक्र्य घटना घडू लागतात, तेव्हा समाजातील बुरसटलेल्या धारणा कशी उचल खातात, त्याचे उदाहरण म्हणून या घटनांकडे पाहता येईल.

ल. सि. जाधव यांनी स्वयंप्रेरणेने शिक्षण घेतले. शिक्षण घेताना त्यांना कोणाचे औपचारिक मार्गदर्शन लाभले नाही. ते राहत असलेल्या मातंग वस्तीतही शिक्षणाबद्दल कोणाला विशेष आस्था नव्हती. मॅट्रिकपर्यंत शिक्षण म्हणजे मोठी मजल समजली जात असे, अशा काळात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले. स्वत:च्याच बळावर सोलापूर महानगरपालिकेत क्लार्कची नोकरी मिळवली आणि तब्बल दहा वर्ष त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत ती नोकरी केली. एक गुणी कामगार म्हणून नावही मिळवले. नंतरच्या काळात स्टेट बँकेत त्यांना नोकरी मिळाली आणि या नोकरीमुळे त्यांच्या जीवनात काही प्रमाणात स्थिरता आली. जीवनशैली बदलली, पण पशाची चणचण कायम राहिली. त्याचे कारण जवळच्या नातेवाइकांचे आजारपण आणि त्यांची स्वीकारलेली जबाबदारी. स्टेट बँकेत असताना मुंबईच्या एअरपोर्टवरील शाखेत त्यांची बदली झाली आणि कधीही मुंबई न पाहिलेल्या जाधवांनी मुंबईत पाय ठेवला. या मुंबईच्या वास्तव्यातील रोमहर्षक वर्णने वाचण्यासारखी आहेत. आपले जवळचे आणि दूरचे कोण कोण नातेवाईक मुंबईत आहेत याचा धांडोळा घेऊन त्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. यामधून त्यांच्यातील एक कौटुंबिक आस्था दृष्टिस पडते.

‘होरपळ’ या आत्मकथनात सोलापूर शहराचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा आविष्कृत झाला आहे. शहरातील आडवानळ परिसर, तेथील निसर्ग, विस्तीर्ण अशी मातंग वस्ती, त्याला लागून असलेला महारवाडा, मातंग वस्तीजवळील भंगी वस्ती या सगळ्या परिसरातील जीवनव्यवहार आणि परस्पर सामाजिक संदर्भ त्यांनी बारकाईने नोंदवले आहे. त्या काळात क्रीडा संस्कृतीचे स्वरूप कसे होते हेही उत्कटपणे सांगितले आहे. मॅट्रिकला असतानाच मित्रांसोबत ‘महालक्ष्मी तरुण मंडळा’ची स्थापना करून त्यांनी विधायक उपक्रम राबविले. या उपक्रमांना त्या काळात मोठाच प्रतिसाद मिळाला. त्यांच्यातील हा सामाजिक कार्यकर्ता पुढे नोकरीच्या धबडग्यात अडकल्यामुळे स्वतंत्रपणे समाजकार्य करू शकला नाही. ‘होरपळ’मध्ये जाधवांनी आपला खडतर संघर्ष अतिशय संयमाने चित्रित केला आहे. त्यामुळे हे आत्मकथन संवेदनशील वाचकांना अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. आपल्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहताना उत्तरार्धात त्यांच्याकडून काही प्रमाणात आत्ममग्नता चित्रित झाली आहे. ती टाळता आली असती. वाचनीयता हे या आत्मकथनाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. प्रवाहीपणे केलेले निवेदन, नाटय़पूर्ण घटनांची सांगड आणि वंचित समूहातील असूनही संघर्षांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला लाभलेली खोली या आत्मकथनातून प्रत्ययाला येते.

होरपळ- ल. सि. जाधव

रोहन प्रकाशन

पृष्ठे- १९६   किंमत- २५० रुपये

manohar2013@gmail.com