News Flash

क्रिकेट कसे पाहावे

क्रिकेट या खेळाचा प्रसार आणि प्रचार इतका झाला आहे की, ‘क्रिकेट कसे पाहावे’ हा लेखम्हणजे एक अनावश्यक खटाटोप आहे, असे कित्येकांना वाटेल. त्यात काय विशेष?

क्रिकेट या खेळाचा प्रसार आणि प्रचार इतका झाला आहे की, ‘क्रिकेट कसे पाहावे’ हा लेखम्हणजे एक अनावश्यक खटाटोप आहे, असे कित्येकांना वाटेल. त्यात काय विशेष? टी.व्ही. लावायचा, रेलून बसायचं आणि पाहायला लागायचं. गांगुलीला कसं कळत नाही किंवा तेंडुलकर कसा चुकीचे फटके मारून आऊट होतो, यावर सुखाने चर्चा करायची. आहे काय त्यात? असले ढुढ्ढाचार्य आता इतके वाढीस लागले आहेत की, त्या दर्जापर्यंत पोहोचताना काय अग्निपरीक्षा असते हे कळणे आवश्यक आहे, पण क्रिकेट पाहणाऱ्या लोकांतील फार थोडे प्रत्यक्ष क्रिकेट खेळतात आणि जे खेळतात त्यातील फार थोडे नीट खेळतात. त्यातील फारच थोडे वरच्या दर्जाचे क्रिकेट खेळतात. सामान्यपणे क्रिकेटमधील चमचमाटामुळे दिपलेले डोळे त्या खेळातील उच्च तत्त्वे पाहू शकत नाहीत. त्यातच सामने ‘फिक्सिंग’ करण्यामुळे आणि त्याची जवळजवळ सर्वानाच खात्री पटल्यामुळे आता क्रिकेट हे डब्ल्यूडब्ल्यूएफप्रमाणे संपूर्ण खोटे असून, बघायला गंमत येते म्हणून बघायचा खेळ झाला आहे. त्यातच फिल्मस्टार्सच्या वरताण असलेले ग्लॅमर, धो धो मिळणारे पैसे, जाहिरातीत क्रिकेटरांभोवती घोटाळणाऱ्या सुंदऱ्या पाहून अनेक मुंगेरीलाल आपल्या दिवास्वप्नात जे हरवून जातात ते पुन्हा परत येतच नाहीत.
क्रिकेट हे फार वेगळे आहे. आयुष्यात येणाऱ्या घटनांना तोंड देता येण्यासाठी जी पूर्वयारी करायला लागते, ती करण्यासाठी क्रिकेटहून चांगला खेळ नाही. अनेक वेळा अन्य खेळ खेळणाऱ्या लोकांना क्रिकेटला दिले गेलेले अवास्तव महत्त्व डाचते.  सद्यपरिस्थितीत ते खरेही आहे, पण त्यांनाही हा लेख वाचून पटेल की, क्रिकेटमध्ये काही विशेष गोष्ट आहे आणि त्यामुळेच त्या खेळावर कित्येक लोक जीव टाकतात.
क्रिकेट हा कसा खेळ आहे, हे आधी पाहणे महत्त्वाचे आहे. क्रिकेट या खेळात दोन संघ एकमेकांविरुद्ध कधीच खेळत नाहीत; खेळतात दोन माणसे अकरा माणसांविरुद्ध. फुटबॉल, व्हॉलिबॉल या खेळात सर्व संघ एकदमच खेळतो. याबाबतीत क्रिकेटचे खो-खो आणि लंगडी या खेळांशी साम्य आहे. क्रिकेट हा खेळ सलग असा कधीच खेळला जात नाही. एक चेंडू टाकला की मध्यंतर असते. परत पुढचा चेंडू. मग सहा चेंडू झाले की बाजूबदल. त्यात पुन्हा वेळ जातो. साधारण एक ते दीड सेकंद खेळ होतो आणि मग विश्रांती असते. खेळणाऱ्या सर्वाना तेवढा सेकंद पूर्णपणे एकाग्र राहावे लागते. मग थोडे सैलावले तरी चालते. असे दिवसभर करत राहायला लागते. पाहणाऱ्या सर्वानाच हे समजते असे नाही. फक्त पाहतानाच नव्हे तर खेळतानादेखील अतिशय कंटाळवाणा होऊ शकणारा हा खेळ आहे. अशा कंटाळवाण्या परिस्थितीत एकाग्र होणे आणि सैलावणे असे करत राहणे फार दुष्कर आहे.
मुळात लहान वयातच क्रिकेट खेळायला लागल्यावर बॅटीला बॉल लागत नाही तेव्हाच एक ईर्षां उत्पन्न होते की, हा चेंडू मारायचाच! जेव्हा चेंडू बॅटीला लागतो आणि लांब जातो तेव्हा जो आनंद होतो तो फक्त ज्यांनी असा बॉल एकदा तरी मारला आहे त्यांनाच समजेल. पण तो तसा नेहमीच मारता येत नाही आणि मग एक शिक्षण चालू होते. हातात चेंडू घेऊन विशिष्ट जागी टप्पा पाडायचा प्रयत्न चालू केला की, ते किती अवघड आहे ते कळते. मग एक दिवस अचानक एक सुरेख चेंडू पडतो आणि बॅट्समनचा त्रिफळा उडतो; त्या वेळेस जो आनंद होतो तो ज्यांनी त्रिफळा उडवला आहे त्यांनाच कळतो. हातात कॅच घेताना जे समाधान होते तेही याच प्रतीचे असते. हळूहळू हे करण्याची धुंदीच यायला लागते.
क्रिकेटमधली ही मजा लुटण्यासाठी संघात प्रवेश मिळवायला लागतो आणि इथेच पहिल्यांदा आयुष्याचे शिक्षण चालू होते.  संघ शिशुशाळेचा आहे की कसोटीचा आहे याला काहीच महत्त्व नसते. कारण संघात घेतले आणि घेतले नाही, यामुळे होणारा आनंद आणि घोर निराशा सारखीच असते. कित्येकदा आपण चांगल्या विकेट घेतलेल्या असतात, चांगल्या रन्स काढलेल्या असतात आणि ऐन वेळेस आपले नाव संघात नसते. भलत्याच मुलाचे नाव कानावर पडले किंवा अकराजणांची नावे वाचल्यावर आपले नाव त्यात नाही, हे दारुण सत्य लहानपणी पचवायला लागते. हे पचवताना कधीकधी आपले नाव बारावे असते आणि संघातील सर्व खेळाडूंची कामे विनातक्रार करायला लागतात. आपण ज्या संघात नाही त्या संघातील कोणत्याही खेळाडूचे कोणतेही काम करायला लागते. पाणी नेऊन द्या, ग्लोव्हज् द्या, बॅट बदलून द्या.. इत्यादी. अतिशय स्थिर वृत्तीने हे सारे करायला लहानवयातच शिकायला लागते. मनातला संताप निवळून द्यायला लागतो. संघात नसताना वेळेवर येऊन, स्वच्छ कपडे वगैरे घालून जय्यत तयार राहायला लागते. कधी कधी कुणाचे कमनशीब तुमचे नशीब ठरते. अचानक व्यवस्थापक सांगतात की, ‘अरे शिशिरला ताप आला आहे, तर तुला घेतले आहे.’ एका क्षणात नव्हत्याचे होते झालेले असते. आणि अचानक कोणतीही मानसिक तयारी वगैरे केलेली नसताना तुम्ही मैदानावर उतरता. मनाचे संतुलन ठेवून अजिबात उत्तेजित न होता खेळण्याचे हे अतिशय अवघड शिक्षण लहानपणीच मिळते. कधीकधी उलटेच होते. म्हणजे तुम्हाला संघात घेतलेले असते, पण तुम्हीच कुठेतरी धडपडता. तुम्हाला खेळणे अशक्य होते. धैर्याने तुम्हाला गप्प बसून सारा सामना पाहावा लागतो. तुमच्याऐवजी ज्याला घेतले असते तो खूप धावा ठोकतो किंवा अनेक विकेट्स घेतो, पण खचून चालत नाही.
या सर्व गोष्टीवर मात करून तुम्ही बऱ्यापैकी खेळायला लागता. साधारणपणे तुमचा खेळ चांगला होऊ लागतो आणि पुढचे शिक्षण अजूनच अवघड बनते. आपण ते आता बॅट्समनच्या नजरेतून पाहू या.
अचानक विकेट पडते आणि आपली बॅटिंगला जायची वेळ येते. जगातला कोणताही थोर बॅट्समन असू दे, बॅटिंगला जाताना दर वेळेस पोटात खड्डा पडतोच पडतो. ‘सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति’ अशी अवस्था ज्याची होत नाही असा बॅट्समन विरळाच. आसपास लोक ओरडत असतात, दंगा चालू असतो. पॅव्हिलियनच्या अंधारातून एकदम उजेडात आल्यामुळे नीट दिसत नसते. बराच वेळ बसायला लागले असेल तर सारे अंग आंबलेले असते. कधीकधी अशा परिस्थितीत जलद धावा काढायच्या असतात. तर कधी विकेट गमावून चालणार नसते. अशातच गेल्या इनिंगमध्ये काढलेला भोपळा अगर भोपळे डोळ्यासमोर नाचत असतात किंवा गेल्या वेळेस ज्यांनी तुमची पहिल्या बॉलला विकेट काढली तोच गोलंदाज समोर असतो. बाद होऊन आत परत येणारा फलंदाज विकेट भलतीच फास्ट आहे किंवा टर्निग आहे जपून खेळ, असे उगाचच बोलून गेलेला असतो.
तुम्ही विकेटवर येता. नवीन बॅट्समन आला आहे तर लवकर सापळ्यात पकडावा म्हणून कर्णधाराने एकदम आवळून क्षेत्ररक्षण लावलेले असते. सगळे क्षेत्ररक्षक एकमेकांत विनोद करून हसत असतात कारण नुकतीच विकेट पडलेली असते. गोलंदाज तर नुसता फुरफुरत असतो. विकेटकीपर ‘बकरा आहे रे बकरा’ अशा प्रकारचे काहीतरी बोलून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. बॅट हातात नीट धरून मनातले काहूर बाहेर न दाखवता तुम्ही आवाजात अत्यंत आत्मविश्वास आणून पंचांना ‘वन लेग’ मागता आणि तो जगातला सगळ्यात अवघड असा चेंडू खेळायला तुम्ही तयार होता.
जगातला सर्वात अवघड चेंडू कोणता? तर तो पहिला चेंडू. त्याच्या इतका अवघड चेंडू दुसरा कोणताही नाही. तो कुठे पडणार, किती जोरात येणार, किती हलणार अगर वळणार, किती उसळणार हे काही म्हणजे काहीही माहीत नसते. लांबून पाहताना एक कल्पना आलेली असते, पण प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग नसतो. साधारण क्षेत्ररचनेवरून आणि गोलंदाजाच्या आविर्भावावरून तो कशा प्रकारचा गोलंदाज आहे हे समजते, पण तो कुठल्या प्रकारचा चेंडू कुठे टाकेल हे कळणे दुरापास्त असते. तो चेंडू पडतो. सामान्यपणे पहिल्याच चेंडूवर बाद होणारे कमी असतात म्हणूनच केवळ आपण बाद झालो नाही, हे सर्व फलंदाज मनोमन समजतात. पण हा एकच चेंडू खूप माहिती देऊन जातो अगदी त्या चेंडूवर चकलात तरी. साधारणपणे अतिशय सोप्या किंवा अतिशय अवघड चेंडूवर फलंदाज बाद होतात. सामान्यपणे या दोन्ही प्रकारात न बसणारा चेंडू पडतो आणि फलंदाज बाद होत नाही. सुरुवातीला चाचपडत खेळणारे कित्येक फलंदाज नंतर शतके ठोकतात, तर पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट चौकार मारणारे दहा-पंधरा धावा झाल्यावर बादही होताना दिसतात.
एकदा पहिल्या चेंडूवर बाद नाही झालात की, प्रत्येक चेंडू अधिकाधिक समजू लागतो. याच वेळेस नशीब आणि प्रयत्न या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे फलंदाजास समजते. फलंदाजाला तंबूत परत जायला फक्त एकच चूक पुरेशी असते, पण कधी नशीब जोरावर असते. क्षेत्ररक्षक मेहरबानी करतात, झेल सुटतात. कधीकधी पहिल्याच चेंडूवर झेल सोडतात. मग पुढे शंभर धावा केल्या तरी फलंदाजाला मनोमन माहिती असते की खरे पाहता या धावांची किंमत शून्य होऊ शकली असती. कधी अप्रतिम फटका मारलेला असतो पण त्याहून अप्रतिम क्षेत्ररक्षण केल्याने तंबूत परत यावे लागते. कधी आपलाच मित्र ‘येस नो, येस नो’ करत आपल्याला धावचीत करतो. डोळ्यांदेखत शतक करायची संधी हुकते. कधी समोरचा फलंदाज अप्रतिम सरळ ड्राइव्ह मारतो पण गोलंदाजाच्या हाताला लागून चेंडू स्टंप्सवर आदळतो. आपल्याला परत यावे लागते. कधी पंच चुकीने बाद ठरवतात. कधी बाद असून देत नाहीत. ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट तो टिकतो.
त्यातच बॅटिंग करताना ‘विचारपूर्वक’ बॅटिंग करता येत नाही, हे कुणालाच माहीत नसते. सेकंदापेक्षा कमी वेळात आलेल्या चेंडूवर निर्विकार अवस्थेत खेळायचे असते हे भल्याभल्यांना कळत नाही. एखादा फटका मारून बाद झाल्यावर तो कसा चुकीचा होता हे सांगणे फार सोपे असते. बऱ्याचदा असेच फटके मारून खूप धावा मिळालेल्या असतात हे सोयीस्करपणे सर्वजण विसरलेले असतात. त्यातच ‘राँग शॉट सिलेक्शन’ असे समालोचक बोलतात तेव्हा सर्वानाच असे वाटते की बॅट्समनसमोर हजार प्रकारचे शॉट मारण्याचे पर्याय असतात आणि मग बॅट्समन त्यातून एक निवडतो पण नेमका चुकीचा निवडतो आणि बाद होतो. तर असे काहीही नसते. फटका मारणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया असते.. कधी चुकीची होते, कधी बरोबर होते.    
(पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 1:01 am

Web Title: how to watch cricket
टॅग : Ipl,Sports
Next Stories
1 आनंदी दृष्टिकोन
2 जेवणाचा आनंद
3 व्यायामाचा आनंद
Just Now!
X