नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

मराठी संगीतामध्ये आजपर्यंत सर्वात जास्त प्राबल्य चित्रपट संगीत, लोकसंगीत आणि भाव-भक्तिसंगीत यांचंच राहिलेलं आहे. अल्बम हा प्रकारसुद्धा मराठी संगीतकारांनी भरपूर हाताळला आणि त्यात बऱ्यापैकी यशसुद्धा मिळवलं. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ‘अभंग तुकयाचे’ ही ध्वनिफीत किंवा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग, गणपतीची गाणी आणि रवी दाते यांनी सुरेश वाडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या गजला या मराठी रसिकांच्या मनात खूप मानाचं स्थान मिळवून राहिलेल्या आहेत. लोकसंगीतातसुद्धा लावण्या, कोळीगीते आणि इतर लोकगीते यांचे अल्बम प्रसिद्ध झाले आणि लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेमसुद्धा केलं. या ध्वनिफितींच्या मालिकेत एका ध्वनिफितीने मात्र  सर्वच दृष्टीने आपलं वेगळेपण सिद्ध केलं आणि गेली जवळजवळ ५० वर्षे त्यातील गाणी आणि काव्य यांना जेवढं मानाचं स्थान प्राप्त झालं आहे तेवढा मान क्वचितच दुसऱ्या कुठल्या ध्वनिफितीला मिळाला आहे. ती अत्यंत  एकमेवाद्वितीय ध्वनिफीत म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांनी गायलेली ‘शिवकल्याण राजा’!

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील सर्व रयतेचं प्रात:स्मरणीय असं दैवत. त्यांच्यावर अनेक चित्रपटगीते, पोवाडे, समरगीते आणि थोडय़ाफार प्रमाणात भावगीतेसुद्धा प्रसिद्ध झाली. परंतु शिवाजी महाराजांचा ढोबळमानाने चरित्रपट मांडणारा आणि मराठीतील गेल्या ४०० वर्षांतील अद्वितीय अशा वेगवेगळ्या कवींच्या कवितांनी आणि गीतांनी सजलेल्या या संग्रहाला खरोखरच मराठी संगीतात तोड नाही. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी बऱ्याच चित्रपटांना, भावगीतांना आणि अभंगांना चाली दिलेल्या आपण ऐकलेल्या आहेत. कायम प्रयोगशील राहणं आणि एकाच वेळेस अभिजात शास्त्रीय संगीतापासून ते कोळीगीतांपर्यंत सर्व प्रांतांत मुशाफिरी करणं आणि सर्वावर आपल्या प्रतिभेची छाप सोडणं हे अजिबात सोपं काम नव्हे. परंतु एकाच अल्बममध्ये विविध कवींची गाणी अत्यंत भिन्न भिन्न पद्धतीने संगीतबद्ध करून त्यांचा एक गुच्छ रसिकांसमोर सादर करणं हा प्रयोग मराठी संगीतात त्याआधी आणि त्यानंतरही फारसा प्रभावीपणे आपल्यासमोर आलेला नाही. तेव्हा असं नि:संदिग्धपणे म्हणावंसं वाटतं की, पंडितजींच्या प्रतिभेचा सूर्य सर्वात प्रखरपणे  तळपत असताना त्यांच्या हातून हा स्वराविष्कार घडला आणि आपल्याला एक अत्यंत अनमोल अशी भेट मिळाली.

‘शिवकल्याण राजा’ची सुरुवात होते ‘प्राणिमात्र झाले दु:खी’ या समर्थ रामदासांच्या छोटय़ा काव्याने. पण त्याच्याही आधी निरूपणकाराच्या भूमिकेत आपल्याला भेटतात साक्षात् शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे! बाबासाहेब पुरंदरे नसते तर ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिफितीला ही उंची प्राप्त झाली असती असं मला अजिबात वाटत नाही. अत्यंत शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार, थोडक्यात चार-पाच ओळीमध्येच अत्यंत हृदयाला भिडणारे असे अर्थपूर्ण शब्द आणि त्या निवेदनाच्या गर्भातून ऐकू येणारे संगीत आणि लताजींचा स्वर हा अभूतपूर्व योग यानिमित्ताने जुळून आलेला आपल्याला दिसतो. यातील सर्व गाणी आधीच्या गाण्याची आस घेऊन येतात आणि पुढच्या गाण्याला एक पाया प्राप्त करून देतात. ‘प्राणिमात्र झाले दु:खी’ यामध्ये आपल्याला सुरुवातीला विजांचा आवाज आणि नंतर डफावर वाजवलेला एक घुमारेदार रेलासदृश तालाविष्कार ऐकू येतो. ते सोडून या चार ओळींत कुठलंही स्वरवाद्य नाही! सुरुवातीलाच कोमल रिषभ आणि कोमल गंधार यांच्या साहाय्याने सुरू होणारी सुरावट दुसऱ्याच ओळीत शुद्ध धैवत आणि शुद्ध गंधार घेऊन एका वेगळ्याच प्रतलावर श्रोत्यांना नेऊन ठेवते. पुढे सादर होणाऱ्या सर्व गीतांच्या सांगीतिक श्रीमंतीची चुणूक आपल्याला इथेच जाणवते.

आणि रामदासांच्या या चार ओळी संपल्या की तिच्यातून भिन्नषड्ज रागातील सतार आणि सरोदचे सूर आपल्याला ऐकू येतात आणि सुरू होते शिवरायांची आरती! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अत्यंत जाज्वल्य, अभिमानाने युक्त असे शब्द आणि धृपद अंगाने त्याला दिलेली चाल आणि त्याचे केलेले संगीत संयोजन यामुळे एक अतिशय प्रसन्न वातावरण तयार होते आणि आपण या अल्बममध्ये गुंतत जातो. तसं बघायला गेलं तर पूर्ण गाणे भिन्नषड्ज रागावर आधारलेले आहे. परंतु पहिल्या अंतऱ्याच्या तिसऱ्या ओळीत ‘करुणारव’ या शब्दावर अचानकपणे शुद्ध रिषभ वापरून पंडितजी आपल्याला परत ध्रुवपदावर आणतात, ते ऐकून आपण रोमांचित होतो. तसेच ‘भगवन भगवद्गीता सार्थ कराया या’ या ओळीत ‘कराया’ या शब्दातील शेवटचा ‘या’ आणि त्याला जोडून येणारा स्वतंत्र ‘या’ हा शब्द याची जी स्वरयोजना पंडितजींनी केली आहे, ती कमाल आहे. या एका छोटय़ा गोष्टीवरून त्यांची महत्ता आपल्याला सहज कळते.

यानंतर येते ‘गुणी बाळ असा जागसि का रे वाया, नीज रे नीज शिवराया..’ काव्य, संगीत, संगीत संयोजन आणि गायन यांचा इतका पराकोटीचा मेळ जमलेला निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. सर्वच दृष्टीने हे गाणं हजार वर्षांत एखादी चांगली गोष्ट घडते त्यातील आहे. या गाण्याला वरवर अंगाईगीताची चाल आहे आणि पहिला अंतरा संपेपर्यंत ते कवितेच्या दृष्टीनेसुद्धा अंगाईगीतच वाटते. परंतु दुसऱ्या अंतऱ्यामध्ये एखादा काळपुरुषच किंवा स्वत: सह्यद्री शिवाजी महाराजांना त्यांच्या पुढील खडतर जीवनगाथेची सूचना देतो आहे असं वाटतं. गोविंदाग्रज यांचं हे काव्य मराठी संगीतातील एक अतिशय मानाचं पान आहे यात काही शंका नाही. अंगाईगीतापासून सुरू होणारा प्रवास अफझलखान, सिद्दीजमान आणि विजापूरच्या मुलुखमैदान तोफेपर्यंत पोहोचतो, हे केवळ विलक्षण आहे. स्वत: गोविंदाग्रजांनी या कवितेला ‘पाच देवींचा पाळणा’ असं नाव दिलं आहे. अंगाईगीताला साजेशी मध्य सप्तकात विहरणारी चाल अचानक ‘इकडे हे सिद्दीजमान, तो तिकडे अफझलखान’ या ओळीला तारसप्तकाला जाऊन भिडते आणि परत अतिशय सुंदर वळण घेत मुखडय़ावर येते. हा प्रवासच अत्यंत रमणीय आहे. विशेष उल्लेख करायला लागेल तो पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीचा. इतके पराकोटीचे उच्च कलाकार त्यावेळी मराठी भावसंगीतात आणि चित्रसंगीतात रमले होते, हे आपलं परमभाग्यच!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अजून एक अप्रतिम गीत या संग्रहामध्ये आहे- ‘हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’! अतिशय आक्रमक पद्धतीचं संगीत संयोजन, ळ१४ेस्र्ी३ आणि र३१्रल्लॠ२ चा अतिशय अप्रतिम वापर, कोमल धैवत आणि त्याला जोडून येणारा शुद्ध धैवत यांचा हार्मनीच्या संगतीने गुंफलेला हार आणि संचारीचा फार सुंदर उपयोग ही या गाण्याची वैशिष्टय़ं. टं्न१ आणि ट्रल्ल१ २ूं’ी२ ची वारंवार होणारी खांदेपालट हे सगळं खूपच अचंबित करणारं. या आणि इतर गाण्यांतही पं. रमाकांतजी म्हापसेकर यांनी वाजवलेला पखवाज हा इतका भरदार आणि ढंगदार वाजला आहे की केवळ तो पखवाज ऐकून आपले बाहू स्फुरण पावतात. याच संग्रहामध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याही दोन अत्यंत अप्रतिम रचना आहेत. बाजीप्रभूंचे पावनखिंडीतील बलिदान चित्रित करणारी ‘सरणार कधी रण’ ही एक अजरामर कविता ज्या पद्धतीने या अल्बममध्ये आपल्या भेटीस येते, तो एक ‘न भूतो न भविष्यति’ असा सुंदर मेळ आहे. ‘प्रभू’ या शब्दावर निषादवरून गंधारावर येणारी एक छोटीशी आणि साधी जागा लताजींनी इतक्या उत्कटपणे म्हटली आहे की अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाही. परत एकदा २३१्रल्लॠ२ आणि तारशहनाईचा अत्यंत सुंदर वापर आणि सगळ्या शुद्ध स्वरांच्या वातावरणात अत्यंत हृदयाला भिडत प्रवेश करणारा तीव्र मध्यम या गाण्यात फार प्रकर्षांने जाणवतो. ‘म्यानातून उसळे तरवारीची पात’ या गाण्यात घोडय़ांच्या टापांचा वापर करत वीररस आणि नंतर करुणरसनिष्पत्ती फार सुंदर पद्धतीने होताना आपल्याला दिसते. आत्तापर्यंत घोडय़ांच्या टापांचा वापर ओ. पी. नय्यर यांच्या रोमँटिक आणि प्रणयरम्य गाण्यांमध्ये आपल्याला अनेकदा दिसून आलेला आहे. परंतु या पद्धतीच्या गाण्यातले गांभीर्य कुठेही कमी होऊ न देता असा वापर करता येणं ही खूप अवघड गोष्ट आहे. या सगळ्याचं श्रेय अर्थात अनिल मोहिल्यांचं!

कविराज भूषण यांच्या ‘कुंद कहा पयवृंद कहा’ आणि ‘इंद्रजिमि जंभपर’ या दोन गीतांचाही समावेश या संग्रहात आहे. ‘कुंद कहा पयवृंद कहा’ या गाण्यात मेंडोलिन हे वाद्य वापरल्यामुळे ते गाणे इतर मराठी गाण्यांपेक्षा वेगळे वाटते आणि त्याला एक उत्तर हिंदुस्थानी रंग प्राप्त होतो. परंतु बाळासाहेब मंगेशकर यांची खरी प्रतिभा दिसते ‘इंद्रजिमी जंभपर’ या गाण्यामध्ये. म्हटलं तर ते काव्य द्रुत झपतालमध्ये लिहिलेलं आहे. परंतु त्याचं विलंबित किंवा मध्य लयीतील झपतालात रूपांतर करून जो अभिजात अनुभव आपल्याला येतो, तो अतिशय समृद्ध करणारा आहे यात वाद नाही.

या संग्रहाच्या अखेरच्या भागात आपल्याला ऐकू येते संत रामदासांचे अतिशय आनंदी, संतुष्ट आणि समाधानाने भरलेले आत्ममग्न शब्द.. ‘आनंदवनभुवनी’! अत्यंत साध्या ठेक्यामध्ये आणि चारुकेशीच्या साध्या सुरावटीत  बाळासाहेबांनी ही रचना स्वरबद्ध केली आहे.  यातील सह्यद्रीच्या कडेकपाऱ्यांत उमटणारा  प्रतिध्वनी इतक्या सुंदर स्वरांमध्ये बांधला गेला आहे, की खरोखरच रामदासांच्या हृदयात काय उचंबळून आलं असेल याचा अंदाज येतो. कविवर्य शंकर वैद्य यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला’ हे गीत या सर्व शिवगाथेची एक सुखांतिका! एका भव्य उत्सवाची वातावरणनिर्मिती या गीताच्या शब्दांतून आणि चालीतून होते. परंतु या सगळ्याचा खरोखर परमोच्च बिंदू ज्याला म्हणता येईल ते अखेरचं गाणं म्हणजे रामदासकृत ‘निश्चयाचा महामेरू’ हे गीत. केवळ तानपुऱ्याच्या साथीत लताजींचा आवाज इतका एकरूप झाला आहे की हे गाणे ऐकले की त्यानंतर तास-दोन तास या वातावरणातून बाहेर पडायला आपल्याला सहज लागतात. इतका सुकून, इतका ठहराव, इतकी शांती या गाण्यात भरलेली आहे की आपल्या डोळ्यांतून पाणी आल्यावाचून राहत नाही. ‘शिवकल्याण राजा’ पहिल्यापासून शेवटपर्यंत सलग ऐकलं की त्याची धुंदी उतरायला किमान सात-आठ दिवस तरी लागतात. शिवरायांप्रति आपल्या  मनात असलेली अपार भक्तीची भावना, बाळासाहेब मंगेशकरांचं संगीत, लताजींनी केवळ जादू वाटावी अशा पद्धतीने केलेलं गायन, अनिल मोहिले यांच्यासारख्या अत्यंत विद्वान आणि मातब्बर संगीतकाराचं संगीत संयोजन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची अमोघ वाणी, अत्यंत ऋषितुल्य असे प्रथितयश वादक आणि अतिशय रोमांचित करणारे काव्य इतका दुर्मीळ योग आजपर्यंत मराठीतच काय, परंतु इतर भाषांमध्येसुद्धा खूप क्वचितच जुळून आला असेल. ‘शिवकल्याण राजा’सारखे अप्रतिम संगीत-काव्य-गीत-शिल्प त्यानंतर परत कधीही घडलं नाही; आणि यानंतर परत होईल याची शाश्वती नाही. म्हणजे यासारखे कलाकार आजही आहेत, कदाचित त्याहून चांगले असतील. परंतु या प्रकारचं रसग्रहण करण्याची ताकद आणि त्यासाठी लागणारा वेळ आपल्याकडे आहे की नाही, याबाबतीत मात्र ठामपणे सांगता येणार नाही, हेच खरं..