16 January 2021

News Flash

इतिहासाचे चष्मे : चष्म्याच्या काचा स्वच्छ असाव्या!

भौतिक आयुष्यातल्या जवळपास सर्वच गोष्टींना नवनवी परिमाणे लागू होत आहेत.

एकूण सामाजिक, राजकीय, मानसिक, आर्थिक वगैरे सर्वच क्षेत्रांत बराच धूर, धुरळा उडतो आहे.

हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

‘इतिहासाचे चष्मे’ या पाक्षिक सदरातील हा शेवटचा लेख. मानववंशशास्त्रातील साधारणत: चोवीस-पंचवीस तत्त्वे केंद्रस्थानी ठेवून इतिहासाकडे आंतरविद्याशाखीय दृष्टीने बघण्याच्या वेगवेगळ्या रीतींचा परामर्श घेण्याचा हेतू मुळाशी ठेवून हे सदर लिहिणे सुरू झाले, त्याला आता वर्ष होईल. या काळात पर्यावरण झपाटय़ाने बदलले. एकूण सामाजिक, राजकीय, मानसिक, आर्थिक वगैरे सर्वच क्षेत्रांत बराच धूर, धुरळा उडतो आहे. नवनवे विकार, रोग, त्यांची वेगवेगळी रूपे येत आहेत समोर. माणूस बदलतो आहे. शहरे बदलत आहेत. गावे तर बदलून गेली आहेतच. भौतिक आयुष्यातल्या जवळपास सर्वच गोष्टींना नवनवी परिमाणे लागू होत आहेत.

खरं तर या सगळ्याचा आजच्या या सदरातील शेवटच्या लेखाशी किंवा लेखमालेच्या विषयाशी काय संबंध, असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण ही सर्व बदलती परिमाणे लक्षात यावी यासाठी साधारणत: देशी, विदेशी माध्यमे वाचावीत, अकादमिक जर्नल्स बघावी, अकादमिक अभ्यासक, संशोधक, पत्रकार इत्यादी मंडळींनी लिहिलेले ग्रंथ, रिपोर्ताज वाचावेत, लेख चाळावेत, माहितीपट पाहावे अशी साधारण धारणा जनमानसात अजूनही बऱ्याच अंशी टिकून आहे. आता माध्यमांची वाढलेली व्याप्ती, अभिव्यक्तींच्या शैलींमध्ये झालेला बदल किंवा उत्क्रांती या कारणांमुळे आता पॉडकास्टसारखी नवी माध्यमे आज स्वीकारली जात आहेत. सोशल मीडियावर बराच जम बसवलेल्या छोटय़ा पोर्टलसारख्या माध्यमांतून मिळालेली ढोबळ तपशिलात्मक माहिती वाचून लोकांची फावल्या वेळातली जिज्ञासा शमवली जाते. हे सारं योग्य आहे की अयोग्य, या वादात न जाता हे आजचे सामाजिक वास्तव आहे, हे आधी स्वीकारणे अधिक सोपे व सयुक्तिक ठरेल.

‘इतिहासाचे चष्मे’ हे सदर लिहिण्याची कल्पना सुचली तेव्हा वर म्हटल्यानुसार, खरे तर मानवी समाजाला, विशेषत: उपखंडातील मानवी समूहांच्या इतिहासाला ज्या ज्या म्हणून चौकटींतून बघता येईल त्या, त्या चौकटींपैकी महत्त्वाच्या चौकटींची नेमकी संरचना, घडण तपासता येईल असे काहीसे माझ्या डोक्यात होते. त्यानुसार मानववंशशास्त्रातील साधारणत: चोवीस-पंचवीस तत्त्वे केंद्रस्थानी ठेवून इतिहासाकडे आंतरविद्याशाखीय दृष्टीने बघण्याच्या वेगवेगळ्या रीतींविषयी या सदरात काहीएक चर्चा आपण केली. मात्र आज हा शेवटचा लेख लिहिताना या वर्षभरात समाजात, जगात प्रत्यक्ष घडलेल्या घडामोडींतून केवळ इतिहासच नव्हे, तर एकुणातच मानवी समाजातील सर्वच घटनांना नव्या चौकटी, नवीन चष्मे मिळणार आहेत. या चौकटींसोबत वाढणारी गुंतागुंत सर्वच क्षेत्रांना नव्या परिमाणांनी तोलण्यास भाग पाडणार असल्याचं सर्वाना जाणवत आहे.

अर्थात ही परिमाणे ठळक होत जात असली तरी समाजाला त्यांच्याशी जुळवून घेणं कितपत शक्य होणार आहे, किंवा समाज जगाकडे बघण्याची दृष्टी कितपत बदलणार आहे, हे मात्र सांगता येत नाही. अर्थात बदल असा झटकन् स्वीकारला जात नसतो, वगैरे पठडीबाज वाक्ये लक्षात घ्यावी लागणार असली तरी समाजाचा पोत, दर्जा अशा कसोटय़ांद्वारे जोखला जातो. कोविडसारख्या जगाला ग्रासून टाकणाऱ्या, साधारणत: सतरा लाख लोकांचा बळी घेणाऱ्या साथीच्या काळात भारतात घडलेल्या काही भयावह घटनांकडे बघण्याची दृष्टी ही जमातवादी असल्याची जाणीव झाली. अनेक धार्मिक संघटनांच्या मेळाव्यांचे, भूमिपूजनांचे, दिवेलावणीचे आयोजन करणाऱ्या संघटनांचा, धर्मधुरिणांचा व राज्यकर्त्यांचा बेजबाबदार बेदरकारपणा समोर आला. त्यातून निर्माण केल्या गेलेल्या जातीय, धार्मिक व पक्षीय राजकारणाच्या अजेंडय़ांना उघड किंवा आडून समर्थन देणाऱ्या समाजाचा- म्हणजे आपल्या सर्वाचा- सर्वपक्षीय, सर्वधर्मीय दंभदेखील समोर आला. इतिहास अशा वेळी निर्विकार, निष्पक्ष असलेल्या द्रष्टय़ा तत्त्वज्ञ, महात्म्यासारखा वागतो. तो तोडलेल्या बोटांची, उचकटलेल्या कोथळ्याची, फोडलेल्या मंदिरांची, मशिदींची नोंद घेतो, तशीच या साऱ्या बेजबाबदारपणाचीही नोंद घेतो. या सगळ्या नोंदींतून घडवल्या जाणाऱ्या स्मृती, या नोंदींतून आकाराला येणारं धर्मकारण, अर्थकारण, संस्कृतिकारण, राजकारण या साऱ्यांचं कर्तृत्व मात्र त्या, त्या काळातल्या मानवी समूहांकडेच राहतं.

ज्येष्ठ इतिहासकार संजय सुब्रह्मण्यम् यांनी मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटल्यानुसार, भारतातल्या विविध विचारसरणी व पक्षांच्या अनुषंगाने इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकारांमध्ये नेमका राष्ट्रवादी इतिहास लिहिताना कोणाचा राष्ट्रवाद हा अधिक प्रामाणिक आहे हे ठरवण्याची भलती हौस किंवा खोड असल्याचं म्हटलं आहे. खरे तर सुब्रह्मण्यम् यांच्या या मताची कक्षा थोडी रुंदावली तर केवळ राष्ट्रवादच नव्हे, तर धार्मिकता, पंथीयता, मूल्यरचना, आदर्शवाद  इत्यादी बाबतींतही कुणाची धार्मिकता किंवा अन्य पूर्वोक्त चौकट अधिक निखळ, तेजस्वी, शुद्ध वगैरे आहे याविषयीची एक अहमहमिका कायम दिसून येते. याच अहमहमिकेतून शिवबांसारखे न्यायाने राज्य करण्याची इच्छा तीव्र सत्ताकांक्षेत परिवर्तित झालेले राज्यकर्ते लोकशाही व्यवस्थेद्वारे लोकांच्या मनावर गारूड करू लागतात. बुद्धासारखे विरक्त असल्याची बेफाट जाहिरात करणारे धर्मधुरीण कोटय़वधी रुपयांच्या जाहिराती करू लागतात. ज्ञानमार्गी, निवृत्तीपर संप्रदायांच्या शेकडो एकर प्रॉपर्टीज् निर्माण होतात. या सगळ्याला कोंदण दिलं जातं ते राष्ट्रवाद, संस्कृती, जात आणि धर्म यांचे. याला बळ द्यायला असतात अब्जावधी डॉलर्समध्ये उलाढाल करणाऱ्या बाजारयंत्रणा!

या साऱ्याचा विचार करण्यासाठी, यातून इतिहासाची वाट धुंडाळण्यासाठी ‘इतिहासाचे चष्मे’ या लेखमालेत आपण वेगवेगळ्या काळात घडलेल्या घटना किंवा रचलेल्या कथांतून आकाराला आलेल्या स्मृतींचे आजच्या काळातील रूप संबंधित घटना किंवा साहित्यकृतींच्या परिशीलनातून जोखण्याचा प्रयत्न केला. भारतीय इतिहासाभ्यास क्षेत्राचा आधुनिक काळात झालेला विकास, त्याचे वासाहतिक मूळ, त्याला प्रत्युत्तर देण्याच्या खटाटोपांतून निर्माण झालेली राष्ट्रवादी भावना व तिच्यातील विसंगतीचा आढावा घेतला. वेदकाळातून उगम झालेल्या मिथकांच्या चौकटींचे बदललेले स्वरूप लक्षात घेतल्यावर त्या मिथकांसोबत येणाऱ्या गूढवादाची आणि अलौकिक अनुभूतिविश्वाची चिकित्सा काही प्रातिनिधिक उदाहरणांतून केली. मानवी विश्वात अपरिहार्य असलेल्या स्थलांतरांच्या पॅटर्न्‍सचा मागोवा घेताना त्यांमागचे ग्रांथिक संकेत आणि अपरिहार्यता लक्षात घेणे का गरजेचे आहे याचा परामर्श घेतला. सामूहिक अस्मितांची निर्मिती त्यांच्या ऐतिहासिक, वर्तमानकालीन संदर्भात तपासून घेतली. हल्ली परवलीचा शब्द झालेल्या  ‘पुरोगामी’ या शब्दाची ऐतिहासिक व्याप्ती लक्षात  घेत त्याचे वर्तमान नेमके कसे आहे याची चर्चा  दोन लेखांतून केली. हा सारा विषयांचा पसारा मांडताना पौर्वात्यवाद, बळ व बलाधिष्ठित राजकारण, अस्मिता, कर्मकांडे, धर्म आणि विज्ञानाचा संबंध जोडण्याच्या आजच्या लोकप्रिय रीतीची छाननी, भूगोल व इतिहास यांचा संबंध, साहित्य आणि इतिहास यांचा सहसंबंध, लिंगभाव, कुटुंबव्यवस्था, पवित्रता आणि इतिहास, सामाजिक उतरंड- अर्थात जातव्यवस्थेची ऐतिहासिक आणि आधुनिक संदर्भातील घडण, प्रमाणीकरणाचा आग्रह, पर्यावरण आणि ऐतिहासिक दृष्टी, संस्कृतीचे परिशीलन करणारे संरचनावादासारखे सिद्धांत आणि विश्वनिर्मितीसंबंधीचे ऐतिहासिक समज, कलाक्षेत्रातील ऐतिहासिकता यांसारखे विषय या लेखमालेतून हाताळले. या साऱ्या लेखांच्या मर्यादा बहुतांशी भारतीय किंवा उपखंडाच्या इतिहासाच्या कक्षेपुरत्या मर्यादित राहिल्या, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे.

वास्तवात इतिहास या ज्ञानशाखेला देशकालादि कृतक मर्यादा आधुनिक समाजरचनेच्या, राजकीय रचनेच्या घडणीतून पडल्या असल्या तरी डेव्हिड लुडेन या अभ्यासकाने म्हटल्यानुसार, विवक्षित संस्कृतीच्या कक्षांच्या पल्याड जाऊन इतिहासाकडे बघणे- अर्थात History Outside Civilizationया दृष्टीने इतिहासाविषयी प्रामाणिक जिज्ञासा असलेल्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोण तयार व्हायला हवा. अर्थात विशिष्ट भूभाग किंवा राष्ट्रीयता या मर्यादा आजच्या सामाजिक, राजकीय रचनांचे वास्तव असल्याने संबंधित रचनांच्या परिप्रेक्ष्यात इतिहासाची मांडणी करण्याला एका विशिष्ट संदर्भात महत्त्व आहेच. मात्र सुब्रह्मण्यन यांनी विशिष्ट संस्कृती किंवा त्यांच्या मांडणीला अधिक थोडं व्यापक बनवत श्रद्धा, राष्ट्रीयता व अस्मितांच्या चौकटीत बघण्याची रीत अंधतेने स्वीकारल्यास त्यातून विवक्षित अस्मिताविषयाचा गौरव करणाऱ्या सुवर्णयुगादि कल्पनांचा अतिरेकी पुरस्कार त्यातून  होतो आणि  मग इतिहास संकुचित होत जातो.

अशा वेळी संस्कृतीप्रेमाची प्रामाणिक कसोटी म्हणून आपल्याला पुन्हा चिकित्सेकडेच वळावे लागते. विशिष्ट अवस्थेतील एखाद्या तत्त्वाला किंवा रचनेला वेगवेगळ्या काळातील प्रामाण्याच्या निकषांनुसार घासून, तावूनसुलाखून शुद्धतेच्या विशिष्ट चौकटीत बसवलेल्या रचनेला उद्देशून ‘संस्कृत’, ‘संस्कारित’ ही विशेषणे किंवा ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो. हे निकष लिंगभाव, स्थलांतर, अस्मिता, बाजारपेठेतील प्रवाह इत्यादी चष्म्यांच्या चिकित्सक नजरेतून वारंवार जोखून, तपासून घ्यावे लागतात.

इतिहास हे  शास्त्र असले तरी ते विविध वास्तवांविषयीच्या विविध धारणांतून, स्मृतींतून व्यक्त होत असते. अनेकदा आपल्याला न पटणारी वास्तवे काळ्या यादीत टाकताना त्या वास्तवांचे भूतकाळात, वर्तमानकाळात झालेले, होत असलेले आणि भविष्यकाळात उमटणारे पडसाद सर्वच समाजाला गती प्रदान करत असतात. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेली तटस्थता, साक्षेप आणि विवेक हे वर्तमानातील समाजाच्या भविष्याची दिशा ठरवत असतात. इतिहासाच्या चष्म्याच्या काचा वारंवार स्वच्छ करणे आवश्यक असते ते यासाठीच!

(लेखक धर्म, इतिहास आणि भाषा या विषयांचे अभ्यासक आहेत.)

(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 1:05 am

Web Title: human civilisation history itihasache chasme dd70
Next Stories
1 सांगतो ऐका : कभी अलविदा ना कहना!
2 अफसाना लिख रही हूँ.. : तिहाई..
3 पडसाद : सामान्यांच्या विश्वासाला तडा
Just Now!
X