गोष्ट परवा रात्रीची. बँक स्टेटमेंट घेण्यासाठी म्हणून कोपऱ्यावरच्या एटीएममध्ये गेलो. कार्ड घातले अन् काही केल्या पिन नंबर आठवेना. आकडे अंधूक झाले होते. तीनदा वेगवेगळी कॉम्बिनेशन्स झाल्यावर मशीनने कार्ड रद्दबातल ठरविले. गिळंकृत केले नाही हे माझे नशीब. काम झालेच नाही. माझा नुसता तिळपापड.. चरफड.. गेल्या पंधरा वर्षांचं माझं अकाऊंट.. आज एक अद्ययावत यंत्र माझी माहिती मलाच नाकारत होते. दोष यंत्राचा नव्हता, माझा होता. चूक तंत्रज्ञानाची नव्हती, माझ्या स्मरणशक्तीची होती. धुसमुसत घरी आलो. आई म्हणाली, ‘‘रोज चार बदाम खा.’’ भावाला फोन केला, तो शांतपणे म्हणाला, ‘‘माझी अशी दोन कार्डे रद्द झाली आहेत.’’
 वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी आपल्याला अल्झायमर्स तर सुरू होत नाही ना! या शंकेने झोप आली नाही आणि मग दोन गोष्टी स्पष्ट झाल्या की, हल्ली आपल्याला हे असे विस्मरण आणि गोंधळ होतोय खरा. आणि दुसरे म्हणजे ते फक्त आपल्यालाच नाही, तर शेजारच्या खांडेकरांना, पलीकडच्या ताम्हणकरांना आणि त्यांच्यापलीकडच्या दिनेशभाईंनाही होतोय. मोठय़ा शहरातले व्यस्त जीवन जगताना, लक्षात ठेवायच्या स्र्१्र१्र३्री२ ठरविताना, ऑफिसातल्या ऊीं’्रिल्ली२ पाळताना आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या, पण रोज न लागणाऱ्या गोष्टी आपण विसरतोय. हा कितीही स्र्१३ीू३ी िेील्ल४ असला तरी नेमक्या वेळी फीूं’’ करायला पुरेशी फअट आपल्यापाशी नाही, उलट मेंदू हळूहळू ‘राम’ म्हणतो आहे.
..धड झोप आली नाही. साडेनऊच्या ठोक्याला बँक गाठली. रांगेत उभे राहावे लागणार. त्रासिक मुद्रेने ऑफिसर ‘‘काय झम्प्या आहे? पिन विसरला म्हणजे काय?’’ असे म्हणणार. माझीच मला ओळख दहा वेळा पटवून द्यावी लागणार. जन्मदिवस, पत्ता सांगायचा. आईचे माहेरचे नाव.. नशीब एवढय़ावर निभावते अन् गोत्र, नक्षत्र, कूळ आणि कुंडलीतल्या ग्रहांचा पसारा सांगावा लागत नाही. पण यातले काहीच झाले नाही. टेबलापलीकडच्या सुजाता मॅडमनी हसून स्वागत केले. बसायला खुर्ची दिली. मॅनेजरांनीही आश्वस्त केले. कर्मचाऱ्याने चहाचा कप दिला आणि.. आणि पुढच्या पंधरा मिनिटांत नवा पिन घेऊन मी बाहेर पडलो ते बँकेला धन्यवाद देत. मनात विचार आला की, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शेवटी मानवी स्पर्श, शब्द आणि ध्वनी यांना त्याने बदलू नये.
बँक ही तर आपल्या सर्वाच्या विश्वासाची ठेव.  पुंजी वाढते, पतसंस्था फोफावते ती लोकांच्या विश्वासाच्या नात्यावर. जिव्हाळा, आपुलकी यांची भर पडली तर सोन्याहून पिवळे, पण मूळ विश्वासाला कधी तडा जाता कामा नये. या विश्वासाची जोपासना करायची तर कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणही द्यायला हवे. केवळ नोकरीत प्रवेश करताना नव्हे, तर पुन:पुन्हा मरगळ झटकण्यासाठी रिफ्रेशर कोर्सही व्हावेत.  जसजशी संस्था मोठी होते, तिचा पसारा वाढतो, तसतशा गोष्टी यांत्रिकी होऊ लागतात. भावनेचा ओलावा सरतो.. पण ग्राहकांना नेमका हा भावनेचा ओलावाच हवा असतो. पसे त्यांचेच असतात, व्याजाची काय ती थोडी फार भर.. पण ते देताना आपण त्याच्यावर उपकार करीत नाही, तर त्यांच्या घरातलेच काम करीत आहोत, ही भावना हवी. सही जुळत नाही म्हणून कॅशिअर डाफरल्यावर जन्मभर अकाऊंट्स ऑफिसर असलेल्या माझ्या वडिलांना झालेल्या यातना मी अनुभवल्या आहेत. बँकेत मोबाइलवर बोलू नका म्हणून माझ्या एका विद्याíथनीवर ओरडणाऱ्या कर्मचाऱ्याला, ‘अहो, ती डॉक्टर आहे अन् एका पेशंटसाठीच हॉस्पिटलमधल्या नर्सशी बोलते आहे,’ हे मला सांगावे लागले आहे.
बँक ही मध्यमवर्गीयांच्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. पुढची पिढी कदाचित पूर्णपणे प्लॅस्टिक मनी वापरेल, पण आजच्या पन्नाशीतल्या आमच्या पिढीला अजूनही पासबुक आणि बँकेतल्या मंडळींचा आधार आहे. एका अर्थी बँक आणि रुग्णालयातील आमचे काम साधम्र्यधर्मी आहे. डॉक्टरांच्या एकेका शब्दासाठी, कटाक्षासाठी रुग्णाचे नातेवाईक आसुसलेले असतात. दुर्दैवाने आम्ही कधी कधी महाग होतो.  रुग्णालयात नातेवाईक जीव आमच्या हातात सोपवितात, बँकेत आपण त्या जीवाचे ‘जगणे’ बँकेच्या हवाली करतो. ‘मर्मबंधातली ठेव’ म्हणजे बँक.
गोष्ट आहे अमेरिकेतली. १८ एप्रिल १९०६ रोजी अ‍ॅमॅडिओ गिएनिनि सकाळी ५.१५ वाजता प्रचंड हादऱ्याने जागा झाला. पलंग, टेबल, कपाट, सारे घरदार आणि खालची जमीन हादरत होती. कॅलिफोíनयामधील तो मोठा धरणीकंप होता. १७ मलांवरच्या सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये जमीन खचली होती.  इमारती भूगर्भात पडल्या होत्या. रस्त्यावर दगडविटांचा थर पडला होता. गॅस पाइप फुटले होते, ठिकठिकाणी आगी लागल्या होत्या. गिएनिनिने मोठय़ा कष्टाने स्थापन केलेली ‘बँक ऑफ इटली’ या शहरात वसली होती. इमारत जमीनदोस्त झालीच असणार, पण निदान लॉकरमधली रोख रक्कम वाचवावी या हेतूने गिएनिनिने बँकेकडे धाव घेतली.  शहरात लुटारूंचे साम्राज्य निर्माण झाले होते. इतर बँका नामशेष झाल्या होत्या. शहरातील लोकांना पुन्हा उद्योगधंदे सुरू करावयाचे तर भांडवलाची गरज भासणार होती. भूकंपाच्या दुसऱ्याच दिवशी दोन िपपांवर लाकडाची एक फळी ठेवून गिएनिनिने बँकेच्या कामाला पुनप्र्रारंभ केला. हजारो गरजूंना कर्जाऊ रक्कम दिली. व्यवसाय आणि शहर पुन्हा बांधले गेले. गिएनिनिने दिलेली सर्व कर्जे लोकांनी मुदतीत परत केली. गिएनिनिने लोकांना पसे देऊन प्रचंड विश्वास संपादन केला आणि पुढच्या काही वर्षांत ‘बँक ऑफ इटली’चे परिवर्तन ‘बँक ऑफ अमेरिका’मध्ये करण्यात आले. पुढची अनेक दशके ‘बँक ऑफ अमेरिका’ जगातील सर्वात बलाढय़ बँक बनून राहिली. कित्येक शाखा, एटीएम्सह देशोदेशी विस्तार आणि अब्जावधी डॉलर्सचे भागभांडवल.. पण तंत्रज्ञानाची प्रगती आणि विस्तार तिला १९८० नंतर तोटय़ातून आणि पतनातून वाचवू शकले नाहीत.  बँकिंग क्षेत्रातील या टायटॅनिकच्या अध:पतनाची अनेक कारणे होती, पण सर्वात प्रमुख कारण होते- ठेवीदारांचा गमावलेला विश्वास.
..आपण या साऱ्यातून वेळीच बोध घेऊ या.  एटीएम्स, मोबाइल-अ‍ॅप हे सारं असेलच, पण काऊंटरपलीकडच्या सुजाता मॅडमचं आश्वस्त हसूही असू दे.. आमच्या पिढीला त्याचाच आधार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I forgot my atm password
First published on: 06-04-2014 at 01:18 IST