|| सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास..

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

सदू धांदरफळेचा एकसाथ नमस्ते.

दादू, तू पत्राच्या शेवटी ‘मस्ती की पाठशाला’चा विषय काढून ‘स्कूल चले हम’चा नारा दिलास आणि मन कसं चाळीसेक र्वष मागे गेलं बघ. तसंही जून महिना उगवला की शाळेत असताना अध्र्याहून अधिक दिवस दांडय़ा मारल्याबद्दल नापास होणाऱ्या लोकांनाही शाळेचे दिवस आठवू लागतात आणि ते चक्क रम्यही वाटू लागतात. आपलं असं काही होत नाही. भूतकाळानं माझ्या जिभेवर रेंगाळणारी चव कमी आणि पाठीवर ठसठसणारे रट्टेच जास्त दिले असल्यामुळे असेल कदाचित- मी भूतकाळाचा रमता जोगी नाहीये.

खरं सांगू, जवळ जवळ दोन महिन्यांच्या सुटीनंतर माझ्या मुलीची शाळा सुरू होतेय तेव्हा आनंद, दु:ख, औत्सुक्य यापेक्षा माझ्या मनात सुटकेचीच भावना जास्त आहे. अरे, मला जरी दोनच मुली असल्या आणि त्या बऱ्यापकी शांत असल्या, तरी मागील दोन महिन्यांत सहा पोरांनी घरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता.. नोबिता, शिझुका, जियान, सुनिओ, छोटा भीम आणि शेवटचा तो अक्करमाशा.. डोरेमोन! या सगळ्या चायनीज, जापनीज पोरांपासून सुटका होणार याचाच मला आनंद आहे.

ज्यांना कुणाला शाळेचे दिवस रम्य

वाटतात त्यांना वाटू दे बापडे; पण मला बालपणीच्या कटू आठवणीच सारख्या सतावीत राहतात. मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि अजूनही कळत नाही, की दिवसाची सुरुवात आपल्या मनाजोगत्या गोष्टीनं झाली तर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दिवस चांगला जातो, हे सगळ्यांनाच माहीत आणि मान्य आहे. तरीही आपल्याला दररोज सकाळी शाळेत जाण्यासाठी मनाविरुद्ध

झोपेतून का उठवलं जातं? पालकांनी रोज लवकर उठवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन परिणामी मी शाळेत नापास व्हायचो. पण माझ्या या अपयशाचं पालकत्व माझ्या पालकांनी आपल्या शिरावर न घेता ते नेहमीच माझ्या डोक्यावर, पाठीवर आणि पाश्र्वभागावर बिंबवण्याचं काम उत्साहानं केलेलं आहे. आणि त्यामुळेच कदाचित माझ्या मनात शाळेबद्दल एक प्रकारची अढी निर्माण झालेली आहे.

शाळेत जाण्यासाठी मला अंथरुणातून उठवणं हा माझ्या पालकांसाठी एक मोठाच प्रोजेक्ट असायचा. तो प्रोजेक्ट ‘शोन्या’, ‘बाळा’ असा प्रेमानं सुरू होऊन पांघरून ओढणं, कानात गवताची काडी घालणं, तोंडावर पाण्याचा हबकारा मारणं असा व्हाया रूट घेऊन शिव्या आणि लाथाबुक्क्यांवर पूर्ण व्हायचा. (पुढे एमबीएसाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ शिकताना उढट आणि ढएफळ सारख्या संज्ञा मला समजायला सोप्या गेल्या, त्याचं कारणही हेच.)  मिटलेल्या डोळ्यांनी चुलीतल्या राखेनं दात घासत असतानाही शाळेच्या विचारानं माझ्यात हॅम्लेट संचारलेला असायचा.. ‘कोणी सुट्टी देता का रे सुट्टी? टू गो ऑर नॉट टू गो टू स्कूल दॅट इज द क्वेश्चन.. शाळेत जावं की नाही, हा एकच सवाल आहे! या कंटाळवाण्या, कोंदट शाळेतील हजेरीपटाच्या उकिरडय़ावर गर्दीचा तुकडा होऊन न आवडणाऱ्या विषयांचा अभ्यास करावा.. बेशरम, लाचार आनंदानं? भिजलेल्या चड्डी- दप्तरानिशी वर्गामध्ये किडा-मुंगीसारखं अडकून पडावं, मास्तरांच्या छडय़ा खाव्यात की फेकून द्यावं हे देहाचं दप्तर गप्प घरच्या बिछान्यावर.. आणि काढावी दिवसभर झोप? आणि सांगावं सगळ्यांना, की नका जाऊ तुम्हीही.. शाळेत, शेतात, ऑफिसात, कुठेही.. खड्डय़ात गेली ती शाळा आणि तेल लावत गेली ती भविष्याची सोनेरी स्वप्ने!’

पण हे सगळं मनातल्या मनात राहायचं. कधी वाटायचं, की जिथं शाळाच नाही अशा एखाद्या देशात आपला जन्म व्हायला हवा होता. पण शाळा नसलेला देशच जगात नाही असं जेव्हा कळलं तेव्हा थोडीशी निराशाच झाली. विचार केला.. आपणच कुठंतरी जमीन घेऊन असा एखादा देश निर्माण करायला हवा. सुयश दीक्षित या सनकी इसमानं इजिप्त आणि सुदानच्या मध्ये ८०० चौरस मलांच्या जागेवर आपला हक्क सांगून स्वत:ला त्या प्रदेशाचा राजा घोषित केल्याची बातमी मध्यंतरी वाचनात आली होती. मी त्यादृष्टीनं अधिक तपास केल्यावर मला असं लक्षात आलं की, असा काही प्रदेश असण्याची शक्यता नाही. कारण असा मोकळा भूखंड असता तर आपल्या जाणत्या राजांनी तो सोडला नसता. आणि असा एखादा देश असता तर आपल्या पीएमसाहेबांनी दौरा करायचा सोडला नसता! असो. आधीच माझ्या पत्रात फापटपसारा असतो; त्यात हे आणखीन विषयांतर झालं.

जरा मोठा झाल्यावर (म्हणजे बाबांच्या भाषेत ‘शिंगं फुटल्यावर’!) मी ‘शाळेत न जाता घरून अभ्यास करीन’ हे पटवण्यासाठी एकलव्याचं उदाहरण देऊन बाबांबरोबर वाद घातला तेव्हा बाबांनी ‘तू गुरूंना तुझा अंगठा कापून द्यायला तयार आहेस का?’ असा प्रतिप्रश्न करून मला चूप करण्याचा प्रयत्न केला. पण वादविवादात मी संबित पात्रा कोळून प्यायलो असल्यानं मी बाबांना म्हटलं की, हे इतिहासाचं विकृतीकरण आहे. मला अशी ठाम खात्री आहे की, एकलव्याचा तो अंगठा द्रोणाचार्यानी कापून नव्हे, तर आधार व्हेरिफिकेशनसाठी मागितला असावा! ‘मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार.. आणि मुलांनी आपल्याला शिकवणं म्हणजे उर्मटपणा!’ असेच संस्कार आमच्या बाबांवर झालेले असल्यामुळे त्या दिवशी पुन्हा एकदा माझ्या पाश्र्वभागाचा एफएसआय वाढला होता. असो.

तर सांगायचा मुद्दा हा, की अजिबात इच्छा नसताना बाबांनी माझं शाळेत नाव घातलं म्हणून मी शाळेत गेलो. अभ्यासात रुची आणि गती दोन्ही नसल्यानं मी त्या भानगडीत कधी पडलोच नाही. परीक्षेत कॉपी करण्याइतपत हिंमत आणि बनेलपणा अंगात नसल्यानं तेही कधी जमलं नाही. नाही म्हणायला, वैकल्पिक प्रश्नाच्या उत्तरात माझ्या बाजूनं पडलेल्या नशिबाच्या फाशांमुळे चुकून एखाद्या चाचणी परीक्षेत मी नंबरातही यायचो. इतर पोरं कॉपी करून पास होतात अशी कुरबुर मी सतत करायचो. पण माझं म्हणणं शाळेत किंवा घरीही कुणी कधी मनावर घेतलंच नाही. (आज मी कुटुंबप्रमुख असूनही अजूनदेखील ही उज्ज्वल परंपरा सुरूच आहे.) वार्षकि परीक्षेचा रिझल्ट हाती आल्यावर आज घरी गिळायला मिळणार नाही हे माहीत असल्यानं शाळेजवळ असलेल्या मावशीच्या घरी जेवून मगच मी माझ्या घरी जायचो.

दादू, आता हे सर्व तुला सांगण्याचं कारण एवढंच, की इतके सारे गुण, साऱ्या सवयी जुळत असूनही मी इथे दोन वेळच्या जेवणासाठी खर्डेघाशी करतोय आणि दिल्लीत तो खळीस्तानी राजकुमार एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. बहोत नाइन्साफी है, माय लॉर्ड!

दादू, आपल्या वेळी कशी शाळा म्हटली म्हणजे परिसरात असलेली एसएससी बोर्डाची एकमेव जिल्हा परिषदेची शाळा असायची. आता वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांचं पेवच फुटलंय. आयसीएससी काय, सीबीएससी काय, इंटरनॅशनल काय; अमुक स्पेशल, तमुक स्पेशल अशाही शाळा निघाल्यात. परवा मी रस्त्यानं जाताना चक्क वेद शिकवणाऱ्या एका शाळेची जाहिरात पाहिली. मनात म्हटलं, मुलांना वेद वाचायला शिकवा, ते चांगलंच आहे हो. पण त्यांनी चांगले नागरिक व्हावं अशी तुमची इच्छा असली तर आधी त्यांना इतरांची वेदना वाचायला शिकवा. कारण या समरसतेच्या साक्षरतेचीच समाजाला आणि देशाला अधिक गरज आहे.

हे बघ मित्रा, माझ्या मुलीनं खूप प्रगती करावी असं मला वाटतं म्हणून मी तिचा अभ्यास घेत नाही. पण पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडायला जाणं ही डय़ुटी मात्र मी आनंदानं करतो. बरेच पालक मोटारसायकल, कार, रिक्षा अशा वाहनांतून मुलांना शाळेत सोडायला आलेले असतात. आज पालकांमध्ये शिक्षणाविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. पाल्याप्रती पालकांच्या आशा-अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. या आशा-अपेक्षांचं ओझंच अलीकडे दप्तराच्या ओझ्यापेक्षा अधिक झालं आहे. मुलीचा शाळेचा पहिला दिवस अनुभवताना मीही नकळत भूतकाळात जातो. आठवणींत रमतो. मनाच्या पडद्यावर फ्लॅशबॅकमध्ये एक कृष्णधवल सिनेमा सुरू होतो. नवीन गणवेश, नवीन वह्य-पुस्तकं, नवीन वर्ग, वर्गातले ओळखीचे आणि अनोळखी चेहरे, आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय, आपला लकी हजेरी क्रमांक मिळतोय की नाही, नवीन शिक्षक कोण याची उत्सुकता, आपलं नवंकोरं दप्तर भिजू नये म्हणून आपला चाललेला आटापिटा.. मागच्या वर्षी चांगले मार्कस् मिळाल्यानं उगाचच भाव खाणारी मुलं, पावसानं ओलसर दमट झालेले ते बेंच, त्या पोपडे उडालेल्या वर्गाच्या भिंती, अभ्यासू, मध्यम, टवाळ सगळ्या प्रकारची मुलं, वरवर शांत वाटणाऱ्या, पण प्रत्येक गोष्ट बारीक नजरेनं टिपणाऱ्या मुली, वर्गातला कोलाहल, स्वच्छतागृहाजवळचा नाक जाळणारा भपकारा, टीचर रूममधली गडबड, आपला आवडता बेंच पकडण्याची चढाओढ.. हे असे आठवणींनी भरलेले आणि भारलेले दिवस आठवले की मनही भरून येतं.. फक्त शरीर शाळेतून शिकून बाहेर पडलंय आणि पोटासाठी राबू लागलंय.. मन अजूनही तिथंच बसलंय ठाण मांडून.. ओल्या, दमट बेंचवर.. कायमचं.. एक विद्यार्थी म्हणून!

– तुझा आजन्म विद्यार्थी-मित्र..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com