12 November 2019

News Flash

एक टप्पा आऊट

दादू, तुम्ही काही क्रिकेटब्रिकेट बघता की नाही?

|| सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यांस..

सदू धांदरफळेचा नमस्कार.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमुळे आणि त्यात आपला देश विजेतेपदाचा संभाव्य दावेदार असल्याने सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहौल आहे. जगातल्या १९५ पकी (मागील दोन-तीन दिवसांत मी पेपर वाचलेला नाहीये. यादरम्यान अखंड हिंदुस्थान अस्तित्वात आला असेल, किंवा भारतासह जगभरातल्या विविध फुटीरतावाद्यांनी आपले नवे देश स्थापन केले असतील तर हा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. चूकभूल द्यावी-घ्यावी.) जेमतेम दहा देश खेळत असलेली स्पर्धा ‘वर्ल्ड कप’ कशी काय असू शकते, या जुन्या प्रश्नाबरोबरच उद्या २५-३० देश या स्पर्धेत भाग घेऊ लागले तर या स्पर्धेला ‘युनिव्हर्स कप’ म्हणावं लागेल की काय, अशीही एक शंका डोक्यात चमकून जाते. असो.

दादू, तुम्ही काही क्रिकेटब्रिकेट बघता की नाही? की तुम्हीही माझ्यासारखे क्रिकेटपासून क्रीझभर अंतर राखून आहात? नाही म्हणजे तसं मला आधी क्रिकेटचं खूप वेड होतं, पण मागे ते मॅच फिक्सिंग प्रकरण झाल्यापासून माझा क्रिकेटमधला रस इतका आटला आहे की माझ्या हाताशी अगदी समाजकल्याण मंत्र्याइतका मुबलक वेळ असला तरी मी टीव्हीवर नुरा कुस्तीचे सामने पाहतो, टेलिशॉपिंगच्या जाहिराती पाहतो; पण क्रिकेट पाहत नाही.

असं म्हणतात की, क्रिकेट हा भारतीयांचा खरा धर्म आहे. क्रिकेट न आवडणारा भारतीय माणूस शोधून सापडणे मुश्किल. लहानपणी मीही याला अपवाद नव्हतो. पाण्यात पडल्यावर पोहोता येतं तसं हातात बॅट घेतल्यावर क्रिकेट खेळता येईल, हा सर्वसामान्य भारतीयांना असणारा ओव्हर- कॉन्फिडन्स लहानपणी मलाही होता. ज्या मुलाची बॅट असेल त्याला पहिली बॅटिंग देणे, तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला तर तो बॅट घेऊन घरी जाईल या भीतीपोटी त्याला ट्रायल बॉल म्हणून नॉट आऊट देणे.. हे सगळे नखरे मीही सहन केलेत. मिळेल त्या लाकडाच्या हाताने बनविलेल्या बॅटपासून वर्गणी काढून आणलेल्या बॅटपर्यंत, कागदाच्या आणि रबराच्या बॉलपासून टेनिस बॉलपर्यंत, चांगल्या खेळाडूला प्रतिस्पर्धी संघातून वगळायला लावण्याच्या दुराग्रहापासून एक रुपये दहा पशाची पज लावण्यापर्यंत, ‘एक टप्पा आऊट’पासून सिक्सर मारून आपल्या हृदयसुंदरीच्या घराच्या खिडकीची तावदाने फोडण्यापर्यंत विविध लेव्हलचं क्रिकेट मीही खेळलोय.

प्रत्येक माणसाचं किमान एक तरी स्वप्न असतंच. माझंही होतं. आमच्या गावच्या टीममध्ये माझा समावेश मोठय़ा मुश्किलीने होत असला तरी एक दिवस भारतासाठी खेळून वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून देशाला जिंकून द्यायचं स्वप्न मीही पाहिलंय. पण स्वप्नांना कृतीची जोड मिळाली नाही की सगळ्या स्वप्नांचं जे होतं तेच माझ्याही स्वप्नाचं झालं. स्वप्नांच्या खेळपट्टीवर पोटापाण्याच्या जबाबदारीचा धो-धो पाऊस पडला आणि आमचा सामना रहित करण्यात आला. असो.

दादू, तू आपला खास माणूस आहेस म्हणून तुला सांगतो. आमच्या गावच्या संघातर्फे खेळताना माझ्याकडे झेल आला की तो नक्की सुटणार, मी बॅटिंग करत असेन तर ऐन मोक्याच्या वेळी शंभर टक्के त्रिफळाचित होणार, आणि चुकून मला बॉलिंग दिली असेल तर अटीतटीच्या वेळेला मी नोबॉल देणार हे अख्ख्या गावाला माहीत झालं होतं. मी लहानपणीच ‘श्यामची आई’ तीन-तीन वेळा वाचलेलं असल्याने मदानात असताना आपण जिंकणार, या आनंदापेक्षा समोरची टीम हरणार, याचं मला जास्त दु:ख व्हायचं. तुला पटो अगर न पटो, केवळ आणि केवळ त्या समोरच्या टीमच्या आनंदासाठी मी आत्मघातकी खेळ करायचो. दादू, आज या वयात मागे वळून पाहिल्यावर दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानल्याचं मला खूप दु:ख होतं! अरे, त्या वेळेला सामना पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांकडून माझी जी हुर्यो उडवली जायची त्याचा सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा रे. पण नंतर नंतर त्याचं काही वाटेनासं झालं. कुणीतरी म्हटलं आहेच की, एकदा पत गमावली की आपण वाटेल तसं वागायला मोकळे होतो.

एकदा का आपल्याला आपली क्रिकेटच्या मदानातली औकात कळली की सगळे भावी तेंडुलकर, कोहली, धोनी जे करतात तेच आपणही करू लागतो. घरी सोफ्यावर बसून टीव्हीवर मॅच पाहता पाहता खेळाडूंना सल्ले आणि शिव्या देणे, टाळ्या वाजवणे आणि आजूबाजूला आपलं ऐकणारं कुणी असेल तर (कारण एकतर क्रिकेट आणि राजकारणात सगळ्यांना सगळंच कळतं. आणि क्रिकेटवर बोलायला सगळ्यांना आवडतं, पण ऐकायला कुणालाच आवडत नाही.) त्याच्यासमोर आपले क्रिकेटचे ज्ञान पाजळणे.

आजही भारत-पाकिस्तानची मॅच असली की मी हटकून ऑफिसला रजा घेतो. ऑफिसातले सहकारी विचारतात की, ‘बाबा रे, तुला क्रिकेटमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही. आणि तू कोणतीच मॅच पाहत नाहीस असं म्हणतोस. मग रजा का घेतोस?’ त्यांना आता कोण समजावणार, की माझी बायको आणि आमची घरकामवाली बाई दोघेही क्रिकेटचे डायहार्ड फॅन आहेत. आखिर घरगृहस्थी की जिम्मेदारी भी कोई चीज होती है!

भारत-पाकिस्तानची मॅच पाहताना एक विचार माझ्या डोक्यात हटकून यायचा, की जे लोक फाळणीच्या नावाने जिना-नेहरू-गांधींना शिव्या घालतात, पंचावन्न कोटी द्यायला लावले म्हणून गांधींचा उद्धार करतात, ते लोक भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचचा थरार एन्जॉय करत असताना जिना-नेहरू-गांधींचे आभार मानत असतील काय?

दादू, असं म्हणतात की क्रिकेट हा कौशल्यापेक्षा नशिबाचा खेळ आहे. त्यामुळेच अनेक खेळाडू विविध प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासताना आपण पाहतो. कुणी मॅचच्या सुरुवातीपासून ते बाद होऊन आल्यानंतरही मॅचच्या शेवटापर्यंत पॅड बांधून बसतो, कुणी दाढी करीत नाही, तर कुणी कसलं लॉकेट वापरतो, कुणी विशिष्ट रंगाची वस्त्रे घालतो. आणि गंमत म्हणजे या अंधश्रद्धांच्या बाबतीत आपण क्रिकेटचे फॅनही काही मागे नसतो. दिवाणखान्यात सोफ्यावर बसून मॅच पाहताना आपल्या बसण्याच्या जागेवर आपल्या देशाच्या क्रिकेटचा परफॉर्मन्स अवलंबून आहे असं समजून अगदी मुतखडय़ाचा त्रास होईपर्यंत जागेवरून न हलणारे महाभाग मी पाहिलेत.

दादू, तुला सांगतो, माझा अंधश्रद्धेचा आरोप धुडकावून लावत एका क्रिकेटभक्त असलेल्या मित्राने मला समजावले, की नास्तिक असल्यानेच मी चांगला क्रिकेटर होऊ शकलो नाही. तो पुढे म्हणाला की, आजच्या जमान्यात क्रिकेटमध्ये करीअर करायचे असेल तर आस्तिक असणे महत्त्वाचे! आपला देवावर विश्वास असो की नसो, पण जो दिसत नाही, ज्याचे नियम आपल्याला कळत नाहीत; मात्र ते न कळणारे नियम पाळायला लागतात आणि त्या निर्णयाचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात, अशा डकवर्थ लुईसवर विश्वास ठेवणे भागच आहे. दादू, होतं काय, की देशभरातले क्रिकेटचे लाखो फॅन या अशा अंधश्रद्धा बाळगतात तेव्हा आपल्यालाही त्याला श्रद्धा म्हणणे भाग पडते. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधला शाहरुख खान म्हणतो की, नेव्हर अंडर-एस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. दादू, मी तर म्हणतो- आपल्याला जर आपला जीव प्यारा असेल आणि आपली मते न पटणारा हा कॉमन मॅन जर झुंडीमध्ये असेल तर त्याला अजिबात अंडर-एस्टिमेट करू नये.

पुन्हा एकदा.. असो.

दादू, क्रिकेटचं सोडूनच दे. तसं पाहिलं तर कुठलाच खेळ मला धड खेळता येत नाही. बठे खेळ मला आवडत नाहीत आणि मदानी खेळ मला झेपत नाहीत. माझा खेळांशी संबंध आला तो अपघातानेच. शाळा-कॉलेजच्या दिवसांत केवळ मित्रांच्या आग्रहाखातर जेव्हा त्यांना खेळाडू कमी पडलेले असायचे तेव्हा नगास नग म्हणून मला मदानात उतरायला लागायचं. आणि त्या मोरपंखी काळात काळजाच्या खूप जवळच्या असलेल्या एका मत्रिणीचं मन मोडू नये म्हणून कधीतरी तिच्यासोबत कॅरम, पत्ते, बुद्धिबळासारखे बठे खेळ खेळायलाही मी बसायचो. इतकं करूनही ती कॅरममधली क्वीन कधी मला कव्हर करता आली नाही. पत्त्यांतली बदामाची राणीही माझ्या हाती लागली नाही. बुद्धिबळात राजासकट मीही चेकमेट झालो. आणि क्रिकेटमध्ये गुगली बॉलवरही एक टप्पा आऊट झालो. दादू, तुला सांगू, माझ्या मर्जीने खेळ निवडायचा आणि खेळायचा ऑप्शन तेव्हा (निय)तीने मला दिला असता तर मी इतकेच म्हणालो असतो..

‘खेळू खेळ असा एखादा करुनी गावभर गाजावाजा जिंकलो तर तू माझी हरलो तर मी तुझा..’

तुझा नॉन-स्ट्रायकर मित्र

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

 

First Published on June 23, 2019 12:08 am

Web Title: icc cricket world cup 2019 4