मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

‘इजाजत’.. अनुमती!

indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

एखाद्यावरचं आपलं प्रेम कितीही जीव तोडून केलेलं असलं तरी समोरच्या व्यक्तीला हवंय त्या व्याख्येत ते बसणारं नसलं तर? द्यायची परवानगी त्या प्रेमाला सोडून जायची? खरं तर प्रेम हा असा पानावरचा पाऊसथेंब.. काही क्षण त्या पानाला घट्ट धरून ठेवणारा. त्या थेंबाचा भार एका क्षणी त्या पानालाच अस होतो आणि थेंब खाली ओघळतो. थेंबालाही एका क्षणी ती साथ सोडून धरतीत स्वत:चं अस्तित्व विरघळून टाकावं लागतं. त्याच्या आठवणीनं ती फांदी थरथरली तरी तो थेंब पुन्हा परतू शकत नाही.. एकदा निसटत गेलेलं प्रेम मग हाती लागत नाही. एक भयंकर पोकळी.. एक अंधारडोहच उरतो आपल्यापाशी. भावनांशी प्रामाणिक राहण्याची किंमत  चुकवताना आपल्या माणसांना गमवावं लागण्याचं दु:ख काय असतं हे त्या होरपळलेल्या जीवांनाच ठाऊक. प्रेमात पडताना मनाची अनुमती असते.. ‘त्या’ व्यक्तीच्या डोळ्यांनी कौल दिलेला असतो.. पण कधी कधी काही आठवणीसुद्धा सोडून जाण्याची ‘परवानगी’ मागतात. दोघांमधल्या त्या असोशीला आता ते हक्काचं अस्तित्व, ते सुरक्षित कोंदण उरलेलं नसतं. मग कुणी कुणाला द्यायची ‘इजाजत’.. आयुष्यात येण्याची, निघून जाण्याची, एका प्रेमाला विसरण्याची, उत्कट असण्याची? जिवापाड प्रेम करण्याची? दोन मनस्वी माणसांच्या मध्ये न येण्याची?

‘इजाजत’ ही अशा तीन होरपळलेल्या जीवांची कहाणी आहे. १९८७ साली आलेला, रेखा, नसिरुद्दीन शाह आणि अनुराधा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेला, सुबोध घोष यांच्या कथेवर आधारित, गुलजार दिग्दर्शित ‘इजाजत’ म्हणजे खरं तर एक कविता.. एक कोडं.. एक कहर नाजूक गुंता. ज्या गुंत्यात आपण अडकलो याचा आनंदच व्हावा असा गुंता. खरं तर हा एक आरसा.. पण त्यात एकदा ‘महेंद्र’ होऊन बघावं, तर कधी ‘सुधा’.. आणि हिंमत झालीच, तर ‘माया’ बनूनही! मुळात चाकोरीबाहेरच्या विचारांचा हा चित्रपट.. आणि गुलजारी तरलता! ‘पंचम’ आर. डी. बर्मनशिवाय इथं कुणाचा विचारच करता येत नाही. आणि ती कशिश आवाजातून पोचवण्याची, तो उत्कट भावनांचा प्रपात पेलण्याची ताकद असलेला आवाज म्हणजे आशाबाई! यातली चारही आत्यंतिक अवघड गाणी एकटय़ा आशाबाई गायल्या. दुखावलेली, उत्कट प्रेयसी माया याच आवाजातून ‘समजली’! तहानलेली तृप्ती प्रत्येक क्षणी जगू पाहणाऱ्या सुधाचा हाच आवाज होता. आणि हताश, रीत्या संध्याकाळी हाच आवाज समजूत घालत आला.

सुरुवातीलाच अगदी टायटल्सच्या पाश्र्वभूमीवर एका गाण्यातून खास वातावरण निर्माण करण्याची गुलजार शैली इथेही जाणवते. तुफान पावसाळी माहोल.. कोसळणारे धबधबे.. पानांवरून ठिबकणारे पाऊसथेंब.. आणि या सगळ्याला एक तेज रफ्तार त्या ट्रेनची!

‘छोटीसी कहानी से बारिशों के पानी से

सारी वादी भर गई..

ना जाने क्यूँ दिल भर गया..

ना जाने क्यूँ आँख भर गयी!’

(गुलजार, आशा भोसले)

छोटय़ाच असतात म्हटलं तर या गोष्टी.. पण आयुष्य व्यापून टाकतात. धुंवाधार पावसानं दऱ्याखोरी भरून जावीत तसं काहीसं.. नकळत डोळे भरून येतात.. मनाला भार वाटायला लागतो. पावसाचे उनाड थेंब धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करणाऱ्या या फांद्या, पानं.. त्यावरचं ते अलवार पाणी.. पाणी कसलं, अश्रूच ते!

‘शाखों पे पत्ते थे,

पत्तों पे बूंदे थी,

बूंदो में पानी था,

पानी में आंसू थे!’

घट्ट मिटून घेतलेल्या चाफ्याची एक-एक पाकळी अलगद उलगडत जावी तशी ही शब्दकळा आहे. त्या थेंबाच्या किती आत पोहोचली गुलजार नजर! सामान्य नजरेला फक्त पाऊसधारा दिसल्या असत्या. पाण्याने ओथंबलेल्या फांद्या दिसल्या असत्या.. या प्रतिभेला त्या थेंबांचं काळीजही कळलं. मग दिसतात त्या फांदीवरचे ‘ते’ तीन थेंब.. आणि नंतर उरणारा एकाकी थेंब. हे सगळं साक्षीभावानं बघणारं प्रेम नावाचं एक सुंदर फूल.. अप्राप्य!

अशा वळणावर आता दोन जीव भेटणार आहेत. म्हटलं तर एकमेकांचा कण न् कण ओळखणारे, पण आता परके झालेले. काहीतरी शल्य घेऊन जगणारे. कधीतरी एकरूप असलेले आणि आता दोन वेगळ्या अवकाशांचा स्वत:भोवती निर्माण झालेला कोष भेदू न शकणारे!

‘दिल में गिले भी थे, पहले मिले भी थे,

मिल के पराये थे, दो हमसाये थे!’

ही ती अवस्था!

धुंवाधार पावसात वेगानं मार्ग काढणारी ट्रेन.. धबधबे.. ओलेचिंब तृप्त डोंगरमाथे, खळाळणारे झरे.. त्यातूनच एक शिरशिरी आणणारा तुषार अंगावर यावा तशी येणारी  लकेर.. तो आवाज त्या क्षणी स्वत:च इतका उत्तेजित आहे! छो टी सी क हा नी से- ‘सा रे ग प रे ग सा’ हे सगळे स्वर त्या अक्षरांना घट्ट कवेत घेत येतात. पण त्यातला ‘कहानी’मधला ‘क’ आणि ‘बारिशों के’मधला ‘के’ हे दोन्ही पंचम त्या स्वराचा सगळा टपोरा थेंब प्राशूनच येतात. कर्मकठीण आहे हे गाणं! ना, जा, ने, क्यू.. अशी  चार अक्षरं एक वेगळा डौल घेऊन येतात. त्या आवाजातच एक रूढ चाकोरी सोडण्याची धमक दिसते. एक अ‍ॅटिटय़ूड दिसतो. एका कमाल धुंदीत आशाबाई गायल्यात. खरं तर तो बेभान आवाज त्या दृश्याला जास्त धुंद करतो.

पंचम त्या सिच्युएशनकडे कसं बघतो..? सगळं काही छान चाललेलं असताना आयुष्याला खटकन् कलाटणी मिळावी, किंवा एका रुळावरून दुसऱ्या रुळावर गाडी वळवावी लागावी तसे कोमल गंधार आणि शुद्ध गंधार यात वागतात. बघा, अंतऱ्याच्या पहिल्या दोन ओळी- ‘रुकती है थमती है.. कभी बरसती है’ हे स्वर ‘सारेग सारेग’असे कोमल गंधार घेऊन येतात, तर ‘बादल पे पाँव रख के’ इथं ‘सारेग’ म्हणताना  शुद्ध गंधार? कसा आला हा? इथं जाणवतं ते हे, की एक गाणंसुद्धा पुढचा संघर्ष सांगू शकतं.. संगीत हे कथेला द्यायचं असतं, कवितांना नाही..

दादऱ्यात सुरूहोणारा बासरीचा धिमा पीस फसवा.. त्याला पुढच्या वादळाची कल्पना आपल्याला द्यायची नसल्यासारखा. पण बास गिटार नूर पालटून टाकते. जोरदार सरींसारखी व्हायोलीन्स येतात आणि मनातल्या विचारांचं काहूर घेऊन अ‍ॅकॉर्डियन येतं. थरारून टाकणारा आहे हा अनुभव.. हा अ‍ॅकॉर्डियनचा पीस गाण्यात सतत येत राहतो.. एक मस्त रफ्तार देतो.. आणि गाडी थांबताना धिमा होत होत थांबतो. पंचमकडे ं११ंल्लॠीेील्ल३ करणाऱ्या केरसीजी, बबलूदा, मनोहारीदा व अ‍ॅकॉर्डियन-वादक सुराज साठे यांची ही कमाल आहे.

पाटण्याला जाण्यासाठी निघालेली सुधा वेटिंग रूममध्ये वाचत बसलेली आहे. तिथे अचानक येणाऱ्या महेंद्रला ती बघते, पण मासिकाच्या आड चेहरा लपवते. पाच वर्षांपूर्वी ज्याच्यापासून वेगळे झालो तो नवरा अचानक समोर उभा आहे. शेवटी नजरानजर होतेच. खरं तर ते नातं केव्हाच लुप्त झालंय. पण तरीही त्याची अस्ताव्यस्त सुटकेस आवरताना, त्याला चावी देताना, अगदी त्याचे ओले केस टॉवेलने खसाखसा पुसताना नकळत ते ‘बायकोपण’ उफाळून येतंच. खरं तर ते ‘आईपण’ आहे. नातं संपलं (?) तरी ‘काळजी’ संपत नाही. महेंद्रच्या डोळ्यांत दिसणाऱ्या पोरकेपणाकडे लक्ष न देणं सुधाला कठीण जातंय..

फ्लॅशबॅकमधून भूतकाळातल्या घटना उलगडत जातात. सुधाशी सगाई झाल्यावर महेंद्रच्या आयुष्यात मध्यंतरी माया आलेली असते. एक अतिशय मनस्वी, स्वच्छंद, कमालीची नैसर्गिक जगणारी मुलगी. महेंद्रवरचं तिचं प्रेम हे परिणामांची चिंता न करता मुक्तपणे कोसळणाऱ्या धबधब्यासारखं आहे. त्यात स्वत:चा माथा घेऊन उभं राहणाऱ्यानं काळजी घ्यावी- तो प्रपात झेपणार की नाही याची! खूप अस्थिर, वादळी माया आणि महेंद्र यांच्या त्या प्रेमात एक पराकोटीची उत्कटता आहे. मायासारख्या व्यक्तींना कुठल्याही नात्याच्या कप्प्यात बसवणं अशक्यच असतं. केवळ मनाचा कौल मानणाऱ्या अशा व्यक्तींना समाजाच्या नियमांपेक्षा स्वत:च्या भावनांची बांधिलकी हवीशी असते. या गाडग्यामडक्यांच्या भातुकलीच्या जगात त्या नसतातच. जन्माला येतानाच रक्तात एक धुंदी आणि बंडखोरी घेऊन येतात.. शापित यक्षासारख्या! आपण वागतोय ते बंडखोर आहे, हेही त्यांच्या गावी नसतं. खरं तर हा त्यांच्यासाठी परग्रहच! लग्नाआधी महेंद्रनं सुधाला कल्पना देऊनही आणि सुधानं स्वत:हून त्यातून बाजूला व्हायची तयारी दाखवूनही मायाच्या अचानक गायब होण्यामुळे महेंद्र आणि सुधाचा विवाह होतो. सुधा एक पुरेपूर ‘गृहिणी’.. पण कोरडी मात्र अजिबात नाही. महेंद्रच्या मायाबद्दलच्या भावना समजून घेणारी. मायानं महेंद्रसह संपूर्ण घर व्यापलेलं असताना त्यातून महेंद्रचं अस्तित्व स्वत:साठी जमा करणारी. मायाचे कपडे, इतर ‘सामान’ तिला परत पाठवल्यावर तिचं येणारं उत्तर.. तिचं ‘माया’ असणं ठळक करणारं!

‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है..’

(आशा भोसले )

काय काय पाठवशील? या वस्तूच माझ्या होत्या? आणखी काहीच माझं दिसलं नाही तुला? एकमेकांसोबत जगलेले असंख्य क्षण, कुठल्या कुठल्या आठवणींचा गंध लपेटून उभे आहेत.. ते पाठवशील? ते ओलेकंच दिवस.. तुला पाठवलेल्या असंख्य पत्रांत गुरफटून बसलेली ती संध्याकाळ.. आणि हो- पानझडीतल्या त्या पानांच्या आवाजाची चाहूलच जडवली होती कानात.. आहे का ती? देशील पाठवून? ती फांदी अजून थरथरत असेल. मुद्दाम भिजण्यासाठी एका छत्रीत फिरणं.. शरीर-मन सगळंच ओलंचिंब. तो मनाचा ओलावा पुसता येतो? असेल बघ तिथंच ते आपल्या बिछान्यात.. ते कसं पाठवणार? अगदी हिशोबानं  सांगायचं तर तब्बल एकशे सोळा रात्री आहेत माझ्या तिथे तुझ्याबरोबर जगलेल्या.. चांदण्यात न्हालेल्या.. आपल्या सहवासाच्या! आणि हो, तुझ्या खांद्यावरचा तो तीळ.. तोही माझाच ना! हातावरच्या ओल्या मेंदीचा गंध.. ते रुसवेफुगवे.. हे कसं पाठवणार आहेस? आणि खरं म्हणजे हे सगळं तुला नकोसं झालंय, जड होतंय, अडगळ होतेय त्याची.. तर खरंच सगळं पुरून टाकीन मी खोल. पण मग मीसुद्धा अस्तित्वात नसेन, कारण या सगळ्यातच माझंही दफन झालेलं असेल. या क्षणांतच मी आहे.. मला वेगळं अस्तित्व नाही.. नकोही!

‘मेरा कुछ सामान’सारख्या वरकरणी गद्य भासणाऱ्या, पण प्रचंड रोमान्स भरलेल्या काव्याला चाल लावणं, त्यातल्या त्या अमूर्त भावना, दृश्यमय आठवणी यांना स्वरांमध्ये आणि आवाजातून व्यक्त करणं हे महाकठीण होतं. त्याच्या अनुपम बांधणीबद्दल आणि ‘खाली हाथ शाम आयी है’, ‘कतरा कतरा मिलती है’.. याबद्दल उत्तरार्धात!

(पूर्वार्ध)