शब्दांना नसते दु:ख
शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे..
..ते तुमचे माझे असते
एके दिवशी भल्या सकाळी बोलता बोलता अगदी अनपेक्षितपणे कवि-हृदयात उमटलेला आणि त्याच्या वाणीतून प्रकट झालेला हा एक सहज उद्गार होता. प्रथमदर्शनी या ओळींनी स्वत: कवीही थोडा गोंधळात पडला. हे अचानक काय घडलं आणि त्याचं प्रयोजन काय हे त्याला उमगेना. मग हे नक्की काय घडलं असावं यांचा स्वत:च्याही नकळत तो विचार करीत राहिला. एरवी स्वत:चं कविपण मिरवणं तर सोडाच, पण अकारण प्रकट करत राहणं हेही त्याच्या मूळ स्वभावाला फारसं मानवणारं नव्हतं. पण आजची गोष्टच वेगळी होती.. संध्याकाळच्या आनंद-बैठकीत तो त्याच्या जिवलग दोस्ताला म्हणाला, ‘‘अरे आज खूप दिवसांनी मला काहीतरी माझं स्वत:चं असं सुचलंय.’’ त्या चार ओळी ऐकून दोस्त मनापासून सुखावला आणि म्हणाला, ‘‘छान आहे रे..’’ त्यावर कवीचा चिमूटभर त्रागा. ‘‘अरे, पण एवढंसं हे टीचभर घेऊन करू काय? मरू दे.. असेल म्हणे काहीतरी.’’ थोडक्यात, कवी महाराजांनी तो विषय तिथंच गुंडाळून टाकला आणि ते सगळंच प्रकरण मनावेगळं करून समोरच्या प्रवाही वर्तमानाला जवळ केलं. पण तेवढय़ात पुन्हा कुणीही न बोलावता अंत:करणात आणखी एक उद्गार घुमला..
शब्दाचे डसतां नाग
शब्दांचे भिनतां भोग
मग अशब्द-नि:शब्दाला
..शब्दांची उरते जाग
या क्षणापासून मात्र कवी आणि ती अनाहून नवखी चाहूल या दोघांमध्ये जणू उभयपक्षी प्रायव्हसीचा एक नवा अलिखित करार सुरू झाला. मन अनिवारपणे काही बोलू लागलं होतं आणि कवी ते स्वत:च्याही कानांना कळू न देता अबोलपणे स्वीकारत होता. तंद्रीखोर जगणं ही कवीसाठी अनोळखी गोष्ट कधीच नव्हती. पण आजवर अनुभवलेल्या तंद्रीपेक्षा ही तंद्री काही वेगळीच होती. ती त्यांचं समग्र अस्तित्व व्यापून होती, पण तरीही त्याच्या दैनंदिन जगण्यात कसलाही अडसर होत नव्हती. त्याचे सगळे व्यवहार- वैयक्तिक, भावनिक, व्यावसायिक बिनबोभाट चालू होते. त्यांची मुंबई शहरभरची सकारण-अकारण भटकंतीही मनसोक्त चालू होती. नाही म्हणायला फरक एकच पडला होता. आजवर कवीच्या हाती, ‘कवीची वही’ नामक इतरेजनांना धास्ती वाटायला लावणारं अस्तित्व कधीच नसायचं. (‘‘काय ते दिसते हातीं? अरे काव्य कवी कवी, पाणी तरी कुणी पाजा कविता दिसते नवी.. अरे आला कवी आला, धावा धावा पळा लपा, पाठीराखे स्मरा किंवा रामरक्षा तरी जपा..’’ वगैरे) पण आता मात्र त्याच्या हातातील छोटय़ाशा पाऊचमध्ये एक लाल रंगाची डायरी समाविष्ट झाली होती. एरवीचे सर्व व्यवहार बिनबोभाट चालू असताना मध्येच ती डायरी हळूच बाहेर निघायची आणि कवीची त्यात काहीतरी नोंद झाली की ती पुन्हा त्याच्या झोळीत अदृश्य व्हायची.
शब्दांचे कण पेरावे
शब्दांचे ऋण वेचावे
शब्दाच्या धरणीवरती
शब्दांचे घर बांधावे
शब्दांची राखण करण्या
शब्दांचे कोट रचावे
शब्दाच्या तटबंदीत
शब्दांचे डंख चिणावे
शब्दांना यावा गंध
शब्दांत झरावा नाद
शब्दातील नक्षत्रांचा
शब्दांनी घ्यावा वेध
शब्दांचे जहर पिउनी
शब्दांची तृषा निवावी
शब्दांच्या जखमांवरती
शब्दांची फुंकर घ्यावी
शब्दांच्या आकाशात
शब्दांचे मेघ भरावे
शब्दांचे क्षितिज धराया
शब्दाचे भिंग करावे..
आज मागे वळून पाहताना गमतीदार वाटणारी, पण त्या काळात स्वत: कवीला एक वेगळाच थरार अनुभवायला देणारी ही प्रक्रिया आज फलद्रूप झालेली दिसते, ती कवीच्या ‘शब्दधून’ या कविता-संग्रहाच्या रूपात.. ‘शब्दधून’ची ही जन्मकथा आणि तिची तेव्हाची अपूर्वाई आता स्वत: कवीलाही फारशी उरली नाही. आज इतक्या वर्षांनी त्या कवितांकडे पाहताना जाणवते ती त्या निर्मितीमागची कवीची मानसिकता आणि त्या निर्मितीमध्ये त्याला आलेल्या कलात्मक प्रचिती. पहिली गोष्ट त्याला फार चटकन उमजली की, एका दीर्घ कवितेचे हे अंतरे नाहीत. त्या सर्व छोटय़ा पण स्वतंत्र कविता आहेत. मात्र त्यांना गुंफणारं सूत्र आहे ते ‘शब्द’ नामक जालिम अस्तित्वाचं.. म्हणजे जे शब्द-माध्यम आजवर त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचं साधन होतं, तेच इथं साध्यही बनलं होतं. खूप लहानपणी स्वरांच्या पालखीतून शब्द त्याला प्रथम भिडले होते. त्या स्वरांची जादू कधीही ओसरणारी नव्हतीच. पण तरीही त्याच्या अस्तित्वाचा खरा ताबा त्याच्याही नकळत घेतला होता तो या अवर्णनीय शब्दमोहिनीनं. त्याच्या मनावर मंत्र घालणारी, त्याला अखंड वेढणारी आणि वेधूनही घेणारी शब्दांची ती अद्भुत, गूढरम्य देवराई आता जणू सर्वार्थानं जागी झाली होती. आणि त्याच्या आजवरच्या जगण्यात गोळा झालेलं सगळं प्रकट-अप्रकट संचित त्याच्यावर मुक्त मनानं उधळू लागली होती. तो घनदाट वर्षांव हवाहवासाही होता, नकोनकोसाही होता, पण त्याच्या स्वाधीन होणे यावाचून काही गत्यंतर नव्हतं.
 काही दिवसांनी एक छोटा मुक्काम आला. पूर्णविराम भासावा तसा. ‘शब्दांच्या कातरवेळी शब्दांचे गाणे गावे, शब्दांच्या गाण्यासाठी शब्दांना शब्द सुचावे.’ पण ते केवळ छोटं मध्यंतर होतं. कारण खंडित भासलेला ओघ पुन्हा वाहता झाला.
शब्दांना कुंपण जेथे
शब्दांची तिथवर धांव
शब्दांच्या गांवाआधी
शब्दांची बुडते नाव.
शब्दांच्या शस्त्रांवरती
शब्दांचा चढतो गंज
शब्दांच्या डबक्यावरती
शब्दांचा हिरवा माज
शब्दांच्या देव्हाऱ्यात
शब्दांची पूजा चाले
शब्दांचे नास्तिक देव
शब्दार्थ फरारी झाले
शब्दांतील अनंग जेव्हा
शब्दांत सुस्त होईल
शब्दांत रती येऊन
शब्दांत सती जाईल..
कविता-सखीच्या वाटचालीतील शब्दधून हे फार महत्त्वाचं वळण आहे. ते फार नेमक्या वेळी, आणि तितक्याच अपरिहार्यपणे सामोरं आलं. जगण्याच्या प्रवासात मुळात एका शुभक्षणी कवीला त्यांची कविता भेटली. अल्पावधीत तिला एक गीत-शाखाही सहजपणे फुटली. मग ती अलगद त्याला चित्रपटगीतांच्या विस्तीर्ण रणमैदानात घेऊन आली. मुळात आस्वादक म्हणूनही कसल्याही बुरसट पूर्वग्रहांनी मन गढूळलेलं नसल्यामुळे कवी तिथंही मन:पूर्वक रमला होता.मूलभूत मानवी सुखदु:खांच्या साध्यासुध्या विविध अनुभूती व्यक्त करता करता तो स्वत:ही नकळत मोकळा होत होता. शिवाय पुन्हा, ‘अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहते’ म्हणत नामानिराळा राहून स्वत:चं अंतर्विश्व सुखरूप जपतही होता. पण तरीही ‘नाही गुंतून जायचे’ ही मूळ शपथही विसरत नव्हता.
‘शब्दांच्या माजघरात
शब्दांचे जगणे फोल
शब्दांच्या चक्रव्यूहात
शब्दांना जाण सखोल’
या मूळ जाणिवेनं या चक्रव्यूहात बिनधास्त घुसला तरी इथे नव्याने जाणवलेली नवी प्रचितीही तो डोळय़ांआड करू शकत नव्हता.
शब्दांच्या भांडारात
शब्दांच्या अगणित राशी
शब्दांच्या बाजारांत
शब्दाचा शब्द उपाशी
अशा त्या दोलायमान मानसिकतेच्या काळात शब्दधून अवतरली आणि तिनं त्याचं अवघं अस्तित्वच मुळापासून घुसळून काढलं. इतकंच नव्हे, तर आतूनबाहेरून त्याला धुवून काढून निर्भर, निर्मळ आणि निर्भयही केलं. पुन्हा पुन्हा गुंतायला आणि पुन्हा पुन्हा मोकळाही व्हायला.
तर असं हे शब्द-वादळ सुमारे महिनाभर चाललं होतं. ते हळूहळू ओसरू लागल्याच्या खुणा काही कणिकामधून हुरहुरता ‘मारवा’ तरळत राहावा, तशा भासतील.
शब्दांचे लाघव सरता
शब्दांच्या सुन्या पखाली
शब्दांच्या अंतर्यामी
शब्दांची हुरहुर ओली
शब्दांच्या व्योमतटाशी
शब्दांचा उसळे सिंधू
शब्दांच्या गालापाशी
शब्दाचा निखळे बिंदू
शब्दांना दिसता दिसता
शब्दाचे बिंब बुडाले
शब्दांची तुडवीत वाट
शब्दांचे कळप निघाले
शब्दांना व्यापून उरला
शब्दांचा किणकिण ताल
शब्दांत गडद झाकळला
शब्दांचा झांझर काळ
शब्दोत्सव पूर्ण फळा ये
शब्दांत सांगता झाली
शब्दांचे मन सांगाया
शब्दांत विराणी आली
पण या उदास, गंभीर जाणिवेतही एक उबदार आश्वासन अखेर उमटलं होतंच.. उत्पत्ती-विलय आणि पुन्हा उत्पत्ती या पुरातन चक्राची चिरंतन ग्वाही देणारं..
शब्दांच्या धूसरतेत
शब्दांचे चित्र विरेल
शब्दाने झपाटलेली
.. शब्दांची रेघ उरेल

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?