|| सिद्धार्थ खांडेकर

इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होणारी ही पहिलीच अशी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे, जी भारतीय उपखंडाबाहेर होत असूनही भारताकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. ही धारणा जगभरच्या क्रिकेट विश्लेषकांमध्ये आहे. ती तशी होण्याचे श्रेय प्रामुख्याने विराट कोहलीला द्यावे लागेल. यजमान इंग्लंड संघही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री

वीस वर्षांपूर्वी- म्हणजे १९९९मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये चौथ्यांदा भरवली जात होती, त्यावेळी तेथे या खेळाच्या लोकप्रियतेबाबत सर्वेक्षणे केली जात होती. इंग्लंड ही क्रिकेटची जन्मभूमी. त्यातून विश्वचषकासारखी दिमाखदार स्पर्धा. मग सर्वेक्षणे कशासाठी? तीदेखील लोकप्रियता पडताळण्यासाठी? पण तशी वेळ आली होती. कारण फुटबॉलने इंग्लिश जनमानसाचा पूर्णपणे कब्जा घेतला होता. त्यामुळे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेविषयी- विशेषत: युवकांना काहीच पडलेली नव्हती. कित्येकांना ही स्पर्धा आपल्या देशात, आपल्या शहरात भरत आहे याचीही माहिती नव्हती. ही बाब पुरस्कर्त्यांच्या मनात धडकी भरवत होती. त्या काळात इंग्लिश क्रिकेटप्रेमींना केवळ अ‍ॅशेस मालिकांचीच पडलेली असायची. त्याही बाबतीत प्रचंड निराशाजनक स्थिती होती. कारण त्यावेळचा दिग्विजयी ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या संघाला तुडवत सुटला होता. शिवाय तो इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा सुवर्णकाळ! पाठोपाठची इंग्लिश प्रीमियर अजिंक्यपदे पटकावीत असताना ते युरोपमध्येही अजिंक्य ठरले होते. जवळपास तशीच काहीशी परिस्थिती यंदाही आहे. म्हणजे फुटबॉलमध्ये त्यांचे दोन क्लब युरोपियन चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहोचलेत. गेल्या वर्षी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत त्यांनी बऱ्याच अवधीनंतर उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. फरक इतकाच, की यंदा फुटबॉलच्या लोकप्रियतेपुढे क्रिकेटची लोकप्रियता वाहून गेलेली नाही. उलट, यंदा प्रथमच यजमान असूनही संभाव्य विजेते म्हणून इंग्लंडचे नाव अग्रणी आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये त्यांचा इतका दबदबा  नव्हता. यंदा तो आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी पाचपैकी चार सामने (त्यांतील एक त्यावेळच्या बांगलादेशाविरुद्ध!) गमावले होते. पण त्यानंतरच्या काळात सर्वाधिक सुधारणा झालेला संघ असे त्यांच्या बाबतीत म्हणावे लागले.

गतहंगाम भारतीय क्रिकेटसाठी यशस्वी ठरला होता. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध त्यांच्या देशात जाऊन भारताने एक-दिवसीय मालिका जिंकून दाखवल्या. अपवाद इंग्लंडचा! विराट कोहलीचा विजयी रथ इंग्लंडमध्ये अडखळला होता. इंग्लिश क्रिकेट मंडळाने गेली काही वर्षे काही पथ्ये प्रयत्नपूर्वक पाळलेली दिसतात. त्यांच्याकडे अँड्रय़ू फ्लिंटॉफ, केव्हिन पीटरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन असे अनेक वलयांकित क्रिकेटपटू खेळत होते. परंतु या क्रिकेटपटूंचे वलयमूल्य वाढण्यापलीकडे त्यांचा इंग्लिश क्रिकेटला फारसा फायदा होत नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांना क्रमाक्रमाने नारळ दिला गेला. इऑन मॉर्गन नामे आयरिश क्रिकेटपटूला (आर्यलडकडून अक्षरश: खेचून!) इंग्लंडला आणले गेले आणि एक-दिवसीय संघाच्या कर्णधारपदी बसवले गेले. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडचे ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात पानिपत झाले तरीही त्याच्यावर विश्वास टाकण्यात आला. त्याच्या पसंतीचा संघ निवडण्याची मुभा देण्यात आली. अशा पद्धतीने विश्वास आणि स्वातंत्र्य दिले गेल्यानंतर मॉर्गनने जो संघ बांधला आणि विकसित केला, तो आज आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. २०१५ नंतर इंग्लिश संघाने ३६ वेळा ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्यांनी दोन वेळा साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडला. त्यात एकदा तर ३६० धावांच्या लक्ष्याचा त्यांनी यशस्वीपणे पाठलाग करून दाखवला. इंग्लिश भूमीवर मागे ज्यावेळी त्यांचा संघ लक्ष्याचा पाठलाग करत होता त्यावेळी (सप्टेंबर २०१५) ‘ब्रेग्झिट’ या संकल्पनेचा जन्मही झालेला नव्हता! इंग्लंडच्या सातत्यामुळे एक-दिवसीय क्रिकेटमध्ये हल्ली ३०० ऐवजी ३५० हा अपवाद नव्हे, तर नियम बनू लागला आहे. फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटच्या बाबतीतही जुने ते त्यजून नवे खेळाडू आणि नवे डावपेच, तसेच आक्रमक आणि बेधडक खेळाच्या जोरावर इंग्लंड या स्थानावर पोहोचला आहे. नवीन तंत्र आत्मसात करताना आयपीएलचा फायदा झाला, हे मॉर्गन दिलखुलासपणे कबूल करतो. त्या अर्थाने हे फेरवसाहतीकरणच (रिव्हर्स कलोनायझेशन!) आहे. आणि हे कबूल करण्यासाठी इंग्लंडला आयरिश कर्णधाराचीच गरज भासली!

विराट कोहली आणि भारतीय संघाची कामगिरी गेल्या वर्षभरात उत्तम झालेली आहे. आयसीसी क्रमवारीत त्यांचा इंग्लंडखालोखाल दुसरा क्रमांक आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आजवर इंग्लंडमध्ये झालेल्या कुठल्याच विश्वचषकांमध्ये भारतीय संघ संभाव्य विजेता म्हणून दाखल झालेला नव्हता. १९७५ आणि १९७९ मध्ये आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अशी स्थितीच नव्हती. १९८३ मध्येही तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार किम ह्य़ूज वगळता भारताला चांगला संघ म्हणण्यासही फारसे कुणी राजी नव्हते. १९९९ मध्ये भारतीय संघात सचिन तेंडुलकरसारखे काही गुणवान क्रिकेटपटू होते. तरीही त्या संघाकडे कुणी संभाव्य विजेता म्हणून पाहिले नव्हते. ‘संभाव्य विजेता’ असा भारताचा उल्लेख १९८७, १९९६ आणि २०११ मधील विश्वचषक स्पर्धाच्या आधी झाला होता. या तिन्ही स्पर्धा भारतीय उपखंडात झाल्या, हा योगायोग नव्हे. २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारताने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. या दोन्ही स्पर्धापूर्वी भारताकडे एक धोकादायक संघ म्हणून पाहिले गेले होते.

इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होणारी ही पहिलीच अशी विश्वचषक स्पर्धा आहे, जी भारतीय उपखंडाबाहेर होत असूनही भारताकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. ही धारणा जगभरच्या क्रिकेट विश्लेषकांमध्ये आहे. ती तशी झाल्याचे श्रेय प्रामुख्याने विराट कोहलीला द्यावे लागेल. गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये भारताने एक-दिवसीय मालिका जिंकल्या, तर इंग्लंडमध्ये टी-२० मालिका जिंकली. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे- अशा प्रकारे जिंकत राहिल्याशिवाय भारतीय संघाला प्रतिष्ठा मिळणार नाही, हे विराट कोहलीने त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात पुरेपूर भिनवले आहे. भारताचा दबदबा निर्माण होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे- प्रतिस्पध्र्याचा संघ गुंडाळू शकेल असे भेदक गोलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. एरवी फलंदाजांसाठी ओळखला जाणारा हा संघ यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक वैविध्यपूर्ण गोलंदाजांचा संघ म्हणून दाखल होत आहे हेही या संघाचे वेगळेपण आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार हे मध्यम-तेज गोलंदाज; यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाज.. इतके वैविध्य इतर कुठल्याही संघांकडे नाही. यांच्या जोडीला हार्दिक पंडय़ा, विजय शंकर आणि केदार जाधव हे अष्टपैलू क्रिकेटपटू गोलंदाजीचा अर्धवेळ किंवा पूर्णवेळ भार गरजेनुरूप उचलू शकतात. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा खास या स्पर्धेसाठी निर्जीव बनवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्या गोलंदाजांना साह्य़भूत ठरण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. इंग्लिश वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी स्विंगवर प्रभुत्व असलेले गोलंदाज भारताकडे आहेत. शिवाय जवळपास सर्वच संघांतील फलंदाज अलीकडे मनगटी फिरकी गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसतात. भारताकडे यजुवेंद्र आणि कुलदीप असे दोन चांगले मनगटी गोलंदाज आहेत.

आणखी एक महत्त्वाची आणि थोडीफार आपल्या पथ्यावर पडणारी बाब म्हणजे- या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन कुकाबुरा चेंडू वापरले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात याच प्रकारचे चेंडू वापरले जातात आणि आपण ते कौशल्याने वापरले होते. इंग्लंडमध्ये नेहमी वापरले जाणारे डय़ुक्स प्रकारचे चेंडू यावेळी दिसणार नाहीत, हा आपल्याला आणखी एक दिलासा.

विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या स्पर्धेसाठी युवा ऊर्जेपेक्षा अनुभवाला प्राधान्य दिलेले आहे. त्याचा मोठा फटका ऋषभ पंत या युवा यष्टिरक्षक फलंदाजाला बसला. त्याला वगळण्याच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दिनेश कार्तिक हा तिशी ओलांडलेला यष्टिरक्षक फलंदाज त्याच्याऐवजी आज संघात आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे- या दोघांची मुख्य जबाबदारी यष्टिरक्षण ही आहे. त्यात ऋषभकडे अजून म्हणावी तशी सफाई आलेली नाही. भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच आहे. त्याला दुखापत झाली किंवा विश्रांती देण्याची गरज वाटली तर त्याची जागा घेऊ शकेल असा आजच्या घडीला दिनेश कार्तिक हा यष्टिरक्षक आहे. शिवाय तो जबाबदारीने फलंदाजीही करू शकतो.

एरवी फलंदाजी हे भारताचे बलस्थान नेहमीच असते. यावेळी जरा निराळी परिस्थिती आहे. चौथ्या स्थानावरील फलंदाजाचा प्रश्न भारताने अनुत्तरित ठेवलेला आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांच्या नावावर मिळून नव्वदेक शतके जमा आहेत. त्यांच्यापैकी एकाने किंवा दोघांनी शतक झळकवले की भारत हमखास विजयी ठरतो. हे तिघेही अपयशी ठरणार नाहीत असे आपण गृहीत धरले आहे. चौथ्या, पाचव्या, सहाव्या स्थानावर के. एल. राहुल, विजय शंकर, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, महेंद्रसिंग धोनी यांच्यापैकी तिघांना खेळवावे लागेल. तो धोका आपण पत्करणार आहोत, कारण गोलंदाज आणि पहिले तीन फलंदाज यांच्यावर भारताचा भरवसा आहे.

आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- भारताकडे इतर कोणत्याही संघापेक्षा मोठा आणि अनुभवी असा नेतृत्वगण आहे. विराट, धोनी, रोहित या तिघांचेही नेतृत्वगुण वेगवेगळ्या स्तरांवर दिसून आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतील अशी या तिघांची क्षमता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्या जोडीला गतविजेत्या ऑस्ट्रेलियामध्येही अजिंक्यपद मिळवण्याची क्षमता आहे. तर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजकडे धोकादायक क्रिकेटपटू आहेत. मात्र, नेतृत्वाच्या आघाडीवर दोन्ही संघ आणि काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया अस्थिर दिसतो. इंग्लंड आणि भारत यांचे ते सर्वात ठळक बलस्थान आहे.

sidhdharth.khandekar@expressindia.com