22 January 2020

News Flash

हिंदुस्थानचा सागरविक्रम

इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो असे आता सर्वसामान्यांनाही पटू लागले आहे.

| August 16, 2015 02:15 am

इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो असे आता सर्वसामान्यांनाही पटू लागले आहे. पूर्वी म्हणजे पुराणकाळात भारताने अफाट वैज्ञानिक प्रगती केली होती, त्यामुळे आमच्या पूर्वजांना आजचे सर्व शोध लागले होते असे मानणारा आणि त्याचा प्रसार करणारा एक मोठा वर्ग सध्या सक्रीय आहे. मात्र, तितक्या प्राचीन काळात न जाता साधारणपणे लेखी पुरावा मिळेल इतक्या जुन्या काळापर्यंत जाऊन आपली पूर्वावस्था काय होती, याचा धांडोळा घेऊन स्वत:ची ओळख पटवून घेणे नेहमीच उपयोगी ठरते. सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी आपल्या समाजात ब्रिटिशांच्या अमलाखाली जी एक सातत्याने परावलंबी मनोवृत्ती आली होती, तिचा निचरा करण्यासाठी ब्रिटिश राज्यपद्धतीचे खरे स्वरूप समजावून सांगण्याचा उपक्रम वारंवार केला जात असे. अशापैकीच एक पाऊल असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या भास्कर टेंबे यांनी वयाची साठ वर्षे उलटल्यावर आपल्या व्यवसायापेक्षा एका संपूर्ण वेगळ्या विषयावर प्रयत्नपूर्वक माहिती गोळा करून त्यातून एक सिद्धान्त मांडावा, हे त्या काळातल्या सुशिक्षितांत राष्ट्रभावना किती तीव्र होती याचे निदर्शक म्हणता येईल. डॉ. टेंबे यांनी त्याअगोदर सेविका, आरोग्यशास्त्र, शिशुसंवर्धन, मातृपद, चाळिशी उलटल्यावर, अन्न आणि शरीर, इत्यादी पुस्तके लिहिली होती.

या पुस्तकाला रँग्लर र. पु. परांजपे यांनी प्रस्तावना आणि गो. स. सरदेसाई यांनी पुरस्कार लिहिला आहे. रँग्लर परांजपे प्रस्तावनेत लिहितात, ‘गेल्या शंभर-दीडशे वर्षांत ही मर्दुमकी नामशेष झाली व हिंदी नाविक संसार पुरा नाहीसा झाला. याची कारणे अनेक आहेत व त्यांचे सविस्तर विवरण ग्रंथकर्त्यांने केले आहे. त्यातील मुख्य कारणे म्हणजे आमची आपापसातील दुही व इंग्रज सरकारची स्वार्थी व सहानुभूतीशून्य राज्यपद्धती. आपणास जर पूर्वीसारखे प्रभावी दिवस पाहावयाचे असले तर आमच्या अपकर्षांची कारणे शोधून काढून ती नाहीशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कामात या ग्रंथाचा फार उपयोग होईल.’
आपल्याला- म्हणजे हिंदुस्थानला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला असूनही आपले सागरी दल दुर्बल आणि त्यामुळे जगावर छोटय़ा बेटवजा राष्ट्रांचे साम्राज्य असू शकते; आपले नाही, याची खंत वाटून लेखकाने या विषयाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ती माहिती पहिल्या सहा प्रकरणांतून मांडली आहे. ‘हिंदुस्थानच्या नौकानयनाचे पुरावे, हिंदुस्थानच्या सागरवर्चस्वाचे पुरावे, मौर्यपूर्वकाल सागरवर्चस्व, मोगल-पूर्वकालीन सागरावरील चळवळी, मोगलकालीन आरमार’ अशी या पुस्तकातील प्रकरणांची नावे आहेत.
‘मोगलकालीन आरमार’ या प्रकरणात लेखक सांगतात- ‘त्यावेळी बादशहाच्या आरमारात एकूण तेरा जातींच्या ३२२ युद्धनौका होत्या. युद्धनौका हा विभागच आरमारात स्वतंत्र व पूर्ण पद्धतीने काम करीत असे. परंतु परदेशी व्यापाराकडे त्यांनी लक्ष दिले नाही. अकबराचे वेळी खुला व्यापार नसून, उत्पन्न केलेल्या सर्व मालावर बादशहाचा अग्रेसरत्वाचा हक्क असे. अकबर स्वत: खासगी व्यापार करीत असल्याने परदेशातून आलेल्या मौल्यवान जिनसा प्रथमत: त्याच्या व्यापारासाठी त्याचे सुभेदार विकत घेत व मग किफायतशीर दराने देशी व्यापाऱ्यास विकत असत.’ (पृष्ठ ८४)
‘मराठय़ांचे आरमार’ या प्रकरणात सुरुवातीसच जदुनाथ सरकार यांनी केलेल्या शिवाजीच्या ‘अशिक्षितपणा’च्या आरोपाचे खंडन त्यांनी केले आहे. शिवाजीस आपले राज्य स्थापन करताना उत्तरेस मोगलांची सत्ता व पूर्व आणि दक्षिण या दोन बाजूंस विजापूरची अदिलशाही सत्ता यांचा उपद्रव होत असे. म्हणून दोघांचाही बंदोबस्त करण्यास त्याला समुद्रावरील आरमाराची जरुरी भासली. (पृष्ठ क्र. ९२)
‘कान्होजी आंग्रे यांच्या पश्चात आरमाराची शक्ती भाऊबंदकीमुळे कमी झाली..’ या निवेदनास इतर ग्रंथांतूनही दुजोरा मिळतो. ‘मराठय़ांच्या आरमाराचा खर्च प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये होता. आरमाराचा स्वतंत्र सुभा असून, त्यांचे खर्चासाठी सौंदमहाल स्वतंत्रपणे तोडून दिला होता. स्वदेशी सागर व्यापार करण्यात बहुधा गुजराती, भाटय़े, मुसलमान व सारस्वत (कारवारी) यांचा भरणा असे. खुणेसाठी जहाजांवर भिन्न भिन्न निशाणे लावून ‘मालवी’ नामक दिशा पाहण्याचे होकायंत्र, दुर्बिणी वगैरे सामान मराठा आरमाराजवळ असे.’ (पृष्ठ क्र. ११४-१५)
पुढील दोन प्रकरणांत ब्रिटिशांचे हिंदी आरमार, ब्रिटिशांनी हिंदी नौकानयनाची पद्धतशीरपणे अवहेलना कशी केली व देशी व्यवसाय नष्ट करून ब्रिटिश कंपन्यांना फायदा होईल अशी नियमावली कशा पद्धतीने राबवली, याचे विस्तृत निवेदन आहे. किंबहुना, पुस्तकाचा मुख्य हेतू याच दोन प्रकरणांत आहे. त्यासंबंधीचा मजकूर असा : ‘हिंदुस्थानात तयार झालेल्या बोटी स्वस्त पडत आणि दीर्घकाळ टिकत असत. त्यासाठी बोटी हिंदुस्थानात तयार करून त्यावर खलाशी व नाविक मात्र ब्रिटिश, युरोपीय हेच जास्त असत.’
‘इंग्लंडात जे बोटींचे कारखानदार होते, त्यांनी आपली बाजू अधिक रंगवून हिंदी जहाजावरून मालाची वाहतूक चालू ठेवल्यास इंग्लंडचे बोटी करणारे कारखाने खास बुडतील व धंदाच नष्ट होईल असे मत दिले. त्यामुळे सिलेक्ट कमिटीच्या रिपोर्टअन्वये पार्लमेंटने हिंदी खलाशी व बोटी वापरण्यास मनाई करणारा कायदा पास केला. यास अ‍ॅक्ट ५५ जॉर्ज ड चॅप्टर ू७५क सेक्शन ६ असे म्हणतात.’ (पृष्ठ १५३) अशा उपायांमुळे १८५७ मध्ये हिंदी मालकीच्या व बनावटीच्या ३४,२८६ बोटी व्यापारात होत्या. त्यांची संख्या १९०० मध्ये १६७६- म्हणजे जेमतेम ५ % इतकी खाली आली. (पृष्ठ १५५)
हिंदुस्थानात नाविक शिक्षण देणाऱ्या शाळा, कॉलेजे यांना ब्रिटिशांनी शिकस्तीने परवानगी दिली. पण त्यातून बाहेर पडणाऱ्या कॅडेट्सना नोकऱ्या मिळेनात. यासंबंधी १९३७ साली अ‍ॅसेंब्लीत वादविवाद झाला. परंतु हिंदुस्थान सरकारने त्यासाठी काहीच मदत केली नाही.
दहाव्या प्रकरणात हिंदी नौकानयनाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न कसे व कोणी केले, याची सविस्तर हकिगत आहे. ‘१८६० ते १९२५ पर्यंत हिंदी नौकानयनाचा धंदा परत आणण्यासाठी चिकाटीचा प्रयत्न करणाऱ्या कमीत कमी १०२ कंपन्या निघाल्या. त्यांचे भागभांडवल ४६ कोटी रु. होते व सर्व रजिस्टर्ड कंपन्या होत्या. पण परकीय सत्तेमुळे प्रोत्साहन, सहाय्य न मिळाल्याने १९४३ साली त्यातली फक्त सिंदीया स्टीम नेव्हिगेशन कंपनी तग धरून राहिली.’ (पृष्ठ क्र. ८९) शेवटच्या प्रकरणात रॉयल इंडियन नेव्हीसंबंधी माहिती आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास समजून घेताना प्रस्तुतचे पुस्तक राजकीय पारतंत्र्याने आर्थिक पारतंत्र्यही कसे आले, हे समजावून सांगते.

‘हिंदुस्थानचा सागर विक्रम’
अथवा हिंदवासीयांच्या प्राचीन व अर्वाचीन सागरावरील चळवळीच्या माहितीची टिपणे,
लेखक- डॉ. भास्कर महादेव टेंबे
प्रकाशक- स्वत: लेखक. प्रकाशन वर्ष- १९४३, मूल्य २ रु.
vazemukund@yahoo.com

First Published on August 16, 2015 2:15 am

Web Title: india ocean victory
टॅग Victory
Next Stories
1 सापांची मनोरंजक दुनिया
2 सहवास सारस्वतांचा!
3 स्वकेंद्रित स्मरणरंजन
Just Now!
X