अलीकडेच जर्मनीत झालेल्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कांस्यपदक पटकावण्याची करामत केली. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो राणी रामपाल, नवनीत कौर, मनजीत कौर, नवज्योत आणि मोनिका या हरयाणातील शाहबाद हॉकी अकादमीच्या पाच खेळाडूंनी! शाहबाद या छोटय़ाशा गावाने आजवर जवळपास ५० च्या वर आंतरराष्ट्रीय हॉकीपटू देशाला दिले आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणाऱ्या या छोटय़ाशा खेडय़ातील खेळाडूंच्या संघर्षांची आणि जिद्दीची कहाणी..
हरयाणा हे सुजलाम् सुफलाम् असं शेतीप्रधान राज्य. तांदूळ, ज्वारीची प्रचंड लागवड.. दूरवर नजर जाईल तिथवर पसरलेली सुखद हिरवाई.. शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी.. असं नजरेला सुखावणारं दृश्य सर्वत्र पाहायला मिळतं. येथील हवामानही टोकाचंच.. कडक थंडी आणि तीव्र उन्हाळा. पावसाळा केवळ एक ते दीड महिनाच. त्यामुळे या प्रतिकूल वातावरणाशी झुंजताना तावूनसुलाखून निघणारी इथली माणसं. हरियाणवी माणसांची देहयष्टी पाहिल्यावर त्यांची मेहनत आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द प्रत्ययाला येते. इथला बराच मोठा वर्ग मध्यमवर्गात मोडणारा. त्यांचे उत्पन्नाचे साधन फक्त शेती व सरकारी नोकऱ्या. त्यातही सरकारी नोकरी मिळवायची तर उच्चशिक्षित असणे किंवा खेळाच्या मैदानात बाजी मारणे अत्यावश्यक. त्यामुळे जवळपास ९० टक्के लोकांचा व्यवसाय शेतीचाच. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बऱ्याच जणांकडे स्वत:ची शेतीही नाही. त्यामुळे जीवनसंघर्ष आणखीन तीव्र झालेला. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हरयाणाच्या अनेक खेळाडूंनी देशी-विदेशी मैदानांवर बाजी मारून आपले जीवनमान सुधारले. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
अशापैकी शाहबाद मारकंडा हे कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. ज्या कुरुक्षेत्रावर महाभारत घडले, त्या या ऐतिहासिक स्थळाविषयी आत्मीयता होतीच.  शाहबाद हे भगवान शंकराचा भक्त असलेल्या ऋषी मरकडेय यांच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेलं ठिकाण. लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास. कच्च्या विटांची घरं. घरासमोर पाळीव जनावरं. प्रत्येकजण कामामध्ये गुंतलेला. त्यामुळे दुसऱ्याकडे लक्ष देण्यास कुणास फुरसद नाही. महाभारतातील युद्धामुळे कुरुक्षेत्र अजरामर झाले, तसेच शाहबादच्या रणरागिणींनी आपल्या गावाला जगाच्या नकाशावर आज अढळ स्थान प्राप्त करून दिलं आहे. परंतु याची कल्पनाही इथल्या माणसांना नसावी- इतकी ती कामांत गुंतलेली. या गावाने देशाला जवळपास ४५ ते ४८ आंतरराष्ट्रीय हॉकीपटू दिले, यावर जराही विश्वास बसत नव्हता. नुकत्याच जर्मनीत झालेल्या ज्युनियर महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले. भारताच्या या विजयात शाहबाद गावातल्या शाहबाद हॉकी अकादमीच्या पाच मुलींनी मोलाचा वाटा उचलला होता. पण कुठेही त्यांच्या कामगिरीची दखल घेणारी पोस्टर्स दिसली नाहीत, ना बॅनर्स. गावातल्या बऱ्याच जणांना याविषयी कल्पनाही नव्हती. त्यामुळे या मातीत असं दडलंय काय, याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली होती.
मुख्य गावापासून दोन ते तीन कि. मी. अंतरावर असलेली शाहबाद हॉकी अकादमी. तिथपर्यंत जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे अकादमीत पोहोचण्यासाठी चांगलीच तंगडतोड करावी लागते. आत शिरल्यावर जणू सर्कस सुरू असल्याचा भास होतो. हातात हंटर असणारा प्रशिक्षक आपल्या तालावर जसा प्राण्यांना नाचवतो, त्याप्रमाणे हातातल्या हॉकी स्टिकने आदेश देणाऱ्या एका पंजाबी प्रशिक्षकाच्या इशाऱ्यानुसार सर्व सूत्रे हलत होती. राज्याचा क्रीडामंत्री असो वा उच्चपदस्थ अधिकारी- अकादमीत सराव करणाऱ्या शिबिरार्थीव्यतिरिक्त कुणालाही इथे प्रवेश दिला जात नाही. प्रसारमाध्यमांना तर अकादमीत प्रवेश निषिद्धच. परंतु मी मुंबईहून आल्याचे सांगितल्यावर तासभर सराव पाहण्याची संधी मिळाली. हॉकीवरील चित्रपट काढणाऱ्या मंडळींनी २० दिवस स्टेडियमची जी काही वाट लावली, त्यामुळे कॅमेरा असणाऱ्या कुणालाही आता इथे प्रवेश दिला जात नाही, असे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
डोक्यावर पगडी, त्यावर परिधान केलेली टोपी अशा पेहेरावातला प्रशिक्षक समोर आला आणि तुमची १५ मिनिटे झाली आहेत, तुम्ही तुमचं काम आटोपून बाहेर निघा,’ असा त्याने वरच्या पट्टीत दम दिल्यानं पायाखालची जमीन सरकल्याचाच भास झाला. तो प्रशिक्षक म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कारविजेते बलदेव सिंग. सैन्यातील जवानांपेक्षाही कडक शिस्तीचा माणूस. पण कसबसे त्यांना बोलते केल्यावर त्यांनी आजवर घेतलेल्या अथक परिश्रमांची कहाणी उलगडत गेली. शाहबादमध्ये १९९२ मध्ये हॉकीची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर अनेक संकटे आ वासून उभी होती. आर्थिकदृष्टय़ा मागास आणि शिक्षणाचा अभाव असलेल्या येथील खेडय़ापाडय़ातील मुलांना आणि त्यांच्या पालकांना हॉकीविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे हॉकीचे मैदान बनविण्यापासून ते मुलींना हॉकी या खेळाकडे आणण्याकरता अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पाच-सहा महिने कुणीच फिरकलं नाही. आपले प्रयत्न फोल ठरणार की काय, अशी भीती त्यांना वाटत होती. मैदानासाठी सरकारदरबारी असंख्य फेऱ्या मारल्या, पण कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी शाळेकडे मोर्चा वळवला. श्री गुरू नानक प्रीतम सीनिअर सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांनी खेळाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे शाळेचे पटांगण हॉकीच्या सरावासाठी उपलब्ध झाले. अडीच एकर जमिनीवरील खाचखळगे आणि दगड-विटा बाजूला केल्यानंतर गवतावरच हॉकीचा सिलसिला सुरू झाला. प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून आणि नंतर त्यांच्या पालकांचे मन वळवून मुलींना हॉकीकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. हरयाणातील कट्टर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे यात मोठीच बाधा येत होती. आपल्या मुलींनी टी-शर्ट, स्कर्ट घालून खेळण्याला लोकांचा विरोध होता. अखेर जेमतेम २० पालकांनी समाजाचा रोष पत्करून आपल्या मुलींना हॉकी खेळण्यास परवानगी दिली. अकादमीतील कडक शिस्त आणि कठोर मेहनत यामुळे एक-दोन वर्षांतच त्यापैकी १०-१२ मुलींनी हॉकीला अलविदा केला. अविरत प्रयत्न करूनही हॉकी रुजण्याचे कोणतेही सकारात्मक संकेत मिळत नव्हते. अशा निराश वातावरणात १९९४ साली शाहबाद हॉकी अकादमीचे भाग्य अकस्मात पालटले. एका स्पर्धेत शाहबादचा मुलींचा संघ विजयी ठरला आणि त्यांना रोख रकमेचे इनाम मिळाले. या संघातील काही मुलींची भारतीय संघात निवड झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय स्टील प्राधिकरण लिमिटेड (सेल) यांच्याकडून काही मुलींना शिष्यवृत्तीही मिळाली. अशा तऱ्हेने हॉकी हे पैसे मिळवण्याचे आणि कुटुंबाचे दारिद्रय़ दूर करण्याचे साधन आहे, ही खात्री पटल्याने अनेक मुली शाहबाद हॉकी अकादमीकडे आकर्षित झाल्या. १५ वर्षे अथक परिश्रम घेत अखेर शाहबादच्या मुलींनी भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. इथूनच खऱ्या अर्थाने शाहबाद हॉकी अकादमीला झळाळी मिळाली.
अकादमीत येणाऱ्या ९९ टक्के मुली गरीब कुटुंबांतल्या असतात. त्यांची जिद्द व संघर्षांची कथा ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी अर्जुन पुरस्कारविजेती जसजीत कौर सांगते, लहानपणीच माझे पितृछत्र हरपले. त्यामुळे आई माहेरी परतली. माझ्यासह चार मावश्यांची जबाबदारीही आईवर पडली. खाण्यासाठी घरात अन्न नसायचे. त्यामुळे कित्येक दिवस आम्ही एक वेळ जेवून रात्री पाणी पिऊन झोपायचो. मी त्यावेळी जेमतेम सहा वर्षांची होते. आईसह माझ्या मावश्यांनी गरिबीची झळ माझ्यापर्यंत सहसा पोचू दिली नाही. पाचही जणी कामासाठी सकाळी बाहेर पडायच्या. त्यामुळे माझा सांभाळ कुणी करायचा, हा प्रश्न भेडसावू लागला. आपण जे सोसले ते आपल्या मुलीच्या वाटय़ाला येऊ नये.. तिने चांगले शिक्षण घ्यावे अशी आईची इच्छा होती. म्हणूनच माझ्याबरोबरच्या अन्य मुलींप्रमाणे तिने माझी शाहबाद हॉकी अकादमीत रवानगी केली. सकाळी पाच वाजता मी अकादमीत यायचे. तीन-चार तास कठोर सराव करायचे. त्यानंतर शाळेत जायचे. शाळेतून पुन्हा अकादमीत येऊन सराव करायचा आणि रात्री दहा वाजता घरी परतायचे. हा शिरस्ता जवळपास सात-आठ वर्षे सुरू होता. हॉकीसाठी लागणारी साधनसामुग्री घेण्याची आमची ऐपत नव्हती. पण बलदेव सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी आमच्याकडून हॉकीचे धडे गिरवून घेतल्याने मला भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली. खेळात पैसे मिळू लागल्याने त्या बळावर मी घरचे दारिद्रय़ दूर करू शकले.’’
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या खेळाची छाप पाडणाऱ्या आणि १८ व्या वर्षीच भारतीय हॉकीची राणी’ बनलेल्या राणी रामपाल हिचा संघर्षही थक्क करणारा आहे. हिरा कोळशाच्या खाणीतच सापडतो, हे राणीच्या घराकडे पाहिल्यावर समजते. घरात प्रवेश केल्यावर समोर येणारे घोडे, डोक्यावर सरपणाची लाकडे घेऊन येणारी तिची आई, गाईच्या शेणाने सारवलेले घर.. वडील पाचवी शिकलेले. व्यवसायाने टांगाचालक. दिवस-रात्र मुलांच्या भवितव्यासाठी कष्ट करण्यात गुंतल्याने त्यांना मुलांकडे जराही लक्ष देता आले नाही. पण राणीचा हॉकीप्रवास कथन करताना रामपाल यांच्या डोळ्यांत आपसूक अश्रू तरळतात. आम्ही गरीब कुटुंबातले. त्यामुळे हॉकीविषयी कोणतेच ज्ञान नव्हते. चौथीत असताना राणी आपल्या मैत्रिणींसोबत शाहबाद हॉकी अकादमीत पोहोचली आणि तिने मला हॉकी खेळायचे आहे,’ असा हट्टच धरला. आमच्या समाजात कोणत्याही मुलीने आजवर घराची चौकट ओलांडली नव्हती. पण राणीच्या जिद्दी स्वभावासमोर आम्ही नरमलो. समाजाने आम्हाला वाळीत टाकले. कुणीही आमच्याशी बोलत नव्हते. आमच्यावर टीका-टोमण्यांच्या वर्षांव होत होता. आमचे जगणे असह्य झाले होते. पण आम्ही हार मानली नाही. असंख्य वेदना आम्ही पचवल्या. पण राणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावल्यानंतर तोच समाज आता तिचे गुणगान गातो आहे. आम्हाला आदरार्थी वागणूक देतो आहे. इतकेच नव्हे तर आपल्या मुलींना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आज दोन मुलांपेक्षा एक मुलगी असल्याचा गर्व मला अधिक आहे.’’
जसजीत किंवा राणी रामपाल यांचा हा संघर्ष केवळ एकटी-दुकटीचा नाही, तर इथल्या जवळपास प्रत्येकीलाच खडतर परिस्थितीतून जावे लागले आहे. काहींचे वडील टांगाचालक, तर काहींचे बसचालक. काहींनी आई-वडील लहानपणीच गमावलेले. त्यामुळे घरची व भावंडांची जबाबदारी बालपणीच त्यांच्या खांद्यावर आलेली. अशा परिस्थितीत खडतर काबाडकष्ट हाच पर्याय त्यांच्यासमोर होता. कित्येकींना हॉकी खेळण्याची इच्छा असली तरी स्त्रियांनी घराची वेस न ओलांडता फक्त चूल आणि मूल सांभाळावे, हीच बहुसंख्य कुटुंबांची धारणा होती. तरीही काही मुलींनी घरच्यांचा, समाजाचा विरोध पत्करून हॉकीला आपलेसे केले. काहींना या प्रवासात यश मिळाले. तर अपयशी ठरलेल्या अनेकींचा संघर्ष अद्यापि जारी आहे.
शाहबाद हॉकी अकादमीतील यशाचा मूलमंत्र म्हणजे बलदेव सरांची कडक शिस्त. इथं चालणारा सराव सकाळ तसेच दुपार-संध्याकाळ अशा दोन सत्रांतला. एक मिनिटही शिबिरात उशिरा आलं की आता कोणत्या शिक्षेला सामोरे जावे लागणार, या कल्पनेनेच मुलींना धडकी भरते. त्यामुळे काहींना झोपेतही हातात हॉकी स्टिक घेऊन असलेले बलदेव सर दिसतात. सूर्योदयापूर्वी सकाळी पाच वाजताच सरावास सुरुवात होत असल्याने अंधाऱ्या रस्त्याने, कधी भरपावसात अकादमी गाठायची, हा या मुलींचा वर्षांनुवर्षांचा शिरस्ता. गेल्या २५ वर्षे शिबिरात एका दिवसाचाही खंड पडलेला नाही. कोणत्याही सणाला किंवा रविवारचीदेखील सुट्टी नाही. मग हाडे गोठवणारी थंडी असो वा पावसाळा.. आजारी असो वा मासिक पाळीची समस्या असो- शिबिराला दांडी मारण्याची कुणालाच परवानगी नाही. एक दिवस जरी खंड पडला तरी शिबिरातून कायमची हकालपट्टी! कोणत्याही परिस्थितीत शिबिरात वेळेवर हजर राहणे सक्तीचे. त्यामुळे बाहेरगावच्या मुलींना या शिबिरात स्थान नाही. सराव करताना मोबाइल वापरणे दूरच; टंगळमंगळ करणाऱ्यांनाही कठोर शिक्षा होते. सराव करताना साधी चूक झाली तरी बलदेव सर वा सीनियर खेळाडू हातातील स्टिकने त्या मुलीच्या हातावर कठोर प्रसाद देतात. कसलीही हयगय इथे अमान्य.
अकादमीत स्थान मिळवण्याकरता जातपात, धर्म, वय, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जात नाही. साधारणत: आठते दहा वर्षांच्या मुला-मुलींना शिबिरात प्रवेश दिला जातो. त्याआधी त्यांची शारीरिक क्षमता आणि बौद्धिक पात्रतेची चाचणी घेतली जाते. सहा महिन्यापर्यंत तो मुलगा किंवा मुलगी वेळेवर येतो की नाही, सराव करतानाची मेहनत आणि तो किंवा ती पुढे कोणत्या स्तरापर्यंत हॉकी खेळू शकेल, याचा अंदाज बांधून अकादमीत दाखल करून घेतले जाते. अ‍ॅस्ट्रो टर्फवर वेगाने चेंडू येत असल्याने सुरुवातीला लहान मुलांना गवतावरच हॉकीचे बाळकडू पाजले जाते. वर्षभराच्या मेहनतीनंतर त्याची खेळ आकलन करण्याची, निरीक्षण करण्याची क्षमता यांवर अधिक लक्ष दिले जाते. सुरुवातीची दोन-तीन वर्षे तांत्रिकतेवर भर दिल्यानंतर त्यांच्या सरावाचे वेळापत्रक आखले जाते. त्याचबरोबर डाव्या की उजव्या बाजूने तो खेळाडू चांगली कामगिरी करेल, हे समजून घेऊन त्याला तसे प्रशिक्षण दिले जाते. मुलगा/ मुलगी एकदा मोठे झाले की त्यांची अन्य शिबिरांमध्ये रवानगी केली जाते.
अकादमीतील वातावरण बिघडू न देण्यासाठी बलदेव सिंग यांचे सर्वावर बारकाईने लक्ष असते. बदललेल्या जमान्याविषयी ते नाराजी व्यक्त करतात. समाजातील अनिष्ट चालीरीतींमुळे ते खचून गेले आहेत. जमाना बदलल्यामुळे पंजाबी ड्रेसवर हॉकी खेळणाऱ्या मुली आता टी-शर्ट आणि स्कर्टवर खेळू लागल्यात. पण गेल्या काही वर्षांत चित्रपट आणि टीव्ही मालिकांचा प्रभाव शिबिरावर होऊ लागला आहे. चित्रपट व मालिकांमुळे अकादमीतील शिस्त कमी होत चालली आहे. चांगली हॉकी खेळणाऱ्या अनेक मुली वाईट मार्गाला जाऊ लागल्या आहेत. पूर्वीच्या मुलींमध्ये आढळणारी हॉकीसाठी काहीही करण्याची वृत्ती आता लोप पावत चालली आहे. १५-२० वर्षे हॉकीचे धडे गिरवणाऱ्या मुली लग्न झाल्यानंतर हॉकीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. अनेक मुली लग्न करून परगावी गेल्या. त्यामुळे अनेकींची कारकीर्द बहरण्याआधीच कोमेजली. या अशा गोष्टींमुळे तीन वेळा प्रशिक्षकपदी मुदतवाढ मिळालेल्या बलदेव सिंग यांची उमेद आज वयाच्या ६३ व्या वर्षी खचू लागली आहे.
शाहबाद हॉकी अकादमीला यशोशिखरावर पोहोचवण्यात सिंहाचा वाटा आहे तो बलदेव सिंग यांचा! विद्यापीठ स्तरावर हॉकी खेळणारे बलदेव हे लुधियाणातले श्रीमंत जमीनदार. वडिलोपार्जित ऐश्वर्य उपभोगत न राहता त्यांनी हरयाणाच्या क्रीडा विभागाच्या उपसंचालकपदाची जबाबदारी स्वीकारली. २४ तास फक्त हॉकीचाच विचार करणाऱ्या बलदेव सिंग यांनी आपले आयुष्य हॉकीसाठी समर्पित केले आहे. पत्नी व मुलीला लुधियाणामध्ये ठेवून त्यांनी शाहबादमध्ये आपले बस्तान ठोकले आहे. महिन्यातून फक्त एकदाच- तेही फक्त काही तासांसाठी ते पत्नी व मुलीला भेटण्यासाठी लुधियाणाला जातात. शाहबाद हॉकी अकादमी हेच त्यांचे घर बनले आहे. अनेक मुलींच्या शिक्षणाची, त्यांच्या पौष्टिक आहाराची तसेच त्यांच्या घरच्यांचीही जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मुलींनी मनमोकळेपणी कोणत्याही तणावाशिवाय हॉकीवर लक्ष केंद्रित करावे, हेच यामागचे  त्यांचे उद्दिष्ट. इतकेच नव्हे तर सकाळचे शिबीर आटोपून मुली शाळेत जातात की नाही, याकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असते. एखादी मुलगी वाईट मार्गाला गेल्याचे समजल्यास ते कडक भाषेत तिला समज देतात. अकादमीतील मुलींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी आणि नोकरी मिळाल्यावर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी, हीच त्यांची एकमेव इच्छा. याचसाठी त्यांचा हा सारा खटाटोप सुरू आहे.
१५ वर्षे गवतावरच सराव करताना सुमारे २० आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्यानंतर अखेर २००५ मध्ये हरयाणा सरकारने शाहबाद हॉकी अकादमीला अ‍ॅस्ट्रोटर्फ बसवून दिले. १५० मुली एकाच वेळी सराव करत असल्याने आता हे अ‍ॅस्ट्रोटर्फही अपुरे पडू लागले आहे. फ्लडलाइट्स, राहण्याची सुविधा, अत्याधुनिक जिम्नॅशियम, जलतरण तलाव यांसारख्या कोणत्याही अत्याधुनिक सोयीसुविधा नसतानाही शाहबादच्या मुलींनी घेतलेली झेप थक्क करणारी आहे.
बलदेव सिंग आणि शाहबाद हे जणू समीकरणच बनले आहे. आजच्या घडीला शाहबादमध्ये हॉकी जिवंत आहे ती केवळ बलदेव यांच्यामुळेच. हार’ हा शब्दच बलदेव सिंग यांच्या डिक्शनरीत नाही. सुरुवातीची काही वर्षे रेल्वे, पंजाब, ओरिसा, झारखंडसारख्या संघांकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर गेल्या १५ वर्षांत हरयाणाचा मुलींचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही. गेली दीड दशके हरयाणाचा महिला हॉकी संघ राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवून आहे. हरयाणाची बरोबरी करणारा एकही संघ आज देशात नाही.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शाहबाद हॉकी अकादमीतील मुलींनी देशाचे नाव आज उज्ज्वल केले आहे. आतापर्यंत ३५ महिला आणि १२ पुरुष आंतरराष्ट्रीय हॉकीपटू शाहबादने देशाला दिले आहेत. संजीव कुमार डंग आणि संदीप सिंग यांसारखे पुरुष ऑलिम्पियन हॉकीपटू शाहबादने देशाला दिले. सुरेंदर कौर, जसजीत कौर (अर्जुन पुरस्कारविजेती), त्याचबरोबर भूपिंदर कौर, संदीप कौर, सुमन बाला, गुरप्रीत कौर, सिमरजीत कौर, बलविंदर कौर, राजविंदर कौर (भीम पुरस्कारविजेती) (महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराच्या धर्तीवरील प्रतिष्ठेचा हरयाणा सरकारच्या सर्वोत्तम क्रीडा पुरस्कार!) यांसारख्या शाहबादच्या अनेक महिला हॉकीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तथापि आपल्या कुटुंबाचा भार पेलण्यासाठी त्यांना आज गरज आहे ती नोकऱ्यांची. त्यांच्या खांद्यावरील आर्थिक बोजा सरकारने पेलला तर त्यांना अधिक जोमाने खेळता येईल. देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवता येईल. शाहबाद हॉकी अकादमीची वाटचाल अशीच कायम राहिली तर भविष्यात महिला हॉकीतही आपल्याला ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न बाळगता येईल. शेतात नांगर फिरवून जमिनीतून सोनं उगवावं तसं हरयाणानं देशाला क्रीडाक्षेत्रातही अनेक अनमोल रत्नं दिली आहेत. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदकं मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्यात हरयाणाच्या खेळाडूंचा वाटा होता तब्बल चार पदकांचा! आता २०१६ च्या रिओ डी’ जानेरो ऑलिम्पिक स्पर्धेत हरयाणाने किमान दहा पदकांची अपेक्षा बाळगली आहे!!